उलटीची उलट तपासणी

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 7 जून 2021

आरोग्य संपदा

उलटी हे लक्षण अनेक शारीरिक संस्थांच्या विकारात आढळते. त्यामुळे रुग्णाला फक्त उलटी कमी करण्याची प्राथमिक औषधे घेऊन चालत नाही.

मळमळणे आणि उलटी होण्याचा भयाण अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी आलेलाच असतो. पोटात प्रचंड ढवळून येते, छातीत कसेतरी होते, तोंडातून लाळ पाझरू लागते, घाम फुटतो, डोकं सुन्न होते, गरगरू लागते, डोळ्यापुढे अंधाऱ्या येतात.... क्षणार्धात असे बरेच काही सुरू होते आणि मग आतडी पिळवटून टाकत उलटी होते. आपले सगळे अस्तित्व हेलावून टाकणारा प्रसंग असतो तो.

तसे पाहिले, तर अनेकदा आदल्या दिवशी काही चुकीचे खाल्ले, प्यायले असेल तरच उलटी होते असा सर्वसाधारण समज आहे. पण उलटी ही फक्त शरीरातल्या पचनसंस्थेशीच संबंधित असते असे नाही, तर मेंदू आणि मज्जासंस्था, मूत्रपिंडाचे आजार, काही विशेष जंतुसंसर्ग, काही औषधांचा दुष्परिणाम, क्वचित प्रसंगी विषबाधा, मानसिक आजार, वेदना यांच्याशीदेखील निगडित असू शकते. 

मेंदू आणि मज्जासंस्थेचे विकार
 मेंदू आणि मज्जासंस्थांच्या काही विशिष्ट आजारांमुळे ज्या उलट्या होतात, त्या रुग्णाच्या दृष्टीने खूप गंभीर असतात. जर एखाद्याला अपघातात डोक्याला मार लागला आणि मेंदूला इजा झाली तर उलट्या होतात. मेंदूच्या बाहेरील आवरणांना सूज आली, मेंदूच्या आतील भागांमधील दबाव वाढला, मेंदूत रक्तस्राव झाला किंवा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीत गुठळ्या होऊन मेंदूचा काही भाग निर्जीव झाला तरी त्या रुग्णाला उलट्या होऊ शकतात. 

आपल्या मेंदूच्या विविध भागांना जोडणाऱ्या पोकळ्यातून एक प्रकारचा द्राव फिरत असतो. या पोकळ्यांमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला, तर अंतर्गत असलेला द्रावाचा दबाव खूप वाढतो आणि तो मेंदूवर परिवर्तित होतो. लहान मुलांमध्ये यामुळे डोक्याचा आकार वाढतो, याला हायड्रोकीफॅलस म्हणतात. अशा रुग्णाला उलट्या होत राहतात. काही रुग्णांत मेंदूतल्या या द्रावाचा दबाव अकारण वाढतो, याला सुडो ट्यूमर सेरेब्राय म्हणतात. या सर्व विकारात कमालीच्या उलट्या व मळमळ होत राहते.
मेंदूचे ट्यूमर, मेंदूला तसेच येणारी सूज म्हणजे एनकेफेलायटीस, त्यावरील आवरणांची सूज म्हणजे मेनिनजायटीस, मेंदूत होणारा पू, अर्धशिशी, अपस्माराचे झटके अशा कारणांनी उलट्या होतात. काही रुग्णांत कानाच्या आतील भागाचे आजार असतील तरी असे त्रास होतात. यात व्हेस्टीब्युलायटीस, लॅबिरीन्थायटिस, मेनायर्स डिसीज हे आजार येतात. ज्यांना गाडी किंवा जलप्रवासाताली बोट लागण्याचा ‘मोशन सिकनेस’ हा विकार असतो, त्यांनाही अशावेळेस अनिर्बंध उलट्या होतात. 

पचनसंस्थेचे विकार
पोटाच्या अनेक आजारात उलटी होणे हे अनेकदा प्रमुख लक्षण असते. अल्सर, जठराची सूज, जठर आणि लहान आतडे जिथे जोडली जातात त्या ठिकाणी आतडे खूप आकुंचित होणे, लहान आतड्यामध्ये अडथळा निर्माण होणे, लहान आतड्याला पीळ पडणे, आतडे आतल्या बाजूस उलटे घुसणे, आतडी एकमेकास चिकटणे, आतड्याच्या आवरणांना सूज येणे, हर्नियामुळे आतडी बंद पडणे अशा अनेक गंभीर त्रासांमध्ये खूप उलट्या होतात. 

तोंडाने खाल्लेला घास अन्ननलिकेच्या आकुंचन प्रसरणाने पुढे जठराकडे सरकतो, पण अन्ननलिकेच्या शेवटच्या भागातील मज्जातंतूंमध्ये बिघाड झाल्यास ही हालचाल होत नाही. अशावेळेस उलट्या होतात. अन्ननलिकेची सूज, तिथले कर्करोग यातही हा त्रास होतो. 

पोटातील इतर अवयवांच्या त्रासातही उलट्या होतात. यकृत, अपेंडिक्स, पित्ताशय, स्वादुपिंड, लहान आतडे यांना कुठल्याही कारणाने सूज आली तरी उलट्या होत राहतात. 

जंतुसंसर्ग
कुठलेही खाण्याचे पदार्थ काही जंतूंमुळे बाधित झालेले असले तर अन्नातून विषबाधा होते आणि रुग्णांना कमालीच्या उलट्या व जुलाब होऊन त्यांची प्रकृती गंभीर होते. केवळ जंतूच नाही, तर रोटा व्हायरस, अॅडिनोव्हायरस यामुळे होणाऱ्या संसर्गात अशाच उलट्या व जुलाब होतात. कुठलाही जंतुसंसर्ग मोठ्या प्रमाणात असेल तर ‘सेप्टीसेमिया’ होतो, यातसुद्धा उलटी हे व्यवच्छेदक लक्षण असते. सतत कान फुटण्यामुळे कानाच्या मध्यभागात आणि अंतर्भागातील नाजूक भागात सूज येऊन उलट्या होतात. न्यूमोनिया, मूत्रपिंडाचे आणि मूत्रमार्गाच्या सुरुवातीच्या भागाचा जंतुसंसर्ग यातदेखील असेच त्रास जाणवतात.

औषधांचे परिणाम
कर्करोगाची औषधे, काही वेदनाशामके, सांध्याची सूज कमी करणारी औषधे, अपस्माराच्या झटक्यांची, हृदयाची गती अनियमित असेल तर ती नीट करणारी औषधे यांनी उलटी-मळमळ होऊ शकते. काही प्रतिजैविके, संप्रेरके, गर्भनिरोधक गोळ्या, डिगॉक्सिन, मद्यार्क, ज्यात अफू किंवा तत्सम रसायने वापरली जातात अशी औषधे घेतल्यास उलटीची भावना तीव्र होते. अनेक औषधे जास्त मात्रेत घेतली गेल्यास हमखास उलट्या होतातच. कर्करोगाच्या रुग्णांना किरणोत्सारी उपचारांमुळे असेच त्रास होतात. जंतुनाशके, कीटकनाशके, पीक फवारणीची औषधे, आर्सेनिकसारखे अतिविषारी पदार्थ पोटात गेल्यास उलट्या होतात. 

चयापचय क्रियेतील असमतोल
मधुमेहातील किटोअॅसिडोसिस, थायरॉईड, पॅराथायरॉईड, तसेच अॅडरीनल ग्रंथीचे विकार, मूत्रपिंडे निकामी होत जाताना रक्तातील दूषित द्रव्ये वाढून होणारा युरेमिया, कर्करोगाचा शरीरातील संप्रेरकावर परिणाम होऊन उद्‌भवणारा पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम यामध्ये उलट्या होणे हे प्रमुख लक्षण असते.

इतर महत्त्वाचे आजार
 ग्लॉकोमा, हृदयविकाराचा तीव्र झटका, मूत्रपिंडातले खडे, हातापायांच्या हाडांचे फ्रॅक्चर यामध्ये उलट्या होऊ शकतात. काही मनोविकारातदेखील उलट्या होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी जास्त असते. काही व्यक्तींना खूप घाणेरड्या गोष्टी पाहिल्यास, खूप भीतीदायक बाबी घडल्यास शिसारी येऊन उलट्या होतात. 

काही गरोदर स्त्रियांना पहिल्या चार महिन्यात सकाळी उठल्या उठल्या खूप मळमळ व उलट्या होत राहतात. याला 'मॉर्निंग सिकनेस' म्हणतात. सायक्लिकल व्हॉमिटिंग या आजारात कुठलेही कारण सापडत नाही पण रुग्णाला सतत उलट्या होत असतात.

लहान बाळांच्या उलट्या
लहान बाळांना होणाऱ्या उलट्या या एखाद्या आरोग्य समस्येचे लक्षण असते. मात्र बहुतेकदा अन्नाचे अपचन किंवा जास्त खाणे किंवा त्यांच्या पोटाच्या क्षमतेपेक्षा जास्त भरवणे, अधिक दूध पाजणे, पोट साफ न होणे ही कारणे असू शकतात. काही वेळेस लहान मुले आईने अंगावर दूध पाजले की थोडे थोडे दूध बाहेर काढतात किंवा एखादे वेळेस पिचकारी मारल्यासारखी उलटी होते. याला प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग म्हणतात, यामध्ये विशेष काळजी करण्याचे कारण नसते. बाळांना पाजण्याचे प्रमाण कमी केल्यास, पाजल्यानंतर उभे धरून त्याचा ढेकर काढल्यास हे त्रास थांबतात.
मात्र उलट्या सातत्याने होत राहिल्यास एखाद्या अन्नपदार्थाचे वावडे असणे, अन्नमार्गाला सूज येणे (गॅस्ट्रायटिस, गॅस्ट्रो एन्टरायटिस), अन्नातून विषबाधा होणे अशी सर्वसामान्य करणे असू शकतात. मात्र काही वेळेस मेंदूला सूज येणे, फ्लूसारखे तापाचे आजार, पोटाचे काही आजार असू शकतात.    

उलट्यांचे निदान
यामध्ये रुग्णाच्या तक्रारी, उलटीचे स्वरूप, उलटीचे रंग, त्यात रक्ताचे प्रमाण आहे किंवा नाही, रुग्णाला होणारे इतर सहयोगी त्रास यावरून सर्वसाधारणपणे प्राथमिक निदान केले जाते. त्यानंतर आवश्यकतेनुसार रक्ताच्या विविध तपासण्या केल्या जातात. एक्सरे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एमआरआय, एन्डोस्कोपी आणि कर्करोगाची शक्यता असल्यास व आवश्यक असल्यास बायॉप्सीसारख्या तपासण्या करून निदान पक्के केले जाते. 

उपचार
उलटी हे लक्षण अनेक शारीरिक संस्थांच्या विकारात आढळते. त्यामुळे रुग्णाला फक्त उलटी कमी करण्याची प्राथमिक औषधे घेऊन चालत नाही. त्याला उलटी व्हायला कारणीभूत असलेल्या मूलभूत कारणाप्रमाणे उपचार केले जातात. या उलट  शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते, अशा वेळेस कोणतेही औषध तोंडावाटे देणे टाळावे लागते. उलट्या जास्त झाल्यास शरीरातील क्षार, पाणी आणि इतर अनेक गोष्टी कमी होतात. त्यांचा देखील विचार करून उपचार करावे लागतात. लहान बाळांना उलटी होताना झोपलेले किंवा आडवे ठेवू नये, तर उभे धरावे. किंवा मोठ्यांमध्येसुध्दा उलटी होताना झोपलेले राहू नये. कारण कित्येकदा उलटी होताना ती गिळली जाऊन श्वासमार्गात जाऊन अचानक गुदमरले जाण्याची शक्यता असते. अशी उलटी श्वासमार्गात आतवर गेल्यास प्राणांतिक ठरू शकते.
उलटी होणे हे असे सर्वसाधारण किरकोळ बाबीत तर घडतेच, पण जीवन धोक्यात टाकणाऱ्या कमालीच्या गंभीर आजारांतसुद्धा उलट्या होत असतात. त्यामुळे वरचेवर उलट्या होत असतील, तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन रोगनिदान आणि उपचार करवून घेणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या