फायब्रोमायाल्जिया- अहोरात्र अंगदुखीचा आजार

डॉ. अविनाश भोंडवे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

आरोग्य संपदा

‘फायब्रोमायल्जिया’ नक्की कशामुळे होतो याबद्दल खात्रीची माहिती आज उपलब्ध नाही. मात्र काही कारणांमुळे मेंदूची वेदना सहन करण्याच्या शक्तीची पातळी खाली येते. त्यामुळे आधी न जाणवणाऱ्या वेदना खूप प्रकर्षाने आणि जास्त तीव्रतेने जाणवू लागतात, असा संशोधकांचा कयास आहे. हा प्राणांतिक आजार नसला तरी वेळेवर निदान आणि उपचार न केल्यास तो रुग्णाला विकलांग करून मरणप्राय अवस्थेत नेऊन ठेवतो.

रोजच्या दैनंदिन कामामध्ये जरा धावपळ झाली, जिन्यावरून जास्त वेळा चढ-उतार करावी लागली, दूरचा प्रवास झाला की सर्वांग दुखू लागते. पण थोडा आराम केला; एखादी वेदनाशामक गोळी खाल्ली की हे दुखणे कमी होते आणि पुन्हा त्या वेदना होतही नाहीत. मात्र काही असे आजार असतात की ज्यात काहीही श्रम न करता अंग सतत दुखत राहते, हाड-न्-हाड ठणकत रहाते, सगळ्या स्नायूंच्या हालचाली वेदनामय होतात. यातील एक आहे ‘क्रॉनिक फटिग सिंड्रोम’ आणि दुसरा ‘फायब्रोमायाल्जिया’. पहिला प्रकार हा बहुतांशी मनो-शारीरिक पध्दतीच्या आजारांमध्ये येतो. ज्यात काही मानसिक कारणांमुळे अंगदुखी आणि थकवा असतो. तर फायब्रोमायाल्जिया उद््भवण्यामागे शारीरिक कारणे असतात.

‘फायब्रोमायाल्जिया’ या संज्ञेचा अर्थ आपण पाहिला तर १८व्या शतकातील लॅटिन भाषेतल्या शब्दांमध्ये सापडतो. ‘फायबर’ म्हणजे तंतुमय पेशी, ‘मायीस’ म्हणजे स्नायू आणि ‘अल्गोस’ म्हणजे वेदना, अशा तीन शब्दांचा मिळून हा शब्द बनला आहे. म्हणजे, तंतुमय मांसलपेशींच्या अतीव वेदनेचा आजार म्हणजे ‘फायब्रोमायाल्जिया’.

तसे पाहता हा आजार मुळीच दुर्मीळ नाही. या आजाराच्या जागतिक आकडेवारीकडे नजर टाकली तर लक्षात येते...

 • जगातील २.७ टक्के व्यक्ती या आजाराने त्रस्त आहेत.
 • यातल्या दोन तृतीयांश रुग्णांचे निदान चुकीचे होते.
 • या आजारावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी २८ टक्के डॉक्टर्स हा फार महत्त्वाचा आजार आहे असे मानत नाहीत.
 • या आजाराचे ७४ टक्के रुग्ण डॉक्टरांकडून औषधोपचार करण्याऐवजी दुकानातून पेनकिलर्स घेऊन वेदना थांबवण्यात अनेक वर्षे घालवतात.
 • या रुग्णांपैकी १३ टक्के रुग्णांना वर्षभरात सरासरी १२ वेळा डॉक्टरांकडे अतीव वेदनांचा इलाज करायला जावे लागते.
 • यापैकी ७० टक्के रुग्णांचे वजन सतत वाढत राहते.
 • इतर निरोगी व्यक्तींच्या तुलनेत फायब्रोमायाल्जियाच्या रुग्णात आत्महत्या करण्याचे प्रमाण १० पटीने जास्त आहे.
 • अर्धशिशीचा विकार असलेल्या रुग्णांपैकी २० ते ३६ टक्के रुग्णांमध्ये हा आजारही आढळतो.
 • कसलीही अॅलर्जी नसताना सतत सर्दीचा त्रास होणाऱ्या रुग्णांमध्ये फायब्रोमायाल्जिया हे मूलभूत कारण असते. 
 •  हा त्रास असणाऱ्या स्त्रियांमध्ये ताणतणावामुळे शरीरातील कॉर्टिसॉल या संप्रेरकाची पातळी खूप वाढलेली असते.

कारणमीमांसा
फायब्रोमायल्जिया नक्की कशामुळे होतो याबद्दल खात्रीची माहिती आज उपलब्ध नाही. मात्र काही कारणांमुळे मेंदूची वेदना सहन करण्याच्या शक्तीची पातळी खाली येते. त्यामुळे आधी न जाणवणाऱ्या वेदना खूप प्रकर्षाने आणि जास्त तीव्रतेने जाणवू लागतात, असा संशोधकांचा कयास आहे.
काही संशोधकांच्या मते मज्जापेशींना संवेदनांचे संकेत प्राप्त झाल्यावर त्या अतिरिक्त प्रतिक्रिया देतात. म्हणजे १० टक्के वेदना असेल तर त्या ५० टक्के म्हणजे पाचपट जास्त वेदना आहे असा संदेश मेंदूला देतात.

 •      रोग संसर्ग : पूर्वी होऊन गेलेले आजार फायब्रोमायल्जिया उद््भवण्यास कारणीभूत ठरू शकतात किंवा त्याची लक्षणे आणखीनच वाढवू शकतात. यामध्ये फ्लू, न्यूमोनिया, साल्मोनेला तसेच ‘शिगेला’ जिवाणूंमुळे होणारे जुलाब, एपस्टेन-बार विषाणूचा संसर्ग अशामुळे फायब्रोमायल्जियाचा त्रास उद््भवतो असे लक्षात आले आहे.
 • जनुकीय कारणे : बहुतेकदा एखाद्या कुटुंबामध्ये अनेकांना फायब्रोमायल्जिया असतो. जवळच्या नातेवाईकात हा आजार असल्यास तो होण्याची शक्यता जास्त असते. संशोधकांच्या मते काही विशिष्ट जनुकीय उत्परिवर्तनांमुळे (म्युटेशन्स) हा आजार होतो. वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणाऱ्या मज्जापेशींवर परिणाम करणाऱ्या काही संभाव्य जनुकांवर संशोधन होते आहे. 
 • अपघाती इजा : अपघातामुळे गंभीर शारीरिक इजा किंवा भावनिक आघात होणाऱ्या व्यक्तींना पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) होतो तसा फायब्रोमायल्जियादेखील होऊ शकतो. 
 • ताणतणाव : ताणतणावामुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे फायब्रोमायल्जियाला होऊ शकतो. अपघातजन्य इजेप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा ताणतणाव आघाताप्रमाणेच आपल्या शरीरावर विपरीत परिणाम करू शकतो. 
 • ऑटोइम्युन डिसीज : संधिवात किंवा मल्टिपल स्क्लेरोसिसप्रमाणे फायब्रोमायाल्जियादेखील ऑटोइम्युन डिसीज असावा असे वरवर विचार केल्यास वाटू शकते. या प्रकारच्या आजारात आपल्या शरीरातील प्रतिकार प्रणाली शरीरातील पेशींना बाह्य आक्रमक पेशी समजून त्यांना नष्ट करतात. यामध्ये एक प्रकारचा दाह निर्माण होतो. मात्र फायब्रोमायाल्जियामध्ये अशा प्रकारचा दाह दिसून येत नाही आणि ऑटोइम्युन आजारात दिसून येणाऱ्या ऑटोअँटिबॉडीजसुध्दा आढळून येत नाहीत. मात्र काही ऑटोइम्युन डिसीज आणि फायब्रोमायाल्जिया एकत्रितरीत्या झालेले रुग्ण दिसून येतात.  

लक्षणे

 • वेदना बिंदू : या आजारात शरीरात १८ ठिकाणी वेदना जाणवणाऱ्या जागा आसतात. याठिकाणी दबाव दिल्यास रुग्णाला कमालीच्या वेदना होतात. केवळ रुग्णाच्या शारीरिक तपासणीतून आजाराचे निदान करण्यास याचा उपयोग होतो. या जागा म्हणजे मस्तकाची मागील बाजू, दोन्ही खांद्यांची वरील टोके, छातीचा वरचा भाग, नितंब, गुडघे, कोपर अशा असतात. या आजारात एक प्रकारचा ठणका देणाऱ्या वेदना शरीरातील ठरावीक भागात सतत होत राहतात. याशिवाय सतत थकल्यासारखे वाटणे, वेदनांमुळे झोप न येणे खूप वेळ प्रदीर्घ झोप घेऊनही शरीरातील थकवा आणि वेदना दूर न होणे, डोके दुखणे, सतत चिंता वाटत राहणे, निराश वाटणे, कोणत्याही गोष्टीवर मन एकाग्र न होणे, ओटी पोटाच्या भागात सतत ठणका लागून राहणे, डोळे कोरडे वाटणे, मूत्रविसर्जनाची भावना सतत होणे अशी या आजाराची जाणवणारी लक्षणे आहेत.
 • फायब्रो फॉग : या आजारामध्ये रुग्णांना मधेच ‘काहीच सुधरत नाही’ अशी जाणीव होते. आजूबाजूच्या घटना आणि स्वतःची जाणीव अस्पष्ट आणि धुरकट झाल्यासारखी वावते. याला ‘फायब्रो फॉग’ किंवा ‘ब्रेन फॉग’ म्हणतात. यामध्ये रुग्णाला सतर्क राहणे अशक्य होते, मनाची एकाग्रता पूर्णपणे ढळते आणि स्मृती भरकटल्यासारखी होते.  
 • लिंग भिन्नता : फायब्रोमायाल्जिया हा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होतो असे मानले जायचे. स्त्रियांच्या रजोनिवृत्तीचा आणि या विकाराचा संबंध जोडला जात असे. मात्र २०१८मध्ये ‘अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या शोध निबंधानुसार पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त संख्येने हा आजार आढळतो. असह्य शारीरिक वेदना आणि मानसिक लक्षणांमुळे त्यांचे वैयक्तिक जीवन, करिअर आणि कौटुंबिक नातेसंबंध यावर विघातक परिणाम होतात अशी नोंदही या नियतकालिकाने केलेली आहे.

निदान 
फायब्रोमायाल्जियाचे निदान कोणत्याही रक्ताच्या तपासणीतून किंवा एक्सरेमधून केले जात नाही. त्यासाठी २०१६मध्ये खालील निकष पाहून निदान केले जाते.

 • वर उल्लेख केलेल्या १८ पैकी ११ बिंदूंवर ४ किलोग्रॅमचा दाब दिल्यावर वेदना होणे.
 • हा त्रास याच पातळीवर किमान ३ महिने सलग होत असणे.
 • ‘अमेरिकन कॉलेज ऑफ ऱ्हुमॅटॉलॉजी’ यांनी दिलेल्या सर्वदूर पसरणाऱ्या वेदनेच्या निर्देशांकाप्रमाणे (वाईडस्प्रेड पेन इंडेक्स- डब्ल्यू पी आय) ७ पेक्षा जास्त असेल आणि वेदनेच्या तीव्रतेचे परिमाण (सिम्प्टम सिव्हिरिटी स्केल- एसएसएस) ५ पेक्षा जास्त असेल तर त्या रुग्णाला फायब्रोमायाल्जिया असतो.
 • किंवा डब्ल्यू पी आय ४ ते ६ असेल आणि एसएसएस ९ पेक्षा जास्त असेल तरी तो फायब्रोमायाल्जिया धरावा.
 • रुग्णाला इतर कोणतेही आजार असले तरी फायब्रोमायाल्जिया असू शकतो.

उपचार 
 या आजाराचे उपचार करताना औषधांबरोबर स्वतःची काळजी घेणे आणि जीवनशैलीत बदल करणे याबद्दल रुग्णांना समुपदेशन करावे लागते. 

औषधे 
 यामध्ये ‘आयबुप्रोफेन’, ‘डायक्लोफिनॅक’, ‘पॅरॅसिटॅमॉल’ अशा दाहशामक औषधांचा वापर केला जातो. ‘गाबापेंटीन’, ‘प्रीगाबालीन’ अशी अपस्मारावरील औषधे, तसेच ‘ड्युलॉक्सेटीन’ व ‘मिनासिप्रान’ सारखी नैराश्यावर वापरली जाणारी औषधे यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ‘ट्रॅमॅडॉल’ सारखी वेदनाशामक औषधेही वापरली जातात. याशिवाय ‘५-हायड्रोक्सी ट्रिप्टोफॅन’ अशी औषधेही वापरली जातात. मात्र ही सर्व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य डोसेजेसमध्ये योग्य काळापर्यंत घ्यायची असतात.
मानसोपचारांमध्ये ग्रुप थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेविरल थेरपी यांचा औषधांसमवेत सहाय्यक पद्धती म्हणून उपयोग होऊ शकतो. इतर पर्यायी उपचारपद्धतीमध्ये फ़िजिओथेरपी, अॅक्युपंक्चर, ध्यानधारणा, योग, ताई-इचि, मसाज यांचाही वापर केला जातो. फायब्रोमायाल्जिया हा प्राणांतिक आजार नसतो. मात्र वेळेवर याचे निदान आणि उपचार न केल्यास तो रुग्णाला विकलांग करून मरणप्राय अवस्थेत नेऊन ठेवतो.

संबंधित बातम्या