आधुनिक जीवनशैलीतील आहार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 25 जानेवारी 2021

आरोग्य संपदा

मानव हा पृथ्वीवरील सर्वात प्रगल्भ प्राणी समजला जातो. झाडावरची फळे आणि पाला खाणाऱ्या माकडाचे वंशज समजल्या जाणाऱ्या माणसाने, आपली वेगळी आहारपद्धती सुरु केली. जसजशी मानवाची जीवनशैली विकसित होत गेली, तशा आणखी नवनव्या पद्धती आहार आणि भोजनसंस्कृतीत शिरल्या. मात्र काळाच्या ओघात माणसाच्या आजच्या आधुनिक जीवनशैलीतल्या आहारामुळे आरोग्याबाबत असंख्य प्रश्न आणि जीवनशैलीविषयक आजारांची एक नवी श्रेणी उभी राहिली आहे.

दोन पिढ्यांपूर्वी प्रत्येकाच्या आहारात नैसर्गिक अन्नधान्यांचा, फळफळावळीचा नियमितपणे समावेश असे. पण आजच्या पिढीला आवडणाऱ्या बहुतेक खाद्यपदार्थांवर कसली ना कसली तरी प्रक्रिया केली जात असते. आजचे अन्न म्हणजे रासायनिक रंग, रसायने, अतिप्रमाणात  साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेली तेले यांनी ठासून भरलेली असतात. 

या प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा आजच्या तरुण पिढीच्या रोजच्या खाण्यापिण्यात समावेश झाल्यापासून, अतिलठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर्स, मुलींमधील मासिक पाळीचे आजार, वंध्यत्व आणि नैराश्य अशा आजारांचे प्रमाण संसर्गजन्य साथीच्या आजारांच्या तुलनेत बरेच वाढले आणि वाढतच राहिले. नव्या युगाच्या या आहारपद्धतीने जीवनशैलीतील नवी आजारपद्धती निर्माण झाली. जागतिक स्तरावर या आजारांचे प्रमाण एवढे वाढले की ‘असंसार्गिक आजार’ किंवा ‘नॉन कम्युनिकेबल डिसिजेस’ (एनसीडी) ही वैद्यकशास्त्राची एक नवी शाखा मानली जाऊ लागली. आजचा आधुनिक आहार आणि त्यातील आधुनिक घटक हीच या उपरोक्त आजारांमागील मुख्य कारणे आहेत. आजच्या पिढीला भावणाऱ्या जगातील अनेक नव्या फॅशन्सप्रमाणे या जंकफूड, फास्टफूडची सुरुवातही अमेरिकेत झाली. त्यानंतर हा आहार ज्या ज्या खंडात गेला, ज्या देशांत लोकप्रिय झाला तिथे लठ्ठपणा, हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह याची जणू काही एक साथच आली. 

हे आजार नव्या जीवनशैलीतील आहारातील आठ मुख्य दोषांमुळे पसरत होते. आहारातून हे आठ आहार-दोष काढून टाकले तर कदाचित या आजारांच्या व्यापक प्रसारावरसुद्धा नियंत्रण आणता येईल.

प्रक्रिया केलेले अन्न

प्रोसेस्ड फूड हा आजच्या संगणक युगातील कुटुंबांचा परवलीचा शब्द आहे. यापूर्वीच्या काळात प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कुटुंबाच्या किराणामालाच्या खरेदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात कधीही घेतले जात नव्हते. पण नव्वदीच्या दशकापासून भारतात पाय रोवलेल्या सुपरमार्केट, फूडमॉल, ऑनलाइन अन्नपदार्थ खरेदी अशा मार्गांनी नवश्रीमंतांच्याच नव्हे तर नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीयांच्या घरातही याचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. टप्प्याटप्प्याने किराणामालाच्या पारंपरिक दुकानांतही यांचा प्रवेश झाला. एका अंदाजानुसार तीन माणसांच्या किराणामालाच्या खरेदीत २५ टक्के खर्च हा प्रक्रियाकृत अन्नपदार्थ, डबाबंद खाद्ये, फळांचे रस, फळांचे काप, शीतपेये इथपासून ते दूध, भाज्या, ब्रेड, नूडल्स, मांसाहारी पदार्थ, मिठाया यांच्यावर केला जातो आणि दरवर्षी हे प्रमाण वाढतच जाते आहे.  

यामध्ये अनेकदा किमतीचा तर प्रश्न येतोच कारण पीठ किंवा साखर किंवा दोन्ही गोष्टी असलेले प्रक्रियायुक्त पदार्थ, ताजी फळे आणि भाज्यांच्या तुलनेत प्रत्यक्षात स्वस्त पडतात. शिवाय वेळेचा आणि कष्टांचाही प्रश्न आहे. रोजच्या रोज जाऊन भाज्या खरेदी करणे, त्या शिजवणे यासाठी नव्या जीवनशैलीत वेळच नाही. पापड, लोणची, शेव, कुरडया करणे मागच्या पिढीतच बंद झाले होते. आता गव्हाचे पीठही गिरणीत जाऊन दळून आणण्याऐवजी रेडीमेड ‘आटा’ आणणे सोयीचे वाटू लागले, दिवाळीसारख्या सणासुदीचे पदार्थही रेडीमेड आणणे हा आजच्या पिढीला ‘स्टेटस सिम्बॉल’ वाटू लागला. 

या साऱ्यांच्या मागे वर्तमानपत्रे, टेलिव्हिजनवर दिलखेचक पद्धतीने आकर्षून टाकणाऱ्या जाहिराती, मार्केटिंग तत्त्वामधील एकावर एक फ्री, एकूण एवढी खरेदी केली तर इतकी सूट अशा ऑफर्स यांची सूत्रबद्ध चाल होतीच. तथापि, याचे परिणाम आताशा स्पष्ट दिसू लागले आहेत. मधुमेह आणि लठ्ठपणा यासारख्या बऱ्याच गंभीर आणि तीव्र आरोग्यसमस्या याच रेडीमेड गोष्टींच्या आणि प्रक्रियायुक्त पदार्थांच्या हव्यासाने वाढू लागल्या आहेत. 

अतिरिक्त साखर

अन्नपदार्थात गोडाचे आणि पर्यायाने साखरेचे जास्त प्रमाण असणे हा आजच्या नव्या आहार पद्धतीतला मोठा दोष आहे. बहुसंख्य पदार्थात शुद्ध साखरेऐवजी उच्च प्रक्रिया केलेला ‘हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप’ वापरला जातो. त्यामुळे आजच्या जीवनशैलीतील नव्या आहारपद्धतीतून शरीरात जाणाऱ्या साखरेचे प्रमाण दुपटी-तिपटीने वाढलेले आहे.

ही साखर वेगवेगळ्या स्वरूपात शरीरात जात असते. त्यातील प्रक्रियायुक्त साखरेचे प्रमाण २५ टक्के आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा साखरेचे सेवन वाढले आहे. ‘जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन’च्या (जामा) मते आपल्या आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेमध्ये केवळ १०० ते १५० कॅलरीज साखरेतून मिळाव्यात. जर एकूण कॅलरीजपैकी २० टक्क्यांपेक्षा जास्त कॅलरीज साखरेतून मिळत असल्यास ती व्यक्ती कोणत्याही हृदयरोगाने दगावण्याची शक्यता दुपटीने वाढते. प्रक्रियायुक्त साखर आपल्या आहारात येण्याचे स्रोत म्हणजे शीतपेये, फळांचे तथाकथित रस म्हणून घेतले जाणारे पण प्रत्यक्षात फळांचा फक्त कृत्रिम स्वाद असलेली पेये, कँडी, दुग्धजन्य मिष्टान्ने, डेझर्ट, आइस्क्रीम, केक, बिस्किटे, कुकी, चॉकलेट्स इत्यादी. आपल्यापैकी अनेकजण या साखरेबाबत इतके ‘अनजान’ असतात की ‘मी अजिबात गोड खात नाही,’ असे ते नेहमीच ठासून सांगत असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेताना शक्यतो साखरेचा प्रवेश अगदी मर्यादित ठेवावा. आपल्या आहारातील कृत्रिम  साखर काढून टाकावी. साखरेचे छुपे स्रोत शोधण्यासाठी सर्व खाद्यपदार्थांवरील लेबल वाचावेत, कारण बहुतेकदा तुम्हाला कल्पनाही केली नसेल अशा तुमच्या आवडीच्या पदार्थात ती नेमकी दडलेली असते. मग कधी तो टोमॅटो सॉस असेल तर कधी पीनट बटर.

अंडी खाण्याबाबत गैरसमज

गेल्या ५० वर्षांत अंड्यांच्याबाबतीत खूप गैरप्रचार झालाय. त्यात मुख्य म्हणजे अंडी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते असा समज. खरे तर अंड्यात नैसर्गिकरीत्या कोलेस्टेरॉल असतेच. पण आपल्या आहारातून उत्तम प्रथिने शरीराला मिळवायची असतील तर अंडी हा एक उत्तम स्रोत असतो. पण अंडी मांसाहारी असल्यामुळे शाकाहारी व्यक्ती ते खात नाहीत, आणि अंड्यांमुळे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असल्याचा समजामुळे अनेक मांसाहारी व्यक्तीदेखील नेमकी ही महत्त्वाची गोष्ट टाळत आले. आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलशी संबंधित आहारातील कोलेस्टेरॉलचा फारच कमी संबंध असतो. अनेक संशोधन अहवालातून असे दिसून आले आहे की अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात एलडीएल (खराब) कोलेस्टेरॉल वाढत नाही. 

यामध्ये आणखी एक गोष्ट अशी आहे की गावरान कोंबड्यांची अंडी ही पोल्ट्रीत पिंजराबंद अवस्थेत वाढवलेल्या कोंबडीच्या अंड्यापेक्षा अधिक पोषक असतात. यामध्ये सुमारे सातपट अधिक बीटा कॅरोटीन, तिप्पट व्हिटॅमिन ई आणि दुप्पट व्हिटॅमिन ए असते. कदाचित अंडी दुकानातून घेताना ती नक्की गावरान आहेत का हे समजणार नाही. पण त्यांचा पिवळा बलक पाहिला, तर मुक्त फिरणाऱ्या आणि नैसर्गिकरीत्या फिरणाऱ्या आणि खाणाऱ्या कोंबडीच्या अंड्यातला बलक चमकदार केशरी असतो, पण बंद खुराड्यात किंवा पिंजऱ्यात वाढवल्या जाणाऱ्या कोंबडीच्या अंड्याचा बलक पिवळा आणि कदाचित फिकट गुलाबी असतो.

प्रक्रिया केलेले वनस्पती तेल

खरे तर गायी-म्हशीच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाचा वापर बंद करून आधुनिक जीवनशैलीत जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेल्या वनस्पती तेलाचा वापर करण्यास सुरुवात झाल्यापासून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. एका दृष्टीने चरबी हा एक महत्त्वाचा अन्नघटक असतो आणि आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असतो. आहारातील जीवनसत्त्वांचे अभिशोषण होण्यास, मुलांच्या शरीराची वाढ होण्यास, त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी चरबीयुक्त अन्न घटकाची गरज असते. चरबीयुक्त पदार्थामध्ये वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य चरबी, तूप आणि तेलाचा समावेश होतो. परंतु अनेक वर्षे प्राणिजन्य चरबी, तूप आणि खोबरेल तेल यांना ‘सॅच्युरेटेड फॅट्स’ किंवा संपृक्त स्निग्ध पदार्थ म्हणून गणले गेले. आणि हायड्रोजनेटेड वनस्पती तेले आणि मार्गारीन हे निरोगी पर्याय म्हणून घोषित केले गेले. संतृप्त चरबीमुळे हृदयविकार वाढतो, म्हणून ते टाळून वनस्पतिजन्य प्रक्रियाकृत तेले आणि वनस्पती तूप वापरले जाऊ लागले.  

पण आता संशोधनाने वेगळ्याच गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. हायड्रोजनेशन प्रक्रियेने वनस्पती तेलांमध्ये ‘ट्रान्सफॅट’ तयार होतात असे दिसून आले आहे. आणि ती हृदयाला अधिक धोकादायक असतात असे लक्षात आले आहे. त्यामुळे हा दोष दूर करण्यासाठी कॉर्न किंवा सोयाबीन तेलाऐवजी ऑलिव्ह ऑइल किंवा गवत खाणाऱ्या गायीच्या दुधापासून मिळणारे लोणी किंवा तूप वापरले गेले पाहिजे हे सांगितले जाते.नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले लोणी, चीज आणि अव्होकॅडो सारख्या निरोगी नैसर्गिक चरबीमुळे आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता घटते. अशा प्रकारच्या पदार्थांनी आपले शरीर चरबी साठवण्याच्या गुदामाऐवजी चयापचय क्रियेतून चरबी जाळणारे यंत्र होते. 

तेल-तूप नको

तेल-तुपामुळे जाडी, वजन आणि कोलेस्टेरॉल वाढते अशी माहिती साधारणपणे १९७७ च्या सुमारास जगभरात प्रसृत झाली. मात्र १९७७ पासून आजवर झालेल्या अनेक संशोधनात नेमकी उलटी गोष्ट ध्यानात आली की प्राणिजन्य तूप किंवा चरबीमुळे नव्हे तर साखर आणि प्रक्रियाकृत कर्बोदकांमुळे आरोग्याच्या समस्या वाढतात. त्यावेळपासूनच्या अनेक वैद्यकीय शोध निबंधात आहारात चरबी कमी असल्याने लठ्ठपणा, कर्करोग, स्ट्रोक किंवा हृदय रोग टळतो असे दिसून आलेले नाही. उलट नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले लोणी, चीज आणि अव्होकॅडो सारख्या निरोगी नैसर्गिक चरबीमुळे आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता घटते. अशा प्रकारच्या पदार्थांनी आपले शरीर चरबी साठवण्याच्या गुदामाऐवजी चयापचय क्रियेतून चरबी जाळणारे यंत्र बनते. 

वनस्पतिजन्य तेलांचे जास्त सेवन

प्रक्रियाकृत वनस्पती तेलात ओमेगा-६ फॅटी अॅसिड्स जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयरोग, कर्करोग, मधुमेह, नैराश्य आणि अल्झायमर्स असे आजार होण्याची शक्यता बळावते. याउलट आपल्याला नैसर्गिक वनस्पती तेलात आणि प्राणिजन्य तेलातुपात ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स अधिक असतात. त्यामुळे प्रक्रिया केलेले पदार्थ, वनस्पती तेले आणि प्रक्रिया केलेल्या तेलात तळलेले पदार्थ टाळून आपले फॅटी अॅसिड्सचे प्रमाण सुधारावे. क्रील जातीच्या नॉर्वेजियन माशांमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सचे प्रमाण भरपूर असते. 

गहू आणि मैदा

आरोग्याला गहू आणि गव्हाचे पदार्थ उत्तम असतात असे बऱ्याच लोकांना वाटते. गेल्या तीस वर्षांत गव्हातील लोह, जस्त आणि मॅग्नेशिअम यासारख्या महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये २८ टक्क्यांनी घट झाल्याचे जागतिक आकडेवारी सांगते, त्याशिवाय गव्हामधील टरफल घासून आतून येणाऱ्या शुभ्र भागाचा वापर मैदा म्हणून केला जातो, त्यात तर जीवनसत्त्वांची पूर्ण वानवा असते. शिवाय गव्हामधल्या लेक्टिन ह्या घटकद्वारे आपल्या रोगप्रतिकारक यंत्रणेकडून दाहक प्रतिसाद निर्माण होतो, मज्जातंतूंच्या वाढीस प्रतिबंधित होतो आणि पोटाचे आणि अन्नपचनाचे अनेक विकार उद्‌भवतात. ग्लुटेनमुक्त आहाराचा वापर केल्याने हे त्रास थांबू शकतात.

हायड्रोजनेटेड सोयाबीन तेल

या तेलाचा स्वतःहून एक विशेष उल्लेख येतो. जवळजवळ सर्व सोया प्रॉडक्ट्स आता जनुकीय प्रक्रिया केलेल्या (जीएमओ) वनस्पतींकडून येतात. सेंद्रिय सोयाही ते हायड्रोजनेटेड असते आणि त्यात ट्रान्स-फॅट्‌स असतात. साहजिकच जनुकीय प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ आणि हायड्रोजिनेशन केलेली तेले एकत्रितपणे घेतली जातात त्यावेळेस आरोग्याबाबत विपरीत गोष्टी अगदी पेशींच्या पातळीवर घडू लागतात. हायड्रोजनेटेड सोयाबीन तेल कर्करोग, मधुमेह, पुनरुत्पादन समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा असंख्य आरोग्य समस्यांशी ते जोडले जाते. सोयाबीनचे तेल स्वस्त असल्यामुळे अनेक प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थात असते. साहजिकच आपण आरोग्याला विघातक गोष्टीचा आहारात समावेश करतोय याची जाणीवच अनेकांना नसते. हे टाळण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर्वसाधारणपणे प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, विशेषतः सोयाबीन तेलातले, टाळणे.

एकूणात माणसाची भौतिक क्षेत्रातील प्रगती ही त्याच्या आरोग्यदृष्ट्या होणाऱ्या अवनतीस कारणीभूत आहे. प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर सुखासीनता एकेक पाऊल वर चढत गेली आणि आरोग्य पायरी पायरीने खाली उतरत गेले, असेच म्हणावे लागते.

संबंधित बातम्या