परिचारिकांचे योगदान

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 13 जुलै 2020

 कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी लढणारे बऱ्याच क्षेत्रांतील ''कोरोना योद्धे'' आपण पाहिले. पण यामध्ये डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावली ती परिचारिकांनी. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...

दरवर्षी ७ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी ७ एप्रिल हा दिवस परिचारिकांच्या गौरवासाठी जाहीर केला होता. दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा होतो. सन २०२० हे जागतिक आरोग्य संघटनेने ''आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष'' म्हणून घोषित केले आहे. परंतु, कोरोनाच्या जागतिक महासाथीच्या संकटामुळे या तीनही गोष्टींचे कोणतेही समारंभ झाले नाहीत. पण सेवाव्रत घेतलेल्या नर्सेसनी आपल्या निरलस कार्याने ते साजरे केले. त्याबाबत कोणतीही तक्रार कोठेही केली नाही. जगामधले कोणतेही रुग्णालय घ्या, आरोग्यसेवा घ्या, त्यात घडणाऱ्या कामांचे कौतुक करताना परिचारिकांच्या कार्याला नेहमीच विसरले जाते. यावर्षी या तीनही बाबतीत तेच घडले.

  यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ''स्टेट ऑफ द वर्ल्ड नर्सिंग रिपोर्ट २०२०'' चा शुभारंभ. हा अहवाल नर्सिंग कर्मचाऱ्यांची जागतिक परिस्थिती, आरोग्य सुधारण्यासाठी त्यांचे योगदान, नर्सेसचे जगातील सर्व देशांत होणारे उत्तम कार्य, त्यांच्या अडचणी याबद्दल असंख्य सर्वेक्षणे होत आहेत. त्यातून साकारलेल्या भावी नियोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचना या अहवालात असतील. या अहवालात सर्व देशातील नर्सेसच्या कार्याची माहिती, त्यांच्या विषयीची धोरणे, निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या परिचारिकांशी संवाद, संशोधन, पुरस्कार आणि भावी काळात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीची कार्यसूची ठरवली जाईल. मिडवाइफरी म्हणजेच सुइणींबाबत असाच एक अहवाल २०२१ मध्ये प्रसारित केला जाईल.

नर्सिंगचा इतिहास
 नर्सिंगला वेदांच्या काळापासूनचा इतिहास आहे. आजारी व्यक्तीची काळजी घेण्याच्या कार्याला त्याकाळी समाजात मोठा मान होता. इ.स.पू. १००० मध्ये चरकाच्या काळात व्यावसायिक शुद्ध आचरण, चतुर, कार्यक्षम, दयाळू, रुग्णांची सर्व प्रकारची सेवा करण्यात कुशल, स्वयंपाक, रुग्णांची स्वच्छता, रुग्णांना आंघोळ घालणे, मालिश करणे, उचलणे आणि चालवणे, पाय ठेवणे या गुणांच्या आवश्यकतेचे वर्णन केलेले आहे. आधुनिक वैद्यकाचा जनक मानल्या जाणाऱ्या हिपोक्रेटसनेसुद्धा, ''केवळ औषधोपचार नव्हे, तर रुग्णांची सर्वांगीण काळजी घेणे गरजेचे असते'' असे नमूद केलेले आहे.सुरुवातीच्या ''ख्रिश्चन चर्च कॉन्फेडरेशन''च्या काळात स्त्रिया आपली घरे सोडत असत आणि रूग्ण आणि व्यथित लोकांची सेवा करण्यासाठी आणि त्यांची वैद्यकीय काळजी घेण्यासाठी काम करत असत.

फ्लॉरेन्स नाइटिंगेल
रुग्णसेवेचा मानदंड समजली जाणारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही श्रीमंत घरची मुलगी होती. काही तरी वेगळे करायचे अशा तारुण्यसुलभ विचारांनी तिने नर्सिंगचे शिक्षण घेतले. १८४५ मध्ये, वयाच्या ३४ व्या वर्षी ३८ परिचारिकांच्या एका गटामध्ये सामील होऊन सैनिकांच्या सेवेसाठी ती क्रिमियन युद्धात रणांगणावर गेली. फ्लॉरेन्स नाइटिंगेलने रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आरोग्यविषयक विज्ञानाची तत्त्वे लागू केली. भर लढाईतल्या रुग्णसेवेत येणाऱ्या अडचणींचा समर्थपणे सामना केला. सेनेच्या अधिकाऱ्यांचा विरोध असूनही तिने आपले कार्य अहोरात्र निभावले. तिच्या व्यवस्थापनाचा परिणाम म्हणून, युद्ध रुग्णालयात मृतांचा आकडा ४२ टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत कमी झाला.  

 नाइटिंगेलने १८५६ पर्यंत केलेली कामगिरी त्या काळातील एक आश्चर्यकारक कथा झाली. तिला ''लेडी विथ द लॅम्प'' या नावाने ओळखले जाऊ लागले. इंग्लिश कवी लाँगफेलो यांनी तिच्यावर कविता रचली आणि गायली.ब्रिटिश सरकारने या शूर महिलेला घरी परत आणण्यासाठी विशेष युद्धनौका पाठवण्याचे आदेश दिले. लंडनने या महिलेच्या शाही स्वागतासाठी तयारी केली. पण ते टाळून ती वेगळ्याच फ्रेंच जहाजामधून इंग्लंडला तिच्या घरी पोचली. 

 फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या प्रयत्नांमुळे लंडनमधील परिचारिकांसाठी १८६० मध्ये ''नर्सिंग स्कूल'' सुरू झाले. भारतातील पहिले नर्सिंग स्कूल १९४४ मध्ये मद्रास आणि १९६० मध्ये मुंबईला सुरू झाले. १९५५ मध्ये स्थापन झालेल्या लेडी डफरिन फंडाद्वारे अनेक नर्सिंग रुग्णालये उघडली गेली. त्यामध्ये भारताच्या महिला परिचारिकांच्या प्रशिक्षणाचा समावेश होता. आता देशातील बहुतेक सर्व मोठ्या रुग्णालयांमध्ये परिचारिकांना प्रशिक्षण देऊन सामान्य देखभाल पदविका दिली जाते, तर नर्सिंग कॉलेजमध्ये बी.एससी पदवी दिली जाते आणि मेट्रन आणि सिस्टर शिक्षकांना वॉर्डांच्या संदर्भात नावीन्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. आपण आजही भारतामध्ये वैद्यकीय महाविद्यालये कमी असल्यामुळे डॉक्टरांची संख्या जशी पुरेशी नाही, तशीच नर्सिंग कॉलेजेस कमी असल्याने प्रशिक्षित आणि उच्चशिक्षित नर्सेसही कमी आहेत.

नर्सेसची महत्त्वपूर्ण भूमिका
 उत्तम परिचारिका रुग्णाला तळहातावरच्या फोडासारखं जपते, आजारी रुग्णांची, जखमींची, पीडितांची आणि जराजर्जर वयोवृद्धांची काळजी घ्यायला झटते. एक कुशल आणि कार्यक्षम नर्स होण्यासाठी नर्सेसमध्ये निःस्वार्थी सेवेच्या भावनेबरोबरच उत्तम प्रशिक्षणाची आणि निरंतर अनुभवाचीदेखील गरज असते. ट्रेन्ड नर्स होण्यासाठी एक ते चार वर्षांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक वर्षांपर्यंत त्या विषयाचा कसून अभ्यास करावा लागतो, त्याबरोबरच या साऱ्याचे प्रॅक्टिकल ट्रेनिंगसुद्धा घ्यावे लागते.                                             
परिचारिकांचे कार्य
 फ्लॉरेन्स नाइटिंगेलच्या काळानंतर वैद्यकीय शास्त्रात बरीच प्रगती झाली आणि नर्सिंग विज्ञानातही मूलभूत बदल घडले. नर्सिंग म्हणजे केवळ धार्मिक प्रशासक आणि अज्ञानी व्यक्तींच्या प्रोत्साहनामुळे निर्माण झालेली एक करुणामय सेवाच न राहता ती असंख्य महिलांच्या करिअरचा मार्ग झाली. त्यात विस्तृत वैज्ञानिक अभ्यासक्रम, व्यावसायिक आणि वैयक्तिक कौशल्य प्राप्त करावे लागते. प्रामुख्याने महिलाच नर्सिंगच्या व्यवसायात काम करतात. त्या आपले आयुष्य इतरांचे जीवन उपकृत आणि आनंदी करण्यात खुशी मानतात. केवळ वैद्यकीय उपचार देण्याव्यतिरिक्त, रुग्णाच्या आजाराचे त्याच्यावर होणारे परिणाम त्यांना माहीत असावे लागतात. वेळोवेळी रुग्णामध्ये उद्भवणाऱ्या नवीन लक्षणांची, त्याच्या उपचारांची, त्यांच्या मानसिक स्थितीची इथंभूत माहिती असावी लागते. रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी आणि रोगनिवारण कार्यासाठी नर्सेसचा सहयोग खूप महत्त्वाचा असतो.      
                                                 
विशेष कौशल्ये - आधुनिक नर्सिंगमध्ये प्रत्येक परिचारिका एका विशेष सेवेची तज्ज्ञ असते. 
० सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्यसेवा, ० बाळंतपण, ० रुग्णालयातील आयसीयू, ० औद्योगिक क्षेत्राची काळजी, ० खासगी वैद्यकीय सेवा, ० बालरोग विभाग, ० हृदयरोग, ० अस्थिमज्जा, ० संसर्गजन्य आजार, ० सामान्य औषधनिर्माण, ० शस्त्रक्रिया व शल्यगृह, ० मेंदूचे आजार, ० मानसरुग्ण, ० लसीकरण. 
 निरोगी राष्ट्र घडवण्याकरिता परिचारिकांना खूप महत्त्वाचे काम करावे लागते.जागतिक आरोग्यसंस्थेच्या व्याख्येनुसार आरोग्य म्हणजे संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य असते. केवळ रोगाच्या अनुपस्थितीस आरोग्य असे म्हटले जात नाही, आरोग्य निश्चितपणे जगण्याचे नाव आहे. रुग्णालयात प्रकृती सुधारल्यानंतर, रुग्णाला पूर्वीसारख्या अस्वच्छ वातावरणात परत आणणे, निरोगी देश घडवण्याच्या दृष्टीने केलेली प्रगती मानली जाऊ शकत नाही.परिचारिकांना आरोग्याविषयीचा हा भाव लोकांपर्यंत पोचवावा लागतो.
                    
आव्हानांचा सामना करणे
 नर्सिंगमध्ये रुग्णांच्या आशीर्वादाबरोबरच निरनिराळ्या आव्हानांचादेखील सामना करावा लागतो. या क्षेत्रात हलगर्जीपणाला थारा नसतो. 
- औषधे देताना, रक्त घेताना, कोणतेही उपकरण शरीरात सोडताना, रुग्णाला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवताना नर्सला खूप काळजीपूर्वक वागावे लागते. 
- कोर्ट-कचेरीच्या भानगडी जास्त होणाऱ्या देशांत नर्सेसनाही जास्तच जपून काम करावे लागते. 
- काही प्रसंगांत नर्सेसची कोंडी होते. उदा. डॉक्टरांनी दिलेले औषध चुकीचे आहे किंवा डॉक्टरांनी दिलेला सल्ला रुग्णासाठी हितकारक नाही असे नर्सेसना वाटू शकते. अशा वेळी नर्सने काय करावे? डॉक्टरांना आव्हान द्यावे? असे करण्यासाठी धैर्याची, चातुर्याची आणि व्यवहार-कुशलतेची गरज असते. आणि यात नर्सेसला आपली नोकरी गमावण्याचाही धोका असतो. त्यातही दुर्दैवाने नर्सेस आपल्यापेक्षा कनिष्ठ आहेत, या विचाराने काही डॉक्टर नर्सने दिलेला सल्ला स्वीकारण्यास इतक्या सहजासहजी तयार होत नाहीत.
 नर्सेसमध्ये धीटपणा असावाच लागतो, कारण रुग्णाला दिलेल्या औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत ती कायदेशीरपणे जबाबदार असते, तेव्हा डॉक्टरांनी असे एखादे काम करण्यास नर्सला सांगितले, जे तिच्या अधिकारात नाही किंवा ते चुकीचे आहे, असे नर्सला वाटते, तेव्हा त्या कामाला ‘नाही’ म्हणायचे धैर्य तिच्यात असावे लागते. 

रुग्णालयातील हिंसाचार- भारतात डॉक्टर्सप्रमाणे नर्सेसनादेखील अनेक ठिकाणी सामाजिक हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. यामध्ये शारीरिक हिंसाचाराप्रमाणे शाब्दिक हिंसाचार खूप मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण आफ्रिकेमधील एका सर्वेक्षणानुसार, नर्सेसना हॉस्पिटलमध्ये दुर्व्यवहाराचा आणि हिंसेचा इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त त्रास असतो. एवढेच नव्हे तर पोलीस ऑफिसर्स आणि जेलचे सुरक्षा कर्मचारी यांच्यापेक्षाही नर्सेसबाबत हिंसाचाराच्या घटना अधिक असतात. परिणामतः ७२ टक्के नर्सेसना हॉस्पिटलमध्ये सुरक्षित वाटत नाही. इंग्लंडमधील एका सर्वेक्षणात तर ९७ टक्के नर्सेसना शारीरिक हिंसेचा सामना करावा लागतो असे आढळले आहे. मादक औषधांचे सेवन करणाऱ्या, दारू पिणाऱ्या, तणावात असलेल्या किंवा अत्यंत दुःखी असलेल्या रुग्णांकडून नर्सेसवर हल्ले होतात. 

ताणतणाव - तणावामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक शिणवट्याबाबत (बर्नआउट) देखील नर्सेसना संघर्ष करावा लागतो. 
- बहुसंख्य रुग्णालयांत नर्सेस कमी असल्यामुळे कामाचा भार वाढतो. त्यामुळे एका नर्सला पेशंटकडे जास्त लक्ष पुरवता येत नाही. त्यामुळे तणाव वाढतो. त्यामुळे ती जेवणाच्या सुटीत काम करते. तेही कमी पडल्यामुळे ओव्हरटाइम करते आणि अधिकच तणावग्रस्त होते. 
- तणावाचे दुसरे कारण म्हणजे जास्त वेळ काम आणि कमी पगार. शिवाय सतत बदलणाऱ्या शिफ्ट ड्युटी. परिणामस्वरूप त्यांना नर्सिंग ड्युटी सांभाळत आणखी एखादे काम स्वीकारावे लागते किंवा नर्सिंग पेशा सोडून द्यावा लागतो.
- पेशंटच्या मृत्यूमुळे नर्स दुःखी होते. मरणाला टेकलेल्या रुग्णांची जिवाचा आटापिटा करून सतत काळजी घेणे आणि त्याचा मृत्यू सहन करणे या दोन्ही गोष्टींचा त्यांना मानसिक त्रास होतो आणि त्या शारीरिक आणि मानसिकरित्या कमजोर होऊ शकतात.

नर्सेसचे भवितव्य
 टेक्नॉलॉजीच्या विकासामुळे आणि प्रभावामुळे नर्सिंगच्या क्षेत्रातला दबाव अधिकाधिक वाढत आहे. कारण टेक्नॉलॉजी आणि माणुसकी (रुग्णांशी सौम्यतेने वागणे) यांचा मेळ बसवणे खरोखरच मोठे आव्हान आहे. नर्सला एखाद्या पेशंटबद्दल जी प्रेमळ काळजी आणि दया वाटते, त्याची जागा कोणतेही यंत्र घेऊ शकत नाही. नर्सिंग कधीही न संपणारा पेशा आहे. मानवजात अस्तित्वात असेपर्यंत काळजी, दया आणि सुजाणता असलेल्या व्यक्‍तीची गरज भासतच राहणार. मानवाची ही गरज नर्सिंग भागवत आहे.

संबंधित बातम्या