औषधांचे साइड इफेक्ट्स

डाॅ. अविनाश भोंडवे
सोमवार, 3 मे 2021


आरोग्य संपदा

भारतातल्या एकूण मृत्यूंपैकी एक टक्का रुग्ण औषधांच्या दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. जगातील प्रगत राष्ट्रांमध्येही औषधांच्या दुष्परिणामामुळे होणारे मृत्यू हे एकुणातल्या मृत्यूंमध्ये चौथ्या क्रमांकाचे कारण मानले जाते.

जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कसला ना कसला तरी आजार कधीतरी होतोच. आजारी पडल्यावर त्याला औषधे घ्यावीच लागतात. आजार बरा होण्यासाठी घेतलेल्या औषधांमुळे क्वचितप्रसंगी शरीरावर काही वेगळीच लक्षणे दिसून येतात, यालाच औषधाचे ‘साइड इफेक्ट्स’ म्हणतात. यातील काही परिणाम आणि लक्षणे ही आजाराशी संबंधित नसतातही, त्यामुळे याला अवांछित परिणाम किंवा ‘अनटोवर्ड इफेक्ट्स’ असेही म्हटले जाते. असे अवांछित परिणाम सर्व पद्धतीच्या औषधांमुळे घडू शकतात. यात डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरील औषधे, मेडिकल स्टोअरच्या काऊन्टरवरून घेतलेली खुल्या बाजारातील औषधे, जाहिरातीमधील औषधे, हर्बल औषधे, कॉस्मेटिक्स या साऱ्यांचा समावेश होतो.

औषधांच्या बाबतीत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. जगभरातील औषधांपैकी १० टक्के औषधे भारतात खपतात. तरीही भारतात औषधांचे दुष्परिणाम आढळून येण्याचे प्रमाण फक्त दोन टक्के आहे. याचे कारण भारतात औषधांना रिअॅक्शन्स कमी येतात असे नव्हे, तर भारतीय रुग्ण औषधांच्या दुष्परिणामांच्या नोंदी खूप कमी वेळा करतात. 

सन २०१४मधील एका सर्वेक्षणानुसार भारतातील ६ ते ७ टक्के रुग्णांमध्ये औषधांचे गंभीर दुष्परिणाम दिसून आले. औषधांच्या दुष्परिणामांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी ३.४ टक्के रुग्ण औषधांच्या वेगवेगळ्या साइड इफेक्ट्समुळे रुग्णालयात भरती होतात. कोणत्याही आजारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन आजार बरा झाल्यामुळे डिस्चार्ज घेऊन घरी गेलेल्या रुग्णांपैकी ३.७ टक्के रुग्ण औषधांचा त्रास झाला म्हणून परत भरती होतात. भारतातल्या एकूण मृत्यूंपैकी एक टक्का रुग्ण औषधांच्या दुष्परिणामामुळे मृत्युमुखी पडतात. जगातील प्रगत राष्ट्रांमध्येही औषधांच्या दुष्परिणामामुळे होणारे मृत्यू हे एकुणातल्या मृत्यूंमध्ये चौथ्या क्रमांकाचे कारण मानले जाते. औषधांना येणाऱ्या रिअॅक्शनच्या नोंदीमध्ये गेल्या तीन वर्षात चांगली सुधारणा झाली आहे. पण तरीही जगात दर १० लाख लोकसंख्येपैकी १३० ड्रग रिअॅक्शन्स नोंदवल्या जातात, तर भारतात फक्त चाळीस. 

साइड इफेक्ट्सचे प्रकार

 •  अॅनाफायलेक्टिक रिअॅक्शन : अ‍ॅनाफायलेक्सिस ही एक गंभीर आणि संभाव्य जीवघेणी अशी रिअॅक्शन असते. यामध्ये औषध किंवा इंजेक्शन घेतल्यावर काही मिनिटात सर्वांगावर लाल पुरळ येते, खूप खाज सुटते, श्वास घ्यायला त्रास होतो, श्वासनलिका आकुंचन पावून श्वास रोखला जाऊ शकतो, नाडी मंद होते, रक्तदाब एकदम कमी होतो, शुध्द हरपते. पूर्वी वापरले जाणारे पेनिसिलीन, अॅनाल्जिन, टेट्रासायक्लिन अशा औषधांमुळे हा दुष्परिणाम हमखास आढळायचा. साध्या वाटणाऱ्या आणि लोक सर्रास वापरतात अशा गोळीने, किंवा इंजेक्शनने देखील हा दुष्परिणाम होऊ शकतो. तसे पाहिले तर हा परिणाम कोणत्याही औषधाने होऊ शकतो आणि तो व्यक्तीसापेक्ष असतो. कोणत्याही औषधाला येणाऱ्या कोणत्याही रिअॅक्शनचे भाकीत आधी करता येत नाही. मात्र अशी अ‍ॅनाफायलेक्सिस निर्माण करणारी औषधे आधी अगदी कमीत कमी प्रमाणात टोचून त्याचा टेस्ट डोस दिला जातो. नंतर रुग्णाला अर्धा तास थांबवून रीअॅक्शन येतेय का? हे पाहिले जाते. आणि ती न आल्यास ते इंजेक्शन पूर्ण दिले जाते आणि आल्यास त्यावर उपचार करून रुग्णाला वाचवले जाते. मात्र टेस्ट डोसमध्ये देखील काही रुग्णांना तीव्र रिअॅक्शन येऊ शकते. 
 • अ‍ॅनाफायलेक्टिक रिअॅक्शन फक्त औषधांनाच नव्हे, तर शेंगदाणे, मधमाशीचा डंख, काही प्रकारचे मासे खाल्ल्यासही उद्‌भवू शकते. अॅनाफायलॅक्सिस झाल्यास अॅडरिनॅलिन (एपिनेफ्रिन) इंजेक्शन, स्टेरॉइड्सची इंजेक्शन्स, प्राणवायू, सलाईन त्वरित द्यावे लागते.
 •  अंगावर चट्टे उठणे : सल्फा पद्धतीची औषधे पूर्वी सर्रास वापरली जायची. पण त्याने अंगावर पुरळ आणि काळे चट्टे उठू शकतात, तसेच तोंडात, गुप्तेन्द्रीयांच्या अंतस्थ आवरणावर जखमा होऊ शकतात    
 •  उलट्या होणे : स्टेरॉइड्स, काही दाहशामक औषधे, मलेरियासाठी वापरले जाणारे क्लोरोक्विन यांनी उलट्या होऊ शकतात.
 •  जुलाब होणे : अॅम्पिसिलिन, अॅमॉक्सिसिलिन अशा प्रतिजैविक औषधांनी, सर्टालिनसारख्या मानसिक आजारावरील औषधाने रुग्णांना जुलाब होऊ शकतात. हा महत्त्वाचा अवांछित परिणाम आहे. यात या प्रतिजैविकांनी मोठ्या आतड्यात असलेले लॅक्टोबॅसिलस प्रकारचे सहकारी जिवाणू नष्ट होतात. त्यामुळे जुलाब होतात. मात्र अशावेळी औषधे बंद करण्याऐवजी प्रोबायोटिक्स किंवा लॅक्टोबॅसिलस दिल्यास असे जुलाब होत नाहीत. हे लॅक्टोबॅसिलस दह्यातही असल्यामुळे असे जुलाब झाल्यास थोडे दही घेतले तरी हे जुलाब नियंत्रणात येतात.
 •  मज्जातंतूंवर परिणाम ः स्ट्रेप्टोमायसिन औषधांनी श्रवणशक्तीसाठी कार्य करणारी मेंदूतील सहाव्या क्रेनियल नर्व्हला इजा होऊन बहिरेपणा येतो.
 •  तोंडाला कोरड पडणे : मानसिक नैराश्यावरील ट्रायसायक्लिक अॅण्टिडिप्रेसन्ट औषधे विशेषतः अॅमिट्रिप्टिलिन, मूत्रपिंडाच्या विकारांमध्ये दिले जाणारे ऑक्सिब्युटीनिन, पोटदुखीवरील डायसायक्लोमिन तसेच अॅट्रोपिनसदृश औषधे यांनी तोंडाला सतत कोरड पडू लागते.
 •  डोकेदुखी : नायट्रेटस या हृदयविकारात वापरल्या जाणाऱ्या औषधाने डोके खूप दुखू शकते. त्याचप्रमाणे अॅम्लोडेपिन या रक्तदाबाच्या, अॅटोर्व्हास्टॅटीन, या कोलेस्टेरॉलवरील औषधांनी तसेच ओमिप्रेझोल या हायपर अॅसिडिटीवरील आणि सिटालोप्राम, सर्टालीन या मानसिक आजारांवरील औषधांनी डोके दुखू शकते.
 •  बद्धकोष्ठता : लोहाच्या गोळ्या, मॉर्फिन, कोडीन, आणि तत्सम वेदनाशामक औषधांनी शौचाला घट्ट होण्याचे त्रास होऊ शकतात.
 •  पोट बिघडणे : स्टेरॉइड्स किंवा दाहशामक औषधांनी पोट गच्च होणे, पोटात गुबारा धरणे असे त्रास होऊ शकतात.
 •  अस्वस्थ वाटणे : काही औषधे घेतल्यावर अस्वस्थ वाटू लागते, मळमळ होते, गळून गेल्यासारखे वाटते. यामध्ये मेटफॉर्मिन, सर्टालिन, लिव्होडोपा, सिटालोप्रॅम, ट्रामाडॉल आणि काही प्रतिजैविकांचा समावेश होतो.
 •  गुंगी येणे : झोप येण्यासाठी दिली जाणारी औषधे वगळता अनेक औषधांनी गुंगी येऊ शकते. यामध्ये अनेक अॅण्टिहिस्टामिनिक्स असलेली अॅलर्जीवरील औषधे, डेक्सोमिथर्फान तसेच अॅण्टिहिस्टामिनिक्स असलेली कोरड्या खोकल्याची औषधे, ट्रामाडॉल असलेली वेदनाशामक औषधे, प्रीगाबालीन, गाबापेंटिन अशा औषधांनी गुंगी येते. ही झोप नसते पण काही व्यक्तींना त्यामुळे झोपही येते तर काही व्यक्तींना गरगरल्यासारखे वाटते.
 •  झोप उडणे : काही औषधांनी झोप कमी होते. यात तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन सुटण्यासाठी दिली जाणारी निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, एसएसआरआय पद्धतीच्या नैराश्यावरील गोळ्या यांचा समावेश असतो.
 •  गरगरणे : उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांनी रुग्णांना गरगरू शकते. यात रॅमिप्रिल, बिसोप्रोलाल, प्रोपरॅनोलॉल अशी औषधे येतात तर प्रोस्टेट ग्रंथी वाढली असल्यास वापरल्या जाणाऱ्या डॉक्साझोसिन या औषधांनीदेखील असा त्रास होऊ शकतो.
 •  खोकला येणे : अँजिओटेन्सिन कन्वर्टिंग एन्झाइम (एसीइ) इनहिबिटर पद्धतीच्या काही औषधांनी उदा. एनालेप्रिल, लिसिनोप्रिल, रॅमिप्रिल अशा औषधांनी रुग्णाला सतत कोरडा खोकला येऊ लागतो. ही औषधे उच्च रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी वापरली जातात.
 •  अंगावर सूज येणे : अॅम्लोडेपिन हे रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे औषध, काही दाहशामक औषधे, स्टेरॉइड्स यांनी रुग्णाच्या अंगावर, हातापायांवर, चेहऱ्यावर सूज येऊ शकते.

 हृदयाच्या कार्यावर परिणाम ः 
हायड्रोक्सिक्लोरोक्विनने हृदयाच्या आलेखात काही बदल दिसून येतात. 
 केस गळणे : कर्करोगावरील केमोथेरपीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांनी रुग्णाच्या डोक्यावरील केस गळून जाऊ लागतात.

साइड इफेक्ट्सबाबत महत्त्वाच्या बाबी
आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधांनी साइड इफेक्ट्स येतात, पण ही औषधे सर्वांना वापरण्यासाठी खुली होण्यापूर्वी त्याच्या विस्तृत प्रमाणात चाचण्या केलेल्या असतात. हे दुष्परिणाम जिवाला धोकादायक नसतील तरच ती सर्वांना वापरण्यासाठी परवानगी मिळते. या सर्व विपरीत परिणामांची नोंद त्या औषधाच्या प्राथमिक पुस्तकात असते. अनेक नव्या औषधांबरोबर या परिणामांची माहिती देणारे परिपत्रक असते. 

औषधांच्या साइड इफेक्ट्सचे सखोल ज्ञान फार्मसी शिकणाऱ्या बी.फार्म, डी.फार्मच्या विद्यार्थ्यांना दिलेले असते. मेडिकल स्टोअर चालवण्यासाठी अशी पदवी अथवा पदविका असलेल्या रजिस्टर्ड फार्मासिस्टनाच मान्यता दिलेली असते. आधुनिक वैद्यकशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात फार्माकॉलॉजी विषयात या औषधांची कार्यपद्धती त्यांचे डोसेजेस आणि दुष्परिणामांचे सखोल ज्ञान दिलेले असते.

उपरोल्लेखित साइड इफेक्ट्स ती औषधे घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला येत नाहीत. अनेकदा  ते हजारात एखाद्याला येऊ शकतात. त्यामुळे प्रमाणित पदवी असलेल्या डॉक्टरांकडून औषधे घेतल्यास, त्या औषधाचे साइड इफेक्ट्स काय येऊ शकतात आणि त्यांचा उपचार काय करायचा हे त्या प्रमाणित पदवी असलेल्या डॉक्टरांना माहिती असते. त्यामुळे आपण औषधे घेतल्यावर जर काहीही विपरीत परिणाम जाणवला तर त्याबद्दल त्या डॉक्टरांना लगेचच कळवावे. अनेकदा रुग्णांना जे साइड इफेक्ट्स म्हणून वाटतात ती आजाराचीच लक्षणे असतात, मात्र अनेक रुग्ण विनाकारण औषधांचा बाऊ करतात. औषधांचे साइड इफेक्ट्स जाणवल्यास, ती औषधे स्वतःहून बंद करू नयेत. डॉक्टरांना त्वरित कळवल्यावर तुमचे डॉक्टर त्या त्रासाची शहानिशा करून आवश्यक वाटल्यास ती बदलू शकतात. अनेकदा साइड इफेक्ट्सच्या अवाजवी कल्पनांनी रुग्ण जीवरक्षक औषधे स्वतःहून बंद करतात, त्यामुळे आजार वाढून त्यातील गुंतागुंत वाढू शकते. औषधाने साइड इफेक्ट्स आल्यास अनेकदा डॉक्टरांना त्याबाबत जबाबदार धरून अनेकदा वादविवाद केले जातात. लक्षात ठेवा कुणाला कुठल्या औषधाने काय साइड इफेक्ट्स होणार आहेत, ते डॉक्टरांना आधीच कळू शकत नाही. साइड इफेक्ट्स जाणवल्यावरच ते लक्षात येते. आपल्याला कोणत्या औषधाने काय त्रास होतो हे डॉक्टरांशी सल्ला मसलत करून लिहून घ्यावे आणि त्याची नोंद आपल्याजवळ ठेवावी. कोणत्याही डॉक्टरांना दाखवताना आपल्या या नोंदीबाबत डॉक्टरांना कल्पना द्यावी. एखादी औषधाचे गंभीर साइड इफेक्ट्स वारंवार येत असतील तर ते औषध देशाच्या अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) रद्द केले जाते. 

काही जगावेगळी उदाहरणे
औषधांच्या अनटोवर्ड इफेक्ट्समध्ये काही उदाहरणे अशी आहेत की त्या औषधाचे अनपेक्षित परिणाम लक्षात आल्यावर वेगळ्या महत्त्वपूर्ण आजाराच्या उपचारासाठी ती वापरली जाऊ लागली. काही बाबतीत एका आजारासाठी वापरले जाणारे औषध वेगळ्या आजारावरसुध्दा लागू पडते असे लक्षात आले.

 • मिनॉक्सिडिल : हे रक्तदाबासाठी आलेले औषध वापरताना पुरुष रुग्णांचे केस गाळणे थांबून डोक्यावरील केस वाढू लागले. त्यामुळे आज हे औषध पौरुषपद्धतीचे टक्कल पडल्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
 • फिनास्टेराईड : पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीला रोखण्यासाठी आलेले हे औषध पुरुषांच्या टक्कलाच्या समस्येवर रामबाण उपाय ठरू लागले.
 • सिल्डेनाफिल : पुरुषांच्या लैंगिक समस्येसाठी वापरले जाणाऱ्या या औषधाने हृदयाचे स्पंदन सुधारते असे लक्षात आल्यावर ते कार्डिअॅक हायपरट्रॉफी, हार्ट फेल्युअर, फुफ्फुसाच्या रक्तवाहिनीत होणाऱ्या गाठीसाठी वापरले जाऊ लागले. या आजारांवर हा उपचार पुरुषांबरोबर स्त्रिया आणि लहान मुलांवरही केला जाऊ लागला.
 • बॅक्लोफेन : आखडलेल्या स्नायूना सैलावण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या औषधाने अन्ननलिकेचे स्नायूदेखील सैल पडतात. त्यामुळे छातीत सतत जळजळ होण्याची लक्षणे असलेल्या गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज (जीइआरडी) या आजारातदेखील ते वापरले जाऊ लागले.

रोगाने संत्रस्त झालेल्या मानवजातीला रोगमुक्त करण्यासाठी औषधशास्त्राचा उगम झाला. त्यामध्ये ज्या अडीअडचणी येत जातात त्यावर संशोधन होऊन ते दोष काढण्यामागे संशोधक जिवाचे रान करत असतात. अनेक नवी औषधे जुन्या औषधांमधील साइड इफेक्ट्स दूर करून रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी पुढे येत असतात. वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीमध्ये औषधशास्त्राचा त्यामुळेच मोठा वाटा आहे.

संबंधित बातम्या