विभक्त कुटुंबातील आरोग्य समस्या

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

आरोग्य संपदा
 

मनुष्य त्याच्या उत्पत्तीपासूनच समाजप्रिय प्राणी मानला जातो. कळपात आणि झुंडीत राहणाऱ्या प्राण्यांपेक्षा माणसाचे एकत्र राहण्याचे कारण वेगळे होते. सुरक्षितता, परस्पर साहाय्य आणि जन्माला आलेल्या बालकांचे उत्तरदायित्व घेण्यासाठी कुटुंबसंस्था आणि पर्यायाने विवाहसंस्था अस्तित्वात आली. 

कुटुंब म्हणजे परस्परांशी नाती असलेल्या माणसांचा समूह. माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहामधून अथवा दत्तक घेण्यातून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असते. विभक्त कुटुंबसंस्थेत आईवडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात. एकत्र कुटुंबपद्धतीत इतर दुय्यम नातेसंबंधांचा अंतर्भाव होतो. म्हणजे काका-पुतणे, चुलत भाऊ- चुलत बहीण, आत्या, आत्ये बहीण-भाऊ, आजोबा, आजी, नात-नातू वगैरे. साधारणतः पुरुष (वडील) हा कुटुंबाचा प्रमुख असतो. एकत्र कुटुंब म्हणजे अनेक नात्यांना जोडत होणारा वटवृक्षच असायचा.

पूर्वी भारतात सर्वत्रच एकत्र कुटुंबपद्धती होती. मात्र, गेल्या पन्नास-साठ वर्षांत होणाऱ्या नागरी प्रगतीमुळे आता विभक्त कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. 'हम दो हमारे दो' या घोषणेनंतर तीन किंवा चार व्यक्तींचे कुटुंब ही परिस्थिती उदयाला आली.     

या विभक्त कुटुंबसंस्थेने अनेक चांगल्या-वाईट परिस्थितींना जन्म दिला. यामध्ये सामाजिकदृष्ट्या विचार केला तर - 
१. एकत्र राहण्यात एकमेकांना एकमेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आधार होता. त्यामुळे जोपर्यंत आजारपण नाही, तोपर्यंत विभक्त कुटुंब उत्तम वाटते. पण जेव्हा आधाराची गरज पडते, तेव्हा मात्र एकत्र कुटुंबाची आठवण येते. मोठ्या किंवा दीर्घकालीन आजारात एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, तर त्याची देखभाल करायला विभक्त कुटुंबाची तारांबळ उडते. शेवटी रोज पैसे मोजून नर्स ठेवावी लागते.  

२. आपले अगदी लहान मूल सांभाळायला दुसऱ्या अपरिचित हातात देणे, म्हणजेच पाळणाघरात ठेवणे, ही कल्पना किती त्रासदायक वाटते. कितीही विश्वास असला, तरी शेवटी आईच्या मायेची सुरक्षितता आणि पाळणाघरातले भाड्याचे पोषण यात फरक पडतोच. समाजाची गरज असणे वेगळे आणि गरज निर्माण करून पाळणाघरात नेऊन ठेवणे वेगळे. एकत्र कुटुंबात बाळांची काळजी घ्यायला आजी-आजोबा घरात असतात, विभक्त कुटुंबात पाळणाघराशिवाय पर्याय नसतो. 

३. भारतीय शिक्षणपद्धतीप्रमाणे बालकाची पहिली सहा वर्षे ते मूल आईच्या सहवासात जास्त सुरक्षित आणि निर्धास्त असते. आजच्या बदलत्या समाजरचनेतून पाळणाघराची गरज उत्पन्न झाली. आज कितीतरी मातांना लक्षात येते, की त्यांच्या करिअरमधली काही बहुमूल्य वर्षे जरी मुलांचा सांभाळ करण्यासाठी खर्च करावी लागली, तरी ती भावी काळाची गुंतवणूक ठरते.

४. एकत्र कुटुंबात घरातील स्त्रिया मुलांचा सांभाळ आणि त्यांच्यावर संस्कार करीत, आज त्याच्या अभावाने व्यसने, बाहेरील अनारोग्यकारक खाणे वाढून विविध आजार आणि पोटाचे विकार मुलांना होत आहेत.

५. एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात. भारतात ग्रामीण भागात एकत्र कुटुंबपद्धती सर्रास आढळते. शहरी भागात ही पद्धत अस्तंगत व्हायच्या मार्गावर आहे. आई-वडील, मुले आणि नातवंडे इथपर्यंतच आता एकत्र कुटुंब मर्यादित झाले आहे. घरातील महिला कामानिमित्त बाहेर गेल्यावर, अन्य महिलांच्या मदतीमुळे कुटुंबात अडचणी येत नाहीत. मुलांनाही मोठ्या कुटुंबात राहण्याची सवय लागते. सण-समारंभ एकमेकांच्या मदतीने उत्साहात साजरे होतात. एकत्र कुटुंबात राहण्याचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे घराला कधीच कुलूप लागत नाही. त्यामुळे तुम्ही कधीही घरी या, तुमच्या दिमतीला कायम कोणी ना कोणी हजर असतेच.

 एकत्र कुटुंबपद्धतीचे फायदे : मायेची उब, एकमेकांना मिळणारी तातडीची मदत, लहान मुलांवर होणारे चांगले संस्कार, मानसिक आधार, एखाद्या कार्यात सहज उपलब्ध होणारी 'मॅन पॉवर', नैसर्गिक मानसोपचाराचे जणू केंद्रच, कुटुंबातील व्यक्तीला संपूर्ण कुटुंबाचे सुरक्षा कवच इत्यादी.

 एकत्र कुटुंबपद्धतीतले तोटे : आर्थिक विनिमयावरून होणारी भांडणे, प्रत्येकाच्या 'पर्सनल स्पेस'वर होणारे अतिक्रमण, घरच्या सदस्यांमधील बेबनाव होऊन उद्‌्‌भवणारी भाऊबंदकी, स्त्री वर्गातील हेवेदावे, प्रत्येक सदस्यांवर असलेली बंधने, पितृसत्ताक पद्धती.
जसजसा काळ बदलत गेला तसतसे एकत्र कुटुंबपद्धतीवर आघात होत गेले. जुने ते सोने म्हणताना, प्रत्येक गोष्ट सुरुवातीला नवीनच असते, कालांतराने ती जुनी होते. काळाप्रमाणे बदलावेच लागते. पूर्वीच्या सगळ्याच गोष्टी आताच्या काळात तेवढ्याच मोलाच्या असतील असे नसते. बदलत्या काळामध्ये आर्थिक नियोजन, जागेचा अभाव आणि वैयक्तिक स्वार्थ यामुळे विभक्त कुटुंबपद्धती उदय पावली.

 विभक्त कुटुंबपद्धतीचे फायदे : प्रत्येक सदस्यांची 'पर्सनल स्पेस' जपली जाते, आर्थिक स्वातंत्र्य, आपल्या मर्जीप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य. 

 विभक्तांचे तोटे : मुलांवर आजी-आजोबांचे संस्कार होत नाहीत, वैयक्तिक स्वार्थाचा अतिरेक होतो, परस्परांना द्यायच्या वेळेचा अभाव, आईवडिलांना पैशाचे मशीन समजले जाते, मानसिक आधार मिळत नाही, एकटेपणाची भावना, मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा अतिरेक, लहान वयात मानसिक आणि शारीरिक व्याधी.

आजमितीला मोठ्या स्वरूपात विभक्त कुटुंबपद्धतीलाच झुकते माप मिळते आहे. बदलत्या काळाबरोबर कौटुंबिक संबंधांची गणितेही बदलली. आजमितीला लांब राहूनच संबंध चांगले राहतात. रोजरोज भांड्याला भांडे लागले, तर जास्त नुकसान होत जाते. एकत्र कुटुंबात सगळ्यात जास्त मानसिक कुचंबणा तरुण पिढीची होते.

पुरुषांचे कौटुंबिक हाल होतात. एकीकडे आई दुसरीकडे बायको. बऱ्याच वेळा एक बाजू बरोबर असते. मग हळू हळू वाद, भांडणे यांचे रूपांतर संघर्षात होते आणि संपूर्ण कुटुंबाचे मानसिक स्वाथ्य हरपते. ते जपायला एकत्र कुटुंबपद्धतीचा हट्ट सध्याच्या काळात करणे योग्य ठरत नाही.

 एकत्र कुटुंबपद्धती ही चाळ संस्कृतीसारखी असते. आता फ्लॅट संस्कृती आली आणि मनाची कवाडेच बंद झाली, असे म्हटले जाते. पण फ्लॅट संस्कृती जरी आली, दारे बंद झाली तरी या फ्लॅटवाल्या कुटुंबाच्या निदर्शनास एखादी समस्या आढळल्यास हेच दरवाजे सताड उघडतात. याउलट चाळ संस्कृतीने अनेक नवविवाहित जोडप्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. एक पूर्ण पिढी गारद केली. अनेकांच्या पर्सनल स्पेसवर आघात झाला, मोकळेपणाने वागण्याच्या ऊर्मी मारून टाकल्या. अगणित व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य कुलूपबंद करून झाले.

 मात्र, विभक्त कुटुंबपद्धतीतील एक जोडीदार गेल्यास त्यानंतर येणारे एकाकीपण ही मोठी समस्या आहे. एकत्र कुटुंबपद्धतीच्या विघटनानंतर वृद्धांचे प्रश्न ऐरणीवर आले. वृद्धाश्रम हा त्याला पर्याय असेल, पण भारतीय समाजव्यवस्थेच्या पचनी पडायला वेळ लागेल. पाश्चात्त्य समाजरचनेने पचवलेली ही संकल्पना, भारतीय समाजरचनेत उंबरठ्यावरच घुटमळत आहे. तात्पर्य, कोणती पद्धत आदर्श हे त्या त्या परिस्थितीवर आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते.  

विभक्त कुटुंबे आणि आरोग्य समस्या
एकत्र कुटुंबपद्धतीत आरोग्याचे नियम जास्त कटाक्षाने पाळले जायचे, मात्र विभक्त पद्धतीत ते लयाला गेले.

१. आहार : घरातील प्रत्येकाच्या आहारामध्ये नियमितपणा होता. पूर्वी स्त्रिया सकाळी उठून घरच्यांचा स्वयंपाक करत. साधेपणा पण आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या गोष्टी त्यात असत. पोळी, भाजी, वरणभात असा साधाच बेत असायचा. घरातल्या प्रत्येकाच्या खाण्यावर ज्येष्ठांचे विशेषतः आजी आजोबांचे बारीक लक्ष असायचे. पण आज तो दरारा नसल्याने जेवणात काय आणि किती असावे याचे काही गणितच राहिलेले नाही.

विभक्त कुटुंबात कामाला जाणाऱ्या नवराबायकोला आठवड्यातून दोन-तीन वेळा बाहेर खाण्याची सवय लागली आहे. त्यात चमचमीत पदार्थ, फास्टफूड यांचा भर असतो. घरी स्वयंपाक न करता बाहेरचे अन्न घरी मागवण्याची पद्धत सुरू झाली आहे. मुलांना डब्यात पोळीभाजी देण्याऐवजी रेडीमेड पदार्थ द्यायला सुरुवात झाली आहे. सकाळी पोहे, उपमा, शिरा, इडलीऐवजी झटपट मॅगी किंवा वडापाव खाण्यावर भर असतो. सात्त्विक चौरस आहाराऐवजी जंकफूडचा वापर जास्त झाला आहे. 

परिणामतः जीवनसत्त्वांचा अभाव, अॅनिमिया, हायपर अॅसिडिटी, पत बिघडणे, लहान मुलांची वाढ खुंटणे हे विकार वाढत आहेत. सतत जंकफूड, फास्टफूड खाल्ल्याने अतिरिक्त वजनवाढ होऊन मधुमेह, उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते आहे.

२. व्यायाम : एकेकाळी सकाळी व्यायाम करून एक ग्लासभर दूध घेतलेच पाहिजे, असा घरोघरी दंडक होता. आता व्यायामही राहिला नाही आणि दूध पिणे अनेक मुलांना आवडत नाही म्हणून आई त्यांना देत नाही. जे देतात त्या त्यात कृत्रिम प्रोटीन आणि जीवनसत्त्वांचा तथाकथित समावेश असलेल्या पावडरी टाकून देतात. याचाही परिणाम तरुण वयात स्थूलपणा आणि त्यातून उद््भवणाऱ्या लाइफस्टाइल आजारात झाला आहे.

३. विश्रांती : रात्री ठराविक वेळेस म्हणजे नऊपर्यंत झोपी जाण्याचा संकेत होता. आता आईवडील रात्री उशिरापर्यंत सिरियल्स बघतात आणि मुले टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहण्यात धन्यता मानतात. 'लवकर निजे लवकर उठे' असा पूर्वीचा प्रघात लयाला गेला. यामुळे निद्रानाशापासून मानसिक आजारांपर्यंत आणि मधुमेहापासून कर्करोगापर्यंत अनेक आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. 

४. मानसिक शांतता : एकत्र कुटुंबात मुलांकडून सकाळी उठल्या उठल्या ''कराग्रे वसते लक्ष्मी....'' अशा प्रार्थना, पूजा, संध्याकाळी रामरक्षा, परवचे म्हणण्याचा प्रघात होता. हे सर्व मेडीटेशनचे प्रकार होते. त्या काळीही ताणतणाव होताच, पण त्यातून सांभाळण्याचे काम ही पठणे करीत असत. मात्र, आता एकीकडे ताणतणाव प्रमाणाबाहेर वाढला, पण या ध्यानधारणेच्या सवयी सुटल्या. सबब आजच्या पिढीला ताणतणाव नियंत्रणात आणणे कठीण जाते आणि त्यासाठी अन्य गोष्टींचा सहारा शोधावा लागतो. यामुळे चिंता, नैराश्य अशा मानसिक व्याधींचे प्रमाणही बरेच वाढले आहे.

४. व्यसने : एकत्र कुटुंबात घरातल्या थोरामोठ्यांच्या करड्या नजरेतून मुलांची आणि तरुणांची व्यसने सुटत नसत. आज विभक्त कुटुंबात त्या नजरेचा अभाव असल्याने घरातील स्त्री आणि पुरुष स्वतःच व्यसनी होत चालले आहेत आणि मुलांना त्याचे वस्तुपाठ देत आहेत. याचा परिणाम मद्यसेवनाने होणारे यकृताचे आजार, धूम्रपानाने होणारे कर्करोग आणि फुप्फुसांचे आजार वाढण्यात झाला आहे.

५. कौटुंबिक संवाद : एकत्र कुटुंबपद्धतीत घरातील ज्येष्ठ स्त्रिया नेहमी एकमेकींशी चर्चा करत असत. मुलांचे त्यांच्या आजी आजोबांशी हितगुज चालत असे. मात्र, आज आपल्या दैनंदिन कामात गर्क असलेल्या आईबाबांना एकमेकांशी संवाद साधणे कमी होत चालले आहे. मुलांनासुद्धा आईवडील आपला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे कौटुंबिक संवाद हरवल्याने मानसिक विकारांचे प्रमाण वाढले आहे.   

एकत्र कुटुंबपद्धतीचे काही दोष होते, पण विभक्त कुटुंबपद्धतीत आजच्या जीवनशैलीमुळे आणखीनच दोष आढळू लागले आहेत. पण या समस्यांचे काळजीपूर्वक परिशीलन केल्यास अनेक गोष्टी सहज टाळता येतील.

संबंधित बातम्या