दुर्लक्षिलेल्या आजारांचे कठोर फलित - गँगरीन

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 17 मे 2021

आरोग्य संपदा

गँगरीन ही वैद्यकीयदृष्ट्या एक आणीबाणीची परिस्थिती असते. त्यात त्वरित औषधोपचार आणि निर्णय घ्यावे लागतात नाहीतर त्याचे पर्यवसान रुग्णाच्या मृत्यूत होऊ शकते.

आरोग्य ही सातत्याने जपण्याची गोष्ट आहे.. आपल्याला आजार होऊ नयेत म्हणून जशी आहार, व्यायाम, विश्रांती आणि व्यसने टाळण्याची जशी गरज असते, तशीच कोणताही आजार झाल्यावर त्याचे निदान होणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आजार बरा होईपर्यंत नियमितपणे उपचार घेण्याचीही गरज असते. त्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, संधीवात असे काही आजार हे आयुष्यभराचे साथी असतात. आजार अंगावर काढणे, निदान करण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या न करणे, औषधे चुकवणे, पथ्य न पाळणे, पुनर्तपासणी करून घेण्यात दिरंगाई करणे यामुळे अनेक आजारात गुंतागुंत होते आणि ते आजार गंभीर स्वरूप धारण करतात. गँगरीन ही अशीच दुर्लक्षिलेल्या आजारात उद्‌भवणारी एक कठोर आणि दुर्दैवी गुंतागुंत मानली जाते.

शरीरातील एखाद्या भागातील पेशीसमुदाय म्हणजेच उतींना होणारा रक्तपुरवठा काही कारणांनी थांबला तर त्या उती निर्जीव होतात. त्यात जंतुसंसर्ग होऊन त्या अवयवावर आणि पर्यायाने संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. यालाच गँगरीन म्हणतात. गँगरीन सर्वसाधारणपणे हाता-पायांना होते, त्यातही पायांच्या आणि हातांच्या बोटांना होण्याची शक्यता जास्त असते. मात्र शरीरांतर्गत अनेक महत्त्वाच्या अवयवांनादेखील गँगरीन होऊ शकते. अनेकदा गँगरीन झालेला भाग शस्त्रक्रिया करून कापून काढण्याचे वेळ येऊ शकते. गँगरीन ही वैद्यकीयदृष्ट्या एक आणीबाणीची परिस्थिती असते आणि त्यात त्वरित औषधोपचार आणि निर्णय घ्यावे लागतात नाहीतर त्याचे पर्यवसान रुग्णाच्या मृत्यूत होऊ शकते.

लक्षणे
हातापायांच्या बोटांना गँगरीन झाल्यावर सर्वात प्रथम त्यांच्यावरील त्वचेमध्ये लक्षणे दिसून येतात. यामध्ये त्वचेचा रंग पालटतो -गँगरीनच्या प्रकारानुसार त्वचेचा रंग फिकट होण्यापासून निळसर, जांभळा, तांबूस, लालबुंद किंवा काळा होतो. याशिवाय सूज येणे, गँगरीन झालेल्या भागात अचानक खूप वेदना होऊन त्यानंतर बधीरपणा येणे, गँगरीन झालेल्या भागावर एखादी जखम होऊन किंवा पाण्याने भरलेले फोड येऊन त्यातून कमालीचा दुर्गंध येणे अशीही लक्षणे दिसून येतात. अनेकदा गँगरीन होण्यापूर्वी काही काळ त्या भागावरील त्वचा पातळ होते आणि त्यावरील केस नष्ट झालेले आढळतात. गँगरीन झालेल्या भागावरील त्वचा स्पर्श केल्यास गार किंवा थंड लागते. गॅस गँगरीन किंवा अंतर्गत अवयवांचे गँगरीन झाल्यास बारीक तापही येऊ शकतो.

 • सेप्टिक शॉक ः गँगरीन समवेत होणारा जंतुसंसर्ग रक्तावाटे सर्व शरीरात पसरू शकतो. यामध्ये रुग्णाचा रक्तदाब कमी होतो, शरीराचे तपमान ९८.६ अंश फॅरनहाइट (३७ अंश सेंटिग्रेड) पेक्षा कमी होऊ लागते, हृदयाचे ठोके वेगाने पडू लागतात, मस्तक हलके होऊन गरगरू लागते, श्वास कमी पडतोय असे वाटू लागते, दम लागतो आणि रुग्णाला आजूबाजूचे काहीच सुधारत नाही. यात अखेर रुग्णाची शुद्ध हरपते.

गँगरीन होण्याची कारणे 

 • रक्तपुरवठा बंद होणे ः शरीरातील सर्व अवयवांना आणि त्यातील पेशींना, उतींना रक्तप्रवाहाद्वारे प्राणवायू, पोषक द्रव्ये आणि प्रतिकारप्रणालीतून प्रतिपिंडे मिळत असतात. रक्तपुरवठा बंद झाल्यावर या गोष्टींच्या अभावाने पेशी मृत होतात आणि कुजू लागतात. रक्तप्रवाहात काही कारणाने गुठळ्या निर्माण होतात. त्या रक्तवाहिन्यातला प्रवाह बंद पाडतात. परिणामतः गँगरीन उद्‌भवते.
 • जंतुसंसर्ग ः कोणत्याही जंतुसंसर्गावर वेळेवर उपचार न केल्यास, त्याकडे दुर्लक्ष केल्यास गँगरीन उद्‌भवू शकते.
 • अपघातजन्य इजा ः एखाद्या अपघातात जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात शरीरभर जखमा, फ्रॅक्चर्स होतात, किंवा युद्धात बंदुकीच्या गोळ्या लागून, बॉम्बस्फोटात सापडल्यामुळे खूप जखमा होतात, आणि या जखमा वेळेवर योग्य आणि पूर्ण औषधोपचार न होऊन उघड्या राहतात, तेव्हा त्या जखमांत जंतुसंसर्ग होऊन गँगरीन होण्याची दाट शक्यता असते. 

गँगरीनचे प्रकार

 • ड्राय गँगरीन ः गँगरीन झालेल्या भागावरची त्वचा कोरडी आणि सुरकुतल्यासारखी दिसते. तिचा रंग तपकिरी, निळसर जांभळा किंवा काळा पडतो. अनियंत्रित मधुमेह असल्यास किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी जास्त वाढल्यामुळे रक्तवाहिन्या कडक बनल्यामुळे (अॅथेरोस्क्लेरोसिस) या प्रकारचे कोरडे गँगरीन होते. यात जखमा होऊन त्यातून पाणी येत नाही किंवा जंतुसंसर्ग होऊन दुर्गंधी येत नाही.
 • वेट गँगरीन ः या प्रकारात अवयवावर जखमा होऊन त्यात जंतूसंसर्ग होतो आणि त्यातून दुर्गंध येणारा स्त्राव येऊ लागतो. ओल्या जखमा आणि त्यातून वाहणाऱ्या स्त्रावामुळे याला ‘वेट गँगरीन’ म्हणतात.
 • गॅस गँगरीन ः अपघातजन्य जखमांमध्ये किंवा शस्त्रक्रिया केल्यानंतर होणाऱ्या जखमांचा रक्तपुरवठा बंद होऊन त्यात ‘क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स’ या जिवाणूचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास गॅस गँगरीन उद्‌भवते. हा प्रकार शरीरात खोलवर असलेल्या स्नायूंमध्ये निर्माण होतो. सुरुवातीला वरची त्वचा पूर्ण नॉर्मल दिसते. पण जसजसा जंतुसंसर्ग वाढू लागतो, तसतसा त्वचेचा रंग अगोदर फिकट आणि मग काळपट, जांभळट आणि लाल दिसू लागतो. ‘क्लॉस्ट्रिडियम परफ्रिन्जेन्स’ जिवाणूंमुळे वायू आणि द्रव स्वरूपातील विषारी पदार्थ त्वचेखाली निर्माण केले जातात. त्यामुळे त्वचा फुगीर बनते आणि ती वायुरूप तसेच द्रव पदार्थाने भरलेली असते. तिच्यावर बोटांनी दबाव दिल्यावर, त्या आत भरलेल्या वायूमुळे त्यातून कचकच असा आवाज येतो. गॅस गँगरीन ही एक गंभीर आणि आपत्कालीन परिस्थिती असते आणि त्यात रुग्ण दगावू शकतो.
 • अंतर्गत गँगरीन ः शरीराच्या अंतर्गत भागातील अवयवांमध्ये हा प्रकार आढळून येतो. इंटेस्टायनल ऑबस्ट्रक्शनमध्ये लहान आतड्यास पीळ पडून त्याची हालचाल बंद झाल्यास, इंटूससेप्शनमध्ये आतड्याचा एक भाग अंतर्गत भागात घुसल्यास, अपेंडिक्समध्ये सूज येऊन जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्यास, असाच काहीसा प्रकार हर्नियामध्ये आतड्याचा एखादा भाग अडकल्यास, पित्ताचे खडे पित्ताशयाच्या नलिकेत अडकून पित्ताशयाच्या पिशवीला सूज येऊन त्या भागातील रक्तपुरवठा बंद पडतो आणि गँगरीन होते. यातही वेळेवर उपचार न झाल्यास रुग्णाच्या प्राणावर बेतू शकते.
 • फॉरनिअर्स गँगरीन ः पुरुषांच्या तसेच स्त्रियांच्या जननेंद्रियांमध्ये आणि जननेन्द्रियांच्या बाजूच्या भागात (पेरिनीअम) त्याचप्रमाणे गुदद्वार आणि त्याच्या बाजूच्या भागात (पेरीएनल) होणाऱ्या गँगरीनला फॉरनिअर्स गँगरीन म्हणतात. यात जननेन्द्रियावरील आणि गुदद्वाराभोवतालच्या मांसल भागामध्ये जंतुसंसर्ग होतो, सूज येते, तो भाग पूर्ण सोलवटून निघतो. वरवर दुर्लक्षिल्या जाणाऱ्या या आजारात रुग्ण गंभीर होऊन दगावण्याची शक्यता २० ते ४० टक्के असते. 
 • मेलेनीज गँगरीन ः शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या या प्रकारात जंतुसंसर्ग वेगाने वाढत जातो. शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यात वेदनादायी फोड निर्माण होतात आणि ते जलदगतीने पसरत जातात.  

गँगरीन होण्याचा धोका कोणाला असतो?

 • गँगरीन होण्याची जास्त शक्यता खालील गोष्टींवर असते.
 • मधुमेह
 • अथेरोस्क्लेरोसिस- कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असल्यामुळे कडक होणाऱ्या रक्तवाहिन्यांचा आजार
 • मोठ्या प्रमाणात झालेल्या जखमा किंवा शस्त्रक्रिया
 • धूम्रपान
 • स्थूलत्व
 • प्रतिकारप्रणाली कमकुवत बनवणारे आजार- 
 •  एचआयव्ही
 • नशील्या औषधांची इंजेक्शने अवैधपणे शिरेत घेणारे  व्यसनी 
 • कोरोनानंतर होणारी गुंतागुंत

प्रतिबंधक उपाय
मधुमेही व्यक्तींनी कोणत्याही जखमा झाल्यास त्यांचा काटेकोरपणे इलाज करावा. विशेषतः पायांना जखमा होऊ न देण्याची काळजी घ्यावी, पायात चप्पल किंवा स्लीपर वापरू नयेत कारण चपलेतून टाचा बाहेर जातात आणि त्यांना जखमा होतात. त्याऐवजी बूट किंवा सँडल्स वापरावेत. कोणत्याही परिस्थितीत अनवाणी चालू नये. तसेच पायांना जळवाताच्या भेगा किंवा पायाच्या बोटांच्या बेचक्यांमध्ये चिखल्या झाल्यास त्वरित उपाय करावेत. पायांची स्वच्छता ठेवावी आणि पाण्यात काम केल्यावर पाय प्रत्येक वेळेस पूर्ण कोरडे करावेत.

लठ्ठपणा असल्यास पायांच्या रक्तवाहिन्यांवर दबाव येऊन पायाचा आणि पायाच्या बोटांचा रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे वजन कमी ठेवावे. धूम्रपान आणि तंबाखूचे व्यसन टाळावे. अतिथंड प्रदेशात पायांच्या किंवा हातांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावून ‘फ्रॉस्ट बाईट’ नावाचा विकार होतो. ज्यात हमखास गँगरीन होते. त्यामुळे अशा तपमानाच्या प्रदेशातील व्यक्तींनी पायामध्ये लोकरीचे जाड मोजे वापरावेत आणि जाड चामड्याचे बूट वापरावेत.

निदान
रुग्णाच्या बाह्य तपासणीवरूनच निदान होते. रक्ताच्या चाचण्या, एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय यामुळे आतील जखमा समजू शकतात. पोटाच्या सोनोग्राफीमध्ये पोटातील संभाव्य गँगरीन समजू शकते. रक्तवाहिन्यांमधील अडलेला रक्तप्रवाह डॉपलर तपासणीत समजू शकतो.

उपचार
गँगरीनचा उपचार करताना अतिशय उच्च पातळीची प्रतिजैविके वापरली जातात. रुग्णाच्या रक्तदाबासाठी सलाईन आणि इतर औषधे वापरावी लागतात. गँगरीन झालेला भाग कापून विलग करणे आणि वेळ आल्यास त्या भागाचे विच्छेदन करून तो अवयव काढून टाकावा लागतो. हायपरबारिक ऑक्सिजन पद्धतीत एका बंदिस्त पेटीवजा उपकरणात रुग्णाला बसविले किंवा झोपविले जाते. त्यात अतिशय उच्च दाबाने प्राणवायू सोडला जातो. दहा ते वीसवेळा हा उपचार केल्यास गँगरीनची वाढ थांबवता येते. जर त्या भागातील रक्तवाहिन्या आणि पेशी निर्जीव झाल्या नसल्यास त्या पुन्हा कार्यक्षम बनू शकतात.

कोणत्याही साध्या जखमांकडे दुर्लक्ष केल्याने होणारा हा गंभीर आजार म्हणजे आरोग्याची हेळसांड केल्याबद्दल होणारी दुर्दैवी आणि कठोर शिक्षा असते.

संबंधित बातम्या