स्त्रियांमधील व्यसनाधीनता

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

आरोग्य संपदा

अमेरिकेतील वैद्यकीय संशोधनांमध्ये १९९० पर्यंत व्यसनांचा अभ्यास करताना फक्त पुरुषांचाच विचार केला जात असे, पण त्यानंतर अमेरिकन सरकारनेच अशा सर्वेक्षणात आणि अभ्यासपूर्ण संशोधनात स्त्रियांचा समावेश करायला सुरुवात केली. जगभरात भारतासह इतर देशांनीही हा कित्ता गिरवला आणि अनेक सत्ये सामोरी आली.

व्यसनांबाबत चर्चा करताना व्यसन (अॅडिक्शन), अवलंबन (डिपेंडन्स) आणि दुरुपयोग  (अब्युज) या वरवर सारख्याच वाटणाऱ्या तीन संज्ञांमधील मूलभूत फरक समजावून घेणे आवश्यक असते.

 • व्यसन ः हा शब्द मानसिक विकृतींच्या ‘डायग्नॉस्टिक आणि स्टॅटिस्टिकल मॅन्युअल’ या प्रमाण ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीत (डीएसएम-४) दिसत नाही, परंतु व्यसनामध्ये पदार्थाचा गैरवापर आणि अवलंबन या दोन्ही घटकांचा समावेश असतो. व्यसनाधीनतेत एखाद्या विशिष्ट नशील्या पदार्थासाठी तडफड होणे, त्याचा वापराचे नियंत्रण करण्यास असमर्थता असणे आणि नकारात्मक परिणामांनंतरही ती कृती परत परत करत राहणे याचा समावेश असतो. 
 • अवलंबित्व ः ‘डीएसएम-४’च्या मते जे लोक नशील्या पदार्थावर अवलंबून असतात त्यांच्यामध्ये पुढील सात पैकी किमान तीन विशेष लक्षणे किंवा वर्तनदोष हे एक वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीपर्यंत दिसावे लागतात. एक, त्या व्यसनामधील नशील्या पदार्थाचा वापर वाढत जाणे. दोन, व्यसन काही काळ सोडून दिल्यावर उद्‌भवणारी माघार घेण्याची लक्षणे (विथड्रॉवल सिम्प्टम्स). तीन, व्यसन सोडण्याची इच्छा सतत व्यक्त होणे. चार, व्यसन करण्यावर नियंत्रण नसणे. पाच, व्यसनाच्या वस्तूबाबत किंवा पदार्थाबाबत सतत विचारमग्न असणे. सहा, व्यसनासाठी किंवा ते करण्यासाठी जीवनातील इतर महत्त्वाच्या गोष्टी, इतर जबाबदाऱ्या, बांधिलकी, वचनबद्धता यांना मुळीच महत्त्व न देणे आणि सात, व्यसनाच्या परिणामांनी अनेक नकारात्मक घटना घडूनही व्यसन सतत करत राहणे. 
 • गैरवापर ः  ‘डीएसएम-४’ मध्ये ‘गैरवापर’ ही संज्ञा नियमितपणे जास्त प्रमाणात नशीले पदार्थ वापरणाऱ्या लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली गेली. हे लोक कायदेशीर अडचणी उद्‌भवल्या असूनही स्वतःला धोका निर्माण करतात,  कौटुंबिक नात्यात संकटे आणतात किंवा वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अयशस्वी ठरतात. पण त्यांच्यात अवलंबित्वाची चिन्हे दिसून येत नाहीत. व्यसन करण्याबाबत त्यांची तडफड होत नाही किंवा मनात नसूनही व्यसन केले जातेच असेही त्यांच्याबाबत घडत नाही. 

व्यसनाधीन होणाऱ्या स्त्री-पुरुषांतला फरक  
पुरुषांमध्ये व्यसनांचे प्रमाण जास्त असते. जागतिक आकडेवारीनुसार १२ वर्षांवरील ११.५ टक्के पुरुष व्यसनाधीन असतात, तर याच वयोगटातील स्त्रियांमध्ये हे प्रमाण ६.४ टक्के असते. (परंतु स्त्री-पुरुषांच्या आकडेवारीमधील ही तफावत दरवर्षी वेगाने कमी होते आहे.), स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त लवकर व्यसनाच्या आहारी जातात, व्यसनाचे अवलंबित्व यायला स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी काळ लागतो, व्यसन सोडणे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जड जाते, एकदा व्यसन सोडल्यावर पुन्हा त्याच्या आहारी जाण्यात स्त्रियांचे प्रमाण अधिक असते, व्यसनाचे आरोग्यविषयक आणि सामाजिक दुष्परिणाम स्त्रियांमध्ये जास्त लवकर घडून येतात, असे आजही अनेक सर्वेक्षणात दिसून येते. या विवक्षित फरकांमुळे स्त्रिया आणि पुरुषांमध्ये व्यसन निर्मूलनाच्या उपचार आणि समुपदेशन पद्धती थोड्या वेगळ्या असाव्या लागतात.  

मद्यसेवन
जागतिक स्तरावरील आकडेवारीनुसार ७ ते १२ टक्के स्त्रिया, तर २० टक्के पुरुष मद्यसेवनाबाबत व्यसनाधीन असतात. जगभरात आणि भारतातही मद्याच्या व्यसनाधीनतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये कमी आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री-पुरुषांमधील ही तफावत मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसत आहे. स्त्रियांमधील दारूची व्यसनाधीनता ही केवळ शहरी स्त्रियांमध्ये मर्यादित नाही, तर देहविक्रयावर गुजराण करणाऱ्या स्त्रियांमध्ये, निम्न आर्थिक स्तरातील स्त्रियांमध्ये, काही विशिष्ट समाजांमधल्या महिलांमध्येही दारूचे व्यसन आढळून येते. निम्न आर्थिक स्तरातील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रियांना परवडणारे मद्य, भेसळयुक्त आणि दर्जाहीन असते. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होऊन जिवावरही बेतू शकते. दारूच्या व्यसनाचे सामाजिक-आर्थिक परिणाम स्त्रियांना भोगावे लागतात.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार २२ टक्के आत्महत्या आणि २२ टक्के खून दारूच्या नशेत घडतात. भारतात दारूशी संबंधित आजारामुळे दर ९६ मिनिटांना एका व्यक्तीचा मृत्यू होतो. 

स्त्रियांवरील विशेष दुष्परिणाम 
स्त्रियांचे सरासरी वजन पुरुषांपेक्षा कमी असते. त्यांच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत चरबी अधिक आणि पाण्याचे प्रमाण कमी असते. चरबीमध्ये मद्य जास्त काळ राहते आणि पाणी मद्याला सौम्य (डायल्युट) करते. साहजिकच मद्यसेवनाने स्त्रियांच्या महत्त्वाच्या अवयवांची हानी जास्त होते.   

 • दारूमुळे होणारी मेंदूची झीज आणि यकृत पेशींचा नाश स्त्रियांत जास्त वेगाने होतो.
 • मद्यप्राशन केल्यावर जठरात आणि यकृतात मद्याचे विघटन करणारे अल्कोहोल डीहायड्रोजीनेज आणि अल्डीहाईड डीहायड्रोजीनेज हे दोन पाचक रस स्त्रियांच्या शरीरात निसर्गतःच कमी प्रमाणात असतात. याचा परिणाम म्हणून स्त्रियांनी मद्यप्राशन केल्यावर त्याचे विघटन कमी प्रमाणात झाल्याने स्त्रियांच्या रक्तातील मद्यार्काची पातळी जास्त वाढते.  
 • मद्यप्राशनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन क्षयरोगासारखा संसर्गजन्य रोग व्यसनी व्यक्तींमध्ये अधिक आढळतो. 
 •  गरोदरपणात मद्यसेवन करणाऱ्या स्त्रियांच्या बाळामध्ये मेंदूला इजा होऊन बाळाची शारीरिक-बौद्धिक वाढ खुंटते. याला ‘फीटल अल्कोहोल सिंड्रोम’ म्हणतात. पुरुषांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्त्रियांत उद्‌भवायला कमी प्रमाणातील मद्यसेवन पुरेसे ठरते.

धूम्रपान
तंबाखू, विडी, सिगारेट, खैनी, पान मसाला, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ हे तंबाखूच्या पानांमधून पूर्ण किंवा अंशत: अर्क घेऊन बनविले जातात. पूर्वी विडी, त्यानंतर सिगारेट आणि आता इ-सिगारेट आणि हुक्का असे परिवर्तन होताना दिसते आहे. धूम्रपान केले की तंबाखूजन्य पदार्थातील निकोटिन हे रसायन शरीरात जाऊन अॅड्रीनॅलिन नावाचे रासायनिक द्रव्य निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने पडतात आणि रक्तदाब वाढतो. या दोन्हीमुळे तंबाखूसेवन करणाऱ्या व्यक्तीला आधीपेक्षा अधिक दक्ष, जागरूक, तल्लख असल्याची भावना निर्माण होते. धूम्रपानानंतर निकोटिन त्वरेने मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये पोहोचते आणि मेंदूमार्फत डोपामिन नामक दुसरे रसायन निर्माण केले जाते. ते रसायन मेंदूच्या आनंद केंद्रांना उत्तेजित करते. निकोटिनचा परिणाम दीर्घकालीन नसतो. परिणामतः तंबाखूसेवन करणाऱ्याला पुन्हापुन्हा हा आनंद घ्यावासा वाटतो, त्याला तशी तल्लफ येते आणि व्यसन लागते. हेरॉइन या मादक पदार्थापेक्षा व्यसनाधीनता वाढवण्यात निकोटिन जास्त कार्यक्षम असते असे संशोधनातून दिसून आले आहे. 

स्त्रिया आणि धूम्रपान

 •  धूम्रपानामुळे स्त्रियांना फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा जास्त असते.
 •  धूम्रपानामुळे स्त्रियांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पुरुषांपेक्षा दुपटीने जास्त असते.
 •  धूम्रपान सोडणे स्त्रियांसाठी पुरुषांपेक्षा जास्त कठीण असते, एकदा सोडल्यावर पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्याचीही शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असते.
 •  निकोटीन पॅच, च्युइंगम अशा रिप्लेसमेंट थेरपी स्त्रियांमध्ये कमी उपयुक्त ठरतात.
 •  या पद्धतीने धूम्रपानाची सवय सुटण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये २० टक्के तर स्त्रियांत १५ टक्के आहे. 
 •  वजन मर्यादित ठेवण्यासाठी धूम्रपान हे कारण ५० टक्के स्त्रियांमध्ये आढळून येते.
 •  मासिक पाळी येण्यापूर्वीच्या काळात स्त्रियांना धूम्रपान सोडणे कठीण जाते. मात्र पाळी येऊन गेल्यावर त्यांना या प्रयत्नात यश मिळते. पाळी येऊन गेल्यानंतर वाढणाऱ्या इस्ट्रोजेन संप्रेरकांच्या पातळीमुळे स्त्रियांमधील चिंता कमी होते आणि मानसिक स्थिती अनादी बनते, हे यामागले कारण असू शकते. 
 •  तंबाखूच्या वापरामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो असे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.

दुष्परिणाम 
संप्रेरकांच्या बिघाडामुळे येऊ शकणारे  वंध्यत्व, शारीरिक संबंध ठेवताना निर्माण होणारा कोरडेपणा असे काही दुष्परिणाम धूम्रपानामुळे होऊ शकतात.

तंबाखू चघळल्याने वारंवार तोंड येते, दातांवर डाग पडतात, हिरड्या सतत सुजून खराब होऊ लागतात आणि त्यामुळे दातांची मुळे उघडी पडतात. गालामध्ये तंबाखू ठेवून चघळल्याने गालांच्या आतील बाजूस आणि जिभेवर पांढरे चट्टे, ल्युकोप्लेकिया पॅचेस, निर्माण होतात. तंबाखू खाणे वेळेवर बंद करून त्यावर उपचार न केल्यास तोंडाचा कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. सतत तंबाखू खाल्याने अन्ननलिकेचा दाह, जठरातील आम्ल जास्त वाढून हायपर अॅसिडिटी, पेप्टिक अल्सर आणि जठराचा कर्करोग होऊ शकतो. तंबाखू मधील निकोटीन रक्तामध्ये विरघळते. त्याचा हृदय आणि रक्ताभिसरण संस्थेवर दुष्परिणाम होऊन उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा अचानक झटका येणे असे धोके संभवतात.

गुटख्यामधील काही विषारी पदार्थांनी जबड्याच्या आतील अस्तर आकसते. त्यामुळे तोंड उघडणेही मुश्कील होते. याला सब म्युकस फायब्रोसिस म्हणतात. यातूनही नंतर कर्करोग संभवतो. वारंवार आजारी पडणे, दैनंदिन कार्यक्षमता कमी होणे, रक्तदाब, हृदयरोग, टाइप-२ मधुमेह, कॅन्सर, हाडांचा ठिसूळपणा इत्यादी आजार आणि विकारांबरोबरच व्यसनाधीन स्त्रियांना गर्भपात, गर्भात व्यंग असणे, गर्भाची वाढ खुंटणे, कमी वजनाचे बाळ जन्मणे, मुदतपूर्व प्रसूती, वार सरकून होणारा रक्तस्राव, अशा दुष्परिणामांनाही सामोरे जावे लागते. व्यसनांच्या आहारी जाणे, चुकीच्या सवयी यांमुळे आपले व्यक्तिमत्त्व कमकुवत होते. आजच्या प्रगतशील समाजात विविध संधी उपलब्ध आहेत. शारीरिक स्वास्थ्य, सक्षम व्यक्तिमत्त्व व स्थिर मानसिकतेची यासाठी नितांत गरज आहे, हे लक्षात ठेवायला हवे. उत्तेजक द्रव्ये, अफूयुक्त पदार्थ आणि गांजा अवैधरीतीने मिळणारी नशीली औषधे किंवा काहीवेळा डॉक्टर लिहून देतात त्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधांचा दुरुपयोग या व्यसनाच्या पद्धतींबाबत स्त्रियांचे प्रमाण जगभरात वाढते आहे. कोकेन आणि मेथ-मॅफेटामाइनसारख्या उत्तेजक द्रव्यांचा आणि नशील्या पदार्थांचा वापर आणि दुरुपयोग याबाबत पुरुष आणि स्त्रियांची संख्या सारख्याच प्रमाणात वाढत आहे. मात्र काही जागतिक सर्वेक्षणांच्या अहवालांनुसार महिला पुरुषांपेक्षा लहान वयात कोकेन वापरतात, त्यांना उत्तेजकांचे अवलंबित्व जास्त लवकर येते आणि सवय सोडल्यानंतर पुन्हा त्याच्या आहारी जाण्याची जास्त शक्यता असते.

निकोटीनप्रमाणेच, मासिक पाळी येण्याआधी हार्मोनल चढउतारांमुळे कोकेन घेण्याची तीव्र इच्छा स्त्रियांत वाढू शकते. स्त्रियांमध्ये उत्तेजक द्रव्यांची तल्लफ जास्त तीव्रतेने होते.

मारिजुआनाचा (गांजा) वापर करण्यात पुरुषांचे प्रमाण स्त्रियांच्या तिप्पट आहे पण त्यावर येणारे अवलंबित्व आणि दुष्परिणाम स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. 

व्यसनाधीनता हा एक आजार असतो. आपल्या देशात आजमितीला व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय उपचार, औषधे, समुपदेशन आणि पुनर्वसन सर्वत्र उपलब्ध आहे. परंतु त्याबद्दल हवी तशी जनजागृती झालेली नाही. व्यसनाधीन व्यक्तीला उपचाराद्वारे बरे करण्याबाबत नेहमीच दुर्लक्ष केले जाते. 

व्यसनाधीनतेबाबत  कुटुंब, समाज, मित्रगणांचा आधार आणि मदत महत्त्वाची असते. भावी पिढीवर सुसंस्कार करण्यासाठी व्यसनविरहित समाजाची जडणघडण करणे आवश्यक आहे. व्यसन मुक्तीसाठी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, ग्रुप थेरपी, समुपदेशन गरजेनुसार काही औषधे, प्रशिक्षित मानसरोग तज्ज्ञांचा सल्ला तसेच उपचार आवश्यक असतात. 

संबंधित बातम्या