गर्भाशयातील गाठी

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

आरोग्य संपदा

फायब्रॉइड म्हणजे शरीरातील तंतुमय पेशींची होणारी अतिरिक्त आणि कर्करोग नसलेली वाढ. पेशीसमूहाच्या अशा वाढीमुळे गाठी निर्माण होतात. तसे पाहता, शरीरातील विविध अवयवांमध्ये अशा गाठी निर्माण होतच असतात, ज्या अवयवाशी फायब्रॉइड संबंधित असतात, तसे त्याचे नामकरण केले जाते. उदाहरणार्थ न्युरोफायब्रोमा- मज्जातंतुमध्ये असणारा फायब्रॉइड, युटेरिन फायब्रॉइड- गर्भाशयातील गाठी, डरमॅटो फायब्रोमा- त्वचेतील फायब्रॉइड किंवा अँजिओफायब्रोमा- रक्तवाहिनीतील फायब्रॉइड.

फायब्रॉइड म्हटल्यावर गर्भाशयातील गाठी  (युटेरिन फायब्रॉइड) असेच समजले जाते. फायब्रॉइडचा जरी ‘गाठी’ असा उल्लेख केला असला, तरी बहुतांश वेळा त्या कर्करोगाशी संबंधित नसतात. वैद्यकीय परिभाषेत गर्भाशयाच्या फायब्रॉइडना ‘युटेराईन लिओमायोमा’ असे संबोधले जाते. फायब्रॉइडची वाढ एकेरी अथवा समूहाने होऊ शकते. त्यांचा आकार सर्वसाधारणपणे २.५ मिमी ते २० मिमी पर्यंत असतो. पण त्याहूनही मोठ्या आकाराचे फायब्रॉइड अनेकदा आढळून येतात. 

गर्भाशयात या प्रकारच्या निरुपद्रवी (बीनाइन) गाठीचा विकार प्रजननक्षम महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु त्या मागच्या नेमक्या कारणांबाबत वैद्यकीय शास्त्र अजूनही अनभिज्ञ आहे. फायब्रॉइड कुणाला होऊ शकते? या प्रश्नांवर अधिक संशोधन सुरू आहे, मात्र उपलब्ध माहितीनुसार, वयाच्या पन्नाशीपर्यंत ७० टक्के स्त्रियांमध्ये फायब्रॉइड आढळून येतात, फायब्रॉइड असणाऱ्या स्त्रियांमध्ये कृष्णवर्णीय स्त्रियांचे प्रमाण इतर वंशीय स्त्रियांच्या तुलनेत जास्त आहे, हा विकार असणाऱ्या कृष्णवर्णीय स्त्रियांचे वय इतर वंशातील स्त्रियांच्या तुलनेत कमी असते, प्रमाणापेक्षा जास्त वजन असणाऱ्या महिलांमध्ये फायब्रॉइड होण्याचा धोका इतर स्त्रियांच्या तुलनेत काहीसा अधिक असतो आणि एकदाही गर्भधारणा न झालेल्या स्त्रियांमध्ये गर्भाशयातील गाठी  होण्याची शक्यता, बाळंतपण होऊन गेलेल्या स्त्रियांपेक्षा अधिक असते.

गर्भाशयातील गाठींचे प्रकार

 • बहुतेकदा फायब्रॉइडची वाढ गर्भाशयाच्या रचनेतील बाह्य आणि अंतर्भागावर होते. काही फायब्रॉइड गर्भाशयाच्या पृष्ठभागावर अथवा गर्भाशयाच्या पोकळीत देठ निर्माण करून त्या आधारे वाढतात. फायब्रॉइडची वाढ गर्भाशयात कोठे झाली आहे, यावरून त्यांचे चार प्रकार पडतात.
 • इंट्राम्युरल फायब्रॉइड : इंट्राम्युरल फायब्रॉइड हा सर्वात जास्त आढळणारा फायब्रॉईड आहे. हा प्रकार गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होतो. इंट्राम्युरल फायब्रॉइड मोठ्या प्रमाणात वाढू शकतात  आणि गर्भाशय ताणले जाऊन आकाराने मोठे होते.
 • सबसीरोझल फायब्रॉइड : गर्भाशयाच्या बाह्य आवरणाला सीरोसा म्हणतात त्याच्या बाहेरील बाजूवर सबसीरोझल फायब्रॉइड तयार होतात. ही फायब्रॉइड एवढी मोठी होतात, की गर्भाशय एका बाजूने फुगीर दिसू लागते. 
 • पेड्युंक्युलेटेड फायब्रॉइड : सबसीरोझल फायब्रॉइडला आधार देणारा एक  सडपातळ देठ तयार होतो. त्यामुळे त्या फायब्रॉइडला आधार मिळतो. त्यामुळे त्याला पेड्युनक्युलेटेड फायब्रॉइड म्हणून ओळखले जाते.
 • सबम्युकोझल फायब्रॉइड : या प्रकारच्या गाठी गर्भाशयाच्या स्नायूमध्ये किंवा मायोमेट्रियममध्ये विकसित होतात. सबम्युकोझल फायब्रॉइड कमी प्रमाणात आढळतात..

गर्भाशयाच्या  फायब्रॉइडची लक्षणे
बहुतेक फायब्रॉइड कोणतीच लक्षणे दाखवीत नाहीत, परंतु काही स्त्रियांमध्ये मासिक पाळी दरम्यान अतिरिक्त रक्तस्राव होणे, तसेच कमालीच्या वेदना होणे, दोन मासिक पाळ्यांच्या मधल्या काळात अधूनमधून रक्तस्राव होत राहणे, ओटीपोट गच्च आणि जड झाल्यासारखे वाटणे, वारंवार  लघवीला  लागणे, लैंगिक संबंधाच्या वेळी वेदना होणे, पाठीत खालील बाजूस वेदना होणे, दिवस राहण्यात अडचण येणे किंवा वंध्यत्व येणे, गर्भाशयाच्या गाठींच्या  दबावामुळे  गर्भपात  होणे, प्रसूतिपूर्व वेदनांना अकाली सुरुवात होणे अशी लक्षणे दिसू शकतात. 

गर्भाशयाच्या  फायब्रॉइडची कारणे

 • फायब्रॉइडची नेमकी कारणे वैद्यकीय शास्त्राला अजून सापडलेली नाहीत. संशोधकांच्या मते फायब्रॉइड तयार होण्यामागे मुख्यत्वेकरून परस्परांवर परिणाम करणाऱ्या अनेक घटकांचे एकत्रित परिणाम असतात.  
 •  संप्रेरकांची म्हणजे इस्ट्रोजेन : प्रोजेस्टेरोन यांची पातळी- हे हार्मोन्स बीजांडकोषातून स्रवतात. स्त्रीच्या प्रत्येक मासिक पाळीत त्यांची पातळी कमी जास्त होत असते. यातूनच गर्भाशयाच्या अस्तरामध्ये मधेच एखाद्या ठिकाणी पेशीसमूहांची वाढ होते आणि फायब्रॉइड निर्माण होतात. 
 •  आनुवंशिकता म्हणजेच एखाद्या स्त्रीच्या कुटुंबात, तिची बहीण, आई, आजी, आत्या यांना फायब्रॉइड असल्यास तिलाही होण्याची दाट शक्यता असते. 
 •  गर्भधारणा : या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या दोन्ही हार्मोन्सची पातळी बरीच वाढते, तसेच गर्भाशयाच्या आकारातही वाढ होत असते. त्यामुळे स्त्रीच्या गरोदरपणात गर्भाशयात फायब्रॉइड निर्माण होऊ शकतात. 
 •  काही स्त्रियांत यापैकी दोनतीन घटकांचा एकत्रित संयोग होऊ शकतो.
 • फायब्रॉइडची तयार होण्याची नेमकी कारणे ठामपणे माहिती नसल्याने त्यांचा आकार वाढण्याची किंवा कमी होण्याची कारणे कळू शकत नाहीत. बव्हंशी फायब्रॉइडचा आकार वाढण्याची अथवा कमी होण्याची शक्यता  रजोनिवृत्तीनंतर  कमी होते. परंतु याबाबतही तसे पक्के सांगता येत नाही. बहुतेक वेळा फायब्रॉइड कर्करोगाशी संबंधित नसतात. फायब्रॉइडमधून कर्करोग उद््भवण्याची शक्यता ०.१ टक्क्यांहूनही कमी असते. 

निदान

 • स्त्रीच्या वैद्यकीय शारीरिक चाचणीत होणाऱ्या अंतर्गत तपासणीत गर्भाशयाच्या  फायब्रॉइडचे निदान होऊ शकते. त्याचे आकारमान आणि जागा याबाबतही अंदाज डॉक्टर करू शकतात. फायब्रॉइडच्या बाबतीत अधिक निदान करण्यासाठी खालील चाचण्या केल्या जातात. 
 •  सोनोग्राफी  : ओटीपोटाची  सोनोग्राफी  करून  गर्भाशयाच्या  गाठीचे आकारमान आणि स्थान निश्चित केले जाते.
 •  एमआरआय : चुंबकीय आणि  रेडिओलहरींमार्फत प्रतिमा घेऊन गर्भाशयाच्या गाठीचे आकारमान तसेच स्थान निश्चित केले जाते.
 •  क्ष-किरण : शरीराच्या अंतर्भागातील रचनेत निर्माण झालेले काही दोष यातून समजू शकतात. 
 •  सीटी स्कॅन : फायब्रॉइडची  परिपूर्ण प्रतिमा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कोनांतून शरीराच्या अंतर्भागाची अनेक चित्रे घेऊन  गर्भाशयाच्या  गाठीचे आकारमान आणि स्थान निश्चित केले जाते.
 •  लॅप्रोस्कोपी : ही भूल देऊन केली जाणारी पोटावरील शस्त्रक्रिया असते. यात तुमच्या पोटावर छोटा छेद घेऊन दुर्बिणीद्वारे आत फायब्रॉईड आहेत का याची निश्चिती केली जाते. त्याचे चित्रणही केले जाते. 
 •  हिस्टेरोस्कोपी : या शस्त्रक्रियेत डॉक्टर आत फायब्रॉइड आहेत का याची पाहणी करण्याकरिता  कॅमेरा जोडलेली एक लांब नळी  योनी मार्गातून थेट गर्भाशयात सोडतात. गर्भाशयात सलाइन अथवा  कार्बन डायॉक्साइड  भरला जातो.  गर्भाशयात  फायब्रॉइडची झालेली वाढ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हिस्ट्रोस्कोपीद्वारे प्रत्यक्ष पाहता येतात. त्याचबरोबर गर्भाशयाच्या अस्तराचा नमुनाही घेतला जातो. 

उपचार पद्धती
फायब्रॉइडवरील योग्य उपचारांचा पर्याय निवडण्यासाठी स्त्रीचे वय, फायब्रॉइडची काही लक्षणे आहेत का? स्त्रीस गर्भधारणा हवी आहे काय? फायब्रॉइडचा आकार किती आहे? गर्भाशयात फायब्रॉइडचे स्थान कोठे आहे? अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. एखाद्या महिलेच्या गर्भाशयात एकाहून अधिक प्रकारचे फायब्रॉइड असू शकतात. फायब्रॉइडचे प्रकार, याबरोबरच त्यांचे आकार आणि त्यांचे स्थान या बाबी उपचारांचा सर्वोत्तम पर्याय ठरविण्यासाठी विचारात घेतल्या जातात. जर एखादीला फायब्रॉइड असतील, परंतु त्यापासून काही त्रास नसेल, तर तिला कुठल्याही उपचारांची गरज नसू शकते. नियमित शारीरिक अंतर्गत तपासणीवेळी त्यांचा आकार वाढला आहे काय याची पाहणी करणे आवश्यक असते.

औषधोपचार
 दाह कमी करणारी औषधे : युटेरिन फायब्रॉइड असूनही लक्षणे सौम्य असतील तर दाह कमी करणारी वेदनाशामक औषधे वापरली जातात. याने सौम्य वेदना कमी होतात. मात्र वेदनांची तीव्रता जास्त असल्यास याहून अधिक परिणामकारक औषधे वापरावी लागतात.

 • हार्मोन्स- काही संप्रेरक औषधे फायब्रॉइडचा आकार कमी करतात. मात्र, ही औषधे फायब्रॉइडच्या वेदनांपासून तात्पुरता आराम देतात पण औषधोपचार थांबवले की फायब्रॉइड पुन्हा वाढू लागते.
 •  शस्त्रक्रिया : फायब्रॉइडमुळे मध्यम अथवा तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील तर शस्त्रक्रिया हा त्यांच्यावरील उपचाराचा सर्वोत्तम मार्ग असू शकतो. 
 •  एक्सअॅब्लेट २००० प्रणाली : हे एक वैद्यकीय उपकरण असते. त्यात ध्वनिलहरींचा (अल्ट्रासाउंड) वापर करून 'चुंबकीय अनुनाद प्रतिमा' (मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज) मिळवून गर्भाशयातील फायब्रॉइडचा वेध घेतला जातो आणि त्यांना नष्ट केले जाते. ज्यांना अपत्यप्राप्ती झाली आहे अथवा भविष्यात गर्भधारणा करावयाची नाही अशाच महिलांमध्ये हे यंत्र वापरले जाते. एक्सअ‍ॅब्लेट २०००. ही एक नॉन-इन्व्हेझिव्ह म्हणजेच शरीराला इजा न करता केली जाणारी प्रक्रिया असते. फायब्रॉइडसाठी केल्या जाणाऱ्या उपचारांना हा एक अद्ययावत पर्याय आहे. 
 •  फायब्रॉइड आणि गर्भधारणा : फायब्रॉइड असलेल्या स्त्रिया निश्चितपणे गर्भवती बनू शकतात. फायब्रॉइड असलेल्या काही स्त्रियांना त्यांच्या संपूर्ण गरोदरपणात काही प्रमाणात वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता 
 • लागू शकते. तरीही बऱ्याचदा कोणत्याही उपचारांशिवाय सुक्षेम बाळंतपण होते. फायब्रॉइड असलेल्या स्त्रियांनी गरोदर राहण्याचा निर्णय घेताना स्त्रीरोग तज्ज्ञाचे मत घेणे आवश्यक असते. फायब्रॉइडचा आकार आणि जागा हे मुख्य घटक ठरतात. वंध्यत्वाची समस्या असणाऱ्या एक ते दोन टक्के स्त्रियांत फायब्रॉईड हे मूलभूत कारण ठरू शकते. काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेसाठी मायोमेक्टॉमी करणे गरजेचे ठरते.
 • स्त्रीजीवनातील या महत्त्वाच्या आणि त्रासदायक आजाराबाबत सर्व स्त्रियांनी वयाच्या तिशीपासून नियमितपणे शारीरिक तपासणी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून करून घ्यावी. आणि मासिक पाळी संबंधात कोणताही त्रास असेल तर वेळीच निदर्शनास आणणे आत्यंतिक गरजेचे असते. कारण हा आणि इतर कोणतेही आजार मोठे स्वरूप धारण करून त्यांच्यात गुंतागुंत होण्यापूर्वीच त्यांचे निदान करून त्यावर उपचार करून घेणे भावी आरोग्याच्या दृष्टीने श्रेयस्कर असते.

संबंधित बातम्या