लॉकडाउन - एक दुःस्वप्न

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 1 जून 2020

आरोग्य संपदा
​'लॉकडाउन' शब्द उच्चारताच सक्तीच्या सुट्या, घरात बंदिस्त राहणे, कोणताही प्रवास टाळणे, लोकांना न भेटणे अशा अनेक सूचना आपल्या कानांवर सतत पडत राहतात.. आणि त्याचा आपल्यावर मानसिक, शारीरिक दबावही येतो. काही लोकांनी या लॉकडाउनबद्दल अनेक गैरसमजही करून घेतले आहेत. त्यामुळे लॉकडाउन या संकल्पनेचा नेमका अर्थ आणि तिची सद्य:स्थितीत असलेली गरज लक्षात घ्यावी लागेल. 'लॉकडाउन' या संकल्पनेचे थोडक्यात केलेले विश्लेषण...

लॉकडाउन हा शब्द आता आपल्याला नको इतका परिचयाचा झाला आहे. काहींनी त्याची धास्ती घेतली आहे, तर अनेकांना आता तो एखादा तुरुंगवास वाटू लागला आहे. कुठलाही नियम तोडण्यात आनंद वाटणाऱ्या अनेकांना तर सध्या पर्वणीच मिळाली आहे. गंमत म्हणजे एरवी भाषा शुद्धतेबाबतीत खूप तत्पर असणाऱ्या धुरीणांनी अजून 'लॉकडाउन'ला पर्यायी शब्द सुचवलेला नाही. पण एक मात्र खरे की सर्वसामान्यांना आजवर माहीत नसलेल्या या संकल्पनेने अनेकांची झोप उडवली आहे. तीनचार वर्षांच्या लेकरांपासून वयोवृद्ध ज्येष्ठांपर्यंत साऱ्यांच्या तोंडात हा शब्द खेळतोय आणि प्रत्येकालाच त्याचा घोर लागून राहिला आहे. म्हणूनच या लॉकडाउनबद्दल थोडी माहिती घेणे ज्ञानरंजक ठरेल.

लॉकडाउन : कोणत्याही एखाद्या अभूतपूर्व परिस्थितीत जेव्हा घराबाहेर पडणे, स्थानांतरित होणे, इतरांशी वैयक्तिक संपर्क साधणे खूप जोखमीचे होते, अशा वेळेस सामान्यत: प्रत्येकजण जिथे असतो, तिथेच त्याने थांबणे याला 'लॉकडाउन' म्हणतात. सहसा हा आदेश सरकारी पातळीवर, उच्च अधिकाऱ्याकडून काढला जातो आणि यालाच 'स्टे-अॅट-होम ऑर्डर' किंवा 'घरी रहा, सुरक्षित रहा' असे म्हटले जाते. सामान्यतः हा शब्द तुरुंगातील नियमावलीबाबत (प्रिझन प्रोटोकॉल) वापरला जातो. जेव्हा मोठ्या तुरुंगातून काही कैदी पळून गेले किंवा त्यांनी बंडखोरी केली, की त्या तुरुंगात प्रत्येक कोठीला कुलूप लावून कैद्यांना बाहेर पडायला मज्जाव केला जातो, यालाच 'लॉकडाउन' म्हटले जाते. लॉकडाउनचा वापर कधीकधी विशिष्ट सुविधेच्या अंतर्गत केला जातो. उदा. संगणकीय सिस्टीमला हॅक करण्याचा धोका असला किंवा युद्ध, दंगल अशा बाह्यघटनेपासून संरक्षण करण्यासाठी केला जाऊ शकतो. एखादी इमारत किंवा संस्था लॉकडाउन केली जाते, तेव्हा इमारतींमध्ये बाहेरील बाजूचे दरवाजे लॉक केलेले असतात, जेणेरूकन कोणीही प्रवेश करू शकणार नाही किंवा इमारतीबाहेर पडणार नाही.

संपूर्ण लॉकडाउन : संपूर्ण देशाच्या, प्रांताच्या किंवा मोठ्या भूभागाच्या बाबतीत जेव्हा मोठा धोका असेल, तेव्हा संपूर्ण लॉकडाउनचा आदेश दिला जाऊ शकतो. यामध्ये आम जनतेने ते जिथे कुठे असतील तिथेच थांबून राहायचे. कोणत्याही इमारतीत किंवा त्यामधील खोल्यांमध्ये कुणीही बाहेरून आतमध्ये प्रवेश करायचा नाही किंवा आत असलेल्यांनी बाहेर पडायचे नाही. मात्र, जे कुणी बाहेर असतील त्यांनी सुरक्षितपणे नियुक्त केलेल्या जवळच्या ठिकाणी जाणे आवश्यक असते.

ड्रिल लॉकडाउन : एखाद्या देशाला, प्रांताला, शहराच्या बाबतीत कोणत्याही धोका नसताना, लॉकडाउनची रंगीत तालीम आयोजित केली जाऊ शकते. याला ड्रिल लॉकडाउन म्हणतात. यामध्ये लोकांना या काळात कशी शिस्त पाळावी, स्वसंरक्षणासाठी काय काळजी घ्यावी हे समजून येते.

सामान्यतः लॉकडाउनचे दोन मुख्य प्रकार आहेत.
प्रतिबंधात्मक (प्रीव्हेन्टिव्ह) लॉकडाउन :
 
यामध्ये जनता, सरकारी संस्था, कारखाने, शाळा-कॉलेजेस आणि संगणक सिस्टीमची सुरक्षा, सुरक्षितता राखण्यासाठी, कोणताही धोका टाळण्यासाठी असामान्य परिस्थिती किंवा सिस्टीममधील कमकुवतपणाचे निराकरण करण्यासाठी अंमलबजावणी केलेली पूर्वनियोजित योजना असते.

प्रतिबंधात्मक लॉकडाउनचे ध्येय हे व्यवहारातील असुरक्षित, असमान, अनुरूप नसलेल्या अयोग्य गोष्टीमध्ये सुधारणा करणे आणि विशिष्ट आपत्कालीन परिस्थितीत उद्‌भवणारी जोखीम आणि धोके पूर्वनियोजन करून टाळणे. या प्रकारामध्ये प्रत्येक अपेक्षित धोक्याची कल्पना करून तिचे व्यवहारामध्ये कसे निराकरण करता येईल याचे नियोजन करावे लागते. या अंतर्गत केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि त्रास याचे विश्लेषण करावे लागते. त्यासाठी अनेक पर्यायांचा विचार करावा लागतो. हे पर्याय साधे आणि अमलात आणण्यास सोपे असावे लागतात आणि ते वेळप्रसंगी बदलण्याची लवचिकता त्यात असावी लागते. 

ही कार्यप्रणाली करताना त्यात पुन्हा पुन्हा काही गोष्टींत बदल करण्याची गरज भासते. अशा साऱ्या गोष्टींचा विचार करूनच एखादी प्रतिबंधक लॉकडाउनची कार्यप्रणाली निश्चित करावी लागते.
थोडक्यात प्रतिबंधक लॉकडाउनमध्ये एखादी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्यात जीवितहानी, आर्थिक नुकसान, लोकांना होणारे त्रास कमीतकमी कसे होतील याचे सूक्ष्म नियोजन करावे लागते.

आणीबाणीसदृश (इमर्जन्सी) परिस्थितील लॉकडाउन : 
अनेकदा अशी परिस्थिती उद्‌भवते, की पुढच्या काही काळात अगदी थोड्या अवधीत कमालीची जीवितहानी आणि प्रचंड नुकसान होण्याची शक्यता असते. उदा. शत्रूचे आक्रमण, अतिरेकी हल्ल्याची खात्रीची माहिती, कमालीच्या वेगाने पसरणाऱ्या सांसर्गिक आजाराचे संक्रमण

कोरोना लॉकडाउन : भारतात २५ मार्च २०२० रोजी संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले. 'कोरोना विषाणूच्या संसर्गाचे संपूर्ण देशावर आणि जगावर होत असलेले भीषण परिणाम पाहता भारत हा पुढे २१ दिवस लॉकडाउन राहील' अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. प्रत्येक नागरिकाने इतरांशी संपर्क टाळावा, विलगीकरणाची काळजी घ्यावी, कोरोनाचा संसर्ग टाळावा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर आता ३१ मेपर्यंत एकूण ६८ दिवस भारतात चार टप्प्यांत विभागलेला लॉकडाउन आहे. या दरम्यान आरोग्यसेवा, पोलीस, सरकारी कर्मचारी, बँका, एटीएम, पत्रकार, पेट्रोल, इंधन, दूध, भाजीपाला, अन्नधान्य अशा जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यांना मुभा होती. बाकी साऱ्या गोष्टी, सर्व व्यवहार बंद ठेवले गेले होते. पोलिसांद्वारे रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली.

साथ जशी वाढत गेली, तसे वेगवेगळे पर्याय वापरण्यात आले. जिथे अजिबात रुग्ण नाहीत असे विभाग 'ग्रीन झोन' म्हणून गणले गेले. जिथे खूप रुग्ण आहेत असे विभाग 'रेड झोन' आणि मध्यम प्रमाणात असलेले विभाग 'ऑरेंज झोन' म्हणून ठरवले गेले. त्या त्या विभागात काही गोष्टींना मुभा आणि काही गोष्टींना बंदी ठेवण्यात आली. ज्या वस्त्यांमध्ये खूप रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असे भाग सील बंद करून नागरिकांची ये-जा पूर्ण थांबवण्यात आली. यांना 'कंटेनमेंट झोन' म्हणून ओळखले जाऊ लागले.

कोरोनाची साथ कधी ना कधीतरी आटोक्यात येईलच आणि लॉकडाउनसुद्धा संपुष्टात येईल. पण तो कायमच आपल्या सगळ्यांसाठी एक दुःस्वप्न होऊन अनेक वर्षे स्मृतीत घर करून राहील.

लॉकडाउन सैल करणे : लॉकडाउनचा काळ वाढवणे किंवा त्यामधील निर्बंध सैल करून तो उठवणे, यासाठी महत्त्वाच्या पाच गोष्टी विचारात घेतल्या जातात.
 जेवढी बाधित रुग्णसंख्या आहे, तेवढ्या जागा रुग्णालयात उपलब्ध असणे. आज भारतातला बाधित रुग्णांच्या संख्येचा वेग अपरिमित वाढतो आहे. विशेषतः मुंबईसारख्या शहरात रुग्णांची संख्या भौमितीय प्रमाणात वाढते आहे. सरकारी रुग्णालयात यापुढे आता जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या खाटा वापरण्यासाठी त्यांचे अधिग्रहण करण्यात येत आहे. खासगी रुग्णालयातल्या ८० टक्के खाटा या कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचा अध्यादेश काढण्यात आलेला आहे.
 ज्या वेळेस लागोपाठ आठ ते दहा दिवस मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या कमीकमी होत अगदी अल्प राहते, त्यावेळेस लॉकडाउन सैल करण्याचा विचार करता येतो.
 कोविड -१९ च्या संकलित पटावर जेव्हा नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज कमी होतेय असे सलग दहा दिवस दिसते.
 संशयित रुग्णांच्या चाचणीसाठी लागणारे टेस्टिंग किट्स आणि डॉक्टर्स तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना लागणारे पीपीई यांची गरज आणि उपलब्धता समसमान असेल.
 लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने कोरोनाच्या साथीची दुसरी लाट येण्याची शक्यता नसेल.
या पाचही गोष्टी अनुकूल असतील, तरच लॉकडाउन शिथिल केला जावा, असे ब्रिटनमधील सरकारी यंत्रणेने जाहीर केलेले आहे.

कोरोनाच्या साथीमध्ये आजवर कोणतेही प्रमाणित आणि खात्रीचे परिणामकारक औषध अजून शोधले गेलेले नाही, तसेच प्रतिबंधात्मक लसही अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे प्रतिबंधक उपाय हेच रोगनियंत्रणाचे पर्याय उरतात. यात -

  • सोशल डिस्टन्सिंग - एकमेकांमध्ये ३ ते ६ फूट अंतर ठेवणे.
  • बाहेर जाताना आणि अन्य व्यक्तीच्या संपर्कात असताना मास्क वापरणे.
  • हात वरचेवर शास्त्रीय पद्धतीने स्वच्छ धुणे, सॅनिटायझर वापरणे.
  • खोकताना तसेच शिंकताना दंडाच्या आतील बाजूस खोकणे किंवा शिंकणे. अन्यथा टिशूपेपर वापरून त्यात खोकणे. हे खोकल्याचे शिष्टाचार खूप महत्त्वाचे आहेत.
  • आपले घर, परिसर, घरातील दरवाजे, फर्निचर वगैरे गोष्टी जंतुनाशक द्रावणाने, सहसा सोडियम हायपोक्लोराइटने दिवसातून किमान दोनदा साफ करणे.

यांपैकी सोशल डिस्टन्सिंगचे निकष भारतासारख्या गर्दीप्रिय देशांना आचरणात आणणे कठीणच असते. त्यामुळे लॉकडाउन हे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी केलेली कठोर योजना असते. भारतात कोरोनामुळे आजवर सव्वालाख लोक बाधित झाले आहेत. जर हा लॉकडाउन वेळेवर जाहीर केला नसता, तर ही संख्या दुप्पट किंवा त्याहीपेक्षा जास्त आढळली असती असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या