सवयींचे सोपे मानसशास्त्र

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आरोग्य संपदा
 

एखादी क्रिया सतत करत राहणे म्हणजे सवय आणि सवय झालेली एखादी गोष्ट करता न आल्यास जर अत्यंत तडफड होत असेल, तर ते व्यसन. अशी सवयीची आणि व्यसनांची व्यवहारी भाषेत व्याख्या केली जाते. 

प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्य म्हणजे आपल्या असंख्य सवयींची गोळाबेरीज असते. आयुष्याला जो चांगला किंवा वाईट आकार येतो, जे वळण लागते त्याचे मूळ सवयींमध्ये असते. सवयींचा परिपाक आपल्या सुखात किंवा दुःखात होतो. आयुष्यात यशस्वी होणार, की अयशस्वी हे सवयींमधून घडते. वर्तणुकीतल्या, आचार-विचारातल्या नित्याच्या सवयी यातूनच व्यक्तिमत्त्व घडते.

सवयींपैकी काही आपल्या आरोग्याला, सामाजिक प्रतिष्ठेला बाधक ठरतात. कधी मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्य विपरीत सवयी बदलण्याचा आग्रह धरतात. अशा वेळेस या सवयी बदलण्याचा प्रयत्न करावाच लागतो. यावेळी प्रश्न पडतो की जुन्या सवयी कशा सोडायच्या आणि नव्या सवयी कशा आत्मसात करायच्या? 

जुन्या सवयींचा त्याग करून नव्या सवयी भिनण्यासाठी काही मनोशारीरिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. त्यांची माहिती असल्यास हे बदल घडवून आणणे सोपे जाते. 

सवयींचे शास्त्र
चार्ल्स दुहिग्ग या मानसशास्त्रज्ञाने 'दि पॉवर ऑफ हॅबिट : व्हाय वी डू? व्हॉट वी डू? इन लाइफ अॅंड बिझनेस' हा ग्रंथ लिहिला आहे. यासाठी एका युवतीवर संशोधन केले. तिने दोन वर्षांत आपल्या आयुष्यातल्या सगळ्या सवयी बदलल्या. तिने सिगारेट ओढणे सोडले, मॅरेथॉन पळायला सुरुवात केली, आहाराची पद्धत बदलली आणि काही काळाने तिच्या कामाच्या क्षमतेमध्ये कमालीची प्रगती झाली. वैद्यकीय संशोधकांनी तिच्या मज्जापेशींचा अभ्यास केल्यावर त्यात आमूलाग्र बदल घडून आल्याचे लक्षात आले.

नको असलेली सवय सोडून देण्याकरता आणि चांगली सवय अंगात बाणवण्यासाठी सवयींच्या मनोविज्ञानाची थोडी माहिती असावी लागते. कुठलीही सवय अंगवळणी पडण्याचे ४ टप्पे असतात. १. स्वयंसूचना, २. तल्लफ किंवा ओढ, ३. प्रतिसाद किंवा कृती 
४. पुरस्कार, बक्षीस किंवा समाधान. 

एका शास्त्रीय मतप्रवाहानुसार उत्क्रांतीमध्ये आपल्या मेंदूच्या रचनेत नवीन काम सामोरे आले, की मेंदू त्या कामाच्या माहितीचे तर्कदृष्ट्या सुसंगत विघटन करून त्या घडण्याच्या क्रमानुसार छोटे तुकडे करतो. नंतर त्यांच्या तर्कसंगत क्रमानुसार ते पुन्हा एकत्र करून त्याला सवयीमध्ये रूपांतरित करतो आणि हा क्रम कायमचा स्मृतीत सांभाळतो. मानसशास्त्रात याला 'चंकिंग' म्हणतात.

या वैज्ञानिकांच्या मते आपला मेंदू आपला कार्यभार काम कमी करण्याचे मार्ग शोधत असतो. एखाद्या कार्याचे सुसूत्रपणे कार्यप्रणालीमध्ये रूपांतर करून त्याचे स्वभाव अथवा सवयीत रूपांतर केले जाते. ही सवय लागली की वर सांगितल्याप्रमाणे सूचना, ओढ किंवा तल्लफ, प्रतिसाद आणि बक्षीस किंवा समाधान. या चार गोष्टी मेंदूमध्ये एकापाठोपाठ एक अशा चक्रामध्ये सुरू राहतात. 

या चार घटना स्वयंचलितरीत्या म्हणजे ऑटोमोडमध्ये निर्णय घेतात, की या सूचनेला कोणत्या सवयीचा वापर करायचा. एखादी सवय निर्माण झाली, की मेंदूची चांगल्या वाईटाची निर्णय क्षमता थांबते आणि संपूर्णपणे स्वयंचलितरीत्या काम सुरू होते. या चार गोष्टी आपल्या मेंदूच्या कार्यात पक्क्या बसलेल्या असतात. कोणत्याही सवयीबाबत मेंदू आणि मज्जासंस्था याच चार टप्प्यातून मार्गक्रमण करतात.

स्वयंसूचना : सर्वांत प्रथम एखाद्या समाधानाचा किंवा बक्षिसाचा मोह यामुळे मनात किंवा विचारात स्वयंसूचना निर्माण करतो. मेंदूला ती स्वयंसूचना मिळते आणि आपल्या वर्तनाला प्रेरित करणारे संदेश मेंदूतून जाऊ लागतात. 
तल्लफ किंवा ओढ : अमुक एक केले, तर मला तमुक गोष्ट मिळेल आणि समाधान किंवा आनंद मिळेल या सूचनेचे रूपांतर मग ती गोष्ट केलीच पाहिजे या विचारात आणि त्यासंबंधीच्या वर्तनात होते. नियंत्रणापलीकडची ही एक तीव्र प्रेरणा असते. तिला अनुसरून मेंदू तसे वर्तन करण्याची आज्ञा देतो आणि त्यानुसार आपण ती गोष्ट करतो. यामागे ते समाधान मिळवण्याची ओढ असते. 
प्रतिसाद : सूचना मिळाल्यावर ओढ निर्माण होते आणि त्या तीव्र इच्छेतून आपण जे वागतो किंवा जो विचार करतो ती गोष्ट. म्हणजेच सवय किंवा व्यसन म्हणतात. या वर्तनाला जेवढे जास्त अडथळे असतील किंवा प्रखर विरोध असेल तेवढी ती गोष्ट घडण्याची शक्यता कमी असते. 
समाधान : कोणत्याही सवयीच्या किंवा व्यसनाच्या चक्रातला हा अंतिम टप्पा असतो.

  • स्वयंसूचना ही समाधान जाणून घेणारी यंत्रणा असते. 
  • ते समाधान मिळण्यासाठी होणारी तगमग ही ओढ असते. 
  • ते समाधान मिळवण्यासाठी केलेली हालचाल आणि धडपड म्हणजे प्रतिसाद असतो.
  • यातून जे फलित मिळते त्यातून समाधान आणि आनंद तर मिळतोच, पण काही शिकवण देऊन जाते. 

 कुठल्याही समाधानाचे मुख्य काम तुमची तीव्र ओढ तृप्त करणे. अन्नपाण्याची ओढ आपली भूक भागवते, शरीराला ऊर्जा देते, कामातील बढती आपल्याला जास्त आर्थिक प्राप्ती देते, स्टेटस वाढवते. समाधानातून आणखी एक गोष्ट मिळते, ती म्हणजे मेंदूमध्ये त्या समाधानाचा एक ठसा उमटतो, एक सुखद स्मृती होते. 

क्रियांचे सवयीत रूपांतर
मानसशास्त्राच्या संशोधनात एखादी गोष्ट आपण वीस किंवा त्यापेक्षा जास्त वेळा केली, तर त्याची आपल्याला सवय होऊन जाते. एखादे नवे वागणे जेव्हा सतत होते, तेव्हा त्याला 'सवय' म्हणतात.

एका वैज्ञानिक प्रयोगात उंदराला एका विशिष्टरीत्या तयार केलेल्या लाकडी चक्रव्यूहात सोडले. त्या पिंजऱ्यात पलीकडच्या बाजूस एक चॉकलेट ठेवलेले होते. सुरुवातीला उंदराला चॉकलेटपाशी पोचायला खूप वेळ लागायचा. थोड्या दिवसांनंतर चॉकलेट गाठण्यासाठी लागणारा वेळ नंतर कमी कमी होत गेला. काही दिवसांनंतर खूप कमी वेळात तो उंदीर चॉकलेटपर्यंत पोचू लागला. त्या चक्रव्यूहामधल्या अवघड रस्त्याची उंदराला 'सवय' झाली. सुरुवातीला उंदराच्या मज्जापेशींचे कार्य खूप जास्त वेगात व्हायचे. जसजसे दिवस उलटत गेले आणि सवय निर्माण होऊ लागली, तसतसा मेंदूचा कार्यातला प्रत्यक्ष सहभाग कमी होत गेला. यातून हे सिद्ध झाले की - 

  •      कामात वेग आणि कौशल्य आले, की मज्जापेशी पेशींचे कार्य सुस्तावते.
  •      एखाद्या गोष्टीची सवय झाली, की मेंदूचा त्यातला सहभाग कमी होतो. 

या साऱ्या बाबतीत एक पक्की गोष्ट असते. कुठलीही सवय एकदा निर्माण झाली, की त्याचे नित्यक्रमात रूपांतर होते आणि ते स्वयंचलित होते. उदाहरणार्थ, सकाळी उठल्या उठल्या चहा लागतोच. त्यानंतर हात सिगारेटच्या पाकिटाकडे जातो. म्हणजेच चहा, सिगारेटची सवय झाली आहे. त्याविरुद्ध उठल्या उठल्या तोंड धुऊन व्यायामाचे कपडे आणि बूट घालायची क्रिया आपोआप होऊ लागली, की समजा तुम्हाला नियमित व्यायामाची सवय झाली.

सवयींचे चक्र सुरू झाले, की ते मेंदूच्या स्मृती विभागात 'चंकिंग' होऊन कोरले जाते. पण त्याचबरोबर एखादी गोष्ट परत परत टाळत राहून नवी गोष्ट केली, तर जुन्या सवयी मोडतात आणि नव्या सवयी अंगवळणी पडतात. 
चांगल्या सवयी लागण्यासाठी
या साऱ्या मनोशारीरिक अभ्यासातून मानसशास्त्रज्ञांच्या मते, खालीलप्रमाणे चांगल्या सवयी लागू शकतात -
१. सूचना : आपल्याला चांगली सवय अंगीकारायची असेल, तर ज्या ईप्सितासाठी त्या बाळगायच्या आहेत, त्याचे चिंतन करा. त्यातल्या चांगल्या वाईट बाजूंचा विचार करा.

२. ओढ : आपल्याला त्या ईप्सिताची जी ओढ आहे, ती आपल्या मनाला आणि आजूबाजूच्या सर्वांना कशी आकर्षक आणि उत्तम वाटेल याचा विचार करा.

३. प्रतिसाद क्रिया : त्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जे काही करावे लागेल ते सोपे करा. आपल्या दैनंदिन जीवनातल्या इतर गोष्टींना धक्का लागेल असे करू नका किंवा आधीच्या नित्यक्रमात बदल करा.

४.  समाधान : ईप्सित साध्य झाले, की आनंद साजरा करा. किमान अंतर्मनात स्वतः खूश व्हा.  

वाईट सवयी टाळण्यासाठी
१. सूचना : दुर्लक्ष करा. टाळायला सुरुवात करा. उदा. सिगारेट ओढावीशी वाटत असेल, तर तासाभराने ओढू असे स्वमनाला समजवा. हळूहळू या सूचना येणे नाहीसे होईल.

२. ओढ : एखाद्या व्यसनाची ओढ टाळायची असेल, तर अशी तगमग व्हायला लागली की वेगळी क्रिया करा. पाणी प्या, व्यायाम करा, झोप काढा. त्या सवयीमुळे किंवा व्यसनामुळे होणाऱ्या अंतिम त्रासाची आणि शारीरिक व्याधींची आठवण करून ती ओढ नियंत्रित करा. 

३. प्रतिसाद : ओढ लागल्यानंतर प्रतिसाद निर्माण होऊ नये म्हणून ती गोष्ट करणे अवघड करा. सिगारेटचे पाकीट बाळगू नका. घरात सिगारेट ओढू नका. 

४. समाधान : व्यसनातून मिळणाऱ्या फलिताकडे समाधान म्हणून बघण्याऐवजी त्यातून झालेल्या हानीचा विचार करा.

व्यसन किंवा वाईट सवय लागताना, मन आणि बुद्धी दोन्ही सुप्त होत असतात आणि प्रतिसादाच्या क्रिया आपोआप घडत जातात. नेमके हेच लक्षात घेऊन सवयीमधील स्वयंचलित प्रतिक्षिप्त क्रिया होताना मन सतर्क ठेवून जर वरील चारीही क्रिया होत गेल्या तर व्यसन सोडता येते आणि चांगल्या सवयी बाणवणे शक्य होते.

यासाठी मेडीटेशन, ध्यानधारणा यांचा वापर करता येतो. धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर मॅसॅच्युसेट्‍स युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या प्रयोगांमध्ये धूम्रपानाने व्यसनाक्त असलेल्या ज्या व्यक्तींच्या औषधोपचाराला ध्यानाची जोड दिली. त्यांची धूम्रपानाची ओढ केवळ दोन आठवड्यात कमी होत गेली. तज्ज्ञांच्या मते दीर्घकालीन धूम्रपानामुळे मज्जासंस्थेवर झालेले विपरीत परिणाम ध्यानामुळे कमी होऊन मेंदूच्या कार्यात सकारात्मक बदल होऊ लागतात आणि मनुष्याची धूम्रपानाबाबत असलेली ओढ कमी होत जाते. 

सातत्याने दीर्घकाळ केलेले ध्यान तर निश्चितपणे मनुष्यास व्यसने आणि वाईट सवयींपासून परावृत्त करू शकते. ध्यानधारणेची परंपरा आपल्याकडे प्रदीर्घ काळापासून चालत आली आहे. साहजिकच सवयींचे हे मनोशारीरिक मूळ समजून घेऊन, मनाचा विचार ठाम करून, प्रखर इच्छाशक्ती निर्माण करण्यासाठी ध्यानधारणा उपयोगी पडेल हे निश्चित.

संबंधित बातम्या