सायटिका- एक मरणप्राय दुखणे

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 1 मार्च 2021

आरोग्य संपदा

बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हा स्थायीभाव असणाऱ्या आजच्या यांत्रिक जीवनात शरीराला एखाद्या दुर्लक्षित यंत्राप्रमाणे वागवले जाते. कोणत्याही यंत्राला नियमित देखभाल आणि ‘तेलपाणी’ लागते, अन्यथा त्याचे भाग कुरकूरू लागतात आणि यंत्राचे काम बंद पडते. शारीरिक आरोग्याची हेळसांड केल्यावर त्याला योग्य आहार आणि व्यायामाची, हालचालींची जोड न दिल्यावर शरीररूपी यंत्राच्या एकेका भागावर परिणाम होऊन ते आपली लक्षणे दाखवू लागतात. मग कधी कुणाची कंबर दुखते, कधी मान अवघडते, डोळे-कान, हातापायांची बोटे त्रास देऊ लागतात. याप्रकारे उद््भवणाऱ्या असंख्य आजारात सायटिका या आजाराचा समावेश होतो.

सा यटिक मज्जातंतूंचे दुखणे म्हणजे सायटिका. सायटिक मज्जातंतू (सायटिक नर्व्ह) हा मानवाच्या आणि त्याचप्रमाणे सर्व चतुष्पाद प्राण्यांच्या शरीरातील लांबीला सर्वात जास्त असलेला मज्जातंतू असतो. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागातील मणक्यांपासून दोन सेंमी रुंदीची ही दाट आणि जाडजूड नस सुरू होते. सायटिक मज्जातंतूचे दोन विभाग असतात.

टिबिअल नर्व्ह
 सायटिक मज्जातंतूचा मानवी शरीरातील पोटाकडील भागात टिबिअल नर्व्ह असते. ती कंबरेच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यापासून (L4, L5) तसेच त्याखालील सेक्रम या पाठीच्या कण्याचा शेवटच्या भाग असलेल्या त्रिकोणी भागातील पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यापासून (S1, S2) निघणाऱ्या मज्जातंतूंच्या पोटाकडील तंतूंपासून बनते.
कॉमन पेरोनिअल नर्व्ह सायटिक मज्जातंतूचा पाठीकडील भागामध्ये कॉमन पेरोनिअल नर्व्ह असते. ती कंबरेच्या चौथ्या आणि पाचव्या मणक्यापासून (L4, L5) तसेच त्याखालील सेक्रम या पाठीच्या कण्याचा शेवटच्या भाग असलेल्या त्रिकोणी भागातील पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यापासून (S1, S2) निघणाऱ्या मज्जातंतूंच्या पाठीकडील तंतूंपासून बनते. सायटिक मज्जातंतू कंबरेच्या ओटीपोटाच्या हाडापासून सुरू होतो, तिथून नितंबाच्या स्नायूंमधून आणि दोन्ही भागांसह एकत्रितपणे मांडीमध्ये मागील बाजूने येतो. नंतर गुडघ्याच्या मागील बाजूस असलेल्या, पायाच्या दोन्ही हाडांच्या मधोमध असलेल्या खोलगट भागापर्यंत येतो. त्या ठिकाणी त्याचे दोन विभाग वेगळे होतात. 

टिबिअल नर्व्ह गुडघ्यांपासून पायाच्या पुढच्या आणि बाहेरील बाजूने पायाच्या तळव्यापर्यंत जाते आणि या भागातील स्नायूंच्या हालचाली आणि संवेदनांसाठी कारणीभूत असते, तर कॉमन पेरोनिअल नर्व्ह ही पायाच्या पुढील आणि आतील बाजूने पावलाच्या वरील भागापर्यंत जाते आणि त्या भागातल्या स्नायूंच्या हालचाली आणि संवेदनांसाठी कारणीभूत असते. यामुळेच सायटिकाच्या दुखण्यात कंबरेपासून तळव्यापर्यंत वेदना होऊ शकतात.

लक्षणे
सायटिकाच्या सर्वसामान्य लक्षणांमध्ये कंबरेच्या खालच्या भागात वेदना होणे, कंबरेपासून नितंबामधून मांडीच्या मागील बाजूने पायापर्यंत वेदना पसरत जाणे, खाली बसल्यावर या वेदना वाढणे, कंबरेचा खुबा ठणकणे, कंबरेपासून पायापर्यंत आग आग होणे किंवा मुंग्या येणे, पाय किंवा पाऊल हलवले तरी वेदना होणे, किंवा पाय बधीर अथवा शक्तिहीन झाल्यासारखे वाटणे, संपूर्ण पायाला एका बाजूने किंवा मागील बाजूने सतत वेदना होत राहणे, पायांमध्ये मागील बाजूने चमका येत राहतात की त्यामुळे उभे राहणे कठीण होऊन बसते.

सायटिकाच्या वेदना सामान्यपणे कंबरेखालील शरीराच्या फक्त एका बाजूला होतात. बहुतेकदा या वेदना कंबरेपासून, मांडीच्या मागील बाजूने घोट्यापर्यंत पसरतात. सायटिक मज्जातंतू जर जास्त दबला गेला असेल तर तळपाय किंवा पायाच्या बोटांपर्यंत वेदना होतात. काही रुग्णांत सायटिकाच्या कंबरेतून पायाकडे पसरणाऱ्या वेदना इतक्या तीव्र असतात की त्यांचे हलणे-चालणे बंद होऊन ते पूर्ण हतबल होतात. तर काही रुग्णांमध्ये त्या सहन करत दैनंदिन काम करता येण्याएवढ्या मर्यादित असतात. पण या रुग्णांनाही मधेच खूप असह्य वेदना होऊ शकतात.  

या आजारात पुढीलपैकी काही गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे जरुरीचे ठरते. उदा. कडक ताप येणे, पाठ, कंबर कमालीची दुखणे, पायांकडे वेदना आणि चमका सरकणे, मांड्या, पाय, पावले, कंबर, नितंब या भागात बधीरपणा किंवा लुळेपणा जाणवणे, लघवीला जळजळ होणे, लघवीतून रक्त जाणे, शौचावर किंवा लघवीवर नियंत्रण न राहणे आणि वेदना खूप असह्य होणे.

सायटिका होण्याची कारणे
कंबरेच्या चौथ्या, पाचव्या आणि सेक्रल हाडाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मणक्यातून येणारे सर्व मज्जातंतू मणक्यांमधून जिथून बाहेर पडतात, त्याला त्या मज्जातंतूंची मुळे (Roots) म्हटले जाते. कोणत्याही कारणांनी जेव्हा या मुळांचा दाह होतो तेव्हा सायटिकाच्या वेदना सुरू होतात. पाठीचा कणा मानेपासून कंबरेपर्यंत एकाला एक जोडल्या गेलेल्या मणक्यांनी बनलेला असतो. या मणक्यांच्या आत नलिकेसारखा एक पूर्ण सलग असा पोकळ भाग तयार झालेला असतो. या नलिकेतून मेंदूपासून निघालेला मज्जारज्जू असतो. ही नलिका काही कारणांनी, कंबरेच्या भागात अरुंद होते. त्यामुळे तिथून बाहेर पडणाऱ्या मज्जातंतूंच्या मुळांचा दाह होतो आणि सायटिकाचा त्रास सुरू होतो. पाठीच्या कण्याच्या प्रत्येक दोन मणक्यांच्यामध्ये कुर्चेने बनलेली एक चकती असते. त्यामुळे मणक्यांची क्रिया एखाद्या स्प्रिंगसारखी होते आणि आपल्याला मागे-पुढे, बाजूला झुकता येते. वयोमानाने, चकत्यांची झीज झाल्यामुळे, किंवा कंबरेच्या मणक्यांचा नैसर्गिक बाक वेडावाकडा झाल्याने मज्जारज्जू दबला जातो. साहजिकच सायटिकाच्या कळा येऊ लागतात.

स्त्रियांमध्ये गरोदरपणात पोटातल्या बाळाचा आकार वाढत गेल्यावर कण्यावर दबाव येऊ लागतो, शक्तीपेक्षा जास्त वजन उचलल्याने किंवा सतत बसून अथवा खाली वाकून काम करण्याने कंबरेचे स्नायू तीव्रतेने आकसतात. या कारणांनी सायटिकाचा विकार बळावतो.

कुणाला होऊ शकतो
वयस्कर लोक, मधुमेही किंवा मणक्यांमधील चकत्याना फुगवटा (डिस्क हर्नीएशन) आला असेल, शारीरिक व्यायामाचा पूर्णतः अभाव असेल, अतिरिक्त वजनवाढ होऊन स्थूलत्व आले असेल अशा व्यक्ती, हाय हिल्स वापरणाऱ्या स्त्रिया, खूप मऊ किंवा अतिकडक गादीवर झोपणाऱ्या व्यक्ती, धूम्रपान करणारे लोक, दीर्घकाळ सतत ड्रायव्हिंग कराव्या लागणाऱ्या व्यक्ती, कामानिमित्त सतत खूप वजनदार गोष्टीची उचलाउचल करावे लागणारे कामगार अशांना सायटिका होण्याची दाट शक्यता असते.  

निदान
रुग्णाच्या आजाराविषयीच्या तक्रारीचे स्वरूप आणि त्याची शरीररचना यावरून सायटिका असल्याची शंका डॉक्टरांना येते. रुग्णाच्या शारीरिक तपासणीत पायांची हालचाल, पाठीवर झोपलेल्या अवस्थेत पाय सरळ वर उचलताना कंबरेत होणाऱ्या वेदना, टाचेवर आणि चवड्यांवर चालताना होणारा त्रास यावरून सायटिका असल्याचा संशय पक्का होतो. त्यानंतर कंबरेचे एक्सरे, सिटी स्कॅन, एमआरआय, कंबरेखालील मज्जातंतूंमधून जाणाऱ्या वीजप्रवाहाची तपासणी (इलेक्ट्रोमायोग्राफी- इएमजी) याने हे निदान पक्के होते.

उपचार
या आजाराचे निदान लवकर झाल्यावर रुग्णाने स्वतःची काळजी घेतल्यास रुग्णालयात भरती न होता बरे होता येते. यासोबत गरम पाण्याच्या पिशवीचा किंवा आईसपॅकचा शेक, डॉक्टरांच्या सल्ल्याने काही स्ट्रेचिंगचे व्यायाम, दुखऱ्या भागावर लावण्याचे मलम यांनी बरे वाटू शकते. औषधांच्या उपचारात दाह कमी करणारी, स्नायू सैल करणारी, पूर्णपणे वेदनाशामक म्हणून वापरली जाणारी नार्कोटिक्स यांचा वापर केला जातो. तसेच अपस्मारावरील काही औषधे, ट्रायसायक्लिक अॅण्टी डिप्रेसन्ट्सदेखील वापरली जातात.

  • फिजिओथेरपी : पाठीच्या, कंबरेच्या, मांडीच्या आणि पायांच्या स्नायूंना सशक्त करणारे, शरीर जास्तीत जास्त शिथिल करणारे, शरीराच्या हालचाली लवचिकतेने होण्यासाठी आणि शरीराचा पवित्रा सुधारणारे व्यायाम यामध्ये दिले जातात. प्लँकवरील व्यायाम, गुडघ्यापासून छातीपर्यंत स्ट्रेचिंग, सायटिक नर्व्ह मोबिलायझेशन असे विशेष व्यायाम, वेळप्रसंगी ट्रॅक्शन, इंटरफेरेन्शियल ट्रीटमेंट (आयएफटी) यांचाही वापर केला जातो. काही दिवस फिजिओथेरपिस्टच्या देखरेखीखाली हे व्यायाम करून पुढे आपले आपण ते दीर्घकाळ करत राहावेत.
  • स्टेरॉइड्स इंजेक्शन्स : मज्जातंतूंच्या मुळांशी जर खूप दाह असेल तर पूर्ण काळजी घेऊन जंतुविरहित शस्त्रक्रियागृहात मज्जातंतूंच्या मुळाशी कॉर्टिसोन इंजेक्शन दिले जाते. यामुळे सायटिकाच्या वेदना काही महिने थांबू शकतात. मात्र काही काळाने इंजेक्शनचा परिणाम कमी होऊन पुन्हा वेदना सुरू होतात.
  • शस्त्रक्रिया : रुग्णाला जर सातत्याने सहन करण्यापलीकडे वेदना होत असतील, औषधे, व्यायाम, इंजेक्शन्सचा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया हाच शेवटचा पर्याय असतो. विशेषतः पायांची शक्ती कमी होऊन उठबस करणेही मुश्कील होत असेल आणि शौच-मूत्रविसर्जनावरील ताबा गेला असेल तर शस्त्रक्रिया हाच उपाय करावा. यात मज्जातंतूंवर दबाव आणणारा मणक्याचा छोटा भाग किंवा फुगलेली हर्नीएटेड चकती काढून टाकावी लागते. मणक्यांच्या शस्त्रक्रिया करणारे विशेषज्ञ सर्जन किंवा न्यूरोसर्जन या शस्त्रक्रिया उत्तम प्रकारे करतात.

संबंधित बातम्या