साडेतीन बोटांचे दुर्लक्षित दुखणे

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 मार्च 2021

आरोग्य संपदा

संगणक आणि भ्रमणध्वनी हे आजच्या आधुनिक जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. संगणकाच्या आणि मोबाईल फोनच्या कीबोर्डवर, बटणांवर, टच पॅडवर अव्याहतपणे बोटे बडवणे ही सध्याच्या जीवनशैलीतील सर्वांच्या अंगवळणी पडलेली सवय आहे. कुणी दैनंदिन कामासाठी, तर कुणी छंद म्हणून, तर कुणी वेळ घालवायचे उत्तम साधन म्हणून हे महत्कार्य करत असतात. यातूनच हाताची बोटे खूप दुखणे, ती वाकडी होणे, बोटांना मुंग्या येणे हे त्रास आढळून येऊ लागले आहेत. आपल्या देशातल्या सर्वसामान्य सवयीप्रमाणे हे दुखणे सहसा दुर्लक्षितच केले जाते. पण जेंव्हा बोटे पूर्ण बधीर होऊन टायपिंग करणे बिलकूल जमत नाही तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो, आणि वेदना जर थांबल्या तर पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. उपचारही थांबवले जातात आणि हा त्रास काय असतो? का झाला? कसा रोखता येईल याकडे डोळेझाक केली जाते.

कार्पल टनेल सिंड्रोम हा मनगट आणि त्यापुढील तळहाताचा एक वेदनादायी आजार असतो. आपल्या मनगटात ट्रॅपेझियम, ट्रॅपेझॉइड, स्कॅफॉइड, कॅपिटेट, हॅमेट, पिसिफॉर्म, ट्रिक्वेट्रम, ल्युनेट अशी छोटी-छोटी हाडे असतात, त्यांना ‘कार्पल बोन्स’ म्हणतात. या हाडांवरून काही अस्थिबंध (लिगामेंट्स) आडवे जातात. त्यांना ‘ट्रान्सव्हर्स कार्पल लिगामेंट्स’ म्हणतात. कार्पल बोगद्यामधून जाणाऱ्या विविध संरचना, वरून खाली अशाप्रकारे पाहिल्यास...
    फ्लेक्सर डिजिटोरम सुपरफिशिअॅलिसचे  एकूण चार अस्थिबंध
    मेडियन नर्व्ह हा तळहाताचा प्रमुख मज्जातंतू बाहेरील बाजूने येतो
    फ्लेक्सर पॉलिसिस लॉंगस हा एक अस्थिबंधसुद्धा बाहेरील येतो
    फ्लेक्सर डिजिटोरम प्रोफंडस हे चार अस्थिबंध आढळतात.

हे नऊ अस्थिबंध कार्पल बोन्सवरून गेल्यामुळे हाताच्या अंगठ्याएवढ्या रुंदीचा, एक बोगद्यासारखा पोकळ भाग निर्माण होतो. हा बोगदा आपल्या मनगटाच्या वरील हाताकडून तळहाताकडे जातो, त्यालाच ‘कार्पल टनेल’ म्हणून ओळखले जाते. कार्पल टनेल हा मनगटापासून तळहाताकडे जाणारे अस्थिबंध, मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांचे एक प्रवेशद्वारच असते. कार्पल टनेलमधून जाणाऱ्या या संरचनेद्वारा आपल्या हातांची बोटे पेरांमध्ये वाकवता आणि सरळ करता येतात. बोटांकडून जाणारे स्पर्शज्ञानाचे मज्जातंतूही यात समाविष्ट असतात. या बोगद्याच्या पोकळीतून (मेडियन नर्व्ह) आणि रक्तवाहिनी तळहाताकडे एकत्रितपणे जातात. हे मज्जातंतू आणि रक्तवाहिन्या तळहातातून अंगठ्याच्या खालील फुगीर भागात आणि अंगठ्याच्या बाजूस असलेल्या तर्जनी, मध्यमा या दोन बोटांत आणि अनामिकेच्या अर्ध्या भागात पसरलेल्या असतात. त्यामुळे या साडेतीन बोटांच्या संवेदना आणि रक्तपुरवठा कार्पल टनेलमधून होतो.

कार्पल टनेल हॅमेट हाडाच्या टोकापाशी एखाद्या हुकसारख्या असलेल्या भागापाशी अगदी अरुंद होतो. या भागात मेडियन नर्व्ह मनगटांच्या हाडांच्या अगदी लगत असते. काही विशिष्ट कारणांनी हे अस्थिबंध आणि पर्यायाने कार्पल टनेल दबले गेले तर साहजिकच त्याचा दबाव या मज्जातंतूवर आणि रक्तवाहिन्यांवर पडतो आणि मनगटे, तळहाताचा अर्धा भाग आणि ही साडेतीन बोटे यात अनेक त्रासदायक लक्षणे दिसू लागतात.

लक्षणे
मनगटाकडून बोटांकडे तीव्र वेदना जाणे, बोटांची आग होणे, सुरुवातीला बोटांमध्ये थोडासा बधिरपणा येणे, झोपलेले असताना अचानक बोटात कळा आणि मुंग्या येणे, बोटे पूर्ण बधिर होणे, सुया खुपल्यासारखे दुखणे, टोचल्यासारखे वाटणे, मुंग्या आणि बधिरपणा जाण्यासाठी वारंवार हात झटकणे, हात चोळणे, तळहात नसल्याची भावना होणे, बोटांवर सूज आलेली नसतानाही बोटे सुजली आहेत असे वाटणे, हातावरची, बोटांवरची त्वचा कोरडी पडणे.
कार्पल टनेल सिंड्रोमची कारणे

 • संगणकाचा सातत्याने व्यावसायिक वापर ः संगणकीय वापर जास्त प्रमाणात कराव्या लागणाऱ्या क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांमध्ये उदा. आयटी क्षेत्र, शासकीय सेवेमधील लेखनिक, बँक कर्मचारी, बीपीओमधील कर्मचारी वगैरे. 
 • मोबाईलचा अतिवापर ः एसएमएस, टेक्स्ट, गेम, समाजमाध्यमे यासाठी सतत मोबाइल वापरणारे तरुणतरुणी संधिवातामुळे मनगटावर येणारी सूज.
 • मनगटामध्ये होणाऱ्या गँगलिऑन गाठी ः सांध्यांच्या किंवा अस्थिबंधाच्या आवरणापासून ही गाठ होते. त्यात घट्ट असा द्राव असतो. या गँगलिऑनमुळे दबाव येतो. 
 • रक्तातील युरिक अॅसिड वाढल्यामुळे होणारा गाऊट आणि हायपर युरेसिमिया- वाढलेल्या युरिक अॅसिडचे अतिरिक्त कण सांध्यात जमा होतात. त्याचे स्फटिक बनतात आणि मेडियन नर्व्हवर दबाव येतो. 
 • रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण खूप वाढणे.
 • संप्रेरकांच्या असमतोलामुळे (हार्मोनल इम्बॅलन्स) अंगावर येणारी सूज

दुखापती
मनगटातील हाडे फ्रॅक्चर होऊन नंतर वेडीवाकडी जुळणे (मालयुनियन) दुखापतीमुळे कार्पल टनेलमधून जाणाऱ्या मेडियन नर्व्हच्या आवरणात रक्तस्राव होणे.

 •     लठ्ठपणा
 •     मधुमेह
 •     गरोदर अवस्था
 • एकाच कुशीवर डोक्याखाली हात किंवा मनगट घेऊन झोपणे. कार्पल बोगदा सिंड्रोमवर उपचार वेळेवर केले नाहीत तर तीव्र वेदना सतत होत राहतात आणि मज्जातंतूचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.  कार्पल बोगद्याशी संबंधित त्रासदायक लक्षणे दूर करण्यासाठी काही व्यायाम करावे लागतात.

उपचार

काही काळ मनगटाला विश्रांती मिळावी म्हणून मनगटाची हालचाल रोखणारे स्प्लिंट मनगटाला २-३ आठवडे लावले जातात.

 •  सूज कमी करणारी काही वेदनाशामक औषधे, मज्जातंतूंची सूज कमी करणारी औषधे दिली जातात.
 • युरिक अ‍ॅसिड वाढलेले असल्यास त्यासाठी काही औषधोपचार केला जातो.
 • प्रतिबंधक उपाय म्हणून संगणकावरील किंवा मोबाइलवरील टायपिंग किमान एक महिना बंद ठेवावे लागते.

व्यायाम
कार्पल बोगदा सिंड्रोमची लक्षणे सौम्य किंवा मध्यम प्रकारचे असल्यास काही 
सोपे व्यायाम केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो. 

नर्व्ह ग्लायडिंग
 या व्यायामासाठी, आपले मनगट सरळ आणि स्थिर ठेवावे. हाताची मूठ वळवावी. नंतर अंगठा आणि हाताची बोटे सरळ करावीत. त्यानंतर हात मनगटामध्ये मागील बाजूस वाकवून आशीर्वादाच्या पोझमध्ये धरावा. त्यानंतर अंगठा हळूवारपणे दुसऱ्या हाताने डाव्या आणि उजव्या बाजूस ढकलावा. मात्र जर यात मज्जातंतू आधीच खूप दबले गेले असतील तर त्रास वाढू शकतो. त्यामुळे हा व्यायाम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

टेंडन ग्लायडिंग
या व्यायामात हात आणि मनगटाच्या विविध हालचाली क्रमाक्रमाने करून अस्थिबंध मोकळे करून त्यांचे कार्य सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्या प्रत्येक बोटाला दोन अस्थिबंध असतात. त्यांच्याद्वारे बोटांची हालचाल मागे आणि पुढे नियंत्रित केली जाते. या व्यायामात या प्रत्येक बोटाच्या दोन्ही अस्थिबंधांना मोकळे केले जाते. प्रथम बोटे विस्तारून हात सरळ ठेवावा. नंतर  आपल्या हाताच्या बोटांना दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने वाकवून बोट दाखवावे. नंतर बोटे पहिल्या पेरात वाकवून आणि हाताची मूठ वळवावी.  नंतर बंद केलेली बोटे पसरावीत आणि परत मूठ वळवावी. 

आवश्यक कामासाठी व्यायाम
नोकरीतील किंवा व्यवसायातील गरज म्हणून ज्यांना टायपिंग करावे लागते अशांना त्यांच्या आवश्यक हालचाली करण्यासाठी, त्या त्या हालचाली करण्याचे विशेष व्यायाम द्यावे लागतात. हे व्यायाम करताना जर त्रास कमी होण्याऐवजी वाढल्यास ते त्वरित थांबवावेत.

शस्त्रक्रिया
कार्पल टनेल सिंड्रोममध्ये औषधे, विश्रांती आणि व्यायाम यांनी वेदना न थांबल्यास, लक्षणे कमी न झाल्यास अथवा हाताची शक्ती कमी होत असल्यास, हाताला आणि बोटांना खूप वेदना होत असल्यास किंवा मुंग्या येत असल्यास, दुखापतीमध्ये मनगटाचे हाड सरकले असल्यास, मज्जातंतूंच्या आवरणात रक्तस्राव झाला असल्यास, मनगटात गाऊटचे स्फटिक किंवा कॅल्शिअमचे खडे झाले असल्यास, गँगलिऑनच्या गाठी मनगटावर दबाव आणत असल्यास शस्त्रक्रिया करून कार्पल टनेलमधील मेडियन नर्व्ह मोकळी करावी लागते.

इतर उपाय  
यामध्ये कॉर्टिकोस्टीरॉईड्सच्या मलमांचा वापर केला जातो.

प्रतिबंध 
हा विकार बैठ्या जीवनशैलीमुळे आणि तासनतास एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे होतो. त्यामुळे कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनी दर ५५ मिनिटांनी पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. बसताना हात, खांदे, मणक्यांवर ताण येणार नाही अशा पद्धतीने बसावे. संतुलित आहार घ्यावा. नियमित व्यायाम करावेत. सूर्यप्रकाशात खेळ किंवा व्यायाम केल्यास उत्तम. नियमित वेळेस, नियमित काळ झोप घ्यावी. झोपताना शरीराचा पवित्रादेखील महत्त्वाचा ठरतो. डोक्याखाली हात घेऊन झोपू नये. आजच्या बैठ्या जीवनशैलीतून आलेल्या या आजाराला ताब्यात ठेवताना आणि त्याचा प्रतिबंध करताना आहार, व्यायाम आणि विश्रांती यावर भर देणारे जीवनशैलीतील बदल आवश्यक ठरतात.

संबंधित बातम्या