पळाल्याने  मॅरेथॉन; आरोग्य येतसे फार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 27 जानेवारी 2020

आरोग्य संपदा
 

एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकातले शेवटचे वर्ष ३१ डिसेंबर २०१९ रोजी सुरू झाले. या दशकाने शारीरिक फिटनेसच्या बाबतीत एका नव्या संकल्पनेची पेरणी केली. तुम्ही कोणत्याही वयोगटाचे असा, स्त्री असा वा पुरुष, मॅरेथॉन पळा आणि शारीरिक सुदृढतेची पावती मिळवा. २०-२५ वर्षांपूर्वी केवळ कमालीच्या परिश्रमाने मिळवलेल्या स्टॅमिन्याच्या योगे पळणाऱ्या लोकांची अटीतटीची स्पर्धा म्हणून मॅरेथॉनकडे पाहिले जायचे. मात्र, आजमितीला या स्पर्धेची विविध रूपे, विविधांगांनी सतत सामोरी येऊ लागली. कर्करोगाबाबत विशेषतः स्तनाच्या कर्करोगाबाबत पिंक मॅरेथॉन किंवा पोलिओबाबत जनजागृती करण्यासाठी पोलिओ मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या जातात. त्यात पुन्हा पूर्ण मॅरेथॉन, अर्ध-मॅरेथॉन, तसेच ५ किलोमीटरपासून ३० किलोमीटरपर्यंत दर ५ किलोमीटरच्या अंतराच्या वेगवेगळ्या टप्प्यातही त्या घेतल्या जातात. 

मॅरेथॉन म्हणजे दीर्घपल्ल्याची धावण्याची शर्यत. यामधल्या पूर्ण लांबीच्या शर्यतीचे अंतर असते ४२.१९५ कि.मी किंवा २६ मैल ३८५ यार्ड. मॅरेथॉन ही शक्यतो प्रमुख रस्त्यांवरून घेतली जाते. रहदारीच्या मार्गाचा अडथळा होत असल्यास अथवा अन्य कारणांमुळे हे शक्य होत नसेल, तर रस्त्याच्या बाजूस असलेल्या फुटपाथवरून ती घ्यावी लागते. मात्र, गवताळ मार्गावरून ही शर्यत घेतली जात नाही. शक्यतो शर्यतीची सुरुवात आणि शेवट क्रीडांगणावर केला जातो. सर्व स्पर्धकांना दिसेल असे किलोमीटर किंवा मैलाच्या अंतराचे फलक शर्यतीच्या रस्त्यावर लावलेले असतात. शर्यतीच्या सुरुवातीपासून दर पाच किलोमीटर अंतरावर खेळाडूंना खाद्य पदार्थ आणि पेयपानाची सोय केलेली असते. 

इतिहासातल्या नोंदी
मॅरेथॉनची मूळ संकल्पना ग्रीक इतिहासात सापडते. प्राचीन ग्रीसमधल्या मॅरेथॉन नावाच्या गावात एक लढाई झाली. ती लढाई जिंकल्याची बातमी सांगण्यासाठी एक सैनिक तिथून अथेन्सपर्यंत धावत गेला. ते अंतर ४२.१९५ कि.मी. होते. दुर्दैवाने अवजड चिलखत आणि भलीमोठी तलवार घेऊन धावलेल्या या सैनिकाने हे अंतर अथकपणे पळत जाऊन बातमी तर दिली. मात्र, अतिश्रम होऊन विजयाचा निरोप देऊन तो गतप्राण झाला. ज्या गावी ही लढाई झाली, त्या गावाचे नाव 'मॅरेथॉन' हे स्पर्धेचे नाव झाले आणि जे अंतर तो सैनिक पळाला ते अंतर स्पर्धेसाठी अधिकृत मानले गेले.

अर्वाचीन काळातील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये या खेळाचा अंतर्भाव १८९६ पासून केला गेला. मात्र, सध्याचे अंतर ४२.१९५ कि.मी हे अंतर १९२१ पासून प्रमाणित केले गेले. जगभरात ऑलिंपिक व्यतिरिक्त हजारो ठिकाणी ती घेतली जाते. भारतातदेखील मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई या शहरातल्या मॅरेथॉन या प्रतिष्ठित समजल्या जातात. सुरतमध्ये तर नाइट मॅरेथॉन घेतली जाते. या व्यतिरिक्त पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन, नागपूर, ठाणे, वसई-विरार या महाराष्ट्रातल्या आणि लडाख, कावेरी ट्रेल, गुवाहाटी, कोलकाता येथेही या स्पर्धा आयोजित केल्या जातात.

नवे संशोधन
एखाद्या व्यक्तीने आयुष्यात प्रथम मॅरेथॉन पळाल्यास तिचे आयुष्य ४ वर्षांनी वाढते, असे नवे संशोधन या वर्षी ५ जानेवारी २०२० रोजी 'अमेरिकन जर्नल ऑफ कार्डीऑलॉजी' या जगद्विख्यात वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाले. 

युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील ज्येष्ठ प्राध्यापक आणि बार्ट्स हार्ट सेंटर आणि युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शार्लोट मॅनिस्टी यांनी हा संशोधन अहवाल मांडला आहे. लंडन मॅरेथॉनमध्ये प्रथमच भाग घेतलेल्या १३८ निरोगी स्पर्धकांच्या सुरुवातीपासून, त्यांच्या ट्रेनिंग दरम्यान आणि स्पर्धा पूर्ण करण्यापर्यंतच्या विविध वैद्यकीय चाचण्या करून त्यांनी हे संशोधन आणि त्यातले निष्कर्ष साकार केले आहेत.

डॉ. मॅनिस्टींच्या मते, ‘प्रथमच मॅरेथॉन पळण्याचे आव्हान स्वीकारून या स्पर्धकांनी जो कसून सराव केला आणि शर्यत पूर्ण केली, त्यामध्ये त्यांच्या रक्तवाहिन्यांचे काठिण्य कमी झाले. त्यांच्या रक्तवाहिन्यांचे वय तब्बल चार वर्षांनी कमी झाल्याचे आढळले.’ थोडक्यात मॅरेथॉन स्पर्धांमध्ये नियमित भाग घेणाऱ्यांचे आणि त्यासाठी नियमित सराव करणाऱ्यांचे आयुष्य वाढते.

मॅरेथॉनचे फायदे
१.    कॅलरी बर्निंग मशिन : एक मॅरेथॉन पूर्ण पळाल्यास तब्बल २६०० कॅलरीज शरीरातून नष्ट होतात. चार भिंतींनी बंदिस्त व्यायामशाळेऐवजी भल्या पहाटे खुल्या रस्त्यावर पळणाऱ्या व्यायामपटूचे आजूबाजूच्या निसर्गसौंदर्याने मन ताजे आणि तणावरहित होते आणि शुद्ध प्राणवायूच्या श्वासांनी तो आणखीनच उमदा होत जातो. दीर्घ टप्प्याच्या पण सातत्यपूर्ण  पळण्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात उष्मांक खर्ची पडत जातात. 

२.    आहारात सुधारणा : पळण्याने भूक वाढते, पण वेगाने शक्ती खर्च होत असल्याने आरोग्यमय चौरस आहार घ्यायला लागतो. पळताना लागणारी शक्ती, जोम आणि उत्साह याकरिता आहाराबाबत एक समतोल विचार, नवी दृष्टी प्राप्त होते. खाण्यामध्ये पालेभाज्या आणि फळांचा समावेश वाढून अनावश्यक खाणे आणि जंकफूडची हाव कमी होते. 

३.    हृदयाची क्षमता वाढते : मॅरेथॉन पळण्याचे कार्य पाय करीत असले, तरी त्यासाठी हृदय वेगाने स्पंदन पावत राहते आणि रक्तपुरवठा वेगाने होत राहतो. त्यामुळे हृदयाचे पंपिंग सुधारते, रक्तदाब कमी होतो, कोलेस्टेरॉलची पातळी उतरते, रक्तवाहिन्यांचा लवचीकपणा वाढतो. या साऱ्याचे पर्यवसान हृदयाची क्षमता वाढून हृदयविकाराची शक्यता दुरावते.      याबरोबरच रक्तातील शर्करा कमी होते, शरीरावरील चरबी एकप्रकारे वितळू लागते आणि वजन कमी होते. साहजिकच मधुमेह, स्थूलत्व अशा आजच्या बैठ्या जीवनशैलीमधून निर्माण होणारे आजारही या मॅरेथॉन पळणाऱ्या व्यक्तीपासून दूर पळतात. 

४.    कार्यक्षमता सुधारते : मॅरेथॉन रनर्समध्ये ४२ किलोमीटर अखंड पळण्यासाठी नियमितपणा, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, मनाचा निर्धार पक्का ठेवणे, इच्छाशक्ती भक्कम ठेवणे या गोष्टी आपोआपच निर्माण होत जातात. याचे प्रतिबिंब त्यांच्या दैनंदिन कार्यात पडून त्यांची नित्याच्या कामातली क्षमता आणि काम करण्याचा झपाटा, कामाचा वेग सुधारतो. 

५.    आत्मविश्वास : मॅरेथॉन स्पर्धा पूर्ण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात, आपल्याला दिलेले ४२ किलोमीटर हे अंतर आपण संकटांची पर्वा न करता, सर्व समस्यांना तोंड देत पूर्ण केले याचा यथार्थ अभिमान निर्माण होतो. यामध्येच एक जाज्वल्य आत्मविश्वास निर्माण होतो. जगण्याकडे तो जास्त सकारात्मक बघू लागतो. दैनंदिन जीवनातील सामान्य आणि दुर्धर संकटांचा सामना करायला त्याचे मन समर्थ बनते. ही स्पर्धा थोड्या कमी अंतराची असली तरी ती पूर्ण करणाऱ्यांच्यातही या सार्थ आत्मविश्वासाची चुणूक दिसून येते.

६.    नैराश्य दूर होते : दीर्घ अंतर पळाल्याने शरीरात एंडॉर्फिन हार्मोन्सची निर्मिती होते. हा ‘फील गुड’ हार्मोन असतो. त्यामुळे मनाला एक तजेला येतो, चिंता नैराश्य दूर होते, आयुष्यातील ताणतणावांना उत्तरे सापडतात आणि एक प्रकारच्या चैतन्यदायी आनंदाचा अनुभव येतो. दीर्घ अंतर पळताना मनात विचार सुरूच असतात. पण त्यामध्ये सकारात्मकता येते. बहुसंख्य वेळेस ४२ किलोमीटर पळाल्यानंतर तो धावपटू शारीरिक थकव्याने पूर्णपणे ‘ड्रेन‘ होण्याऐवजी मनोमन प्रफुल्लित झालेला आढळतो. 

सद्य परिस्थिती
आज निरनिराळ्या छोट्या-मोठ्या अंतराच्या मॅरेथॉन पळायचे आणि शर्यत पूर्ण केल्यावर, तिथल्या मोठ्या फलकापुढे उभे राहून फोटो काढायचे. ते सोशल मीडियावर टाकून जास्तीत जास्त लाईक्स मिळवायचे अशी एक क्रेझ निर्माण झालेली दिसते. पण कुठलेतरी थातूरमातूर काम करून, त्याचे फोटो किंवा सतत निरनिराळ्या पोझेसमधले सेल्फी टाकून मिरवण्यापेक्षा, घाम गाळून मिळवलेले हे यश फोटो टाकून साजरे करणे कधीही उत्तमच ठरेल. फोटोंच्या या चढाओढीत आपले फोटो का नाहीत? या विचाराने भाग घेणारे लोकही भरपूर आहेत. शारीरिक आरोग्याला हितावह अशा व्यायामाची इच्छा निर्माण करणे ही सोशल मीडियाची एक देणगीच समजायला हवी.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही स्पर्धेत एक विजेता असतो आणि बाकीचे पराभूत गटात असतात. मात्र, मॅरेथॉन स्पर्धेत ती पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला विजेते पदक मिळते. त्याच्या दृष्टीने ते एक परिपूर्णतेकडे टाकलेले महत्त्वाचे पाऊल असते. एक अभिमानाची बाब असते. या पदकातून त्याला एक अखंडित स्वरूपाची प्रेरणा मिळत जाते, त्याच्या मनातल्या ऊर्मी सतत त्याला ऊर्जा देत राहतात आणि आरोग्यमय जीवनातले त्याचे स्थान भक्कम करत राहतात.

मॅरेथॉन हा एक धावण्याचा प्रकार आहे आणि धावणे हा एरोबिक व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळे त्या व्यायामप्रकारातून होणारे सारे फायदे त्यात मिळतातच. पण त्यामध्ये दीर्घ अंतर पार करावे लागत असल्याने मनात जिद्द निर्माण होते आणि ती पूर्ण झाल्यावर एक आत्मिक समाधान प्राप्त होते. मॅरेथॉनला असलेल्या प्रसिद्धी वलयामुळे आजच्या तरुणाईत पळण्याची आवड निर्माण होत आहे. आरोग्यमय जीवनासाठी हेही नसे थोडके.

संबंधित बातम्या