कोरोना : चर्चेतली औषधे व उपचार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 27 एप्रिल 2020

आरोग्य संपदा
 

कोरोना विषाणूने त्रस्त झालेल्या जगातल्या साऱ्या नागरिकांचे डोळे आता यावर कधी औषधे येतील आणि लस कधी शोधली जाईल, याकडे लागून राहिलेले आहेत. आजमितीला अनेक औषधांचे पर्याय शोधले जातायेत. अनेक वापरात असलेली औषधे, उपचार यांचा वापर करा, असे सांगितले जातेय. कोरोना विषाणूच्या या भीषण पर्वामध्ये या औषधांबाबत थोडी माहिती घेणे अत्यावश्यक ठरेल. 

लक्षणांवरील औषधे
पॅरॅसिटॅमॉल : नेहमी तापासाठी दिल्या जाणाऱ्या या ५०० आणि ६५० मि.ग्रॅमच्या गोळ्या करोना विषाणूसदृश लक्षणे असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्याव्यात. याने ताप उतरतो, अंग दुखणे, घसा दुखणे कमी होते. स्वतःच्या मनाने या गोळ्या घेतल्यास ही लक्षणे वरवर कमी होतील, पण आजार बळावू शकतो. पॅरॅसिटॅमॉलप्रमाणेच इतरही काही औषधे कॉक्स-२ या चयापचय क्रियेतील एका रसाला (एन्झाइम) प्रोस्टाग्लांडीन नावाच्या शरीरातील उतींवर सूज निर्माण करणारी संयुगे निर्माण करण्यास प्रतिबंध करतात, त्यांचाही वापर डॉक्टरांकडून केला जातो.

आयबुप्रोफेन : नॉन स्टीरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी (एनएसएआयडी) गटातील हे औषध ताप, अंग दुखणे, सूज कमी करते. पण कोरोनाच्या संसर्गात त्याच्या वापराबाबत वैद्यकीय क्षेत्रात परस्परविरोधी मते आहेत. एका विचारांच्या मते या औषधांमुळे अॅन्जिओटेन्सीन कन्व्हर्टिंग एन्झाईम-२ (एसीइ-२) हा एन्झाइम वाढतो आणि त्यामुळे कोरोनाचा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मात्र, अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासन (एफडीए), सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल (सीडीसी) आणि युरोपियन मेडिसिन एजन्सी यांनी काढलेल्या पत्रकात या औषधांमुळे असा परिणाम अजिबात होत नाही. तूर्तास हे औषध भारतात सावधपणे वापरले जाते.

खोकल्याची औषधे : यामध्ये दोन प्रकारची औषधे असतात. एकात श्वासनलिका रुंदावून घशातील आणि श्वासनलिकेतील श्लेष्म मोकळा होतो. यांना कॉफ एक्स्पेक्टोरंट म्हणतात. तर दुसऱ्या प्रकारात कोरडा खोकला दबला जातो, यांना कॉफ सप्रेसंट म्हणतात. कोरोनाच्या या साथीत आणि अन्यवेळीदेखील अशी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

विषाणूविरोधी औषधे
हायड्रोक्सी-क्लोरोक्विन आणि क्लोरोक्विन : यातील हायड्रोक्सी-क्लोरोक्विनची सध्या खूप चर्चा आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत ते मोठ्या प्रमाणात लोकांना द्यायला सुरुवात केली. भारताकडेही त्यांनी त्याची मागणी केली. त्यामुळे हे औषध कोरोनावर रामबाण उपाय आहे असे साऱ्यांना वाटू लागले. टेलिव्हिजन वृत्तवाहिन्यांवर, सोशल मीडियावर याबद्दल कोरोनाचा इलाज सापडला अशाप्रकारे बातम्या रंगवण्यात आल्या. लोकांनी याचा प्रचंड साठा केला आणि औषधांच्या दुकानातून ते गायब झाले.

मुंबईतील धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य सरकार हायड्रोक्सी-क्लोरोक्विन औषध 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट'ना देणार आहे. आरोग्य विभागाने याबाबत प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. 

मुळात अमेरिकेच्या एफडीए या औषधांच्या गुणवत्तेचे नियंत्रण करणाऱ्या संस्थेने २८ मार्च २०२० रोजी या औषधाला पूर्ण मान्यता दिलेली नाही. मात्र, त्यांच्या सरकारच्या विनंतीवरून तात्पुरत्या स्वरूपात तातडीक उपाय म्हणून ते वापरायला परवानगी दिली आहे.

भारताच्या आयसीएमआर या वैद्यकीय संशोधनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना आणि कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रतिबंधक उपाय म्हणून घ्यायला सांगितले आहे. 

युरोपियन युनियननेदेखील फक्त ५० वर्षांवरील व्यक्तींना ते कोरोनाबाधित असतील आणि तीव्र लक्षणांनी रुग्णालयात दाखल असतील, तरच घेण्याची परवानगी दिली आहे. 

या औषधातील हायड्रोक्सी-क्लोरोक्विन हे संधिवातावरचे औषध आहे, तर क्लोरोक्विन मलेरियावरील औषध आहे. या औषधांनी कोरोनाच्या विषाणूंची वाढ रोखली जाते, असा वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रात पूर्वी संदर्भ होता. त्यामुळे ही औषधे कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला आणि कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून द्यावीत असा स्पष्ट संकेत आयसीएमआरने दिला आहे. या औषधाचा यकृतावर, किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच १५ वर्षांखालील मुलांना ते देऊ नये असेही त्यात बजावले आहे. हायड्रोक्सी-क्लोरोक्विन ४०० मि.ग्रॅम आठवड्यातून एकदा असे तीन आठवडे संपर्कातील व्यक्तींनी, तर सहा आठवडे डॉक्टरांनी घ्यावे असे सुचवलेले आहे.
 
लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिर : चीन आणि इंग्लंडमधील संशोधकांनी संयुक्तरित्या केलेल्या या संशोधनात चीनच्या वूहानमधील १९९ गंभीर स्थितीतील कोव्हिड-१९ ने बाधित असलेल्या प्रौढ वयाच्या रुग्णांवर प्रयोग करण्यात आले. यात ९९ रुग्णांना लोपिनॅव्हिर आणि रिटोनॅव्हिर ही औषधे एकत्रितपणे देण्यात आली, तर उर्वरित १०० रुग्णांना ठराविक आणि नेहमीची प्रमाणित औषधे देण्यात आली. यामध्ये असे दिसून आले, की ही दोन औषधे दिलेल्या ४५.५ टक्के रुग्णांमध्ये १४ व्या दिवशी सुधारणा दिसून आली. तर नेहमीच्या उपचारांवर असलेल्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांत सुधारणा झाली. ही दोन औषधे घेणाऱ्या रुग्णांना आयसीयुमध्ये सहा दिवस ठेवून ते ठीक होत होते, तर दुसऱ्या प्रकारातील रुग्णांना १३ दिवस आयसीयुमध्ये राहावे लागत होते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या मान्यताप्राप्त नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले होते. मात्र, या औषधांच्या वापराबाबत अजूनही जागतिक मान्यता मिळालेली नाही. 

फॅविपिरॅव्हिर : हे एक विषाणूविरोधी औषध आहे. आरएनए पद्धतीच्या विषाणूंवर त्याचा उत्तम प्रभाव पडतो, असे शास्त्रीय प्रयोगात सिद्ध झालेले आहे. त्यामुळे ते एनफ्लूएन्झा, ऱ्हायनोव्हायरस या विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांवर उत्तम पद्धतीने लागू पडते. नुकत्याच येऊन गेलेल्या इबोला विषाणूच्या साथीत ते प्रतिबंधक आणि उपचारासाठी यशस्वीरित्या वापरले गेले. कोरोना विषाणूबाबत यावर चाचण्या सुरू आहेत. त्याची तिसऱ्या टप्प्यातील म्हणजे मनुष्यांवर होणारी चाचणी २५ मार्च २०२० रोजी सुरू झाली आहे. त्याचे परिणाम सकारात्मक आल्यास, लवकरच कोरोनाविरोधी एक महत्त्वाचे औषध हाती लागेल आणि साथ आटोक्यात आणायला त्याचा उपयोग होईल असे अनेकांना वाटते.

रॅमडेसिव्हिर : विविध प्रकारच्या विषाणूंवर लागू पडणारे हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम विषाणूविरोधी औषध आहे. कोव्हिड-१९ च्या आजाराने पीडित असलेल्या, मध्यम आणि तीव्र त्रास असलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर या औषधांची चाचणी सुरू आहे. या औषधावर अनेक ठिकाणी प्रायोगिक चाचण्या सुरू आहेत. तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या २१ फेब्रुवारी रोजी सुरू झाल्या. त्यातल्या एका चाचणीत कोव्हिड-१९ चा मध्यम प्रतीचा त्रास असलेले १६०० रुग्ण आहेत, तर दुसऱ्या चाचणीत तीव्र पद्धतीचा त्रास असलेले २४०० रुग्ण समाविष्ट आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे. 

फॅव्हिलॅव्हिर : चीनमध्ये हे विषाणूविरोधी औषध कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारासाठी अधिकृतरित्या मान्य करण्यात आले आहे. मात्र, केवळ ७० रुग्णांवर प्रयोग करून या औषधाला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे बाकी देशांना याबाबत साशंकता आहे.

विशेष औषध
आयव्हरमेक्टीन : हे जंतासाठी आणि खरजेसाठी दिले जाणारे औषध कोरोनाच्या विषाणूचा नाश करते, असे संशोधन ऑस्ट्रेलियामधील मोनाश युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांनी केले आहे. गोळीच्या केवळ एका डोसमध्ये हे विषाणू २४ तासांत नष्ट होतात, असा त्यांचा दावा आहे. कोरोना हा आरएनए पद्धतीचा विषाणू असतो आणि आयव्हरमेक्टीन हे या व्हायरल आरएनएला संपवू शकते, असे त्यांना प्रयोगशाळेतील संशोधनात दिसून आले. मात्र, या औषधाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून बाकी आहेत.

प्लाझ्मा थेरपी 
या पद्धतीबाबत जागतिक पातळीवर खूप आशेने पाहिले जाते आहे. प्लाझ्मा म्हणजे रक्तातील पांढऱ्या आणि तांबड्या पेशी विलग केल्यावर उरणारा द्राव. एखादा रुग्ण एखाद्या विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य सांसर्गिक आजारातून बरा झाला, की त्याच्या रक्तात त्या विषाणू अथवा जीवाणूविरोधी प्रतिकार घटक असलेली प्रतिपिंडे (अॅंटिबॉडिज) तयार होतात. ही प्रतिपिंडे प्लाझ्मात असतात. त्यामुळे कोव्हिड-१९ आजाराने पीडित रुग्णाला जर ही प्रतिपिंडे असलेला, कोव्हिड-१९ च्या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा शिरेवाटे दिला, तर त्याचा आजार बरा होण्याची शक्यता असते, असा शास्त्रीय विचार आहे. लवकरच भारतामध्ये ही उपचार पद्धत सुरू होण्याची शक्यता आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस : कोव्हिड-१९ या अनिर्बंध वाढत चाललेल्या आजाराला रोखण्यासाठी प्रतिबंधक लस निर्माण होणे ही एक नितांत गरज आहे. आज जगभरात सुमारे ३०० संशोधन संस्था यामधील संशोधनासाठी जय्यत तयार आहेत. या साऱ्या संस्थांच्या लसी विविध पद्धतींचा वापर करणार आहेत. यामध्ये डीएनए आणि आरएनए ही न्यूक्लिक अॅसिड्स, विषाणूसारखे अन्य प्रकारचे अतिसूक्ष्म कण, पेप्टाइड्स, व्हायरल व्हेक्टर, रिकॉम्बिनंट प्रोटिन्स, लाइव्ह अॅटिन्युएटेड व्हायरस, इनॅक्टिव्हेटेड व्हायरस अशा अनेकविध पद्धतींवर त्या त्या संस्था कार्य करणार आहेत.

बीसीजी लस : गेली अनेक वर्षे बाळाचा जन्म झाल्यावर पहिल्या २१ दिवसांत त्याला बीसीजीची लस दंडावर दिली जाते. ही लस क्षयरोग प्रतिबंधक आहे. पण तिचा कोरोना विषाणूने होणाऱ्या कोव्हिड-१९ या आजारावर प्रतिबंधक परिणाम होईल असा अनेकांचा कयास आहे. याबबत

  • ४१७० ऑस्ट्रेलियन आरोग्य कर्मचाऱ्यांवर तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत.
  • हॉलंडमध्ये बीसीजी-कोरोना ही लस विकसित करण्यात येत आहे.

जर्मनीमध्ये मॅक्स प्लँन्क इन्स्टिट्यूट फॉर इन्फेक्शन बायोलॉजीतर्फे व्हीपीएम १००२ याआधी क्षयरोगासाठी तयार केल्या गेलेल्या लसीबाबत जर्मनीतील असंख्य रुग्णालयांत तिसऱ्या टप्प्यातील अभ्यासपूर्ण संशोधन सुरू झाले आहे. यामध्ये वृद्ध व्यक्ती आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर प्रयोग केले जात आहेत. 

याबरोबरच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इम्पिरिअल कॉलेज ऑफ लंडनसारख्या शैक्षणिक संस्था, नोव्हाव्हॅक्स, इनोव्हायो फार्मास्युटीकल्स, इंटरनॅशनल व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट, मॉडर्ना इन्कार्पोरेशन, जॉन्सन अॅंड जॉन्सन, सॅनोफी, जीएसके, मेडीकॅगो, जनेरेक्स बायोटेक्नोलॉजी, व्हॅक्सार्ट अशा जगातील औषध आणि लसीकरण क्षेत्रातील नामवंत कंपन्या कोरोना विषाणू प्रतिबंधक लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

संबंधित बातम्या