दुधाची आरोग्य कथा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 31 मे 2021

आरोग्य संपदा

लहान मुलांच्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि प्रौढांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लागणारे बहुतांश अन्नघटक दुधात असतात. त्यामुळे दुधाला पूर्णान्न असेही म्हणतात. यादृष्टीने दुधाचे आरोग्यविषयक फायदे लक्षणीय ठरतात.

निरामय आरोग्यासाठी समतोल आहाराची नितांत आवश्यकता असते. या आहारात शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असलेले सर्व अन्नघटक, जीवनसत्वे आणि पाण्याचे अस्तित्व असावे लागते. अगदी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकासाठी, त्याच्या पहिल्या चार महिन्यात मातेचे स्तनपान हाच एकमेव समतोल आहार असतो. यावरूनच दुधाचे आपल्या आहारातले स्थान अधोरेखित होते. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या लहानग्यापासून तारुण्यापर्यंत आणि त्यांनतर प्रौढावस्थेपासून जराजर्जर वार्धक्यापर्यंत दूध हा प्रत्येकाचा आहारातला महत्त्वाचा अन्नपदार्थ मानला जातो.

दुधातील अन्नघटक
कोणत्याही प्रकारच्या एक कप दुधामध्ये (२४० ग्रॅम) सर्वसाधारणपणे : कॅलरीज- १४६, प्रथिने ८ ग्रॅम, स्निग्ध पदार्थ ८ ग्रॅम असतात. तर चयापचय क्रियेत लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या जीवनसत्त्वात, ‘ड’ जीवनसत्त्व- २४ टक्के, ‘ब’ १२ जीवनसत्त्व- १८ टक्के, रायबोफ्लेविन- २६ टक्के, जीवनसत्त्व ‘बी१’ असतात. तसेच शरीराला लागणाऱ्या खनिजांमध्ये कॅल्शिअम २८ टक्के, फॉस्फरस २२ टक्के, सेलेनियम १३ टक्के, पोटॅशियम १० टक्के, झिंक अशी रेलचेल असते. याशिवाय कॉन्जुगेटेड लिनोलिक अॅसिड्स, ओमेगा-३-फॅटी अॅसिड्स अशी अनेक प्रकारची फॅटी अॅसिड्स आणि इतर पोषक घटक मुबलक असतात. मात्र गाईच्या आणि म्हशीच्या दुधात थोडे फरक असतात. शेळीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असते पण फॅटी अॅसिड्स भरपूर असतात.

पूर्वापार पद्धतीने फक्त गवत चरणाऱ्या गायींचे कच्चे दूध सेवन करणे हेच शरीराला अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे कच्चे दूध जंतुविरहित करण्यास तापवल्याने किंवा पाश्चराईज केल्याने दुधातील उपयुक्त जीवजंतू, इम्युनोग्लोबिन्स, एन्झाइम्स नष्ट होतात, कच्च्या दुधातील लायपेज, फॉस्फेटेज आणि जीवनसत्त्वेसुद्धा कमी होतात. जीवनसत्त्व ब-६ हे २० टक्क्यांनी  कमी होते.

 • मातेचे दूध : मातेच्या स्तनपानातून तिच्या बाळाला मिळणाऱ्या दुधात पाणी हा घटक ९० टक्के असतो. बाळाच्या शरीरातील पाण्याची गरज त्यानेच भागवली जाते. मातेच्या दुधातून मिळणारे पाणी साहजिकच जंतूविरहित असल्याने पहिले ३-४ महिने बाळाला पाणी न पाजण्याचा सल्ला अनेक बालरोगतज्ज्ञ देतात. त्यामुळे मुलांचा पाण्यातून पसरणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.
 • पिष्टमय पदार्थ किंवा कार्बोहायड्रेट्समधून बाळाला ऊर्जा मिळते. याकरिता दुधातील लॅक्टोज ही साखर उपयुक्त असते. गाईच्या दुधापेक्षा मातेच्या दुधात लॅक्टोज जास्त प्रमाणात असते. तसेच दुधातील ओलिगोसॅकराईड्समुळे बाळाच्या आतड्यातील लॅक्टोबॅसिलस या आवश्यक जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे बाळामध्ये आढळणारा जुलाबाचा विकार टळतो.
 • स्निग्ध पदार्थ : याचे प्रमाण केवळ चार टक्के असते, मात्र बाळाला लागणाऱ्या ऊर्जेसाठी आणि आवश्यक वजनवाढीसाठी ते आवश्यक असते. याचबरोबर मेंदू, मज्जासंस्था आणि दृष्टी विकसित करणारी आवश्यक फॅटी अॅसिड्सदेखील असतात.
 • प्रथिने : बाळाच्या शरीरातील हार्मोन्स, एन्झाइम्स, पाचक रस, प्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी यांची गरज असते. लॅक्टोफेरीन या घटकामुळे बाळाच्या आतड्याला होणारे विकार रोखले जातात.
 • प्रतिकार प्रणाली : बाळ जन्मल्यावर मातेने दिलेल्या पहिल्या स्तनपानातून बाळाला इम्युनोग्लोबुलीनच्या स्वरूपात असंख्य आजारांविरोधी प्रतिकार शक्ती प्राप्त होते. याशिवाय अनेक हार्मोन्स, पाचक रस, जीवनसत्वे आणि इतर अन्नघटक बाळाला मातेच्या दुधातून मिळत असते. साधारणपणे बाळ एक ते दोन वर्षाचे होईपर्यंत मातेने बाळाला स्तनपान देणे आवश्यक असते.   

दुधाचे आरोग्यविषयक फायदे
लहान मुलांच्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि प्रौढांच्या आरोग्य उत्तम राहण्यासाठी लागणारे बहुतांशी अन्नघटक दुधात असतात. त्यामुळे दुधाला पूर्णान्न असेही म्हणतात. यादृष्टीने दुधाचे आरोग्यविषयक फायदे लक्षणीय ठरतात.

 • १. उत्तम दर्जाची प्रथिने : दुधामध्ये प्रथिनांचा समृद्ध स्रोत असतो, शरीराची वाढ आणि विकास, चयापचय क्रियेत नादुरुस्त झालेल्या पेशींचे पुनरुज्जीवन, प्रतिकार प्रणालीचे नियंत्रण अशा बऱ्याच महत्त्वपूर्ण कार्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. शरीरांतर्गत असंख्य क्रिया योग्य पातळीवर कार्यरत राहण्यासाठी प्रथिनांमधील अमायनो अॅसिड्सचा वापर होत असतो. शरीराच्या या कार्यासाठी एकूण नऊ अमायनो अॅसिड्स ही अत्यावश्यक मानली जातात. ही सर्व दुधामध्ये उपलब्ध असतात. 
 • केसिन आणि व्हे प्रोटिन्स ही उच्च-गुणवत्तेची प्रथिने दुधात मुबलक प्रमाणात असतात. गाईच्या दुधात तर केसिन ८० टक्के आणि व्हे प्रोटिन्स २० टक्के असतात. व्हे प्रोटिन्समध्ये ल्युसिन, आयसोल्युसिन आणि व्हॅलिन या आरोग्यासाठी आवश्यक अमायनो अॅसिड्सच्या साखळ्या जोडलेल्या असतात. व्हे प्रोटिन्स आणि त्यातील आवश्यक अमायनो अॅसिड्स स्नायूंचे आकार आणि शक्ती वाढणे, स्नायूंची झीज भरून काढणे आणि व्यायामाकरता लागणारी ऊर्जा पुरवणे ही कार्ये करतात. त्यामुळे बलसंवर्धनासाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांना ती उपयुक्त ठरतात. अॅथलेट्समधील वेगवान धावण्या-पळण्यामुळे होणारी स्नायूंची झीजही त्यामुळे भरून निघते. प्रौढ वयातील व्यक्तींना त्यांच्या स्नायूंच्या शक्तीसाठी उपयुक्त ठरते तर उतारवयात झडणाऱ्या स्नायूंची झीजदेखील दुधामधील व्हे प्रोटीन्सने रोखली जाते. व्यायाम केल्यावर नियमितपणे दूध घेतल्यास, सर्व वयातील व्यक्तींच्या स्नायूंची झीज तर भरून निघतेच, पण व्यायामानंतर होणाऱ्या स्नायूंच्या वेदनादेखील कमी होतात.
 • २. हाडांचे आरोग्य : दूध नियमितपणे घेतल्यास हाडांचे आरोग्य उत्तम राहते. हाडे मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशियम, प्रथिने, व्हिटॅमिन के-२ अशा पोषक तत्त्वांबरोबरच प्रथिनेही आवश्यक असतात. हाडांमध्ये घटकांमध्ये सुमारे ५० टक्के प्रथिने असतात आणि वस्तुमानामध्ये ती एक तृतीयांश असतात. खनिजे, जीवनसत्वे आणि प्रथिने यांचे शक्तिशाली संयोजन दुधामध्ये असते. शरीरातील ९९ टक्के कॅल्शिअम आपल्या हाडांमध्ये आणि दातांमध्ये साठवले जात असते. त्यामुळे नियमित दूध घेतल्याने हाडांप्रमाणे दातही मजबूत राहतात. लहान मुलांच्या शरीराची वाढ आणि त्यांची उंची आणि शरीरसौष्ठव वाढण्यासाठी वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत नियमित दूध घेणे आवश्यक ठरते. आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश असल्यास ऑस्टिओपोरोसिस (हाडे ठिसूळ होणे) सारख्या हाडांच्या आजारापासून बचाव होऊ शकतो. वृद्धांमध्ये हाडे ठिसूळ झाल्यामुळे किरकोळ पडल्यावरसुद्धा फ्रॅक्चर होण्याची जोखीम मोठ्या प्रमाणात असते. कपभर दूध नियमित घेण्याने ती कमी होऊ शकते. गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या मातांना दूध घेणे आवश्यक असते.
 • ३. वजनवाढ रोखणे : स्किम्ड दूध तसेच टोन्ड दूध घेण्याने वजनवाढ रोखली जाऊ शकते.
 1. अमेरिकेतील एका संशोधनानुसार लहान वयातील मुलांना केवळ दुधातून मिळणारे स्निग्ध पदार्थ दिले आणि इतर चरबीयुक्त पदार्थ रोखले तर लहान वयातील स्थूलत्व रोखता येते.   
 2. आणखी एका संशोधनानुसार प्रौढ वयातील व्यक्तींना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दिल्यास वजनवाढ होत नाही आणि स्थूलत्व रोखता येते. 
 3. दुधात भरपूर प्रथिने असल्याने दूध प्यायल्यावर पोट भरल्याचे समाधान मिळते आणि अतिरिक्त खाण्याची खा-खा सुटत नाही. 
 4. दुधातील लिनोलाईक अॅसिडमुळे शरीरातील चरबी निर्माण करणाऱ्या प्रक्रियेला रोखले जाते आणि चरबीचे विघटन होण्याची क्रिया वेगवान होते.
 5. दुधात असलेल्या कॅलशिअममुळे चरबीचे अभिशोषण कमी होऊन अतिरिक्त वजनवाढ होण्याचा धोका कमी होतो. 

दुधाबाबत गैरसमज 
अनेकांना दुधामुळे पोटात गुबारा धरतो, कफ वाढतो, जुलाब होतात असे समज असतात. ते चुकीचे आहेत. केवळ दुधातील लॅक्टोज या शर्करेचे ज्यांना वावडे असते अशांनाच पोटात गॅस होणे किंवा जुलाब होण्याचा त्रास होतो. अशा व्यक्तींचे प्रमाण अत्यल्प असते. 

दुधाने कफ वाढणे म्हणजे नाकात किंवा घशात श्लेष्म होतो असा समज असतो. हा पूर्ण चुकीचा असतो. दूध प्यायल्यावर उलटी होते असा समज असणाऱ्या व्यक्ती लहानपणी दूध घेणे टाळण्यासाठी अशी कारणे सांगतात आणि पुढे त्यांची तीच भावना राहते. हे बरेचसे मानसिक असते.

उलट थंड दुधामुळे आम्लपित्ताने होणारी उलटी कमी होऊ शकते. अॅसिडिटी आणि अल्सरची औषधे वैद्यकीय विश्वात येण्यापूर्वी सलाईनच्या बाटलीतून नाकावाटे तोंडात एक नळी टाकून थंड दूध रुग्णाच्या पोटात दिले जायचे. आजही अॅसिडिटीने छातीत जळजळ होत असल्यास थंड दूध घेणे उपयुक्त ठरते.  

दुधाचे शुद्धीकरण
कच्च्या दुधात पचनसंस्थेला संक्रमित करणारे जिवाणू असू शकतात. त्यामुळे दूध शुध्द करण्याकरिता घरी तापवले जाते. याशिवाय व्यावसायिक पद्धतीत-
पाश्चराईझ्ड दूध : थोर फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चरने ही पद्धत शोधली. यामध्ये साधारणतः ६३ अंश सेंटिग्रेडपर्यंत ३० मिनिटे किंवा ७२ ते ७४ अंश सेंटिग्रेडला किमान १५ सेकंद तापवून ते निर्जंतुक केले जाते. नंतर लगेचच १० अंश सेंटिग्रेड तपमानाखाली थंड करून विक्रीसाठी पोचवले जाते. यात वेगवेगळ्या उपपद्धतीदेखील आहेत.
निर्जंतुकीकरण : यात एका बंद उपकरणात ११५ अंशापर्यंत १५ मिनिटे केले जाते किंवा १३० अंशापर्यंत एक सेकंद तापमान प्रवाही दुधासाठी वापरले जाते. त्यानंतर ते यांत्रिक पद्धतीने सीलबंद करून ग्राहकांना पोचवले जाते. हे दूध रेफ्रीजरेटरच्या बाहेरही साधारणपणे पंधरा दिवस टिकू शकते.

दुधातील भेसळ
‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने भारतातील प्रत्येक राज्यात, घरोघरी वापरल्या जाणाऱ्या दुधाच्या शुद्धतेबाबत एक सर्वेक्षण काही वर्षांपूर्वी केले गेले. या सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील सुमारे जवळपास सत्तर टक्के दूध भेसळयुक्त असते. उत्तरप्रदेशात याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळले होते. दुधातील या भेसळीचे प्रकार पाहू जाता, त्यात तीन मुख्य प्रकार आढळतात. पहिला अशुद्ध पाणी मिसळणे, दुसरा म्हणजे डिटर्जन्टस, युरिया, कॉस्टिक सोडा, फॉरमॅलिन, अमोनिअम सल्फेट, बेन्झॉईक अॅसिड, सॅलीसायलिक अॅसिड, स्टार्च, तवकील, मेलामाईन अशी वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि काही अयोग्य पदार्थ मिसळणे आणि तिसरा प्रकार म्हणजे बेकायदा पद्धतीने बनवलेले रासायनिक दूध. दुधातल्या भेसळीमुळे आरोग्यावर परिणाम तर होतातच पण मूत्रपिंडे, यकृत, आतडी यांचे गंभीर आजार त्याप्रमाणे अनेक प्रकारचे कर्करोग उद्‌भवू शकतात.

संबंधित बातम्या