तीव्र श्वसन क्लेश 

डॉ.अविनाश भोंडवे 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

आरोग्य संपदा

कोरोना विषाणूने बाधित झालेल्या रुग्णांमध्ये ८० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसतात किंवा सर्दी, अंग दुखणे, हातपाय दुखणे, वास न येणे, गळून गेल्यासारखे वाटणे अशी वरवर किरकोळ वाटणारी लक्षणे असतात. या रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हायची गरज नसते. ज्यांच्या घरी अशा बाधित; पण लक्षणरहित व्यक्तींसाठी  वेगळी खोली आणि स्नानगृह आणि स्वच्छतागृह (टॉयलेट - बाथरूम) असेल अशांना आपल्याच घरी ''होम आयसोलेशन''मध्ये राहता येते. ज्यांच्या बाबतीत अशी सोय नसेल अशांची ''कोव्हिड केअर सेंटर''मध्ये आयसोलेशनची व्यवस्था केली जाते. 

मात्र २० टक्के रुग्णांमध्ये दम लागणे, खूप ताप असणे आणि सतत खोकल्याची उबळ येणे अशी लक्षणे असतात. या रुग्णांना रुग्णालयामध्ये ठेवावे लागते. त्यातल्या बहुतेक रुग्णांच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झालेले असते, त्यामुळे सतत प्राणवायू देण्याची व्यवस्था असलेल्या विभागात दाखल करावे लागते. 

एकुणातल्या १० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे निदान होतेवेळीच विषाणू फुप्फुसापर्यंत पोचलेले असतात. अशा रुग्णांचा छातीचा एक्सरे किंवा एमआरआय केला जातो. त्यात न्युमोनियाची लक्षणे असतात. या रुग्णांना विषाणूरोधक प्रतिजैविके (रेमडेसिव्हीर किंवा फ्लॅविपिराव्हिर) किंवा काही इम्युनोमॉड्यूलेटर (टॉसिलिझुमॅब) दिली जातात. मात्र या रुग्णांपैकी अनेकजण फुप्फुसांवर होणाऱ्या विषाणूंच्या आक्रमणापुढे मान तुकवतात. या रुग्णांमध्ये ''अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम'' (एआरडीएस) किंवा तीव्र श्वसनदाह ही परिस्थिती उद्‍भवते. अनेक रुग्णांमध्ये तब्येत गंभीर होण्यास आणि रुग्ण दगावण्यास ही स्थिती कारणीभूत ठरते असे दिसून आले आहे.

अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम 
कारणमीमांसा - कोरोनाच्या रुग्णांमध्ये एआरडीएस ही गंभीर समस्या उद्‍भवण्याचे कारण म्हणजे फुप्फुसातील रक्तवाहिन्यांतील सूक्ष्म केशवाहिन्यांमधून ऑक्सिजनयुक्त रक्तातून वायुकोषातील रिकाम्या जागेत एक प्रकारचा द्रवपदार्थ उत्सर्जित होतो. सामान्यत: वायुकोशांच्या आवरणांतून रक्तातील प्राणवायूचे आदानप्रदान होत असते. रक्तातील हा द्रव कधीच वायुकोषामध्ये एरवी जात नाही. मात्र कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये सर्व शरीरात कमालीचा दाह निर्माण होतो. याला सायटोकाईन स्टॉर्म म्हणतात. यामध्ये वायुकोषातील आवरणाचा तीव्र दाह निर्माण होतो. अन्य काही गंभीर आजारांत किंवा दुखापतींतदेखील वायुकोषांच्या आवरणाचा असाच दाह होतो आणि द्रवपदार्थ वायुकोषात जमा होतो. परिणामतः वायुकोषातून शरीराला मिळणारा प्राणवायू पुरेसा मिळत नाही आणि रुग्णाच्या रक्तातील प्राणवायूचे प्रमाण खूप घटते. प्राणवायूच्या अभावाने शरीरातील सर्व क्रिया मंदावतात आणि रुग्ण अत्यवस्थ होतो. 

लक्षणे 

 • श्वास घेण्यात कमालीचा अडथळा. 
 • श्वासोच्छवासाचा वेग वाढतो. 
 • रक्तदाब कमी होतो. 
 • हृदयाचे ठोके वाढतात. 
 • त्वचा, ओठ आणि नखे निळसर दिसू लागतात. 
 • सतत खोकल्याची ढास लागू लागते. 
 • तीव्र ताप येतो. 
 • कमालीची डोकेदुखी सरू होते. 
 • सर्व स्नायू गळून गेल्यासारखे वाटतात आणि खूप अशक्तपणा जाणवू लागतो. 
 • रुग्णांत मानसिक गोंधळ दिसून येतो. 

अचूक कारण अज्ञात आहे; परंतु, सामान्यत: गंभीर आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या जखमांमध्ये जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यावर रुग्णामध्ये हे निदान निष्पन्न होते. 

फुप्फुसांचे नुकसान होण्यास कारणीभूत असणाऱ्या काही विशेष कारणांमध्ये - १. विषारी पदार्थ, विषारी वायू, धूर, २. सेप्सिस किंवा गंभीर रक्त संसर्ग, ३. फुप्फुसातील विषाणू किंवा जीवाणूंचे तीव्र संक्रमण उदा. न्यूमोनिया, ४. रक्तामध्ये संसर्गजन्य  विषाणूंचे किंवा जिवाणूंचे प्रमाण वाढणे म्हणजेच सेप्टीसिमिया, ५. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जे रुग्ण आजार झाल्यानंतर उशिरा निदान करतात आणि उशिरा रुग्णालयात दाखल होतात - एआरडीएस होऊ शकतो, ६. स्वादुपिंडाचा दाह, मोठ्या प्रमाणात रक्त संक्रमण आणि २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात खोलवर भाजणे, ७. अपघात आणि अपघातात होणाऱ्या इजा, विशेषतः छातीत किंवा डोक्याला इजा होणे. अपघातांमुळे फुप्फुसांचा किंवा श्वासोच्छवासावर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूच्या भागास थेट नुकसान होऊ शकते, ८. पाण्यात बुडलेल्या व्यक्ती. 

कुणामध्ये धोका जास्त? - अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, म्हणजेच एआरडीएसची जोखीम काही विशिष्ट व्यक्तींमध्ये जास्त आढळते. या व्यक्तींमध्ये जर खालील कारणे आढळत असतील तर त्यांना हा त्रास होण्याची शक्यता जशी जास्त असते तसेच तो त्रास प्राणघातक ठरण्याचीही. या कारणात प्रामुख्याने - वय ६५ वर्षांहून अधिक असणे - कोरोनाच्या रुग्णांवर आजवर झालेल्या संशोधनात  वय जितके जास्त असेल तितकी त्या रुग्णामध्ये हा तीव्र श्वसन क्लेष होण्याची शक्यता अधिक असते. जगातील मृत्युदरात वृद्ध व्यक्ती एआरडीएस होऊन दगावण्याचे प्रमाण अधिक आढळते. जसजसे वय वाढत जाते तसतशी प्रतिकारप्रणालीची कार्यशक्ती कमी होत जाते, हे याचे मुख्य कारण असल्याचे न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये मार्च २०२० च्या आवृत्तीत नमूद केले आहे. 

 • अनेक वर्षे धूम्रपान करत असणे किंवा अमर्याद प्रमाणात त्याचे व्यसन असणे. 
 • फुप्फुसांचे आजार, दमा, सततचा खोकला, छातीचा क्षयरोग असे तीव्र आजार असणे. 
 • अतिरिक्त मद्यपानाची नित्य सवयदेखील यासाठी कारणीभूत ठरते. 

निदान - एआरडीएस ओळखण्यासाठी कोणतीही विशिष्ट चाचणी नाही. सर्वसाधारण शारीरिक तपासणी, छातीचा एक्स-रे आणि ऑक्सिजनच्या पातळीवर निदान होत असते. रुग्णाला असलेले इतर आजार आणि त्याची परिस्थिती यांचाही विचार निदान करताना करावा लागतो. रुग्णाला होणारा त्रास हा एआरडीएसमुळे आहे का अन्य कारणाने आहे, हेदेखील काळजीपूर्वक पाहावे लागते. उदाहरणार्थ, हृदयातील काही समस्यांमुळे एआरडीएससारखीच लक्षणे उद्‍भवू शकतात. 

इमेजिंग - छातीचा एक्स-रे. छातीच्या एक्स-रेमध्ये रुग्णाच्या फुप्फुसातील कोणत्या भागांमध्ये आणि फुप्फुसांच्या किती भागात द्रव आहे आणि हृदयाचा आकार वाढला आहे का, हे समजते. 

सीटी स्कॅन - या अंतर्गत अवयवांच्या क्रॉस-सेक्शनल प्रतिमांमध्ये वेगवेगळ्या दिशानिर्देशांद्वारे घेतलेल्या एक्स-रे प्रतिमा एकत्र केल्या जातात. सीटी स्कॅनद्वारे हृदय आणि फुप्फुसातील रचनेविषयी सखोल आणि तपशीलवार माहिती मिळते.. 

प्रयोगशाळेच्या चाचण्या - मनगटातील रक्तवाहिन्यांमधून रक्त घेऊन रक्तातील ऑक्सिजनची पातळी मोजू शकते. इतर प्रकारच्या रक्त चाचण्यांमध्ये संक्रमण किंवा अशक्तपणाची लक्षणे आढळू शकतात. फुप्फुसातील संसर्ग झाल्याचा संशय असेल, तर संक्रमणाचे कारण निश्चित करण्यासाठी आपल्या वायुमार्गावरील स्राव तपासले जातात. 

हृदयाच्या चाचण्या - एआरडीएसची लक्षणे आणि हृदयाच्या काही विशिष्ट समस्या एकसारख्या असतात. त्यामुळे इलेक्ट्रोकार्डिओग्राम या वेदनारहित चाचणीमध्ये हृदयातील विद्युत क्रियाकलापाचा आलेख काढला जातो. इकोकार्डिओग्राम - ही तपासणी म्हणजे हृदयाची सोनोग्राफी असते. या तपासणीत हृदयाची अंतर्गत रचना आणि कार्य यांच्यातील कमतरता आणि दोष लक्षात येऊन हृदयाच्या कार्यामधील समस्यांचे निदान होते. 

गुंतागुंत (कॉम्पलिकेशन्स) - एआरडीएस ही कोरोनामधील एक गुंतागुंत मानली जाते. मात्र त्यातही पुन्हा काही अधिक गंभीर समस्या उद्‍भवून ही गुंतागुंत जास्तच वाढत जाते. 

 1. रक्ताच्या गुठळ्या - रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण त्यांना सीडेशन दिले जात असल्याने, कोणतीही हालचाल न करता एका स्थितीत पडून असतात. यामध्ये मोठ्या रक्तवाहिन्यात रक्तप्रवाह स्थिर राहून रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका निर्माण होतो.  ही क्रिया जर पायातील किंवा मांड्यांमधील खोलवर असलेल्या रक्तवाहिन्यांत घडली तर ही रक्ताची गुठळी किंवा तिचा एखादा हिस्सा विलग होऊन रक्तप्रवाहांबरोबर फुप्फुसामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे फुप्फुसाकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित होण्याची आणि रुग्णाचा श्वास अचानकपणे थांबण्याची दाट शक्यता असते. 
 2. फुप्फुसे कोसळणे - (लंग कोलॅप्स-न्यूमोथोरॅक्स) एआरडीएसच्या रुग्णांमध्ये, व्हेंटिलेटर मशीनचा वापर करून दबावाखाली शुद्ध प्राणवायू मोठ्या प्रमाणात दिला जातो. यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी आणि फुप्फुसामधील वायुकोषातला द्रवपदार्थ बाहेर आणण्यासाठी केला जातो. तथापि, व्हेंटिलेटरचा दबाव आणि हवेचे प्रमाण यामध्ये कधी कधी फुप्फुसांच्या अगदी बाहेरील छोट्या छिद्रातून फुप्फुसातील हवा फुप्फुसाच्या आवरणामध्ये जाते आणि फुप्फुसे पूर्णपणे आकुंचन पावतात. यालाच लंग कोलॅप्स म्हणतात. 
 3. जंतुसंसर्ग - व्हेंटिलेटरच्या नळ्या श्वासनलिकेशी थेट जोडलेल्या असतात. त्यामधून आपल्या श्वसनसंस्थेला जंतुसंसर्ग होऊ शकतो. त्यामुळे एआरडीएसने ग्रस्त असलेल्या रुग्णामध्ये आणखी गुंतागुंत व्हायला लागते. 
 4. लंग फायब्रोसिस - यामध्ये एआरडीएसच्या प्रारंभाच्या काही आठवड्यांत दोन वायुकोषांच्या मधल्या भागातील पेशी आणि पेशीसमूह कडक आणि घट्ट होतात. याला फायब्रोसिस म्हणतात. यामुळे एकूणच फुप्फुसे टणक होतात आणि त्यांचे आकुंचन प्रसरण कमी होते. परिणामतः वायुकोषातून आपल्या रक्तप्रवाहात ऑक्सिजन मिसळणे अशक्य होते. 
 5. श्वासोच्छवासाच्या समस्या - कोरोनाकरिता रुग्णालयात दाखल झालेले आणि एआरडीएस होऊन बरे झालेल्या अनेक रुग्णांच्या फुप्फुसांचे कार्य सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतच्या काळात पुन्हा आधीच्या पातळीवर येते. पण त्यातील काही रुग्णांना आयुष्यभर श्वासोच्छवासाच्या त्रासाची समस्या उद्‍भवू शकते. साधे काम करतानाही त्यांना दम लागत राहतो आणि खूप थकवा येतो. कित्येक रुग्णांना घरी पूरक ऑक्सिजनची आवश्यकता भासू शकते. 
 6. मानसिक औदासिन्य - एआरडीएसमधून बऱ्या झालेल्या अनेक रुग्णांना कमालीचे मानसिक औदासिन्य येऊ शकते. त्यासाठी मानसरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करावे. 
 7. स्मृती आणि स्पष्ट विचारक्षमता - या आजारात द्यावी लागणारी उपशामक औषधे (सीडेटिव्हज) आणि रक्तात सतत कमी राहणारी ऑक्सिजनची खालावलेली पातळी यामुळे एआरडीएसनंतर स्मृती कमी होणे आणि संज्ञानात्मक समस्या उद्‍भवू शकतात. काही रुग्णांत हा प्रभाव कालांतराने कमी होऊ शकतो, पण बहुतेकदा विसरण्याची प्रवृती आणि वैचारिक क्षमता कमी होणे हे नुकसान दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी राहू शकते.. 
 8. स्नायूंची कमजोरी - हॉस्पिटलमध्ये आणि व्हेंटिलेटरवर राहिल्याने शरीरातील अनेक स्नायू कायमस्वरूपी कमकुवत होऊ शकतात. उपचारांनंतरही तुम्हाला खूप थकवा जाणवू शकतो. यासाठी फिजिओथेरपीदेखील आवश्यक असते. 

उपचार 
एआरडीएसवर उपचार करताना पहिले लक्ष्य म्हणजे आपल्या रक्तात ऑक्सिजनची पातळी सुधारणे. ऑक्सिजनशिवाय मानवी अवयव व्यवस्थित कार्य करू शकत नाहीत. रक्तप्रवाहात अधिक ऑक्सिजन मिळविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये - 

 • पूरक ऑक्सिजन - सौम्य लक्षणांकरिता किंवा तात्पुरते उपाय म्हणून, नाक आणि तोंडात घट्ट बसणाऱ्या मास्कद्वारे उच्च प्रवाहाचा ऑक्सिजन वितरित केला जाऊ शकतो. यामध्ये मिनिटाला २ ते ४ लिटर प्राणवायू रुग्णाच्या नाकातून श्वासमार्गात सोडला जातो. 
 • नॉन इन्व्हेझिव्ह व्हेंटिलेशन - यामध्ये एका यंत्राद्वारे दबावाखाली प्राणवायू श्वाससंस्थेत ढकलला जातो. 
 • व्हेंटिलेटर किंवा यांत्रिक वायुवीजन -  एआरडीएस असलेल्या रुग्णांपैकी २५ टक्के व्यक्तींना श्वास घेण्यासाठी या मशीनची मदत घ्यावी लागते. यांत्रिक व्हेंटिलेटर आपल्या फुप्फुसात दबावाखाली आणि प्रचंड वेगाने हवा ढकलतो. सुमारे २० ते ९० लिटर दर मिनिटाला ही हवा आत ढकलली जाते. या यांत्रिक उपचारात वायुकोषात जमा झालेले द्रवपदार्थ बाहेर पडून रुग्णाच्या तब्येतीत चांगला फरक पडू शकतो. 
 • द्रवपदार्थ - शिरेमधून दिली जाणारी सलाईन्स रक्तातील कमी झालेले क्षार आणि पाण्याचे प्रमाण वाढवू शकते. मात्र या सलाईनचा वेग आणि प्रमाण यांचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करणे आवश्यक असते.जर सलाईन जास्त प्रमाणात दिले गेले, तर फुप्फुसांमध्ये असलेला द्रव वाढू शकतो. पण पाणी आणि क्षार यांचे प्रमाण कमी झाल्यास आपल्या हृदयावर आणि इतर अवयवांवर ताण येतो. रुग्णाचा रक्तदाब खूप कमी होऊन तो शॉकमध्ये जाऊ शकतो. 
 • औषधोपचार - एआरडीएस असलेल्या रुग्णांच्या उपचारात काही महत्त्वाची तत्त्वे असतात. 
 • विषाणू किंवा जिवाणू संसर्ग कमी करणे. त्यासाठी अँटिव्हायरल आणि अँटिबायोटिक्स वापरली जातात. रुग्णाला होणाऱ्या वेदना आणि त्याची शारीरिक अस्वस्थता कमी करायला काही औषधे द्यावी लागतात. पायांच्या रक्तवाहिनीतून फुप्फुसात जाऊ शकणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या प्रतिबंधित करण्यासाठी रक्त पातळ करणारी विशेष औषधे द्यावी लागतात. 
 • पोटामधून अन्ननलिकेत उलट्या येणाऱ्या आम्लावर आणि अन्नावर प्रतिबंध करणारी औषधे वापरावी लागतात. रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवताना त्याला गुंगीची औषधे द्यावी लागतात. 
 • इक्मो - एक्स्ट्राकोपोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ईसीएमओ) मध्ये, रक्त शरीराच्या बाहेरून हृदय-फुप्फुस यंत्रात (हार्ट-लंग मशिन) ढकलले जाते. त्यामध्ये रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड काढून शरीरातील ऊतींमध्ये ऑक्सिजनने भरलेले रक्त परत पाठवले जाते. हृदयाच्या उजव्या बाजूच्या जवनिकेतील रक्त हृदय-फुप्फुस यंत्रामधील ऑक्सिजनरेटरकडे जाते आणि त्यातील कार्बन डाय ऑक्साईड दूर करून ते पुन्हा परत शरीरात पाठविले जाते. या पद्धतीत रक्ताद्वारे हृदय आणि फुप्फुसांना "बायपास" केले जाते आणि त्यामुळे या अवयवांना विश्रांती मिळून रुग्ण बरा होतो. 

आज महाराष्ट्रातील एकूण रुग्णांत एआरडीएसमध्ये सापडलेले असंख्य रुग्ण आहेत. रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदराचेसुद्धा हेच कारण आहे. येत्या काही काळात यावर अधिक संशोधन होऊन रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढेल अशी अपेक्षा आहे.

संबंधित बातम्या