डोळ्यांखालची काळी वर्तुळे

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 24 मे 2021

आरोग्य संपदा

आजच्या धकाधकीच्या जीवनात डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसणे खूप सामान्य गोष्ट आहे. पण ही काळी वर्तुळे टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करताना, कुठल्यातरी अशास्त्रीय ऐकीव माहितीचा आधार घेण्याऐवजी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे ठरते.

एखाद्या खूप छान दिसणाऱ्या लहानग्याला दृष्ट लागू नये म्हणून त्या बाळाच्या गालावर काळी तीट लावण्याची पद्धत गेल्या पिढीपर्यंत सर्रास प्रचलित होती. तो काळा ठिपका लावल्याने ते बाळ उलट जास्तच गोड दिसायचे. पण एखाद्या सुंदर युवतीच्या किंवा रुबाबदार पुरुषाच्या डोळ्यांखाली जर काळी वर्तुळे असतील, तर त्यांच्या देखणेपणाला नक्कीच गालबोट लागल्यासारखे वाटते. 

अनेकांचा असा समज असतो की खूप टीव्ही पाहिल्याने किंवा संगणकावर तासनतास नजर खिळवून काम केल्यामुळे ही ‘गडद मंडले’ तयार होतात. पण प्रत्यक्षात डोळ्यांचा आणि सौंदर्याचा बाज बिघडवणारा हा काळ्या रंगाचा शिडकावा म्हणजे अनेक महत्त्वाच्या शारीरिक आजारांचे लक्षण असू शकते.

आपल्या डोळ्यांच्या खाली आणि गालांच्या वर जी त्वचा असते, ती खूप नाजूक आणि कमालीची पातळ असते. त्या त्वचेला रक्तपुरवठा करणाऱ्या खूप सूक्ष्म अशा केशवाहिन्यांचे एक जाळे त्यामध्ये असते. त्या केशवाहिन्यांमधून रक्त वाहताना त्यांच्या बाह्य आवरणातून काही लाल रक्तपेशी बाहेर पडतात आणि त्वचेखाली जमा होतात. केशवाहिनीच्या बाहेर पडलेल्या या पेशी मृत होतात. त्याठिकाणी काही किण्वक रस निर्माण होतात आणि त्या रक्तपेशींचे विघटन होऊ लागते. विघटित होताना या लाल रक्तपेशीतून एक निळसर काळे रंगद्रव्य निर्माण होते. त्याच्या रंगामुळे ही नाजूक त्वचा काळी दिसू लागते. 

कारणे
वाढते वयोमान
डोळ्यांखालची त्वचा तशीही नाजूक असतेच, पण वृद्धापकाळात ती जरा जास्तच पातळ होते आणि तिच्या खालच्या केशवाहिन्या अधिकच ठसठशीत होतात. त्यामुळे उतार वयात अशी काळी वर्तुळे डोळ्यांखाली दिसू लागतात.

आनुवंशिकता
एखाद्या कुटुंबात अशी काळी वर्तुळे पिढ्यानपिढ्या नजरेस येतात. आनुवंशिकता आणि जनुकीय कारणांमुळे असे परिणाम अगदी तरुण वयातसुद्धा दिसू लागतात.

अॅनिमिया
डोळ्यांखालच्या या गडद वर्तुळांचे हे एक मुख्य आणि सर्वसामान्य कारण असते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होते, तेव्हा त्या व्यक्तीला अॅनिमिया झाला आहे असे म्हणतात. बऱ्याच वेळेस लोहाची कमतरता हे याचे कारण असते. अशा व्यक्तींच्या रक्तातील लाल पेशी आकाराने लहान असतात आणि म्हणून त्या रक्तवाहिनीमधून सहज बाहेर पडतात. हा प्रकार डोळ्यांखालील त्वचेत प्रकर्षाने घडतो आणि अशी काळसर वर्तुळे तयार होतात.     

जीवनसत्त्वांचा अभाव
कुपोषित व्यक्तींच्या डोळ्यांखाली निश्चित अशी काळी वर्तुळे दिसतात. अशा व्यक्तींना समतोल आहारासोबत ‘अ’, ‘क’, ‘इ’ आणि ‘के’ जीवनसत्त्वे योग्य प्रमाणात दिल्यास हे दुश्चिन्ह दूर होऊ शकते.

पाण्याची कमतरता
ज्या व्यक्ती आवश्यक प्रमाणात पाणी पीत नाहीत, त्यांच्यामध्ये हे लक्षण सहजतेने दिसून येते.  

पुरेशी झोप न मिळणे आणि थकवा
अहोरात्र काम, जागरणे आणि अपुरी झोप मिळाल्याने अनेकांना कमालीचा शारीरिक थकवा येतो. परिणामतः त्यांची डोळ्यांखालील त्वचा फिकट बनते. त्यामुळे त्याखालचा रक्तप्रवाह जास्त दृश्य स्वरूपात येतो आणि तिचा रंग आतील रक्तामुळे प्रथम लालसर आणि नंतर निळसर काळा बनत जातो.

व्यसने
मद्यपानाने शरीरातील क्षार व पाणी कमी होते. त्यामुळे ही गडद मंडले तयार होतात. याच कारणामुळे, मोठ्या प्रमाणात कॅफीन असलेली कोला पेये, शीत पेये, चहा-कॉफी यांचे सेवन जास्त होत असल्यास असाच परिणाम दिसून येतो. सतत धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये ही वर्तुळे काही काळानंतर हमखास दिसायला लागतात.

कडक ऊन
तप्त उन्हामुळे कातडी भाजून निघते. यात त्वचेमध्ये मेलॅनिन नावाचे रंगद्रव्य तयार होते. हे रंगद्रव्य जर बाह्य त्वचेत जमा झाले तर तिथे पिवळसर रंग येतो. पण जेव्हा हा रंग आणखी खोलवर परिणाम करत अंतर्त्वचेत जमा होत जातो तेव्हा ती काळी पडते. डोळ्यांखालील त्वचा अगदी पातळ असल्याने ती लवकर काळी पडते आणि शरीराच्या इतर भागातील कातडीपेक्षा जास्त गडद बनते. 

संप्रेरके
शरीरातील संप्रेरकांच्या म्हणजे हार्मोन्सच्या परिणामाने या डोळ्यांखालील त्वचेचा रंग काळा पडतो. विशेषतः स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या काळात, गरोदरपणात हा परिणाम जाणवतो. मासिक पाळीला अंगावरून जास्त जात असेल, पाळी अनियमित येत असेल तरीही हा परिणाम काही स्त्रियांत आढळतो.

अॅलर्जी
एखाद्याला काही गोष्टींचे वावडे असेल आणि ती वस्तू खाण्यात आली किंवा तिचा शरीराशी संपर्क आला तर खूप खाज येते. डोळ्यांशी अशा गोष्टींचा संबंध आला तर डोळ्यांच्या खोबणीभोवताली खाज येते. असे अनेकदा होत राहिले आणि डोळे सातत्याने खूप चोळले गेल्यास ही त्वचा काळी पडून वर्तुळे दिसू लागतात.

सर्दी
सतत सर्दी होऊन नाक चोंदलेले राहात असेल तर त्या भागातील रक्तवाहिन्या प्रसारण पावून हे लक्षण दिसू लागते. 

यकृताचे आजार
काविळीमध्ये यकृतातील रंगद्रव्ये जास्त प्रमाणात शरीरात उत्सर्जित होतात. त्यामुळे डोळ्यांखाली काळसरपणा येतो.

त्वचाविकार
इसब, अॅटोपिक डर्माटायटीस अशा आजारांमुळे काळी वर्तुळे येतात.

उपचार
डोळ्यांखालच्या त्वचेत काळ्या सावल्या भेडसावू लागल्या की अनेकदा मेकअपचा वापर करून हा काळा रंग लपविण्याचा प्रयत्न केला जातो. हेअर डाय वापरून केस काळे करण्यासारखाच पण अगदी उलट असा हा तात्पुरता आणि वरवरचा इलाज असतो. ‘कन्सीलर’ सारख्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून डोळ्यांखालची त्वचा इतर चेहऱ्याच्या त्वचेशी समरस करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काळ्या वर्तुळांवरील उपचारात वैद्यकीय सल्ला घेऊन प्रथम त्याचे कारण शोधावे लागते. त्यानंतर त्यावर उपाय योजना करणे जास्त गरजेचे असते. ती करून न भागल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा किंवा मान्यताप्राप्त कॉस्मेटिक (सौंदर्यविशेषज्ञ) वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे निश्चितच फायद्याचे ठरते. यामध्ये अनेक उपचारपद्धतींचा समावेश होतो. 

  • त्वचेचा काळा रंग घालवण्यासाठी काही मलमे, लेझर उपचार केला जातो. केमिकल पीलिंग तंत्राने त्वचेचे काळे थर हळूहळू विलग केले जातात.
  • इंजेक्शनद्वारे फीलर्स टोचून काळ्या रंगाच्या कडा क्रमाने अस्पष्ट केल्या जातात. 
  • एका आधुनिक तंत्रात रुग्णाच्या शरीरातील चरबीचे रोपण करून त्या भागात नव्याने रक्तवाहिन्या तयार केल्या जातात. 
  • स्टेमसेल्स वापरून नॅनो चरबीरोपण करण्याचे तंत्रसुद्धा विकसित झाले आहे.
  • फ्रॅक्टोरा नावाच्या एका उपचारात रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जा वापरून त्वचेमध्ये खोलवर पसरलेले काळे रंगद्रव्य नष्ट केले जाते. 
  • व्हीनस फ्रीझ, व्हीनस व्हिवा अशी तंत्रेही याकरिता उपलब्ध आहेत.

डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांनी आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केल्यावर फक्त चिंता करत बसून, स्वतःच काहीतरी उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला घ्यावा. मात्र यामध्ये कमर्शिअल पद्धतीने कॉस्मेटिक उपचार करणाऱ्या व्यावसायिकांपेक्षा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. यात प्रथम कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केली जाते. उदा. अॅनिमियामुळे काळी वर्तुळे आलेली असल्यास रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजेच पर्यायाने लोह आणि जीवनसत्वे वाढवावी लागतात. त्यासाठी योग्य प्रमाणात समतोल आणि संतुलित आहार आवश्यक असतो.  

संतुलित आहाराला कॅल्शिअम, प्रथिने आणि लोह असलेल्या आहाराला प्राधान्य द्यावे. आहारामध्ये तंतूमय पदार्थ म्हणजेच फायबर जास्त असावे. त्याकरिता पालेभाज्यांचा नियमित समावेश करावा. दूध, मर्यादित प्रमाणात साजूक तूप रोज सेवन करावे. सर्व प्रकारची फळे आहारात असली पाहिजेत. तेलकट, तिखट, मसालेदार चमचमीत पदार्थ, फास्टफूड, जंकफूड अतिप्रमाणात सेवन करू नये. समतोल आहारात पाणी हा घटकसुद्धा योग्य प्रमाणात ठेवला पाहिजे. त्यासाठी दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

आहाराबरोबरच भरभर चालणे, धावणे, सायकलिंग, पोहणे असे शरीरातील प्राणवायू वाढवणारे अॅनेरोबिक व्यायाम करावेत. शक्य असल्यास मैदानी खेळ, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा खेळांमध्ये भाग घ्यावा, योग्य पद्धतीने केलेली योगासने, प्राणायाम, भ्रामरी, ध्यान करावे. या विविध व्यायाम पद्धती अनुसरल्यास चेहरा निरोगी आणि सतेज राहतो आणि या काळ्या वर्तुळांपासून सुटका मिळते.
झोप आणि विश्रांती यांचे गणित योग्य पद्धतीने बसवावे. साधारणपणे ७ ते ८ तास योग्य वेळी झोप घेतल्यास काळ्या वर्तुळांचा प्रश्न सहसा उद्‌भवत नाही, जागरणे, उशिरा झोपणे, कमी झोपणे याप्रमाणेच जास्त झोपणेही काळ्या वर्तुळांना निमंत्रण देऊ शकते. आजच्या आधुनिक जीवनात एकीकडे स्वतःच्या बाह्यरूपाबाबत लोक अतिशय दक्ष होताना दिसत आहेत; पण त्याचवेळेस आजच्या धकाधकीच्या जीवनात अशी डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसणेसुद्धा खूप कॉमन झाले आहे. पण ती टाळण्यासाठी आणि त्यावर उपचार करताना, कुठल्यातरी अशास्त्रीय ऐकीव माहितीचा आधार घेण्याऐवजी योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन त्यावर प्रतिबंधक उपाय करणे महत्त्वाचे 
ठरते.

संबंधित बातम्या