चेहरा बदलणारी प्लॅस्टिक सर्जरी 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 9 मार्च 2020

आपण आकर्षक दिसावे ही इच्छा माणसांच्या प्रत्येकाच्याच मनात असते. सुंदर दिसण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मानला जातो तो चेहरा. आपल्या चेहऱ्यात थोडे वैगुण्य आहे आणि आकर्षक दिसण्यासाठी ते दूर करण्याचा विचार बुद्धिमान मानवाच्या मनात येणारच. त्यामुळे अपरे नाक लांब करायला, डोळ्यांची ठेवण वेगळी करायला या व्यक्ती त्या भागाची पुनर्रचना करणाऱ्या शस्त्रक्रियेचा आसरा घेतात. यालाच प्लॅस्टिक सर्जरी म्हणतात. 

आपण आकर्षक दिसावे ही इच्छा माणसांच्या प्रत्येकाच्याच मनात असते. सुंदर दिसण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा मानला जातो तो चेहरा. आपल्या चेहऱ्यात थोडे वैगुण्य आहे आणि आकर्षक दिसण्यासाठी ते दूर करण्याचा विचार बुद्धिमान मानवाच्या मनात येणारच. त्यामुळे अपरे नाक लांब करायला, डोळ्यांची ठेवण वेगळी करायला या व्यक्ती त्या भागाची पुनर्रचना करणाऱ्या शस्त्रक्रियेचा आसरा घेतात. यालाच प्लॅस्टिक सर्जरी म्हणतात. 

गेल्या काही वर्षांत प्लॅस्टिक सर्जरी कमालीची लोकप्रिय होत चालली आहे. नाकाचा आकार बदलणे, स्तन मोठे-छोटे करणे, ओठांची वक्रता पालटणे एवढेच नव्हे, तर शरीराच्या इतर भागांची बाह्यरचना आकर्षक करायला प्लॅस्टिक सर्जरी प्रक्रियेचा पर्याय अनेक जण निवडत आहेत.

प्लॅस्टिक शस्त्रक्रियेची प्रगती
 पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सैनिकांना बॉम्बस्फोटामुळे भाजणे, शरीराचे अवयव नष्ट होणे आणि जखमांनी चेहरा विकृत होणे अशा प्रकारचे त्रास दूर करण्यासाठी या शास्त्राची प्रगती झाली. मात्र, त्यानंतर या शस्त्रक्रियेला थोडी खीळ बसली. आधुनिक काळात मात्र हे क्षेत्र विकसित होत जाऊन, क्रेनोफेशियल शस्त्रक्रियेसारखी उपवैशिष्ट्ये निर्माण झाली. आज प्लॅस्टिक सर्जरीबाबत बोलताना त्यातील बाह्यरूप सुधारणाऱ्या कॉस्मेटिक सर्जरी या उपप्रकारांबाबत बोलले जाते. प्लॅस्टिक सर्जरीची खरी व्याप्ती कॉस्मेटिक शस्त्रक्रियेपेक्षा खूपच विस्तृत आहे, ज्यामध्ये पुनर्रचनात्मक आणि निवडक सौंदर्याचा (कॉस्मेटिक) शस्त्रक्रिया समाविष्ट आहे. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया म्हणजे शरीराला दुखापत झालेल्या दुखापतीनंतर किंवा कर्करोगाने किंवा इतर शस्त्रक्रियेनंतर शरीराच्या भागाची पुनर्रचना करणे किंवा ती दुरुस्त करणे शस्त्रक्रिया होय. अतिरिक्त, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया बऱ्याच जन्मजात विकृती सुधारण्यासदेखील मदत करू शकते. सामान्यत: बाह्यरूप सुधारण्यासाठी सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया (कॉस्मेटिक सर्जरी) केली जाते. मात्र अनेकदा प्लॅस्टिक सर्जरी प्रक्रियेत पुनर्रचनात्मक आणि कॉस्मेटिक शस्त्रक्रिया या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.

दोन मुख्य प्रकार
     कॉस्मेटिक किंवा सौंदर्यवर्धक  
     रीकन्स्ट्रक्टिव्ह किंवा पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया 

 सौदर्यवर्धक सर्जरी आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया यांमधला फरक समजावून घ्यायला हवा. या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. याची साधी व्याख्या करू गेलो, तर कॉस्मेटिक सर्जरी ही सौंदर्यात्मक हेतूंसाठी आहे आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया म्हणजे काही प्रकारचे विकृती सुधारणे होय. 

सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया : या शस्त्रक्रियेचे अनेक प्रकार आहेत. कॉस्मेटिक शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला त्याच्या शरीराचा न आवडणारा भाग बदलला जातो. कॉस्मेटिक प्लॅस्टिक सर्जरीमध्ये शल्यक्रिया आणि शस्त्रक्रियेव्यतिरिक्त प्रक्रियेचा समावेश असतो. ज्यामुळे त्या व्यक्तीचे रूप आणि अवयवांचा आकार बदलला जातो. सकारात्मक दृष्टिकोन आणि वास्तववादी अपेक्षा असलेल्या निरोगी व्यक्ती सौंदर्यवर्धक प्रक्रियेसाठी योग्य उमेदवार असतात. 

प्लॅस्टिक शस्त्रक्रिया करायची की नाही हे आपले आपणच ठरवायचे असते. ती स्वतःसाठी करावी. आजकाल अनेकदा दुसऱ्याच्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी किंवा एखाद्या सेलेब्रिटीसारखे दिसण्यासाठी या शस्त्रक्रिया केल्या जातात. उदा. स्तन मोठे करण्यासाठी स्तनारोपण किंवा ओठ परिपूर्ण दिसण्यासाठी कोलेजन इंजेक्शन. लेझर शस्त्रक्रिया ही आणखी एक प्रकारची कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आहे, ती चेहऱ्यावर नको असणारे केस किंवा पूर्वी गोंदवलेला टॅटू काढण्यासाठी केली जाते.

पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया 
या प्रकारची शस्त्रक्रिया एखाद्या व्यक्तीच्या बाह्यदर्शनात त्याला नको असलेला पैलू बदलण्यासाठी केली जाते. सामान्यत: जन्मापासून असलेली किंवा एखाद्या अपघाताने निर्माण झालेली विकृती दूर करण्यासाठीदेखील या प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते. उदा. भाजल्यामुळे झालेली विकृती किंवा मोठ्या जखमांचे व्रण घालवणे. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेमुळे शरीरातील दोष पूर्णपणे गेला नाही, तरी तो सुसह्य होऊ शकतो. या शस्त्रक्रियेने शरीराच्या एखाद्या भागाचे कार्य वाढवता येते. उदा. पोलिओने अपंग झालेल्या व्यक्तीच्या पायांवर शस्त्रक्रिया केल्यावर जमिनीवर रांगत चालणाऱ्या रुग्णाला चालायला येऊ शकते. पुनर्रचनात्मक प्लॅस्टिक शस्त्रक्रियेचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो.

पुनर्रचनात्मक प्लॅस्टिक शस्त्रक्रियेचे प्रकार
ऑरोप्लास्टी : ही प्रक्रिया कानाचा आकार बदलण्यासाठी केली जाते. काही मुलांच्या जन्मजात बाह्यकर्णाची वाढ न झाल्याने विकृती आलेली असते. ती वयाच्या पाचव्या वर्षानंतर केली जाते. यात कान नैसर्गिक आकारासारखे दिसू लागतात.
ऱ्हायनोप्लास्टी : ही शस्त्रक्रिया वयस्क रुग्णांमध्ये झालेल्या नाकाच्या आकारातला बदल दूर करण्यासाठी केली जाते. जर कोणताही दोष नसेल, तर कॉर्डोस्टिक शस्त्रक्रियेच्या अंतर्गत ऱ्हायनोप्लास्टी केली जाते.
स्तनांच्या आकारातील विषमता : यामध्ये स्तनांचे आकार बदलणे किंवा आकारमान कमी-जास्त करणे येते. मोठ्या आणि जड स्तनांमुळे रुग्णाला पाठदुखीचा त्रास होत असेल, तेव्हा ही प्रक्रिया केली जाते. पूर्ण शारीरिक वाढ झाल्यावरच ही करता येते.
मायक्रो डर्माब्रॅशन किंवा लेसर शस्त्रक्रिया : मुरुमांमुळे होणारे चट्टे, डाग, घट्ट पुटकुळ्या दूर करण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते.

प्लॅस्टिक सर्जरी करण्याची कारणे
 आजकाल सोशल मीडिया, टीव्ही, चित्रपट, मासिके आणि जाहिरातींची होर्डिंग्ज यामधून सुंदर दिसणाऱ्या ख्यातनाम व्यक्ती आणि मॉडेल्स यांची चित्रे, क्लिप्स यांचा भडिमार सर्वत्र होत असतो. अनेक स्त्रीपुरुषांना या सेलेब्रिटीजची शारीरिक वैशिष्ट्ये आपल्यातही असावीत असे वाटायला लागते. जाहिरातीतल्या नटीसारखे नाक, ओठ, शरीराचा फॉर्म आपल्यालाही असावा असे अनेकांना वाटते. त्यामुळे ते प्लॅस्टिक सर्जरीकडे वळतात. आपल्या बाह्यरूपावर, चेहऱ्यावर समाधानी नसणाऱ्या व्यक्ती त्यांच्या शरीरातील तथाकथित व्यंग दूर करण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरी करून घेतात. 

आनुवंशिकतेने एखाद्याचे नाक जन्मजात वाकडे असेल, कान लांब आणि मोठे असतील, तर या व्यक्ती शारीरिक वैगुण्याबाबत खूप कॉन्शस असतात. प्लॅस्टिक शस्त्रक्रियेद्वारे ही वैशिष्ट्ये त्यांच्या चेहऱ्याला चांगली दिसतील अशी करता येतात.  फेसलिफ्टसारख्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे चेहऱ्यावरील आणि मानेवरील सुरकुत्या दूर करता येतात. उन्हाने काळवंडणारी त्वचा, वयोमानापरत्वे उमटणारे काळे डाग, सुरकुत्या, निस्तेज त्वचा असे त्रास फेसलिफ्ट किंवा रासायनिक प्रक्रिया करून घालवता येतात. चेहऱ्यावरील डाग किंवा बाह्य शरीरावर असणारे जन्मजात डाग, अपघातांचे व्रण, मुरुमांचे घट्टे प्लॅस्टिक सर्जरी फिक्सच्या साह्याने उदा. त्वचेचे फिलर, लेझर, त्वचा पुनर्रचना आणि मायक्रोडर्माब्रॅशन यांनी दूर करता येतात.  व्यावसायिक गरज म्हणून मॉडेल्स, सिने-चित्र नट-नट्या, टेलिव्हिजन समालोचक, राजकीय नेते यांना इतरांपेक्षा अधिक तरुण आणि आकर्षक दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीची मदत घ्यावी लागते.

प्रचलित प्लॅस्टिक सर्जरी

 •  आर्म लिफ्ट - ब्रॅचिओप्लास्टी 
 •  बॅरिएट्रिक - चरबी आणि वजन कमी करण्यासाठी
 •  बेली लिफ्ट - पॅनिक्युलेक्ट्रॉमी 
 •  शरीरातील कॉन्टूरिंग - वजन कमी झाल्यानंतर
 •  स्तनाचा आकार वाढवणे - स्तनारोपण
 •  ब्रेस्ट लिफ्ट - मॅस्टोपेक्सी
 •  मॅमोप्लास्टी - स्तन छोटे करणे  
 •  स्तन पुनरावृत्ती - स्तनारोपण काढणे, पुन्हा करणे 
 •  ब्रो लिफ्ट, ब्रोप्लास्टी - भुवयांचा आकार बदलणे
 •  बटक्स वाढवणे, छोटे करणे
 •  चिक लिफ्ट - गाल वाढवणे  
 •  हनुवटीचा आकार बदलणे - चिन ऑग्मेंटेशन, चिन इम्प्लांट, चिन रिडक्शन, चिनसर्जरी - मेंटोप्लॅस्टी
 •  त्वचारोगाचे चट्टे घालवणे
 •  इअर पिनिंग - ओटॉप्लास्टी
 •  कान शल्यक्रिया - ऑरोप्लास्टी
 •  पापणीची शस्त्रक्रिया - ब्लीफॅरोप्लास्टी
 •  फेस लिफ्ट - ऱ्हायटायडॅक्टॉमी
 •  स्कार रिव्हिजन - चेहऱ्यावरील व्रण घालवणे
 •  चरबी इंजेक्शन, फिलर इंजेक्शन
 •  कपाळाचा आकार बदलणे
 •  केसांचे प्रत्यारोपण - वैयक्तिक केस मायक्रोग्राफ्ट
 •  केसांचे प्रत्यारोपण - मायक्रो-हेयर ट्रान्सप्लांट 
 •  इंजेक्टेबल्स - बोटोक्स
 •  लेसरद्वारे स्त्रियांच्या ओठावरील आणि हनुवटीवरील केस काढून टाकणे
 •  ओठ वाढवणे  
 •  लायपोसक्शन, लोअर बॉडी लिफ्ट, बेल्ट लायपेक्टॉमी 
 •  पुरुष स्तन कमी करणे 
 •  मायक्रोपिगमेंटेशन
 •  मानेचा आकार बदलणे
 •  शस्त्रक्रियेविना चरबी कमी करणे- क्रिओलायपोलिसिस
 •  त्वचा घट्ट करणे
 •  नाकाचा आकार बदलणे- ऱ्हायनोप्लास्टी
 •  त्वचेचा कायाकल्प - मायक्रोडर्माब्रेशन
 •  त्वचा पुनर्संचयित करणे
 •  व्हेरिकोज व्हेन्सवर लेझर उपचार करणे
 •  मांडीचा आकार बदलणे - थायप्लॅस्टी
 •  टमी टक - अॅब्डोमिनोप्लॅस्टी- पोटाचा आकार बदलणे

स्वतःच्या शरीराबद्दल, चेहऱ्याबद्दल, एखाद्या अवयवाच्या आकाराबद्दल नाखूष असलेल्या लोकांच्या आयुष्यात प्लॅस्टिक सर्जरी ही आत्मप्रतिमा उजळवणारी महत्त्वाची घटना असते. पण प्लॅस्टिक सर्जरी करूनच आत्मविश्वास येतो असे नव्हे. शस्त्रक्रियेनंतर कदाचित रुग्णाचे व्यंग दूर होईल, रूप आकर्षक होईल, पण आत्मविश्वास निर्माण होईलच हे खात्रीने सांगता येणार नाही. 

प्लॅस्टिक सर्जरीबाबत आजही अनेक गैरसमज आहेत. ती केवळ श्रीमंतांनाच परवडते. सर्वसामान्यांच्या तर ती आवाक्याबाहेरच, असे मानले जाते. मात्र, अनेक प्रकारच्या ''प्लॅस्टिक सर्जरी'' या सर्वसामान्यांनाही परवडणाऱ्या असून ही शस्त्रक्रिया केवळ श्रीमंतांची हा गैरसमज मिटवण्याची वेळ आली आहे. वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज मानवाचे जीवन सुखकर झाले.अनेक आजारांपासून त्याला मुक्ती मिळाली आहे. नव्या, आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्धर आजारांवरही उपचार करणे सोपे झाले आहे. ''प्लॅस्टिक सर्जरी'' ही अशीच एक आधुनिक उपचार पद्धती आहे. प्लॅस्टिक सर्जरी करण्याआधी आपल्याला ती खरेच आवश्यक आहे का? ती आपल्या तब्येतीला सोसवेल का? याचा विचार करणे गरजेचे असते. त्यासाठी प्रशिक्षित प्लॅस्टिक सर्जनचा सल्ला घेणे आवश्यक असते. संगणकावरील वेबसाइट, सोशल मीडियावरील मजकूर, ग्राफिक्स, प्रतिमा, व्हिडिओ इत्यादी सामग्री केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने असतात. हा एक वैद्यकशास्त्रीय उपचार असतो आणि तो इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच काटेकोरपणे करावा लागतो. 

संबंधित बातम्या