आत्महत्या का होतात?

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 24 जून 2020

आज शैक्षणिक, सामाजिक, राजकीय,  व्यावसायिक अशा प्रत्येक क्षेत्रांत अटीतटीची  स्पर्धा  आहे. या स्पर्धेचा प्रचंड ताण लहान-थोर अशा सर्वांवर  येताना दिसतो. पण  यावर आत्महत्या हा  उपाय नक्कीच असू शकत नाही, मग  तरीही का होतात आत्महत्या हे जाणून घेणे गरजेचे आहे...

क्लिओपात्रा, मार्लिन मन्रो, रॉबिन विल्यम्स, व्हॅन गॉग, अर्नेस्ट हेमिंग्वे, गुरुदत्त, साने गुरुजी, व्हर्जिनिया वुल्फ, जिया खान आणि आता सुशांतसिंह राजपूत... या साऱ्या प्रसिद्ध व्यक्तींनी आत्महत्या केल्या आणि आपले जीवन संपवले. आत्महत्येची बातमी मनाला चटका लावून जाते. अनेकांना त्या व्यक्तीची हुरहूर लागून राहते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांनी साऱ्या महाराष्ट्राचे मन आणि संवेदनाशील सामाजिक जीवन अस्वस्थ झाले होते. 

 आत्महत्येची कोणतीही घटना घडली, की त्याने किंवा तिने असे का केले? याबाबत तर्कवितर्क सुरू होतात. अनेक कारणे सांगितली जातात. जेवढी व्यक्ती प्रसिद्ध तेवढी ही चर्चा जास्त काळ आणि जास्त खोलात जाऊन होत राहते. आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य असते. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या असंख्य व्यक्तींचा मागोवा एका संशोधकाने काही वर्षांनंतर घेतला. प्रत्येक व्यक्तीने आपला आत्महत्या करण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता, हे लक्षात आल्याचे सांगितले. 

एका आत्महत्येमागे सरासरी सहा जणांची आयुष्ये उद्ध्वस्त होतात. आत्महत्येचे दृश्य पाहिलेली व्यक्ती कित्येक वर्षे ते विसरू शकत नाही, त्यामुळे त्यांनाही मानसिक आजार होऊ शकतात. त्यांच्या कुटुंबीयांकडे वेगळ्या नजरेने बघितले जाते. आत्महत्या केलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा विमा लागू होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसमोर आर्थिक प्रश्न उभे राहतात. जागतिक पातळीवर आपण पाहिले, तर गेल्या ४०-४५ वर्षांत आत्महत्येच्या प्रमाणात साठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. १५ ते ४५ या वयोगटात आत्महत्या हे मानवी मृत्यूच्या सर्व प्रमुख कारणांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतातही तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. आत्महत्या करणाऱ्यांत ४० टक्के लोक १५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. २० टक्क्यांहून कमी लोक तडकाफडकी आत्महत्या करतात. उरलेले ८० टक्के मात्र बराच काळ अशा भयंकर विचारांशी झुंज देत असतात.

 आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात अशा घटना घडत जातात, की त्या आता सुधारता येणे शक्य नाही असे त्यांना मनोमन वाटत राहते. त्यावेळची परिस्थिती त्या व्यक्तीला आयुष्याच्या अशा कड्यावर आणून सोडते, की कडेलोट करून घेण्याशिवाय त्याला पर्याय नाही असे ठामपणे वाटते. दिवसेंदिवस आत्महत्येचे वाढते प्रमाण एक भयानक स्वरूप घेत आहे. ते थांबवायचे असेल तर आत्महत्येची जी कारणे दिसून येतात, त्यांचा विचार करणे उचित ठरेल.

मानसिक आजार 
विविध प्रकारच्या मानसिक आजारांची परिणती आत्महत्येमध्ये होऊ शकते. मानसिक आजारांवर उपचार घेत असताना याबाबतची शंका मानसरोगतज्ज्ञांना येत असते. त्याची सूचनाही ते त्या रुग्णाच्या आप्तेष्टांना देत असतात. पण आपल्या देशातील मानसरोगाच्या उपचारांकडे रुग्णांचे आणि त्याच्या स्वकीयांचे नेहमीच दुर्लक्ष होत असते. या सूचनांकडे एक तर डोळेझाक केली जाते किंवा उपचारच थांबवले जातात.

    चिंता ः पराकोटीची चिंता, सोशल फोबिया (सामाजिक भयगंड), पॅनिक अॅटॅक्स, ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर अशा आजारांनी व्यक्तीचे जीवन सैरभैर होत असते. यामुळे कुणाशी मैत्री टिकत नाही, शिक्षण अर्धवट सोडले जाते, नोकरी सतत सोडण्याचे प्रकार घडतात. यामधून उद्‌भवणारा एकाकीपणा आणि भीती याचे पर्यवसान आत्महत्येत होते.

     बायपोलर डिसऑर्डर ः यामध्ये काही काळ कमालीचे नैराश्य आणि त्यानंतर अचानकपणे उन्मादावस्था येणे अशा हिंदोळ्यावर मनस्थिती असते. त्यामुळे अशा व्यक्तींचे नातेसंबंध, मैत्री टिकत नाही. आयुष्यात अनेक प्रसंगात समतोल साधता येत नाही. अशात तीव्र नैराश्याचा झटका आला तर आत्महत्या घडते.

     तीव्र नैराश्य ः आत्महत्येचे हे सर्वात प्रमुख कारण आहे. यात व्यक्तींना जगणे नीरस वाटू लागते. आयुष्यातल्या कोणत्याच गोष्टीत त्यांना आनंद वाटत नाही. योग्य मानसोपाचाराने नैराश्य काबूत राहू शकते. मात्र, हा उपचार दीर्घकाळ आणि कदाचित कायम स्वरूपी घ्यावा लागतो. उपचार न घेणाऱ्या किंवा अर्धवट सोडून देणाऱ्या, शंभरातल्या नव्वद व्यक्तींमध्ये आत्महत्येची शक्यता असते.

     स्किझोफ्रेनिया ः या अतिशय गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजाराला छिन्नमनस्कता असेही म्हणतात. यामध्ये तीव्र नैराश्य, विविध आभास होणे, आकलनविषयक समस्या (कॉग्निटिव्ह डिसऑर्डर) अशी लक्षणे दिसतात. या लक्षणांमुळे ही व्यक्ती दैनंदिन जीवन नैसर्गिक आणि सुरळीतपणे जगू शकत नाही. या आजारातल्या २० टक्के व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होतात.

वेदनामय पूर्वायुष्य
यामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा आजारांचा समूह येतो. पूर्वायुष्यातील शारीरिक छळ, बलात्कार, युद्धाच्या आठवणी, शारीरिक हिंसाचार अशा पराकोटीच्या गोष्टींच्या वेदनामय आठवणी सतत येत राहतात. अचानक त्या आठवणींचे फ्लॅश डोळ्यासमोर चमकत राहतात. सर्व भावना आणि जाणिवा थिजून जातात. मनात चिंता आणि भीतीचे काहूर माजते. एक अगतिकपणा येतो आणि त्यातून आत्महत्या घडतात.

चिडवणे 
लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये एकमेकांना चिडवणे नावे ठेवणे, टोमणे मारणे ही नेहमीचीच गोष्ट असते. पण कित्येकदा काही मुले किंवा मोठी माणसेदेखील एखाद्याच्या व्यंगावरून, स्वभावावरून, चुकांवरून दुसऱ्यांना सतत हिणवत राहतात. कित्येकदा सर्वांसमोर लाज काढली जाते. काही जणांना या चिडवण्यामुळे आपले आयुष्य निरर्थक वाटू लागते, नको हे लाजिरवाणे जीवन असे विचार मनात येऊ लागतात. त्यांना निराशा ग्रासते आणि हे आपण बदलू शकणार नाही म्हणून अगतिकता वाटत राहते. अनेकदा हे हिणवणे इतर लोकांच्या लक्षातही येत नाही, पण ज्याला चिडवले जाते त्याला एकदिवशी ते सर्व असह्य होते आणि जगण्याचे सर्व मार्ग खुंटल्यासारखे वाटून तो आपले आयुष्य संपवतो.

 सध्या सोशल मीडियावर, ब्लॉग्जमध्ये, काही वेबसाइट्सवर 'सायबर बुलिंग' होत असते. एखाद्याच्या खासगी गोष्टी चव्हाट्यावर आणून त्याच्या अब्रूचे धिंडवडे उडवले जातात. अशा वेळेस आपण कमावलेल्या प्रतिष्ठेची धूळधाण सहन न होऊन आत्महत्या घडल्याची अनेक उदाहरणे आहेत.

स्वभावदोष 
पर्सनॅलिटी डिसऑर्डरमध्ये व्यक्तीच्या स्वभावातील दोषांमुळे त्याचे कुणाशीच नीट जुळत नाही. आवेगशील वागणे, रागांवर आणि अन्य भावनांवर नियंत्रण ठेवता न येणे हे स्वभावदोष असल्यास आत्महत्येची शक्यता जास्त असते. 

 काही व्यक्ती इतरांवर, विशेषतः छळणाऱ्या जोडीदारावर खूप अवलंबून असतात. या परावलंबित्वाबाबत त्यांना वाईटही वाटते आणि त्रासही होतो. त्यातून सुटका म्हणून कित्येकदा आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो. 

 काही व्यक्ती इतरांना सतत टाळत असतात. आपण समाजामध्ये, ठराविक समूहामध्ये, मोठ्या लोकांमध्ये सामील होऊ शकणार नाही असे वाटून ते सर्वांना दूर ठेवत जातात. यातून एकटेपणा येतो. आपल्याला कोणी नाही अशी भावना येत राहते. जी पुढे स्वतःला संपवण्याचा विचारात परिवर्तित होते.  

व्यसनाधीनता
मद्य आणि नशील्या गोष्टींचे व्यसन यामुळे नैराश्य वाढते. खरे तर सुरुवातीला वेदनामय आणि दुःखद गोष्टी विसरायला व्यसने केली जातात. त्यामुळे मेंदूतल्या मज्जातंतूमधील संवेदनावाहकांवर परिणाम होऊन दुःख काही काळ हलके झाल्यासारखे वाटते. पण कालांतराने हे दुःख विसरण्यासाठी लागणाऱ्या मद्याचे किंवा नशील्या गोष्टींचे प्रमाण वाढत जाते. एक दिवस कितीही मद्य किंवा ड्रग्ज घेतले, तरी ती 'किक' बसत नाही. पण सवयीने ते घेतले जात राहते. यातूनच तीव्र नैराश्याचा झटका येऊन आत्महत्येचा पर्याय स्वीकारला जातो.

बेरोजगारी
नोकरी दीर्घकाळ न मिळणे किंवा असलेली नोकरी अकारण अचानकपणे जाणे, या दोन्ही प्रकारांत आत्महत्या घडतात. नोकरी व्यवसाय किंवा उत्पन्नाचे काही साधन नसल्यास रोजच्या गरजा भागवणे कठीण होत जाते. आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काही आर्थिक मदत करू शकत नाही अशी भावना, आपले आयुष्य निरर्थक आहे असे विचार निर्माण करते. त्यातून तीव्र नैराश्य येते आणि जीवन संपवले जाते. ज्याला काही काम आहे अशा व्यक्तीचे आयुष्य रोजच्या दबडघ्यात चिंता विसरायला लावते. उलटपक्षी काम नसलेला माणूस एकटा पडतो, त्याचा वेळ पूर्ण रिकामा असतो, अशा वेळी नाना चिंता आणि वैफल्य मनात घर करू लागते.

एकाकीपणा 
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. इतरांना भेटून त्यांच्याशी गप्पागोष्टी करून मन रिझवले जाते. मनात उत्साह आणि सकारात्मक ऊर्मी येते. या उलट एकाकीपणामुळे नैराश्य वाढू लागते. आपल्या समस्यांची चर्चा इतरांशी करून त्यात मार्ग शोधणे हा मनुष्य स्वभाव असतो. पण एकाकी जीवनात हे सारे मार्ग स्वतःहून किंवा परिस्थितीमुळे बंद होतात. मग वेडेवाकडे निर्णय घेतल्याने अनेक चुकीच्या घटना घडत जातात. खाण्यापिण्याची आबाळ, झोप नीट न लागणे, व्यसनाधीनता अशा गोष्टींची त्यात भर पडून नैराश्य आणखी वाढते. परिणामतः आत्महत्येचे विचार मनात येऊ लागतात.

प्रेमसंबंधातील वितुष्टे 
प्रेमसंबंधांमध्ये अनेक प्रकारच्या समस्या उभ्या राहत असतात. काही जणांना मित्र किंवा मैत्रीण नसल्याने, काहींना प्रेम नाकारल्याने, तर काहींना खास सोशलायझेशनचा ग्रुप नसल्याने नैराश्य येते. तर कधी कौटुंबिक हिंसाचार, अपमानास्पद वागणूक यामुळे निराश होतात. प्रेमसंबंधातील ब्रेकअप्स, घटस्फोट, वेगळे राहणे यामुळे नैराश्य, चिंता, दोषीपणाची भावना, धसका घेणे अशा गोष्टी घडून एखाद्या व्यक्तीला कमालीच्या भावनिक वेदना आणि दुःख होते. या भावनातिरेकामध्ये आत्महत्येचे विचार येतात आणि त्या घडतातही.

 समलिंगी प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींना भिन्नलिंगी व्यक्तींपेक्षा जास्त तणाव आणि नैराश्य येते असे एका सर्वेक्षणात आढळले आहे. त्यामुळे या व्यक्तींतही आत्महत्या जास्त होऊ शकतात.

आनुवंशिकता 
काही कुटुंबांत आत्महत्यांची परंपरा आढळून येते. याबाबत केल्या गेलेल्या एका संशोधनात अशी कुटुंबे, जुळी अपत्ये, दत्तक मुले यांचे प्रदीर्घ संशोधन करून आत्महत्येची प्रवृत्ती काही कुटुंबात आनुवंशिकतेने येत असावी असे दाखवून दिले आहे. एका शास्त्रीय विचाराप्रमाणे स्वभावातील आक्रमकता, स्वभावदोष, जाणिवेतील दोष, चिंतातूरपणा, तणावाला बळी पडणे या सर्व जनुकीय प्रवृत्ती आहेत. या साऱ्यातूनच आत्महत्येच्या घटना घडत असतात. त्यामुळे आत्महत्या जनुकीय प्रवृत्तींचा परिणाम आहे असे मानले जाते. मात्र, आत्महत्येची आनुवंशिकता असली तरी बाह्य वातावरण आनंददायी आणि आधार देणारे असेल तर आत्महत्या टळू शकतात.   

वैचारिक गोंधळ 
काही अतिशय बुद्धिमान लोकांच्या मनात, मी का जगतो? माझ्या जगण्याला काही अर्थच उरलेला नाही, माझे अस्तित्व कशासाठी आहे? असे आधिभौतिक विचार मनात येऊ लागतात. याला 'एक्झिस्टन्शियल क्रायसिस' म्हणतात. यातून जगातील काही नामवंतांच्या आत्महत्या घडल्या आहेत. 

दीर्घकालीन आजार 
कर्करोग, काही मेंदूचे रोग, विकालांगावस्था, एड्स यामध्ये जेव्हा कोणतेही औषध वा उपचार आपला आजार बरा करू शकत नाही असे लक्षात आल्यावर अनेक व्यक्ती मरण जवळ करतात. यासाठी अनेक देशात इच्छामरणाचा कायदादेखील संमत झालेला आहे.

 कमालीचे वेदनामय आजार जिणे असह्य करून सोडतात. कोणत्याच औषधोपचाराने वेदना थांबत नाहीत, अशावेळेस त्यातून सुटका म्हणून आत्महत्या घडल्याचे अनेकदा दृष्टोत्पत्तीस येते. मात्र आजकाल 'पेन मॅनेजमेंट' ही नवी वैद्यकीय शाखा उदयाला आलेली आहे. त्यातून अनेकांना वेदनामुक्ती किंवा वेदनाशमन झालेले आढळते.  

आर्थिक तोटा
जेव्हा अचानक काही कारणाने मोठ्या व्यवसायामध्ये खूप तोटा होतो, तेव्हा आपण निर्माण केलेले विश्व लयाला गेले, आता पुढे काय या भीतीने आत्महत्या घडतात. शेअर बाजारात तोटा झाल्याने अशा घटना घडतात. कायदे न पाळल्याने होणारे मोठे दंड अशा घटनांना कारणीभूत ठरतात.  

औषधे
काही निद्राशामक औषधे, काही नैराश्यावरील गोळ्या यांच्यामुळे आत्महत्येचे विचार डोकावू लागतात.

इतर कारणे 
एक चिंतेची बाब म्हणजे आजकाल १५ ते ४० वर्षांमधील वयोगटांत आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे, या वयोगटात अभ्यासाचा ताण, परीक्षेत अपयश आणि प्रेमभंग ही तीन प्रमुख कारणे आहेत. 

 जगाच्या तुलनेच भारतात स्त्रियांमधील आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे. सामाजिकदृष्ट्या दुय्यम स्थान आणि हुंडाबळी ही दोन कारणे यासाठी सांगितली जातात. रागीट, आततायी, हट्टी, टोकाचा परफेक्शनिस्ट आणि अप्रगल्भ असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येची वृत्ती जास्त असते. ज्या व्यक्ती आत्महत्येचे विचार करतात, ज्यांना जीव नकोसा वाटतो आणि जे आत्महत्येसाठी नियोजन करतात अशा व्यक्तींमध्ये आत्महत्या घडण्याचे प्रमाण जास्त असते.

मानसोपचार तज्ज्ञांकडे नियमित उपचार, योग्य समुपदेशन, नातेवाईक 
आणि मित्रमंडळींचा सातत्याने पाठिंबा, आत्महत्येचे विचार आणणारी बाह्य कारणे दूर करणे अशा गोष्टी आत्महत्या टाळायला गरजेच्या असतात.   

संबंधित बातम्या