डीप व्हेन थ्रॉम्बोसिस

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 5 एप्रिल 2021

आरोग्य संपदा

शरीरातल्या अवयावांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे नेणाऱ्या नीलांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’. आजच्या बैठ्या जीवनशैलीत अनेकांना होणारा हा त्रास वैद्यकीयदृष्ट्या गंभीर मानला जातो. मात्र जीवनशैलीत सकारात्मक बदल करून प्रतिबंधक उपायांनी हा आजार टाळता येतो.

मा नवी शरीरातल्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा करण्याचे कार्य हृदयामार्फत होत असते. हृदयाच्या आत मधोमध एक उभा पडदा असतो. त्यामुळे त्याची डाव्या आणि उजव्या भागात विभागणी होते. हे दोन्ही भाग पुन्हा एका आडव्या पडद्याने वरचा कप्पा आणि खालचा कप्पा असेही विभागले गेलेले असतात. डाव्या भागात फुफ्फुसातून आलेल्या प्राणवायूने संपन्न असलेले शुध्द रक्त असते, तर उजव्या भागात शरीरातल्या निरनिराळ्या अवयवांनी आणि शरीरसंस्थांनी प्राणवायू वापरून त्याचे प्रमाण कमी असलेले आणि कार्बन-डाय-ऑक्साईडचे जास्त प्रमाण असलेले अशुद्ध रक्त असते. 

हृदयाकडून शरीराला आणि शरीराकडून हृदयाकडे रक्ताची आवक-जावक रक्तवाहिन्यांमार्फत होत असते. हृदयाच्या डाव्या भागातील शुध्द रक्त अवयवांना पोचवण्याचे कार्य करणाऱ्या रक्तवाहिन्यांना ‘रोहिणी’ (आर्टरी) म्हणतात, तर अवयावांकडून अशुद्ध रक्त हृदयाकडे आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ‘नीला’ (व्हेन) म्हणतात. या दोन्ही प्रकारच्या रक्तवाहिन्या शरीराच्या वरवरच्या भागात किंवा त्वचेलगत असतात, तसेच आत खोलवरही असतात. खोलवर असलेल्या रक्तवाहिन्या महत्त्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा करतात आणि त्या आकाराने मोठ्या आणि जास्त महत्त्वाच्या असतात. 

शरीरात खोलवर असलेल्या एका किंवा अधिक नीलांमध्ये होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्यांना ‘डीप व्हेन थ्रोम्बोसिस’ (डीव्हीटी) म्हणतात. बहुधा अशा प्रकारच्या गुठळ्या पायांच्या व्हेन्समध्ये होतात. हातांच्या नीलांमध्येसुद्धा त्या पाहायला मिळतात. वैद्यकीयदृष्ट्या गंभीर मानला जाणारा हा आजार ज्येष्ठ नागरिकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. पुरुष आणि स्त्रियांत त्याचे प्रमाण समसमान असते. अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दर १ लाख व्यक्तींमध्ये १६० जणांना होतो. 

लक्षणे

 • एका पायाला सूज असणे : रक्तवाहिनीत झालेल्या गुठळीमुळे रक्तवाहिनीतील रक्तप्रवाह थांबतो, आतील रक्तातला द्रवपदार्थ बाहेर येऊन पायावर सूज येते. शक्यतो ही सूज एकाच पायावर असते, पण काही रुग्णांत दोन्ही पायांवर सूज आलेली आढळते.
 • वेदना : पायांमध्ये विशेषतः पोटरीत कमालीच्या वेदना होऊ लागतात. पायाला  पेटके येतात आणि संपूर्ण पाय ठसठसत राहतो.
 • सूज आलेल्या भागातली त्वचा लालसर होऊ लागते.
 • सुजलेल्या पायाचे तापमान वाढून तो गरम लागू लागतो.

ही लक्षणे दिसताच डॉक्टरांना त्वरित दाखवून उपचार सुरु करणे आवश्यक असते.
कुणाला व का होऊ शकतो?
काही जोखमीचे घटक असल्यास डीव्हीटीचा त्रास उद््भवण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ..

 • वय : डीव्हीटी कोणत्याही वयात उद््भवू शकतो, मात्र ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्त्री-पुरुषांत तो अधिक आढळतो.
 • दीर्घकाळ बसून राहणे : विमान प्रवासात किंवा दीर्घ पल्ल्याचे ड्रायव्हिंग सतत करणाऱ्या व्यक्तींमध्ये पोटरीचे स्नायू हालचाल न होता तसेच ठेवले जातात. त्यामुळे डीव्हीटीची शक्यता वाढते.
 • दीर्घकाळ बिछान्यावर पडून राहणे : 

    मोठे ऑपरेशन झालेल्या व्यक्ती, अर्धांगवायूचे रुग्ण तसेच काही आजारांमध्ये रुग्‍णालयात दीर्घकाळ झोपून राहावे लागणाऱ्या आजारात पोटरीच्या स्नायूंची हालचाल न झाल्याने रक्ताच्या गाठी निर्माण होऊ शकतात.

 • अपघातामुळे किंवा शस्त्रक्रियेदरम्यान नीलांना दुखापत झाल्यास हा त्रास उद््भवू शकतो.
 • गरोदरपणात गर्भाच्या वाढत्या आकारामुळे पोटातल्या रक्तवाहिन्यावर दबाव येतो. ज्या स्त्रियांना आनुवंशिकतेने रक्ताच्या गोठण्याच्या समस्या असतात अशांमध्ये रक्ताच्या गाठी निर्माण होतात. हा त्रास त्या स्त्रियांच्या प्रसूतिपश्चात ६ महिन्यांपर्यंत उद््भवू शकतो.
 • गर्भनिरोधक गोळ्यांमुळे रक्ताची गोठण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे हा त्रास होऊ शकतो.ज्या स्त्रियांना हार्मोन्सच्या गोळ्या सुरू असतात अशांमध्येही हा धोका संभवतो.
 • अतिरिक्त वजन असणे तसेच स्थूलत्व
 • धूम्रपानाची सवय
 • कर्करोग
 • पोटाचे आजार : क्रॉह्न्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस अशा आजारात हा त्रास उद््भवण्याची शक्यता असते.
 • हृदयविकार : हार्ट फेल्युअर, हृदयाच्या झडपांचे आजार असल्यास डीव्हीटी होऊ शकते.
 • जनुकीय आजार : रक्ताच्या गोठण्यासाठी आवश्यक असलेल्या घटकांमुळे काही व्यक्तींना हा त्रास होऊ शकतो. उदाहरणार्थ. फॅक्टर व्ही लीडेन.
 • व्हीनस थ्रोम्बोएम्बोलिझम 
 • विषाणूचा संसर्ग:  कोरोना आणि तत्सम विषाणूंच्या आजारात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात.

डीव्हीटीमधील गुंतागुंत 
    पल्मनरी एम्बोलिझम (पीई) ः ही एक डीव्हीटीशी संबंधित असलेली संभाव्य प्राणगंभीर गुंतागुंत समजली जाते. यामध्ये शरीरातील अवयवांकडून फुफ्फुसाकडे येणाऱ्या रक्तात गुठळी निर्माण होते, आणि फुफ्फुसाकडे जाणारी रक्तवाहिनी अवरोधित होते. श्वास घेताना अचानक त्रास, श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे, वेगवान श्वास घेणे, वेगवान नाडी, अशक्तपणा किंवा अशक्तपणा जाणवणे आणि रक्त खोकला येणे अशी लक्षणे या आजारात अचानक निर्माण होतात. कोणत्याही व्यक्तीमध्ये पल्मनरी एम्बोलिझमची ही लक्षणे दिसल्यास तातडीची वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे असते. 
  

 •  पोस्ट फ्लेबायटिक सिंड्रोम ः रक्ताच्या गुठळ्यांमुळे ज्या रक्तवाहिन्या बंद पडतात त्याच्या प्रभावित भागात रक्ताचा प्रवाह कमी होतो, ज्यामुळे पाय दुखणे आणि सूज येणे, त्वचेचा रंग बिघडणे आणि त्वचेवर जखमा निर्माण होतात.
 • रक्तस्राव ः रक्ताच्या गाठी विरवून टाकणाऱ्या औषधांमुळे रक्त अधिक पातळ होते आणि शरीरात अन्य ठिकाणी रक्तस्राव होऊ शकतो. त्याकरता वरचेवर रक्ताची गोठण्याची स्थिती किती कमी झाली याच्या चाचण्या नियमितपणे करून घ्याव्या लागतात.

प्रतिबंध
डीव्हीटीपासून बचाव करण्याच्या उपायांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे.

 • एकाच जागी जास्त वेळ बसणे टाळा ः एखाद्या व्यक्तीची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा अन्य कारणास्तव ती दीर्घकाळ बिछान्यावर विश्रांती घेत असेल तर शक्य तितक्या लवकर हातापायांच्या हालचाली करण्याचा आणि चालू लागण्याचे प्रयत्न करावे लागतात. नुसते बसलेले असताना तर पाय एकावर एक ठेवून (क्रॉस लेग्ड) बसू नये. त्यामुळे रक्त प्रवाह दबला जातो. कारने लांब पल्ल्याचा प्रवास करताना तर दर तासाला वाहन थांबवून थोडे चालावे.

    विमान प्रवासात असल्यास, उभे रहा किंवा अधूनमधून चालत जा. हे करणे शक्य नसल्यास पायांच्या तळव्यांचे काही व्यायाम करावेत. दोन्ही पायांचे चवडे आणि बोटे खाली टेकवून टाचा वर खाली कराव्यात. त्यानंतर दोन्ही टाचा खाली टेकवून पायांची बोटे आणि चवडे वर खाली करत राहावे. हा व्यायाम दर अर्ध्या तासाने प्रत्येकी पाच वेळा करावा.
  

धूम्रपान करू नये  
    नियमित व्यायाम करावेत आणि वजन योग्य पातळीत ठेवावे. डीव्हीटीमध्ये लठ्ठपणा हा जोखमीचा घटक आहे. नेहमी लांब पल्ल्याचे प्रवास करावा लागणाऱ्या स्थूल व्यक्तींबाबत हे महत्त्वाचे असते.

जीवनशैली सक्रिय ठेवावी     
    पोटऱ्या घट्ट बांधून ठेवतील असे पायमोजे (स्टॉकिंग्ज) वापरावेत. 

निदान
काही महत्त्वाच्या चाचण्या डीव्हीटीचे निदान करण्यासाठी केल्या जातात. यामध्ये-
 डी डायमर चाचणी ः रक्तातल्या गुठळ्या होण्याची शक्यता आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी डी-डायमर चाचणी संशयित रुग्णांमध्ये मूल्यांकनासाठी केली जाते. ज्या रुग्णांना दीर्घकाळ झोपून राहावे लागणार असते अशा व्यक्तींमधील जोखीम आधीच जाणून घ्यायला याचा उपयोग होतो व डीव्हीटी, पीई अशा गंभीर व्याधी टाळता येतात. 

पायांवर लालसरपणा, पाय दुखणे आणि पाय सुजणे अशी लक्षणे असल्यास डीव्हीटी होऊ शकतो. त्याचप्रमाणे श्वासोच्छ््वासाचा त्रास, खोकला, छातीत दुखणे, अशक्त होणे, घाम येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे अशी लक्षणे असल्यास पल्मनरी एम्बोलिझम होण्याची शक्यता दर्शवितात. अशावेळेस डी-डायमर चाचणी केली जाते.

 • पेरिफेरल व्हीनस डॉपलर ः अल्ट्रा साउंड वापरून केल्या जाणाऱ्या या चाचणीत हातापायाच्या रक्तवाहिन्यांतील प्रवाहाचे निरीक्षण केले जाते आणि प्रवाहाच्या गतीचे मोजमाप केले जाते. यामध्ये एखाद्या रक्तवाहिनीच्या प्रवाहास आलेला अडथळा आढळल्यास तिथे रक्ताची गुठळी आहे हे लक्षात येते.
 • व्हीनोग्राम ः यात एक रंगद्रव्य रक्तवाहिन्यांमध्ये इंजेक्शनद्वारे टोचून त्याचे एकामागोमाग एक असे एक्सरे काढले जातात. त्यात रक्ताची गुठळी आणि तिची जागा समजू शकते.
 • सिटी व्हीनोग्राफी ः यामध्ये सिटीस्कॅन वापरून रक्तवाहिन्यांचे आणि त्यातील रक्तप्रवाहाचे निरीक्षण करून रक्ताच्या गाठीची जागा, त्यातील कमी झालेला रक्तप्रवाहाचे प्रमाण तपासले जाते. फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीतील गाठ शोधण्यास याचा उपयोग होतो.
 • एमआर व्हीनोग्राफी ः एमआरआय तंत्रज्ञानाने ही तपासणी केली जाते.

उपचार
औषधांमध्ये रक्त पातळ ठेवणारी (ब्लड थिनर्स) किंवा रक्ताचे गोठणे कमी करणारी अँटिकोअॅग्युलंट्स वापरली जातात. यामुळे गुठळी विरघळत नाही पण तिची वाढ रोखली जाते आणि पुन्हा नव्या गुठळ्या होण्याची क्रिया थांबवली जाते. यात काही औषधे इंजेक्शन स्वरूपात दिली जातात, तर काही तोंडाने घेण्याची औषधे दिली जातात. किमान तीन महिने ही औषधे घ्यावी लागतात.

 •  थ्रॉम्बोलायटिक्स ः काही गुठळ्या अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे मेंदूमध्ये, हृदयामध्ये निर्माण होतात. या गुठळ्या पूर्ण नष्ट करण्यासाठी हे तंत्र वापरतात. इंजेक्शनवाटे अथवा एखाद्या नळीद्वारे (कॅथेटर) ही दिली जातात. गुठळी निर्माण झाल्यावर दोन ते तीन तासात हे तंत्र वापरल्यास रुग्णाचे प्राण वाचतात.
 • फिल्टर्स ः पायातील रक्तवाहिनीत निर्माण होणाऱ्या गाठींवर उपचार करताना त्यांचे सूक्ष्म तुकडे होऊन ते हृदयाकडे किंवा फुफ्फुसांकडे जातात. हे सूक्ष्म तुकडे फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीला अवरोधित करू शकतात. यासाठी अशा रुग्णांत पोटातील महानीलेच्या सुरुवातीला एक गाळणीवजा फिल्टर बसवला जातो. गुठळ्यांचे हे तुकडे गाळणीत अडकून फुफ्फुसाकडे जाण्यापासून रोखले जातात.
 • स्टॉकिंग्ज (पायमोजे) ः गुडघ्यापर्यंत किंवा मांडीच्या मध्यापर्यंत असलेले हे पायमोजे पायाला घट्ट दाबणारे असतात. त्यामुळे रक्तपुरवठा सुधारतो आणि पायांची सूज, दुखणे कमी होते. किमान दोन वर्षे सातत्याने आणि दिवसभर हे वापरावेत.
 • थ्रॉम्बेक्टॉमी ः जर रक्तवाहिनीतील गाठ आकाराने मोठी असेल, तिच्यामुळे आजूबाजूच्या मांसल भागावर दुष्परिणाम होत असतील, औषधोपचाराने ती कमी होत नसेल तर शस्त्रक्रियेच्या साह्याने अशी गाठ काढली जाते.
 • डीव्हीटी हा आजच्या बैठ्या जीवनशैलीत अनेकांना होणारा त्रास आहे. जीवनशैलीत सकारात्मक बदल करून प्रतिबंधक उपायांनी तो टाळता येतो. मात्र त्याचे उपचार जाणीव झाल्यापासून लगेच करायला हवेत.

संबंधित बातम्या