मद्यप्राशनाविना लिव्हर सिऱ्हॉसिस

डॉ.अविनाश भोंडवे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

आरोग्य संपदा

यकृत हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. शरीराला आवश्यक असलेल्या निरनिराळ्या प्रथिनांची निर्मिती करणे, स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थांचे चयापचय करणे, अपायकारक जैव-रसायने, अल्कोहोल, काही औषधे तसेच पर्यावरणातून शरीरात जाणारे दूषित घटक उत्सर्जित करण्याचे काम यकृतामध्ये होत असते. यकृतामध्ये पित्तरस (बाईल ज्यूस) तयार केला जातो आणि लहान आतड्यात सोडला जातो. या पित्तरसात पित्ताम्ले असतात. शरीरातील पचनक्रिया आणि ‘अ’, ‘ड’, ‘ई’ आणि ‘के’ जीवनसत्त्वे आतड्यांमध्ये शोषण्यास ही पित्ताम्ले साहाय्य करतात.

मात्र काही आजारांमध्ये यकृताच्या पेशींवर परिणाम होऊन यकृताच्या पेशी नष्ट होतात. त्यांची जागा अतिशय कडक असे तंतू घेतात. त्यामुळे यकृत कडक बनते. त्याच्या कार्यात अडथळे येऊ लागतात. यालाच लिव्हर सिऱ्हॉसिस म्हणतात. अतिरिक्त मद्यपानाने लिव्हर सिऱ्हॉसिस होतो असे मानले जाते. पण मद्याला कधीही न शिवलेल्या अनेकांना आज लिव्हर सिऱ्हॉसिसचा आजार होताना आढळून येते. या प्रकाराला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणतात. अनेक आजारांचा एक समूह असतो त्यात साध्या स्टीटोटीसपासून अतिशय गंभीर स्वरूप धारण करणाऱ्या ''नॉन अल्कोहोलिक स्टीटो हिपॅटायटिस'' (एनएएसएच किंवा नॅश) पर्यंत अनेक आजार येतात.

आजच्या जीवनशैलीत अनेक व्यक्तींमध्ये चरबीयुक्त यकृताचा त्रास आढळून येतो. यालाच वैद्यकीय परिभाषेत फॅटी लिव्हर किंवा हेपॅटिक स्टिटॉसिस म्हणतात. या आजारामध्ये व्यक्तीच्या यकृतावर चरबीचे थरावर थर साचत जातात. यकृतामध्ये योग्य प्रमाणात चरबी असणे आवश्यक असते. पण हे प्रमाण खूपच जास्त असेल, तर ते आरोग्याला विघातक ठरते. फॅटी लिव्हरच्या दोषाला वेळीच आळा घातला नाही तर भावी आयुष्यात जिवावर बेतणारे परिणाम होऊ शकतात. 

अतिरिक्त मद्यपान केल्याने हे आजार उद्भवतात. मात्र जसजसा काळ सरत जातो, तसतसे अतिरिक्त मद्यपानामुळे यकृतातील पेशींमध्ये चरबी साचत जाते. परिणामतः यकृतामध्ये दोष निर्माण होऊन त्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम दिसून येऊ लागतात. 

फॅटी लिव्हरचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण होते. अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज म्हणजे अतिरिक्त मद्यसेवनामुळे यकृताला अपाय होण्याची सुरुवात आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. या दुसऱ्या प्रकारातील या आजारामध्ये यकृतातील पेशींमध्ये अतिरिक्त चरबी साचत जाते आणि त्याकरिता मद्यसेवन कारणीभूत नसते. यकृतामध्ये सर्वसाधारणपणे थोड्या प्रमाणात म्हणजे यकृताच्या वजनाच्या पाच ते दहा टक्के  

वजन चरबी असते. पण जेंव्हा हे प्रमाण जास्त वाढते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर (स्टिटॉसिस) म्हणतात.

नॉन अल्कोहोलिक स्टीटो हिपॅटायटिस
मद्यप्राशन न करताही होणारा हा यकृताचा गंभीर आजार म्हणजे आजच्या जीवनशैलीची देणगी आहे. सततची बैठी कार्यपद्धती आणि अति प्रमाणात उष्मांक देणाऱ्या आहाराचे सेवन यातून उद्भवणारे स्थूलत्व, मधुमेह, मधुमेह होण्याआधीची अंतर्गत शारीरिक स्थिती या साऱ्याचा तो परिपाक आहे. 

कुणाला होऊ शकतो?- 
अति स्थूलत्व- वजन आणि उंची यांच्या गुणोत्तराला बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) म्हणतात. बीएमआय = [किलोग्रॅम मधील वजन] भागिले [मीटरमधील उंचीचा वर्ग]
आदर्श बीएमआय साधारणत: १८.५ ते २४.९ पर्यंत मानला जातो. बीएमआय २५ पासून पुढे असेल तर वजन वाढ मानली जाते. आणि ३०पेक्षा जास्त असल्यास स्थूलत्व मानले जाते. ज्यांचा बीएमआय ४०च्या आसपास आहे अशा व्यक्ती या कमालीच्या स्थूल असतात आणि अशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यकृताचे आजार (एनएएफएलडी) होण्याचे प्रमाण ७० टक्के तर नॅश होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के असते. त्याचबरोबर जर वजन ७ ते १० टक्क्यांनी कमी केले तर यकृताचे अंतर्गत दोष कमी होऊन कार्यात सुधारणा होते असे आढळून आले आहे.

 • टाईप-२ मधुमेह- स्थूलत्वामधून टाईप-२ मधुमेह उद्भवतो. यामध्येही यकृताचे विविध आजार होण्याचे प्रमाण ७० टक्के तर नॅश होण्याचे प्रमाण २५ ते ३० टक्के असते.
 • वय- वृद्धांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळते.
 • जनुकीय कारणे- काही व्यक्तींमध्ये जन्मजात होणाऱ्या विशिष्ट जनुकीय परिवर्तनात हा आजार होतो. ३(पीएनपीएलए३)
 • रक्तातील चरबीचे प्रमाण अतिरिक्त वाढणे
 • इन्सुलिन प्रतिरोध
 • रक्तामध्ये आढळणारी यकृताविषयी असलेले काही रसद्रव्ये उदा. एएसटी आणि एएलटी
 • मेटाबोलिक सिंड्रोम- 
 • रक्तामधील उपाशीपोटीची वाढलेली साखरेची पातळी
 • रक्तातील ट्रायग्लिसेराईडची वाढलेली पातळी
 • रक्तातील हाय डेन्सिटी लायपोप्रोटीनची (एचडीएल) पातळी वाढलेली असणे
 • उच्च रक्तदाब
 • पोटाचा आणि कमरेचा घेर खूप वाढलेला असणे

इतर आजार- काही असे अन्य आजार असतात की ज्यात नॅशची लक्षणे उद्भवण्याची शक्यता अधिक असते. उदा. ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया, मोठ्या आतड्याचा (कोलोरेक्टल) कर्करोग, हाडे विरळ होणे, सोरियासिस, संप्रेरकांचे आजार, हायपोथायरॉइडीझ्म, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज इत्यादी. 

लक्षणे- नॅशची लक्षणे ही आजाराच्या सुरुवातीच्या काळात मुळीच दिसून येत नाहीत. मात्र तो गंभीर झाल्यावरच त्याची कल्पना येऊ लागते. नॅशच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला सातत्याने खूप थकवा येत राहणे, पोटाच्या वरच्या भागात उजव्या बाजूला बरगड्यांच्या खाली जडपणा वाटणे, हलकेसे दुखणे असे त्रास काही जणांना जाणवतात. 

आजार वाढू लागल्यावर पोटाच्या पोकळीत पाणी झाल्याने (असायटिस) पोट फुगीर दिसू लागणे, पोटाच्या आणि शरीरातील अन्य भागातील त्वचेखालील रक्तवाहिन्या फुगून त्यांचे जाळे नजरेला दिसू लागते. प्लिहा वाढते आणि ती वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना पोट तपासताना लगेच जाणवते. तळहात लालसर दिसू लागतात. आणि मुख्य म्हणजे रुग्णाचे डोळे आणि त्वचा पिवळी दिसू लागून काविळीची लक्षणे दिसू लागतात. 

आजार वाढीस लागल्यावर अन्ननलिकेतील रक्तवाहिन्या फुगून त्यातून रक्त बाहेर पडू लागते आणि रुग्णाला रक्ताच्या उलट्या होऊ लागतात. यकृतामधून शरीराच्या चयापचय क्रियेत निर्माण होणारी दूषित द्रव्ये उत्सर्जित केली जातात. मात्र या आजारात यकृताचे कार्य मंदावल्यामुळे रक्तातील अमोनिया वाढून रुग्णाला वास्तव न समजणे, बेशुद्ध होणे असे प्रकार घडतात.

रक्तातील दूषित पदार्थांमुळे मेंदूला सूज येऊन सतत गुंगी येणे झोप आल्यासारखे वाटणे, बोलणे चाचरणे अशी लक्षणे दिसू लागतात. 

यकृताचे काम मंदावल्यामुळे शरीराच्या आरोग्यास आवश्यक घटक न मिळाल्याने रुग्णाचे वजन वेगाने घटू लागते.    

निदान- रुग्णाची सुरुवातीची लक्षणे आणि शारीरिक तपासण्या केल्यावर जर यकृताच्या अशा प्रकारच्या आजाराची शंका आली तर इतर तपासण्या करून निदान केले जाते. रक्तातील यकृताच्या रसद्रव्यांची तपासणी एएसटी आणि एएलटीमधून रुग्णाला यकृताचा आजार असल्याची दिशा मिळते. 

यकृताच्या काही अतिविशिष्ट तपासण्यांमध्ये सोनोग्राफी आणि अल्ट्रासाऊंड इलास्टोग्राफी, ट्रांझिएंट इलास्टोग्राफी, एमआरआय आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इलास्टोग्राफी अशा अतिशय अत्याधुनिक तपासण्या कराव्या लागतात. 

बायॉप्सी- छोट्या शस्त्रक्रियेद्वारे यकृताचा एक तुकडा तपासणे म्हणजेच बायॉप्सी करणे ही नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिजेसच्या निदानासाठी सर्वात महत्त्वाची तपासणी मानली जाते.

फॅटी लिव्हर असलेल्या १०-२० टक्के व्यक्तींना हिपॅटायटिस असू शकतो. त्याचे पर्यवसान यकृताच्या सिऱ्हॉसिस आणि यकृताच्या कर्करोगामध्ये होऊ शकते. साहजिकच यकृत चरबीयुक्त असेल अशा व्यक्तींनी वेळीच काळजी घेणे आवश्यक असते.

उपचार
नॅश हा आजार सध्याच्या जीवनशैलीतील दोषांमधून उद्भवत असल्याने जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावे लागतात. यामध्ये योग्य आहार, योग्य पद्धतीचा नियमित व्यायाम, विश्रांती या गोष्टीवर भर दिला जातो. 

नॅशच्या उपचारात सुरुवातीला वजन कमी करण्याचे व्यायाम आणि योग्य उष्मांकांचा आहार यांची शास्त्रीय सांगड घालून दिली जाते. आजार फार वाढलेला नसल्यास आणि अतिरिक्त वजनवाढ असल्यास वजन कमी करण्यासाठी बॅरिअॅट्रिक शस्त्रक्रियादेखील केली जाते. 

यकृतासंबंधी असलेल्या किंवा इतर आजारांचे उपचार केले जातात. उदा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपोथायरॉईडिझ्म इत्यादी.

औषधांमध्ये मेटफॉर्मिन पूर्वी दिले जायचे पण नव्या सूचनांनुसार ते देऊ नये असे सांगितले गेले आहे. थायाझोलिडीनेडीओन्स- पायोग्लिटाझोनसारखी इन्शुलिनचा प्रतिरोध कमी करणारी औषधे बायॉप्सीमध्ये ज्यांना नॅश आढळला आहे अशांनाच वापरली जातात. ही आणि जीएलपी-१ पद्धतीची औषधे मधुमेहासाठी तर दिली जातातच पण मधुमेह नसतानाही डॉक्टरांच्या सल्ल्याने या आजारात वापरली जातात.

याशिवाय ‘इ’ जीवनसत्व, उर्सोडीसॉक्सिकोलिक अॅसिड, ओमेगा-३ फॅटी अॅसिड अशी औषधे यकृताचे कार्य वाढवण्यासाठी वापरता येतात. मात्र या उपचारात ‘इ’ जीवनसत्व हे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना देऊ नये असा संकेत आहे.

रक्तातील चरबी कमी करणारी स्टॅटिन गटातील अॅटोरव्हास्टॅटिन, रोझुव्हास्टॅटिनसारखी  औषधे वापरता येतात.

प्रतिबंध
या आजाराची लक्षणे सुरुवातीला दिसून येत नाहीत आणि तो जसजसा गंभीर होत जातो, तास तशी त्याची लक्षणे दिसून येतात. आजार हाताबाहेर गेल्यावर तो नियंत्रणात आणणे आणि त्यातून बरे होणे दुरापास्त असते. साहजिकच हा आजार होऊ नये म्हणून काळजी घेणे आणि प्रतिबंधक उपायांचे पालन करणे हाच या आजारापासून दूर राहण्याचा राजमार्ग आहे.

ज्या व्यक्तींचे आयुष्य धावपळीचे आहे, खाण्यापिण्याच्या सवयी चुकीच्या आहेत आणि जे पुरेशी विश्रांती घेत नाहीत, त्यांना यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात. त्यामुळे शरीराच्या कार्यामध्ये कोणतीही अनियमितता आढळली, तर तज्ज्ञांशी चर्चा करून लगेचच त्याच्या तपासण्या करून त्यावर उपाययोजना करावी. यकृतामध्ये असलेल्या चरबीचे मोजमाप करणाऱ्या किंवा रक्तवाहिन्यांचा ताठरपणा तपासणाऱ्या या चाचण्या असू शकतील. यकृताला ताठरपणा आला असेल, तर फायब्रॉसिसची शक्यता असते. याला यकृताला चट्टा पडणे असे म्हणतात.

आहारात ताजी फळे व भाज्या समाविष्ट कराव्यात. कर्बोदके, मेदयुक्त पदार्थ, साखर यांचे कमी प्रमाणात सेवन करावे. मद्यपान, जंक फूड, प्रक्रिया केलेले डबाबंद पदार्थ आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत.

बैठी जीवनशैली सोडून, शारीरिकदृष्ट्या सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करावा. तुमचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल, तर नियमित व्यायाम करून वजन नियंत्रणात आणावे. चालणे, पोहणे, धावणे आणि एरोबिक्स हे व्यायाम करण्यास सुरुवात करावी. त्याचप्रमाणे नियमित तपासणीसुद्धा महत्त्वाची आहे. यकृताच्या कार्याची चाचणी आणि इतर घटकांच्या चाचणीमुळे फॅटी लिव्हरचा आजार वेळीच नियंत्रणात आणता येईल

संबंधित बातम्या