पोटाचा दुर्लक्षित आजार

डॉ.अविनाश भोंडवे
सोमवार, 7 डिसेंबर 2020

आरोग्य संपदा

माणसाचे पोट म्हणजे पँडोराच्या बॉक्ससारखे असते. ग्रीक पौराणिक कथेतल्या पँडोराच्या पेटीप्रमाणे मानवी पोटातही अनेक आजार दडून बसलेले असू शकतात. लक्षणे तीच असतात पण त्याचे विकल्प अनेक असू शकतात. पेटी उघडली की हजारो नतद्रष्ट गोष्टींपैकी काही तरी बाहेर येणारच. 

तसं पाहिलं तर पोटाच्या आजारांची लक्षणे साधीच असतात. पोटात दुखणे, जुलाब, उलट्या, मळमळणे, पोट साफ न होणे, मलावरोध, पोटात गुबारा धरणे, ढेकर येणे, पोटात गडगडणे वगैरे. पण त्याची कारणे कधी पोटातल्या अवयवांना जंतूसंसर्ग झाल्यामुळे, कधी त्यांच्यावर आहाराचा भार पडल्यामुळे; तर कधी आतल्या अवयवांना एखादा गंभीर आजार झाल्यामुळे अशी असू शकतात. काही आजार आपोआप बरे होतात, तर काही औषधे घेऊन, तर काही आजारांमध्ये शस्त्रक्रियेसारखे उपायही करावे लागतात. पोटाच्या आजारांच्या तपासण्यात काही आजारांची कारणे लगेच सापडतात, तर असेही काही आजार असतात की रक्त, लघवी, शौच तपासणीत, एक्सरे, स्कॅन आणि अन्य तपासण्यात काही केल्या काहीही  सापडत नाही, पण हेच त्या आजारांच्या निदानाचे व्यवच्छेदक लक्षण ठरू शकते.    

पोटाच्या अशा वरवर साधी लक्षणे असल्याने उपचारांकडे दुर्लक्षित होणाऱ्या आजारांपैकी नेहमी आढळणारा आजार म्हणजे ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ (आयबीएस). हा पोटाचा मोठ्या प्रमाणात आढळणारा विकार आहे. हा दीर्घकाळ त्रास देणारा विकार असून त्याचे उपचारही  दीर्घकाळ घ्यावे लागतात. 

लक्षणे

 • ओटीपोटात वेदना होणे, पोटात कळा येणे, पोट फुगल्यासारखे वाटणे अशी आतड्यांच्या हालचाली संबंधित लक्षणे प्रामुख्याने असतात. कधीकधी सतत सौम्य वेदना असतानाच एकदम जोराची कळ येते.
 • तोंडावाटे आहार घेतल्यानंतर त्याचे पचन होत होत ते लहान आणि मोठ्या आतड्यांच्या हालचालींनी ते पुढे सरकत राहते. या आजारात बऱ्याचदा काहीही खाल्ल्यानंतर वेदना वाढते, मानसिक ताणांमुळे दुखणे अधिक जाणवते. शौचाला झाल्यावर पोट दुखणे कमी होते. स्त्रियांना मासिक पाळी येण्यापूर्वी किंवा पाळी चालू असताना हे त्रास वाढतात. मलावरोध आणि वाढलेली मलप्रवृत्ती ही दोन्ही आयबीएसची प्रमुख लक्षणे असतात. आतड्यांच्या एरवी होणाऱ्या हालचालीत  कमालीचा बदल आढळून येतो.
 • पोटात गोळा येणे, पोटात गुबारा धरणे किंवा शौचामध्ये शेंबडासारखा द्राव म्हणजेच श्लेष्म पडणे किंवा अधूनमधून मलावरोध होणे. शौचाला पूर्ण झाली नसल्याची भावना राहते. या भावनेमुळे  
 • रुग्ण दिवसातून बऱ्याचदा शौचाला जात राहतो. शौचाला व्हावे म्हणून वारंवार घेतलेल्या औषधांनी अधूनमधून जुलाबही होतात. शौचाला गेल्यावर मलाबरोबर आव पडते पोटात गॅस झाल्याचे वाटते. मग  ढेकर येऊ लागतात. २५ ते ५० टक्के रुग्णांना ढेकर येण्याचा, छातीत जळजळ होण्याचा, मळमळण्याचा किंवा उलटी होण्याचा त्रास होतो. दिवसा जागेपणी अपचन होते. छातीत जळजळ, मळमळ, उलटी, ढेकर येणे, पोटात गडगडणे, वारा सरणे, मलावरोध किंवा वाढलेली मलप्रवृत्ती यातील काही लक्षणे दिसतात.

कुणाला होण्याची शक्यता असते?
हा आजार बहुधा तारुण्यातच होतो. वयाच्या ४५ ते ५० वर्षे वयानंतर हा आजार होताना क्वचितच आढळतो. मात्र प्रौढ आणि वृद्धांनासुद्धा आयबीएसचा त्रास होत राहतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराची लागण दुपटी-तिपटीने जास्त होते. आयबीएसच्या रुग्णांचे दोन प्रमुख प्रकार असतात. एकात रुग्णांना पोटदुखीच्या त्रासाबरोबर जुलाब आणि मलावरोध याचा त्रास होतो, तर दुसऱ्या प्रकारात पोट न दुखता केवळ जुलाब होत राहतात आयबीएसमध्ये तीव्र चिन्हे आणि गंभीर लक्षणे नसतात. ताणतणाव, अनियमित आणि अपुरी झोप असणाऱ्यात हा त्रास उद्भवतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
जर आपल्या रोजच्या मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल आढळला आणि तो सतत बदलला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. अशा लक्षणांमध्ये-

 • वजन कमी होणे
 • रात्री सतत पातळ शौचाला होणे 
 • गुद्द्वारावाटे रक्तस्राव होणे
 • रक्तातील लोहाची पातळी आणि पर्यायाने हिमोग्लोबिन कमी होऊन अशक्तपणा येणे.
 • सतत उलटी होणे
 • अन्नपदार्थ गिळताना त्रास होणे
 • आतड्यांच्या हालचालीमुळे किंवा वारा सरल्याने पोटदुखी कमी होत नाही
 • अशी लक्षणे आढळली तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.

कारणमीमांसा
    आयबीएसचे नेमके कारण वैद्यकशास्त्राला माहीत नाही. पण अनेक घटक या आजाराला कारणीभूत असतात.

 • आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन- आतड्यांच्या आतील बाजूला असलेल्या अस्तराला स्नायूंचेही एक आवरण असते. या स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणामुळे आतड्यामधील अन्न पुढे सरकत राहते. या विकारात हे स्नायू नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात आकुंचन पावतात आणि अशा आकुंचित अवस्थेत ते नेहमीपेक्षा जास्त काळ राहतात. या आकुंचनामुळे पोटात गॅस होणे, आतड्याला सूज येऊन जुलाब होऊ लागतात. या उलट काही रुग्णांत हे स्नायू कमी प्रमाणात आणि कमी वेगाने आकुंचित पावतात आणि त्यामुळे अन्नाचा आतड्यातून पुढे जाण्याचा प्रवास मंदावतो, परिणामतः मळ घट्ट आणि कोरडा होतो आणि मलावरोध होतो.    
 • मज्जासंस्था- आतड्यांचे आकुंचन-प्रसरण मेंदूकडून येणाऱ्या संदेशांमधून नियंत्रित होत असते. या संदेशानुसार आतड्यांची हालचाल होत असते. त्यात गोंधळ झाल्यास आतड्यांची हालचाल अचानकपणे वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. जेव्हा पोटात गुबारा धरतो किंवा मळापासून आतड्यांवर ताण येतो तेव्हा पचनसंस्थेचे मज्जातंतू त्यांना अतिरिक्त प्रतिसाद देतात. मेंदू आणि आतड्यांमधील असंतुलित संदेशपरिवहनामुळे शरीरातल्या पचनप्रक्रियेमध्ये एरवी होणार्‍या बदलांपेक्षा जास्त प्रमाणात परिणाम होतो.  परिणामी वेदना, अतिसार किंवा बद्धकोष्ठता होते.
 • तीव्र जंतूसंसर्ग- मोठ्या आतड्याला जिवाणू किंवा विषाणूंचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यावर होणार्‍या अतिसारानंतर (गॅस्ट्रोएन्टेरिटिस) आयबीएस होऊ शकतो. मोठ्या आतड्यात जिवाणूंची अतिरिक्त वाढ झाल्यामुळेदेखील आयबीएस होतो. 
 • अल्पवयात होणारे मानसिक तणाव- बालपण ताणतणावात गेले असेल किंवा अल्पवयात धकाधकीच्या जीवनाला सामोरे जावे लागले असेल तर आयबीएस होण्याची शक्यता वाढते. 
 • मोठ्या आतड्यातील सूक्ष्मजंतूंमध्ये बदल- मानवी आतड्यांमध्ये काही प्रकारचे जिवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य जंतू (फंगाय) असतात. सामान्यत: ते आतड्यांमध्येच वस्ती करून राहतात आणि आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. काही संशोधनात असे सिद्ध झाले आहे की आयबीएस असलेल्या लोकांमधील अशाप्रकारचे सूक्ष्मजंतू निरोगी लोकांपेक्षा भिन्न असतात..

आजाराला चालना देणारे घटक

 • काही विशिष्ट कारणांमुळे आयबीएस अचानकपणे उद्‍भवू शकतो. 
 • आहार- आहारातील अन्नघटक आणि विविध पदार्थांची अॅलर्जी किंवा वावडे असल्यास आयबीएस उद्भवतो असे अनेक संशोधनपूर्ण सर्वेक्षणात आढळून आले आहे. मात्र त्याची नक्की कारणमीमांसा अजूनही पूर्णपणे सिद्ध झालेली नाही. मात्र काहींना गहू, दुग्धजन्य पदार्थ, लिंबूवर्गीय फळे, सोयाबीन, कोबी, दूध आणि कार्बोनेटेड पेये आहारात आल्यास आयबीएसची तीव्र लक्षणे आढळून येतात असेही लक्षात आले आहे.
 • ताणतणाव- ताणतणावामुळे या आजाराची लक्षणे वाढतात असे लक्षात आले असले तरी आयबीएस हा केवळ ताणतणावामुळे होतो असे सिद्ध झालेले नाही. 

आजारातील गुंतागुंत

 • ·तीव्र बद्धकोष्ठता किंवा अतिसारामुळे अनेक रुग्णांत मूळव्याधीचा (पाइल्स) त्रास उद्भवतो. 
 • ·आयुष्य निकृष्ट दर्जाचे बनते- मध्यम किंवा गंभीर स्वरूपाचा आयबीएस असलेले बरेच लोक निकृष्ट दर्जाचे जीवन जगतात. आयबीएस असलेले लोक इतरांपेक्षा तिपटीने कामावर गैरहजर असतात. 
 • ·मानसिक परिणाम- आयबीएस असलेल्या व्यक्तीत चिंता, नैराश्य, औदासिन्य, मूड डिसऑर्डर्स अधिक प्रमाणात आढळून येतात. ही लक्षणे आजार वाढवतात आणि आजार वाढल्याने ही लक्षणे अधिक वाढतात असे एक दुष्टचक्र निर्माण होऊ शकते. 

निदान

 • आयबीएसचे निश्चित आणि पक्के निदान करण्यासाठी कोणतीही चाचणी नाही. संपूर्ण वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासणी आणि सिलिअॅक डिसीजसारखे पोटाचे अन्य आजार तर नाहीत ना? यासाठी काही तपासण्या केल्या जातात.  
 • आयबीएसच्या निदानासाठी काही निकष संच आहेत. इतर कोणत्याही महत्त्वाच्या मोठ्या आजाराची शक्यता दूर केल्यावर, या निकषांच्या संचापैकी एक वापरला जातो.
 • रोम निकष. सलग तीन महिन्यांत, दर आठवड्यात एकदा पोटात दुखणे आणि जुलाब किंवा मलावरोध अशा लक्षणांनी पोटाची अस्वस्थता निर्माण होऊन, ती कमीत कमी एक दिवस टिकून राहत असेल तर रोम निकषानुसार या विकाराला आयबीएसमानले जाते. 
 • यामध्ये पोटात दुखणे आणि अस्वस्थता ही लक्षणे शौचाला होण्यासंबंधात असावी लागतात. शिवाय शौचाला जाण्याची क्रिया नेहमीपेक्षा जास्त वेळा किंवा कमी वेळा व्हायला हवी. त्याचप्रमाणे मळाची अवस्था नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे पातळ किंवा घट्ट अशा स्वरुपात बदलली गेलेली असावी लागते.  
 • आयबीएसचा प्रकार-  उपचाराच्या उद्देशाने लक्षणाबरहुकूम आयबीएस तीन प्रकारांमध्ये विभागले जाते. १. बद्धकोष्ठता-प्रबल, २. अतिसार-प्रबल ३. बद्धकोष्ठ आणि अतिसार ही दोन्ही लक्षणे मिश्र स्वरूपात असणे.
 • बद्धकोष्ठ आणि अतिसार वगळता रुग्णाच्या आजारात इतर काही लक्षणे असल्यास किंवा तपासणीत काही इतर संशयास्पद चिन्हे आढळल्यास त्याचाही विचार करावा लागतो. यामध्ये-

 

·वयाच्या पन्नाशीनंतर चिन्हे आणि लक्षणे दिसणे·वजन कमी होणे

 • ·गुद्द्वारावाटे रक्तस्राव
 • ·ताप
 • ·मळमळ किंवा वारंवार उलट्या होणे
 • ·ओटीपोटात वेदना, विशेषत: जर ती आतड्यांसंबंधी हालचालीशी संबंधित नसणे किंवा फक्त रात्रीच पोटात दुखणे 
 • ·अतिसार सतत होणे किंवा त्यामुळे झोपेतून वारंवार जागे होणे 
 • ·रक्तातील लोहाचे प्रमाण कमी असणे आणि त्या संबंधित अशक्तपणा असणे.
 • रुग्णामध्ये ही लक्षणे असल्यास किंवा आयबीएसचे प्रारंभिक उपचारांचा सुयोग्य परिणाम आढळत नसेल तर काही अतिरिक्त चाचण्या कराव्या लागतात.
 • अतिरिक्त चाचण्या-  

शौच तपासणी- 
·शौचामधील जिवाणू (बॅक्टेरिया), किंवा परजीवी जन्त्त तपासणी.
·स्निग्ध पदार्थ, प्रथिने, पिष्टमय पदार्थ असे काही ठराविक अन्नघटक न पचण्याची शक्यता  
·यकृतामधील पित्तरस. अशा विविध गोष्टींची शौचामधील तपासणी केली जाते. 

 • कोलोनोस्कोपी- यामध्ये मोठे आतडे त्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका दुर्बीण असलेल्या लवचिक नळीद्वारे पूर्णपणे तपासले जाते. 
 • एक्स-रे किंवा सीटी स्कॅन-  मोठ्या आतड्यातील रचनेत काही दोष निर्माण झाला आहे का? हे तपासण्यासाठी गुदद्वारातून बेरियम नावाचा अपारदर्शक द्राव मोठ्या आतड्यात भरला जातो. या बेरियम चाचणीत आतड्याच्या आतील भागातील दोष दृश्यमान होतात.
 • आजमितीला ही तपासणी करण्याऐवजी पोटाचा सिटी स्कॅन केला जातो. त्यात मोठ्या आतड्याच्या अंतर्भागासंदर्भात अधिक सखोल माहिती समजू शकते. 
 • अप्पर एन्डोस्कोपी - अन्ननलिकेत घशातून एक लांब, लवचिक नळी टाकली जाते. या नलीकेच्या शेवटी असलेल्या कॅमेरामुळे पचनसंस्थेच्या सुरुवातीच्या भागाची तपासणी केली जाते. लहान आतड्यांमधून आणि जीवाणूंच्या अतिवृद्धीसाठी द्रवपदार्थाचे ऊतक नमुना (बायोप्सी) घेतला जातो. सिलिअॅक डिसीजचा संशय असेल तर एन्डोस्कोपीची शिफारस केली जाते. 
 • लॅक्टोज इनटॉलरन्स (दुग्धशर्करा असहिष्णुता)-  दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणारी लॅक्टोज शर्करेचे पचन सर्वसामान्यपणे सर्वांमध्ये होत असते. सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे हे एक द्रव्य असते. दुग्धशर्करा न पचल्यास शौचाच्या वेळेस पोटात वेदना होणे, गुबारा धरणे, जुलाब होणे अशी आयबीएससदृश लक्षणे उद्भवतात. 
 • बॅक्टेरियाच्या अतिवृद्धीसाठी श्वास चाचणी-. आपल्या लहान आतड्यात झाली आहे काय? हे श्वासोच्छ्वासाच्या तपासणीद्वारे ठरवले जाते. जिवाणूंची अतिरिक्त वाढ मधुमेही व्यक्तीत, आतड्यांची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींमध्ये आणि पचनक्रिया मंदावणाऱ्या आजारांमध्ये आढळून येते.  
 • उपचार
 • रुग्णाच्या त्रासदायक लक्षणांचे नियंत्रण करणे आणि त्याला सर्वसामान्य त्रासविरहित आयुष्य जगू देणे हा आयबीएसच्या उपचाराचा उद्देश असतो. त्यामुळे उपचार विविध पद्धतीने करावा लागतो.
 • ताणतणावांचे नियोजन- मेडिटेशन, ध्यान, छंद जोपासणे अशा गोष्टी कराव्यात.    
 • आहाराचे नियोजन- पोटात ज्यामुळे गुबारा धरला जातो असे पदार्थ टाळावेत. कार्बोनेटेड आणि अल्कोहोलयुक्त पेये आणि काही विशिष्ट अन्नपदार्थ ज्यामुळे लक्षणे वाढतात ते टाळावेत. ग्लूटेन- काही संशोधनानुसार आयबीएसग्रस्त व्यक्तींना सिलियाक डिसीज नसला तरीही ग्लूटेन (गहू, बार्ली आणि राय) खाणे थांबविल्यास अतिसाराच्या लक्षणांमध्ये सुधारणा होते.
 • एफओडीएमएपी- पिष्टमय पदार्थांमध्ये ''फर्मेंटेबल ओलिगोसॅकॅराईड्स, डायसॅकॅराईड्स, मोनोसॅकॅराईड्स पॉलिओल्स'' नावाचा अन्नपदार्थांचा गट आहे. यात फ्रुक्टोज, फ्रुक्टन्स, दुग्धशर्करा अशा काही संवेदनशील पिष्टमय पदार्थांनी युक्त विशिष्ट धान्ये, भाज्या, फळे आणि दुग्धजन्य पदार्थ असतात. काही व्यक्ती या आहारगटाला संवेदनशील असतात. त्यांना हे पदार्थ टाळावे लागतात. प्रमाणित आहारतज्ज्ञ या आहार बदलांसाठी रुग्णांची मदत करू शकतात. 
 • याशिवाय पालेभाज्या, फळे असे फायबरयुक्त पदार्थ खावेत. पाणी, सरबत, ताक असे द्रव पदार्थ रोज दोन ते तीन लिटरपर्यंत घ्यावेत. भाताची पेज, अधिक पिकलेली केळी, बिया काढून राहिलेला पेरूचा गर, उकडलेले सफरचंद, डिंक यात विरघळणारे फायबर मोठ्या प्रमाणात असतात. फायबरमध्ये पाण्याचे रेणू राहतात. त्यामुळे मलावरोध होत नाही. उलटपक्षी जुलाब होताना होणारी आतड्यांची जलद हालचाल अशा फायबरमुळे संथ होते. हे रेणू मोठ्या आतड्याच्या अस्तराला ऊर्जा पुरवतात. त्यामुळे आतड्याचे काम सुधारते.
 • नियमित व्यायाम करावा आणि पुरेशी झोप घ्यावी
 • औषधे- लक्षणांच्या आधारे काही औषधे उपचारासाठी प्रभावी ठरतात.
 • भविष्यातील संभाव्य उपचार- फीकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट- आयबीएसग्रस्त व्यक्तीच्या आतड्यात दुसऱ्या निरोगी व्यक्तीचे विशेष प्रक्रिया केलेले शौच काही काळ ठेवून रुग्णांच्या आतड्यात नव्याने योग्य पद्धतीचे जंतू निर्माण करण्याचे उद्दिष्ट या पद्धतीतून साध्य केले जाते. मात्र यावरील संशोधन अजूनही पूर्ण झालेले नाही

संबंधित बातम्या