कोरोना आटोक्यात केव्हा आणि कसा येणार? 

डॉ. अविनाश भोंडवे
मंगळवार, 21 जुलै 2020

सध्या प्रत्येक भारतीयांच्या मनात दोन-तीन प्रश्न सतत घुटमळत असतात. हा कोरोनाचा उद्रेक संपुष्टात कधी येणार? जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या या महासाथीला आपण जेरबंद कधी करणार? जगातल्या एकूण एक देशात पसरलेल्या या कोरोनाला आपण आवर कसा घालणार आहोत? 

साथीच्या आजारांच्या इतिहासाचा मागोवा घेतला, तर इसवी सन पूर्व काळापासून अठराव्या-एकोणिसाव्या शतकापर्यंत आलेल्या प्लेगच्या साथी, १७९७ मध्ये आलेली यलो फीवरची साथ, १८८९-९० मध्ये आलेली फ्लूची साथ, १९१६ मध्ये आलेली पोलिओची साथ, मलेरियाच्या साथी, १९१८-२० सुमारास आलेली स्पॅनिश फ्लूची जागतिक साथ, १९८१ मध्ये उद्‍भवलेली एड्सची साथ, गेल्या वीस वर्षात आलेल्या स्वाईनफ्लू, सार्स, मर्स, इबोला, झिका अशा विषाणूंच्या साथी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या आणि प्रतिबंधक उपायांच्या यशस्वी नोंदी आढळतात. या उपायांचा वापर करूनही कोरोना कुणालाही दाद देत नाही अशी आजची परिस्थिती आहे. कोरोना नक्की बरा होतो असे म्हणणाऱ्या आरोग्य खात्यावर आता कोरोना कधीच संपणार नाही, त्याच्या संगे जगायला शिकू या... असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. 

कोरोनाची साथ नियंत्रणात आली असे म्हणण्यासाठी काही मूलभूत मुद्द्यांचा विचार करावा लागतो : 

रुग्णसंख्या 
रुग्णांची संख्या हा साथ नियंत्रणाचा सर्वांत महत्त्वाचा निकष असतो. सध्या भारतात दर दिवसाला कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन सुमारे २७-२८ हजारांनी रुग्णांची संख्या वाढते आहे. दिवसागणिक ही संख्या वरवरच जाते आहे. ज्यावेळी ही संख्या काही काळ स्थिर राहून, काही दिवसांनी कमी कमी होत जाईल, तेव्हाच साथ आटोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली असे म्हणता येईल. पण इटली, स्पेनमध्ये याबाबत वेगळाच अनुभव आला. तिथे काही काळ रुग्णसंख्या स्थिर राहायची आणि पुन्हा वाढायची. असे अनेक दिवस होत राहिले. त्यामुळे किमान पंधरा दिवस नव्याने निदान झालेल्या रुग्णांच्या संख्येचा आलेख जेव्हा सातत्याने रोज खाली जात राहिला, तर साथ आटोक्यात आल्याचे मानले जाईल. 

दुसरी लाट 
पण साथ आटोक्यात आल्यावरसुद्धा, नियंत्रणाच्या उपायांत शिथिलता आली, तर विषाणूच्या लागणीची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या शून्याच्या जवळ येईपर्यंत किंवा शून्य लागण किमान महिनाभर राहिल्याशिवाय साथ संपली असे म्हणता येत नाही. 

बरे होणारे रुग्ण 
भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ६० टक्क्यांच्या जवळपास आहे. प. बंगाल, उत्तर प्रदेश, ओडिशा या राज्यात ते ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. म्हणजे जेवढे रुग्ण नव्याने दाखल होतायत त्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे आजार ज्यांच्यात सक्रीय आहे अशा रुग्णांची संख्या कमी कमी होत चालली आहे. मुंबईत सध्या बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ६९ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यामुळे मुंबईत ही साथ नियंत्रणात आल्याची चिन्हे दिसून येतायत. या उलट पुण्यात बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या ५० टक्क्यांच्या आसपास आहे, त्यामुळे सक्रीय रुग्णांची (अॅक्टिव्ह केसेस) संख्या वाढते आहे. म्हणजेच साथ नियंत्रणात आलेली नाही, तर तिचा प्रसार वाढतो आहे. 

बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत गेली आणि नव्याने निदान होत गेलेल्या रुग्णांची संख्या कमी कमी होत गेली की साथ नियंत्रणात येते आहे असे समजले जाते. याचबरोबर आजार सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या कमी कमी होत गेली की साथ नियंत्रणात आली असे समजतात. न्युझीलंडमध्ये मागील महिन्यात जेव्हा रुग्णालयात दाखल असलेला शेवटचा रुग्ण घरी सोडण्यात आला आणि त्या आधी बरेच दिवस नव्याने लागण झालेला एकही रुग्ण सापडला नाही, तेंव्हा न्युझीलंड पूर्ण कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

मृत्युदर 
कोरोनाची लागण झालेल्या दर १०० रुग्णांत किती रुग्ण मृत्युमुखी पडतायत याचे प्रमाण म्हणजे मृत्युदर. भारतात हा सरासरी २.७२ टक्के आहे. केरळमध्ये ०.४१ टक्के, झारखंडमध्ये ०.७१ टक्के, बिहारमध्ये ०.८२ टक्के, तेलंगणात १.०७ टक्के आहे; तर महाराष्ट्रात ४.५ आहे. काही भागात तो मध्यंतरी १० पर्यंत गेला होता. हा मृत्युदर जितका कमी होत जाईल तितके आपण साथ नियंत्रणाच्या जवळपास गेलो असे मानता येईल. जर्मनीमध्ये मृत्युदर कायम १ टक्क्याच्या खाली राखण्यात तेथील सरकारला यश आल्याने साथ नियंत्रणात आल्याचे जाहीर केले गेले. 

धोका अधिक कोणाला? 
कोरोनाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजाराच्या प्राथमिक स्थितीत निदान झाले आणि त्याचा योग्य औषधोपचार वेळेतच झाला, तर तो नक्की वाचू शकतो. याचाच अर्थ सुरुवातीस सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असताना आजार अंगावर काढणाऱ्यांना, या लक्षणांची दखल घेऊन योग्य औषधोपचार टाळणाऱ्या आणि थातूरमातूर इलाज करणाऱ्या व्यक्तींमध्ये आजार गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता जास्त असते. 

त्याच बरोबर ज्या व्यक्तींना काही इतर आजार आहेत, (कोमॉर्बिड कंडिशन्स), उदा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, स्थूलत्व, कर्करोगाची केमोथेरपी सुरु असणे, मूत्रपिंडाचे किंवा यकृताचे आजार असणे. अशा व्यक्तींमध्ये कोरोना गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि अशा व्यक्तींमध्ये मृत्युदर जास्त असतो.

आकडेवारीमधून असेही दिसून आले आहे की ६० वर्षांवरील व्यक्ती, गरोदर स्त्रिया आणि नवजात अर्भके तसेच दहा वर्षाखालील लहान बालके यांच्यात हे आजार लवकर होतात आणि गंभीर स्वरूप धारण करू शकतात. 

टेस्टिंग 
कोणत्याही आजाराचे निदान जेवढे लवकर होईल, तितका तो आजार लवकर बरा होऊ शकतो आणि कोरोनासारख्या वेगाने पसरणाऱ्या आणि थोड्याच काळात गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या आजारामध्ये अशा निदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असते, हे सांगायला नकोच. 

आजमितीला कोरोनाचे निदान करणे म्हणजेच टेस्टिंग किंवा निदान चाचण्या, जेवढ्या व्यापक स्वरूपात होतील, तेवढी साथ लवकर आटोक्यात येऊ शकेल. त्यामुळे खालील मुद्दे अंगिकारणे अत्यावश्यक ठरते.

ज्यांना लक्षणे आहेत अशा सर्व रुग्णांच्या चाचण्या व्हाव्यात. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचण्या व्हाव्यात. या संपर्कांचा तपास लावणे किंवा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे खूप महत्त्वाचे असते. दुर्दैवाने लोकांच्या अज्ञानाने आणि असहकारामुळे हे ट्रेसिंग पुरेसे होत नाही. प्रत्येक रुग्णाने आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पूर्ण माहिती दिली त्याच प्रमाणे संपर्कात आलेल्या व्यक्तींनी अशी माहिती दडवून ठेवली नाही, तर हे सहज सोपे होईल. एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीमागे किमान १५ व्यक्तींची तपासणी व्हावी, पण आजमितीस हे प्रमाण फक्त ३ ते ४ एवढेच आहे. टेस्टिंग किट्सची उपलब्धता कमी असणे हे त्यामागचे कारण आहे, हे समजू शकते. 

आज जगामध्ये ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात. एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात येऊन संसर्ग झाला तरी, ट्रेसिंग न झाल्याने आणि टेस्टिंग न झाल्याने त्या व्यक्तीला आपल्याला कोरोनाची बाधा झाली आहे हे समजत नाही. अशा व्यक्ती सर्रासपणे इतरांच्या संपर्कात येऊन आजाराचा प्रसार करत राहतात. हे टाळायचे असेल तर तर्कदृष्ट्या प्रत्येक नागरिकाची कोरोना तपासणी होणे गरजेचे ठरते. पण चाचणीची सामुग्री अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने हे करणे व्यावहारिक होत नाही.

आज टेस्टिंग करायचे असेल तर त्या व्यक्तीला लक्षणे असावी लागतात. त्याशिवाय त्याची चाचणी होत नाही. ही अट काढून सर्वांना इच्छेप्रमाणे चाचणी करून घेण्याची मुभा असेल, आणि या चाचण्या मोफत किंवा अत्यल्प दारात उपलब्ध झाल्या, तर लक्षणे नसलेल्या जास्तीत जास्त नागरिकांचे टेस्टिंग करून घेता येईल. आणि त्यात लक्षणे नसलेल्या पण कोरोना पॉझिटिव्ह निघणाऱ्या व्यक्तींचे विलगीकरण करून प्रसारास आळा घालता येईल. या पद्धतीने सुरुवातीला रुग्णांची संख्या वाढेल, पण प्रसार रोखता आल्यामुळे काही काळाने रुग्णसंख्या निश्चितच घटत जाईल. 

लॉकडाउन 
आज कोरोना हमखास बरा करणारे कोणतेही औषध नाही. त्याचा प्रतिबंध करणारी लस नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळून दोन व्यक्तींमध्ये होणारा संसर्ग रोखणे, प्रत्येकाने मास्क वापरून त्यच्या श्वासातून जाणाऱ्या आणि श्वासामध्ये येणाऱ्या विषाणूंना रोखणे आणि हात स्वच्छ धुऊन पृष्ठभागावरून हातावर आणि मग नाका-तोंडात जाऊन शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणूंपासून आपले संरक्षण करणे, एवढेच आपल्या हातात आहे. 

या गोष्टी टाळण्यासाठी आणि संसर्गाची साखळी रोखण्यासाठी सरकारतर्फे लॉकडाउन करणे हा उपाय हाताळला जातोय. मात्र आपल्या देशात लॉकडाउनचे हसे झालेय. मुळात तो पाहिजे तितका कडकपणे पाळला गेलाच नाही. लॉकडाउन ४ आणि ५ ज्यांना अनलॉक १ आणि २ म्हटले गेले, त्यात तर सर्वच गोष्टी धाब्यावर बसवल्या गेल्या. चीनमध्ये लॉकडाउन कमालीच्या काटेकोरपणे पाळला गेला. तिथे सुरक्षादल आणि स्वयंसेवकांची फौज नागरिकांनी लॉकडाउन तोडू नये म्हणून कार्यरत होती. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये लॉकडाउन तोडल्यास मोठा दंड आकारला जात होता. इटलीमध्ये लोकांनी रस्त्यावर येऊ नये म्हणून लष्कराला पाचारण केले होते. फिलिपाइन्समध्ये तर लॉकडाउन तोडल्यास जागच्याजागी गोळ्या घालायचा हुकूम दिला गेला होता. भारतासारख्या १.३ अब्ज लोकसंख्या असलेल्या आणि लोकशाही पाळणाऱ्या देशात यातली कुठलीच गोष्ट शक्य नाही. त्यामुळे १०० टक्के लोक घरी बसत नाहीत. घराबाहेर पडणाऱ्यांची, मास्क न वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. कायदा वापरल्यास त्याचे राजकारण होऊन परिस्थिती चिघळण्याची शक्यता जास्त आहे. 

भारतात लॉकडाउन पूर्वतयारी न करता जारी केला गेला. बाधितांचे, परदेशातून आलेल्यांचे विलगीकरण न केल्याने रोगप्रसार वाढत गेला. लॉकडाउन दरम्यान पूर्ण व्यवहार थांबवता आले नाहीत. परप्रांतीय कामगारांचे लोंढे अचानक परत जाण्यास परवानगी दिली गेली. कोरोनाग्रस्त भागातून कोरोना नसलेल्या राज्यात, जिल्ह्यात, गावात नागरिक परत गेल्याने तिथे  साथीचा नव्याने उद्रेक होत गेला. 

आता पुन्हा नाईलाजाने अनेक भागात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. याचा काही फायदा होईल अशी कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.   

साथीची परमावधी
भारतासारख्या विशाल देशात कोरोनाच्या साथीचा फैलाव प्रत्येक राज्यात वेगवेगळा आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात अशा राज्यात तो खूप वेगाने अजूनही पसरतोय. त्यामुळे या साथीची परमावधी, म्हणजे 'पीक' येण्याची शक्यता वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी येईल हे नक्कीच. 

वर सांगितल्याप्रमाणे रुग्णसंख्या, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या, मृत्युदर आणि विषाणूच्या दुपटीचा वेग याचा विचार करून केलेल्या एका अभ्यासपूर्ण अहवालानुसार (एसआयइआर मॉडेल) कोणत्या राज्यात ही परमावधी केव्हा येईल आणि नक्की साथ केव्हा आटोक्यात येईल हे जाहीर केले आहे. त्यानुसार - 

  उत्तरप्रदेश- १८ ऑगस्ट    कर्नाटक- ४ ऑगस्ट     केरळ- २० ऑगस्ट 
  महाराष्ट्र- १ ऑगस्ट   तामिळनाडू- १ ऑगस्ट     नवी दिल्ली- ४ ऑगस्ट
  गुजरात- २८ जुलै   प.बंगाल- २८ ऑगस्ट    राजस्तान- २ ऑगस्ट
  तेलंगणा- १६ ऑगस्ट   आंध्रप्रदेश- १६ ऑगस्ट   मध्यप्रदेश- १० ऑगस्ट

या अहवालानुसार या सर्व राज्यात साथीचा शिखरबिंदू ऑगस्ट महिन्यात कधीतरी येणार आहे. त्यानंतर काही आठवड्याने साथ ओसरू लागेल असा कयास आहे. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत कोरोना आटोक्यात येईल असा कयास आहे. 

पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, साथीच्या नियंत्रणाबाबतचे हे अंदाज अनेक गृहितके मानून केलेली असतात. त्या गृहितकांच्या आकड्यात बदल होत असतात. त्यामुळे हवामानाच्या अंदाजाप्रमाणे ती चुकण्याची शक्यता मोठी असते. 

थोडक्यात सांगायचे झाले, तर मोठ्या प्रमाणात टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोमॉर्बिड व्यक्तींचे टेस्टिंग, संशयितांचे विलगीकरण, रुग्णालये आणि औषधांची सोय आणि सर्वांत म्हणजे जनतेकडून प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी झाली तरच ही साथ येत्या महिन्यात आटोक्यात येऊ शकेल.

संबंधित बातम्या