थायरॉईडचे आजार आणि स्त्रिया

डॉ. अविनाश भोंडवे
रविवार, 31 जानेवारी 2021

आरोग्य संपदा

थायरॉइड किंवा गलग्रंथी ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आपल्या गळ्यामध्ये स्वरयंत्राच्या खालच्या बाजूस असते. त्यातून ‘थॉयरॉक्सिन’ नावाच्या संप्रेरकाची निर्मिती होऊन ते रक्तात सोडले जाते आणि त्यानंतर ते शरीरातील सर्व महत्त्वपूर्ण अवयवांमध्ये प्रसृत केले जाते. 

आपल्या शरीरातील अनेक क्रियाकलापांवर थायरॉइडद्वारा शरीरातील नियंत्रण ठेवले जाते. आपली चयापचय क्रिया शरीरातील उर्जा किती वेगाने खर्च करते, आपल्या हृदयाचे ठोके कितपत वेगाने पडतात अशा गोष्टी त्यात येतात, शिवाय शरीरातील ऊर्जेचा वापर सहजसाध्य होणे,  शरीर उबदार ठेवणे, शिवाय हृदय, मेंदू,  शरीरातील स्नायूंची कार्ये योग्यरीत्या पार पाडणे अशी अनेक कार्ये थायरॉइडमुळे नियंत्रित होतात. थायरॉईडच्या विकारांमध्ये थायरॉइड हे संप्रेरक जास्त किंवा कमी प्रमाणात निर्माण होते. आपल्या थायरॉईड ग्रंथी किती जास्त किंवा किती कमी हार्मोन बनवते यावर आपल्या शरीरातील काही क्रियांचा वेग कमी जास्त होत असतो. या आजाराच्या स्वरूपाप्रमाणे थकवा किंवा अति उत्साह वाटू शकतो तसेच वजन कमी होऊ शकते किंवा वाढूही शकते. 

पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये थायरॉईडचे विकार होण्याची शक्यता अधिक असते, विशेषत: गर्भधारणेनंतर आणि रजोनिवृत्तीनंतर. 

थायरॉइडचे आजार

 • हायपोथायरॉइडिझम :  थायरॉइड संप्रेरके कमी स्रावल्यामुळे त्यांचे रक्तातील प्रमाण कमी होऊन हा विकार उद्‌भवतो. या विकारात प्रामुख्याने वजन वाढणे, थकवा येणे, केस गळणे अशी लक्षणे आढळून येतात. ‘थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स’च्या  तपासणीत याचे निदान होते. थायरॉइड संप्रेरकांच्या औषधांनी हा विकार काबूत ठेवता येतो.
 • हायपरथायरॉइडिझम  : थायरॉइड संप्रेरके जास्त प्रमाणात स्रावल्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण वाढून हा विकार उद्‌भवतो. शरीराला कंप सुटणे, दरदरून घाम फुटणे, हृदयाची धडधड वाढणे आणि थायरॉइड ग्रंथीची वाढ होणे ही लक्षणे यामध्ये दिसून येतात.
 • थायरॉइड नोड्युल्स : ग्रंथींमध्ये गाठी होऊन होणाऱ्या या विकाराचे निदान सोनोग्राफी, थायरॉइड स्कॅन, एमआरआय यातून होते. या आजाराच्या रुग्णांपैकी दहा टक्के जणांना कर्करोगाची बाधा होण्याची शक्यता असते.
 • गॉयटर किंवा गलगंड : थायरॉइड ग्रंथीची अस्वाभाविक वाढ म्हणजे गलगंड. थायरॉइड संप्रेरके तयार करण्यासाठी मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे टीएसएच हे संप्रेरक स्रवते. जेव्हा थायरॉइड संप्रेरके कमी असतात तेव्हा टीएसएच जास्त स्रवते.

गलगंड होण्याची कारणे

 • आयोडिन कमतरता :  थायरॉइड संप्रेरकाच्या निर्मितीसाठी आयोडिन लागते. आयोडिन समुद्राच्या पाण्यात, समुद्री मासे, प्रवाळ वनस्पतींमध्ये आणि अल्प प्रमाणात भूगर्भातल्या पाण्यात आढळते. समुद्रकिनाऱ्यापासून दूर असलेल्या डोंगराळ प्रदेशातल्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्याने टीएसएचद्वारे थायरॉइड ग्रंथीच्या पेशींचे आकारमान वाढवून संप्रेरकाची निर्मिती करण्याचा प्रयत्न शरीर करते. साहजिकच गलग्रंथीच्या आकारमानात वाढ होऊन गलगंड होतो. गलगंडामध्ये थायरॉइड संप्रेरकांची रक्तातील पातळी काही रुग्णांत आवश्यक इतकी असू शकते, तर काहींमध्ये कमी अथवा जास्तदेखील असते.
 • जन्मजात :  गरोदर मातांच्या आहारात आयोडिनचे प्रमाण कमी असल्यास जन्माला येणाऱ्या बाळात थायरॉइड ग्रंथीची समस्या आढळते. त्यामुळे अनेक रुग्णालयात नवजात अर्भकांची थायरॉइडबाबत तपासणी करण्याची पद्धत आहे.
 • हाशिमोटो डिसीज  : हा ऑटोइम्युन आजार असतो. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली (इम्युन सिस्टीम) स्वत:च्याच थायरॉइड ग्रंथीच्या पेशी नष्ट करते. थायरॉइड हार्मोन्स कमी स्त्रवू लागते. परिणामत: मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीद्वारे टीएसएच जास्त प्रमाणात स्त्रवते आणि ग्रंथीचा आकार वाढून गलगंड होतो.
 •  ग्रेव्हज डिसीज :  रोगप्रतिकारक प्रणालीद्वारे थायरॉइड स्टिम्युलेटिंग इम्युनोग्लोबिन नावाचे प्रथिने स्रवते. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीच्या पेशींची वाढ होऊन तिचा आकार वाढतो, थायरॉइड संप्रेरके मोठय़ा प्रमाणात निर्माण होतात आणि हायपरथायरॉइडिझम असलेला गलगंड होतो.

स्त्रिया आणि थायरॉइड
एकुणात १२.५ टक्के स्त्रियांमध्ये थायरॉईडचे विकार विकार आढळतात. याचाच अर्थ, दर आठ महिलांपैकी एकीला तिच्या आयुष्यात केव्हाना केव्हा तरी थायरॉइडची समस्या उद्‌्भवण्याची शक्यता असते.  
स्त्रियांच्या आरोग्याबाबत थायरॉइडमुळे खालील मुख्य समस्या उद्‌्भवतात- 

 1. अनियमित मासिक पाळी : थायरॉईड ग्रंथीतील संप्रेरके मासिक पाळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. थायरॉईडच्या संप्रेरकांचे प्रमाण जास्त असल्यास पाळीमध्ये रक्तस्राव जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि पाळीही लवकर येऊ शकते. एरवी अठ्ठावीस दिवसांचे नेहमीचे चक्र दहा ते पंधरा दिवसांपर्यंतही कमी होऊ शकते. थायरॉइड संप्रेरक जर कमी प्रमाणात निर्माण होत असेल, तर पाळीच्या दरम्यान रक्तस्राव अगदी कमी होतो आणि पाळी उशिरा येऊ शकते. काहीवेळेस ती काही महिने लांबू शकते. हायपोथायरॉइडच्या विकारामध्ये स्त्रियांची मासिक पाळी काही महिने किंवा त्याहून अधिक काळ थांबू शकते, याला अमेनोरिया म्हणतात.
 2. अकाली रजोनिवृत्ती : शरीरातील रोगप्रतिकारक प्रणालीमुळे थायरॉइड ग्रंथीचे कार्य कमी होऊ शकते. अशा आजाराला ‘ऑटो इम्यून थायरॉयडायटिस’ म्हणतात. या विकारात स्त्रीच्या बीजांडकोषावर परिणाम होऊन कमी वयातच म्हणजे चाळीशी येण्याआधीच, तिची रजोनिवृत्ती होऊ शकते. या उलट वेळेवर होणाऱ्या रजोनिवृत्तीमध्ये त्यातील लक्षणांमुळे थायरॉईडच्या समस्येची लक्षणे ध्यानात येत नाहीत. रजोनिवृत्तीनंतर थायरॉईडचे विकार, विशेषत: हायपोथायरॉईडीझम होण्याची शक्यता जास्त असते
 3. वंध्यत्व : थायरॉईडच्या विकाराचा मासिक पाळीवर होणाऱ्या परिणामांमुळे स्त्रीबिजांवर परिणाम होऊन स्त्रीमध्ये वंध्यत्व उद्‌भवू शकते. 

थायरॉईड आणि गर्भधारणेदरम्यान समस्या
गर्भधारणेदरम्यान थायरॉईडच्या समस्येमुळे आई आणि बाळाच्या आरोग्यास त्रास होतो. बहुतेक स्त्रियांच्या गरोदरपणात थायरॉईड ग्रंथी आणि संप्रेरकांमध्ये नैसर्गिकरीत्याच काही बदल होत असतात. गर्भाच्या नैसर्गिक वाढीवर या बदलांचे परिणाम होत असतात.

 1. प्रेग्नन्सी गॉयटर : सर्वसाधारणपणे गरोदरपणात थायरॉईड ग्रंथीचा आकार १० ते १५ टक्क्यांनी वाढतो. गरोदरावस्थेमधील पहिल्या १० ते १२ आठवड्यांमध्ये आईच्या रक्तातून गर्भाला थायरॉईड संप्रेरके मिळत असतात. यासाठी मातेला दररोज २०० मायक्रोग्रॅम आयोडीनची आवश्यकता असते. 
 2. गर्भावस्थेतील १६व्या आठवड्यापासून गर्भाची थायरॉईड ग्रंथी स्वतःची थायरॉईड संप्रेरके तयार करू लागते. हे सगळे बदल गरोदरपणात होत असल्यामुळे या काळात प्रथमच उद्‌्भवणाऱ्या थायरॉईड विकारांचे प्रमाण जास्त असते. त्याच बरोबर मातेला गरोदरपणापूर्वी जर थायरॉईडचे विकार असतील तर ते या काळात आणखी बळावतात.
 3. हायपरथायरॉईडिझम : या आजारात मातेच्या रक्तातल्या थायरॉईड संप्रेरकांची पातळी वाढलेली आढळते. साधारणपणे दहा हजार गरोदर स्त्रियांत ६ ते ७ जणींना विकार आढळतो. या आजारात स्त्रियांचे - वजन घटते, सतत उलट्या होत राहतात, छातीत खूप धडधडते, पायांवर सूज येते, त्यांना कमालीचा थकवा जाणवत राहतो, त्यांच्या थायरॉईड ग्रंथीचा आकार वाढलेला आढळतो (गॉयटर), गर्भाची समाधानकारक वाढ होत नाही, रक्तदाब वाढतो, मुदतपूर्व प्रसूती होते. 

अनेकदा गरोदरपणात थायरॉइडबाबत निदान आणि औषधोपचार होत नाही. अशावेळेस रुग्ण ‘थायरोटॉक्सिक क्रायसिस’ किंवा ‘थायरॉईड स्टॉर्म’ या गंभीर अवस्थेत जातो. अशावेळेस त्या स्त्रीला आणि तिच्या बाळाला दोघांनाही प्राणगंभीर धोका असतो. हा विकार असलेल्या स्त्रीच्या पोटातील गर्भाच्या हृदयाचे ठोके वाढणे, गर्भाची वाढ खुंटणे, मूल अपुऱ्या दिवसांचे किंवा मृतावस्थेतच जन्माला येणे, बाळामध्ये जन्मजात दोष असणे, नवजात अर्भकाला हायपरथायरॉईडीझम असणे असे परिणाम होऊ शकतात.

उपचार
योग्य उपचारांनी गरोदर स्त्री आणि तिच्या बाळाला असणारे संभाव्य धोके टाळता येतात. त्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण योग्य पातळीवर राहण्यासाठी संप्रेरकांच्या पातळीची नियमित काळाने तपासणी करत, तिचे नियंत्रण करणारी औषधे न चुकता घ्यावी लागतात. काही रुग्णांच्या संप्रेरक पातळीवर गोळ्यांचा परिणाम होत नाही, अशावेळी थायरॉईड ग्रंथीची शस्त्रक्रिया करावी लागते. ज्या महिलांना दिवस राहण्याच्या आधीपासून थायरॉइडचा विकार असतो त्यांना गरोदरपणातही उपचार घ्यावे लागतात. या उपचारांनी बाळावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते. अशा स्त्रियांच्या नवजात अर्भकाच्याही थायरॉईड चाचण्या करने प्राप्त ठरते. प्रसंगी त्यांच्या बाळावरही उपचार करण्याची गरज असते. बाळंतपणानंतर अशा स्त्रियांच्या पुन्हा तपासण्या करून त्यांचे औषधांचे डोस पुन्हा ठरवावे लागतात.

४. हायपोथायरॉईडीझम : तीन टक्के गरोदर स्त्रियांत हा आजार आढळतो. या आजारात थायरॉईड हार्मोन्सचे रक्तातील प्रमाण कमी झालेले आढळते. बहुतांशी स्त्रियांमध्ये इतर काही लक्षणे आढळत नाहीत. मात्र थायरॉइड संप्रेरके खूपच कमी झाली तर त्या स्त्रियांना अनेक गंभीर त्रासांना तोंड द्यावे लागते. यात वजन जास्त वाढणे, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊन चेहरा पांढुरका पडणे, कमालीचा थकवा येणे, हातापायांना पेटके येणे, गर्भपात होणे, हृदयाचे ठोके मंदावणे, रक्तदाब वाढणे, गर्भाची अपुरी वाढ होणे, प्रसूतीच्यावेळी अतिरिक्त रक्तस्त्राव होणे अशा त्रासांना तोंड द्यावे लागते. थायरॉईड संप्रेरके गर्भाच्या मज्जासंस्थेच्या वाढीला आवश्यक असतात. मातेच्या हायपोथायरॉइडीझमवर योग्य उपचार न केल्यास बाळाची शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढ मंदावते.  गरोदरपणापूर्वीपासून हायपोथायरॉईडीझम असणाऱ्या स्त्रियांमध्ये औषधाचा डोस गरोदरपणात वाढवावा लागतो. थायरॉईडच्या रक्त चाचण्या नियमितपणे करून हा डोस कमी किंवा जास्त करावा लागतो. 

५. प्रसूतीपश्चात थायरॉईडायटिस : बाळंतपणानंतर थायरॉईडचा दाह १० टक्के स्त्रियांमध्ये आढळतो. अनेकदा याचे निदान होऊ शकत नाही. कारण प्रसूतीपश्चात मातेला एरवी होणारे त्रास आणि या आजारामुळे होणारे त्रास हे सारखेच असतात. त्यामुळे यात गल्लत होते. प्रसूतीपश्चात थायरॉईडायटीस असणाऱ्या स्त्रियांना शारीरिकदृष्ट्या खूप थकल्यासारखे आणि मानसिकदृष्ट्या मनस्वास्थ्य ठीक नसल्यासारखे सतत वाटते. प्रसूतीपश्चात थायरॉईडायटीस सामान्यत: दोन टप्प्यांत होते, पहिला टप्पा बाळ जन्मल्यानंतर एक ते चार महिन्यांच्या काळात सुरू होतो आणि सामान्यत: एक ते दोन महिने टिकतो. या टप्प्यात मातेला हायपरथायरॉईडीझमची लक्षणे असू शकतात कारण खराब झालेल्या थायरॉईडमुळे थायरॉईड संप्रेरक लीक होऊन रक्तप्रवाहात मिसळतात.

दुसरा टप्पा प्रसूतीनंतर सुमारे चार ते आठ महिन्यांनी सुरू होतो आणि सहा ते बारा महिने टिकतो. या टप्प्यात स्त्रीला हायपोथायरॉईडीझमची लक्षणे दिसू शकतात. कारण थायरॉईड ग्रंथीतील हार्मोन्स खूप कमी होऊन जातात. त्यानंतरच्या काळात किंवा रोगप्रतिकारक प्रणालीचा हल्ला संपतो आणि थायरॉइडचा त्रास बरा होतो.

थायरॉईडचा कर्करोग
थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा तिपटीने असते. थायरॉईड कर्करोगानेग्रस्त असलेल्या जगभरातल्या महिलांची संख्या २०२१मध्ये ७० हजारांपर्यत पोचेल असा अंदाज आहे. थायरॉईड कर्करोगाचा धोका २५ ते ६५ वयोगटातील लोकांना तसेच अन्य कर्करोगाच्या उपचारासाठी बालपणात ज्यांनी डोक्याला किंवा मानेला रेडिएशन थेरपी दिली गेली होती किंवा ज्यांना पूर्वी गॉयटर होऊन गेलेला आहे, अशा व्यक्तींना जास्त असतो. थायरॉईड कर्करोगाचा कौटुंबिक इतिहासही आहे. थायरॉईड कर्करोगाचा मुख्य उपचार म्हणजे संपूर्ण थायरॉईड ग्रंथी काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. जर कर्करोग आकाराने लहान असेल आणि बाजूच्या रसग्रंथीपर्यंत पसरलेला नसेल तर फक्त शस्त्रक्रिया केल्यास थायरॉईड कर्करोग बरा होतो. शस्त्रक्रियेनंतर रेडिओआयोडीन थेरपी वापरली जाते. रेडिओआयोडीन थेरपी शल्यक्रियेने काढता न आलेल्या शरीराच्या इतर भागात पसरलेल्या कोणत्याही थायरॉईड कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. थायरॉईडचे विकार हे दिवसेनदिवस जास्त प्रमाणात आढळून येत आहेत. अनेक युवती तसेच मध्यमवयीन स्त्रियांना होणारे हे त्रास काळजीपूर्वक औषधोपचार घेऊन नियंत्रणात ठेवावे लागतात.

संबंधित बातम्या