ऑरगॅनिक : साधक का बाधक

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 2 मार्च 2020

आरोग्य संपदा
 

भारतीयांना खाद्यपदार्थांबाबत सर्वात महत्त्वाची वाटते ती म्हणजे त्याची चव. जिभेचे चोचले पुरवणारा पदार्थ जर आरोग्यदायी असेल, तर मग विचारायलाच नको. बघता बघता ते पदार्थ सर्वांच्या गळ्यातले ताईत होऊन जातात. गेली काही वर्षे ऑरगॅनिक खाद्यपदार्थांची अशीच सर्वत्र धूम आहे. भाजीपाला-फळफळावळ विकणारी मंडई असो, नाहीतर सुपरमार्केट किंवा नव्या जीवनशैलीची जान असलेले मॉल्स असोत; ऑरगॅनिक नामाभिधान असलेली फळे, भाज्या, धान्ये, कडधान्ये, दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि या सर्वांपासून केलेले असंख्य खाद्यपदार्थ सर्वत्र चकाकू लागलेत. अगदी कोपऱ्यावरील छोट्या दुकानांमध्ये, टपरीवरसुद्धा ऑरगॅनिक खाद्यपदार्थ विराजमान झाले आहेत. 
ऑरगॅनिक पदार्थ ऑरगॅनिक शेतीतून येणाऱ्या उत्पादनातून होतात. पर्यावरण स्नेही तंत्राचा वापर करून केल्या जाणाऱ्या या शेतीत - 

 • कसल्याही प्रकारची रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, सांडपाणी, जैव तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले बियाणे वापरले जात नाही.            
 • मातीचा कस वाढवणे आणि टिकवणे महत्त्वाचे मानले जाते. 
 • बदलती पिके घेऊन मातीचा कस कायम राखतात. 
 • कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांऐवजी शेणखत, गांडूळखत, जैविक कचरा आणि हिरव्या पानांचे खत वापरतात. 
 • असे सलग तीन वर्षे मातीचा कस वाढवून ऑरगॅनिक शेती उत्पादन केले जाते. 
 • शेतीसाठी कोणतेही रासायनिक कीटकनाशक वापरत नाहीत.
 • ऑरगॅनिक पदार्थ करताना कोणतीही रासायनिक प्रक्रिया (प्रोसेस्ड) करत नाहीत किंवा ते परिष्कृत (रिफाइंड) करत नाहीत.   
 • व्यावसायिक पशुपालनामध्ये कोणत्याही प्रकारची प्रतिजैविके किंवा हॉर्मोन्स न देता दूध, अंडी, मांस, मासे अशी ऑरगॅनिक खाद्ये केली जातात. 
 • ऑरगॅनिक आजमितीला सौंदर्यप्रसाधने, घराच्या स्वच्छतेचे पदार्थ, कपडे, होळीचे रंग, गुलाल अशा अनेकविध तऱ्हांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे मानवी आरोग्य व पर्यावरण या दोहोंचेही रक्षण होण्यास मदत होते.

ऑरगॅनिक अन्नपदार्थाची मागणी दरवर्षी सुमारे २३ टक्क्यांनी वाढत आहे. भारतात सुमारे ५७.८ दशलक्ष हेक्टर जमीन प्रमाणित ऑरगॅनिक शेतीखाली आहे, त्यांपैकी २४ दशलक्ष हेक्टर पूर्णतः प्रमाणित आहे. जगातल्या ऑरगॅनिक शेतकऱ्यांपैकी ३० टक्के भारतीय आहेत. पण जागतिक पातळीवरील उत्पादनात आपला सहयोग फक्त १.३ टक्केच आहे. २०१७-१८ मध्ये देशामध्ये १७ लाख मेट्रिक टन ऑरगॅनिक शेतमालाचे उत्पादन आणि ४.८ लाख मेट्रिक टन निर्यात झाली. 
केंद्र सरकारने दिलेल्या सवलतींमुळे अधिकाधिक जमीन ऑरगॅनिक शेतीच्या लागवडीखाली येत आहे. अनेक नवनवे ऑरगॅनिक पदार्थ बाजारात येत आहेत. हे पदार्थ आरोग्यदायक असल्यामुळे आरोग्याबाबत जागरूक असलेले असंख्य लोक यांचा वापर करू लागले आहेत. 
या साऱ्या पार्श्वभूमीवर ऑरगॅनिक खाद्यपदार्थांपासून होणारे फायदे आणि तोटे समजून घेणे योग्य ठरेल.

फायदे

 • आरोग्यदायक : ऑरगॅनिक खाद्यांमध्ये आरोग्यवर्धक अशी नैसर्गिक रसायने अ-जैविक पदार्थांपेक्षा अधिक प्रमाणात असतात. उदा. पॉलिफीनॉल १७ टक्क्यांनी, फ्लावानॉल्स, फ्लावानॉन्स, अँथोसायनिन्स आणि फीनॉलिक अॅसिड तब्बल ६९ टक्क्यांनी जास्त असतात. त्याचबरोबर रासायनिक खते आणि कीटकनाशके न वापरल्याने विषारी द्रव्यांचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे हे पदार्थ आरोग्यदायी असतात. 
 • रिफाइंड तेल नसल्याने, चवीसाठी त्यात साखर, मिठाची भर नसल्याने आणि प्रक्रिया होत नसल्याने या पदार्थांच्या सेवनाने वजन वाढ होत नाही.
 • नैसर्गिक क्षार आणि आम्ले असल्याने हे पदार्थ चवीला अधिक उत्तम असतात.   
 • ऑरगॅनिक फळे आणि भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे त्यात नैसर्गिक सॅलिसिलिक अॅसिड असल्याने त्यांचा वापर नित्य नेमाने केल्यास हृदयविकार आणि इतर गंभीर आजार न व्हायला उपयुक्त असतात.
 • स्त्रियांनी गरोदरपणात ऑरगॅनिक पदार्थ खाल्ल्यास त्यांच्या बाळांना एडीएचडी, स्वमग्नता, रक्ताचा कर्करोग, शैक्षणिक दौर्बल्य, मज्जासंस्थेचे विकार होण्याची शक्यता खूप कमी होते. लहान मुलांना त्यांच्या आहारात ऑरगॅनिक खाद्यांवर भर ठेवल्यास त्यांची बौद्धिक क्षमता, ग्रहणशक्ती वाढते.
 • सुरक्षित : शेतीमध्ये कीटकनाशके वापरल्याने रक्ताचा कर्करोग, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा, वंध्यत्व, स्त्रियांमध्ये स्तनाचे आणि पुरुषात प्रोस्टेटचे कर्करोग, पार्किन्सन्सचा विकार, प्रतिकारशक्तीचे आजार, हार्मोन्स निर्मिती करणाऱ्या ग्रंथींचे आजार होण्याची शक्यता वाढते. 
 • शेतीत रासायनिक खते वापरलेल्या शेतमालापासून उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग होऊ शकतात. जेनेटिकली एन्जीनियर्ड पद्धतीने तयार होणाऱ्या अन्नपदार्थांत किंवा तत्सम प्राणिजन्य पदार्थात मोठ्या प्रमाणात कृत्रिम हार्मोन्स, प्रतिजैविके आणि शरीराचे आकारमान वाढवणारी औषधे वापरली जातात. त्यामुळेही कर्करोग, हार्मोन्सचे आजार होऊ शकतात. 
 • ऑरगॅनिक खाद्यपदार्थ करताना या सर्व गोष्टी न वापरल्याने हे आजार टळतात. साहजिकच आरोग्याच्या दृष्टीने ते सुरक्षित असतात.
 • प्रदूषणमुक्त : रासायनिक खते आणि कीटकनाशके शेतीत आणि बागायतीत वापरल्याने वातावरणाचे प्रदूषण होते. तसेच ही रसायने भूगर्भजलात जाऊन पाणीपुरवठा दूषित होतो. ऑरगॅनिक लागवडीत या गोष्टी नसल्याने वायू प्रदूषण आणि जल प्रदूषण टळते. 
 • पशूंमधील जननक्षमता : ज्या प्राण्यांना ऑरगॅनिक पशुखाद्ये दिली जातात, त्यांची जननक्षमता वाढते. त्यांना सुदृढ आणि जास्त पिल्ले, वासरे होतात.
 • रोगप्रतिकारक शक्ती : मुळात धान्ये, फळे आणि भाज्या या रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असतात, पण त्यांच्यासाठी रासायनिक खतांचा वापर होतो तेव्हा हा गुणधर्म नष्ट होतो. ऑरगॅनिक मालात हा गुणधर्म टिकून राहिलेला असतो. 
 • हृदयास उत्तम : ऑरगॅनिक अन्न पदार्थांत कॉज्युगेटेड लिनोलीक अॅसिड हे मोठ्या प्रमाणावर असल्याने ऑरगॅनिक पदार्थ आपल्या हृदयाचे चांगले रक्षण करतात. 
 • पोट भरणे : भूक भागवण्याच्या बाबतीत ऑरगॅनिक पदार्थ सक्षम असतात. कारण त्यांच्यात सत्त्व असते. 
 • मांसनिर्मिती : ऑरगॅनिक शेती करताना जनावरांची निगा वेगळ्या प्रकाराने घेतली जात असते. त्यामुळे ऑरगॅनिक शेतीला जोडून केल्या जाणाऱ्या पशुपालनात चांगली जनावरे मांस मिळवण्यासाठी उपलब्ध होत असतात. 
 • शेतकऱ्यांना उपयुक्त : ऑरगॅनिक शेतीत शेतकऱ्यांना बाजारातून कमीतकमी वस्तू आणाव्या लागतात. त्यांचा रासायनिक खतावरचा भार कमी झाल्याने शेती अधिक किफायतशीर होते. 

तोटे

 • महाग : जमिनीचा कस वाढवण्यासाठी नैसर्गिक खत तयार करावयाला जास्त खर्च येतो, जास्त कामगार लागतात, उत्पादन मर्यादित होते. मात्र पॅकिंग, वितरण, व्यवस्थापन यावरील खर्च वाढून एकूण उत्पादन खर्च वाढतो. परिणामतः हे पदार्थ थोडे अधिक किमतीने विकले जाऊन रोजच्या वापरासाठी महाग पडतात.
 • नाशवंत : या पदार्थांत कोणतेही प्रीझर्वेटीव्ह वापरले जात नसल्याने हे पदार्थ नाशवंत असतात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे यांची खरेदी सतत करावी लागते. 
 • उपलब्धता : या पदार्थांची उपलब्धता अजूनही ठराविक ठिकाणीच आहे. नाशवंत असल्याने ते दूरवर नेता येत नाहीत. बाराही महिने ते उपलब्ध नसल्याने ते हंगामी स्वरूपाचे राहतात.
 • कष्ट : ऑरगॅनिक शेती आणि पशुपालनात जनावरांची देखभाल कष्टाची असते. ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी मार्केटिंग, जाहिराती करणे आवश्यक असते. त्यासाठी मोठी रक्कम खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य ठरते. साहजिकच मर्यादित लोकच निर्मितीसाठी पुढाकार घेताना आढळतात.  
 • पौष्टिकपणा : काही ठराविक आहार घटकांचा अपवाद सोडल्यास ऑरगॅनिक आणि इनॉरगॅनिक खाद्यपदार्थात मुख्य पोषक द्रव्यांमध्ये, जीवनसत्त्वात आणि आहार घटकांमध्ये फारसा फरक नसतो.
 • जंतूंचा प्रादुर्भाव : ऑरगॅनिक खाद्यपदार्थात जंतूंचा प्रादुर्भाव जास्त असल्याने खाणाऱ्या व्यक्तींना जंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते.  

प्रमाणित ऑरगॅनिक पदार्थ

 • ऑरगॅनिक शेतीला आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर त्याची तज्ज्ञांकडून तपासणी होऊन प्रमाणपत्र दिले जाते. 
 • ज्यात १०० टक्के ऑरगॅनिक पदार्थ वापरले जातात, त्यांनाच ‘१०० टक्के ऑरगॅनिक’ असे लेबल लावता येते. 
 • ९५ टक्के ऑरगॅनिक पदार्थांचा वापर असेल, तेथे फक्त ‘ऑरगॅनिक’ असे संबोधले जाते. 
 • ७० टक्के ऑरगॅनिक पदार्थ वापरल्यास त्यांना ‘सेंद्रिय पदार्थाचा वापर असलेले’ संबोधतात. 
 • ७० टक्क्यांपेक्षा  कमी ऑरगॅनिक पदार्थाचा वापर असल्यास 'ऑरगॅनिक' लेबल लावायला परवानगी मिळत नाही.
 • भारतात ऑरगॅनिक खाद्यपदार्थ विकताना विविध प्रमाणपत्रांची आवश्यकता असते.  
 • ‘नॅचरल’ असा दावा करणारी उत्पादने वरील बोधचिन्ह वापरू शकत नाहीत. कारण ती नैसर्गिक असतीलच असे नाही. 
 • जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) नियमांचे पालन आवश्यक असते. 
 • धान्याचे संरक्षण, माती आणि जलसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणीय गुणवत्तेचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.

सेंद्रिय उत्पादनाचे अंतिम लक्ष्य टिकाऊ असू शकते. टिकाव टिकण्यासाठी उच्च पौष्टिक मूल्यांसह अन्न तयार करणे, कृषी प्रणालींमध्ये जैविक चक्र वाढविणे, शेतीमुळे होणारे प्रदूषण रोखणे, जमिनीची सुपीकता वाढवणे आणि शक्य तितक्या बंद प्रणालीत काम करणे, नूतनीकरण न होणाऱ्या संसाधनांचा वापर कमी करणे आणि पर्यावरणासह अस्तित्वात असणे आवश्यक आहे.

आज, जगभरातील, सेंद्रिय शेती एक पर्यावरणीय उत्पादन व्यवस्थापन म्हणून ओळखली जाते. जी जैविक विविधता, जैविक चक्र आणि माती जैविक क्रियाकलापांना प्रोत्साहन देते आणि वाढवते. ही प्रणाली अशा कृतींवर आधारित आहे जी कमीतकमी बिगर-शेती साधने वापरतात आणि पर्यावरणीय अनुकूल पुनर्संचयित करतात आणि सुधारित करतात.

सेंद्रिय शेती अभ्यास भविष्यातील पिढ्यांसाठी मातीचे पोषण आणि संरक्षण करणे हे आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी, अक्षय संसाधनांचा वापर, ऊर्जा संसाधनांचे संरक्षण, माती आणि जलसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणीय गुणवत्तेचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.

संबंधित बातम्या