निद्रानाश?... नव्हे आरोग्यनाश

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 14 जून 2021

आरोग्य संपदा

झोप हा निरामय आरोग्यासाठी एक अत्यावश्यक घटक असतो. जगातील अनेकांना झोप ही एक अतिशय प्रिय गोष्ट असते, तर कित्येकांना रात्रभर याचना करूनही हवी तशी न मिळणारी अप्राप्य बाब असते.

‘सारी सारी रात तेरी याद सताये।  प्रीत जगाये हमें नींद न आये।।’ असे तळमळणाऱ्या विरहिणीचे बोल असोत किंवा ‘नींद हमारी ख्वाब तुम्हारे’ असे म्हणणाऱ्या प्रणयोत्सुक नायकापर्यंत आणि पोटातल्या भुकेने तळमळणाऱ्या गरिबांपासून वारेमाप संपत्तीची आणि अफाट धंद्याची काळजी करणाऱ्या अतिश्रीमंतांपर्यंत, झोप ही अनेक प्रकारच्या सुखद आणि दुःखद स्वरूपाच्या शारीरिक आणि मानसिक आंदोलनांना कारणीभूत ठरते.

झोप हा निरामय आरोग्यासाठी एक अत्यावश्यक घटक असतो. शांतपणे लागणारी झोप म्हणजे लखलखीत आरोग्याचे व्यवच्छेदक लक्षणच असते. मेंदूतील संवेदना वहन, संप्रेरकांची निर्मिती, पेशींची निर्मिती आणि इतर महत्त्वाची कार्ये झोपेशी संबंधित असतात. त्यामुळे योग्य वेळी, योग्य प्रमाणात झोप येणे हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. वेगवेगळ्या स्वरूपात योग्यवेळी पूर्ण झोप न होणे म्हणजे निद्रानाश. निद्रानाशात झोप लागण्याची एकूण वेळ, झोपलेल्या अवस्थेत व्यतीत होणारा काळ आणि झोपेचा दर्जा या साऱ्या गोष्टीत त्रुटी आढळतात.

अशा निद्रानाशाने ग्रासलेल्या व्यक्तीमध्ये झोपेबाबत विविध समस्या आढळून येतात. 

 • रात्री झोप येण्यास खूप विलंब होणे
 • एकदा झोप लागल्यावर रात्री मधेच जाग येणे आणि त्यानंतर झोप न येणे
 • झोप पूर्ण झालेली नसताना अकारण पहाटे जाग येणे
 • सकाळी उठल्यावरही पूर्ण ताजेतवाने न वाटणे
 • दिवसा सतत दमल्यासारखे किंवा झोपाळल्यागत वाटणे
 • सतत चिडचिड होणे, नैराश्य आणि चिंताग्रस्त अवस्थेत असणे
 • कामात लक्ष न लागणे, कामात एकाग्रता नसणे किंवा महत्त्वाच्या गोष्टींचे सतत विस्मरण होणे
 • कामात सतत चुका होणे, हातून छोटे-मोठे अपघात घडणे
 • झोप का येत नाही याबाबत सतत काळजी वाटत राहणे

कारणमीमांसा
आपल्या शरीरामध्ये एक जैविक घड्याळ असते. सूर्यप्रकाशातल्या बदलाप्रमाणे या घड्याळात बदल होत राहतो. जसा जसा सूर्यप्रकाश कमी होऊ लागतो तसतसे शरीरात मेलॅटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवू लागते आणि झोप येऊ लागते. या संप्रेरकाच्या स्त्रावामध्ये होणाऱ्या अडथळ्यामुळे झोपेचे गणित चुकत राहते आणि निद्रानाश निर्माण होतो. कॉर्टिकोट्रॉफिन रीलीजिंग फॅक्टर या संप्रेरकाच्या उद्दीपनामुळे मेंदूची जागृती वाढते आणि झोप येणे लांबणीवर पडते.

झोपेचे दोन टप्पे असतात. आरइएम (रॅपिड आय मूव्हमेंट) स्लीप आणि नॉन आरइएम (नॉन रॅपिड आय मूव्हमेंट) स्लीप. पहिल्या टप्प्यात पापण्यांची फडफड, स्वप्नं पडणं या गोष्टी घडतात. तर दुसऱ्या टप्प्यात क्रमाक्रमाने गाढ झोप लागते. हे टप्पे आलटून पालटून येत असतात आणि त्यांचा कालावधी वेगवेगळा असतो. झोपेच्या या नैसर्गिक चक्रामध्ये काही समस्या निर्माण होतात आणि निद्रानाश होऊ शकतो.

निद्रानाशाची कारणे
निद्रानाश अनेक शारीरिक अवस्थांमध्ये आढळून येतो. 

 • तणाव ः कामकाज, नोकरी-धंदा, आर्थिक परिस्थिती, तब्येत, कौटुंबिक प्रश्न, शिक्षण याबद्दलची अति काळजी यामुळे रात्रीच्या वेळेस चिंतेने भरलेले विचारचक्र सतत सुरू राहतं आणि झोप लागणे मुश्कील होऊन बसते. प्रिय व्यक्तीचे आजारपण किंवा मृत्यू, घटस्फोट, नोकरी सुटणे अशा काळजीमुळे निद्रानाश होऊ शकतो.
 • विमानप्रवास किंवा कामातल्या शिफ्ट ः खूप दूर देशीचा विमानप्रवास केल्यावर दोन्ही ठिकाणच्या दिवस-रात्रीच्या फरकामुळे झोप लागणे बरेच दिवस दुरापास्त होते. काही व्यक्तींना कामात बदलत्या शिफ्ट असतात. त्यांना कधी दुपारी तर कधी सकाळीसुद्धा झोपावे लागते. त्यामुळे त्यांना झोपेचे प्रश्न निर्माण होतात.
 •  चुकीच्या सवयी ः झोपेची ठराविक वेळ नसणे, दिवसा झोपणे, झोपण्यापूर्वी चहा-कॉफी किंवा कोलासारखी उत्तेजक पेये घेणे, मद्यप्राशन, तंबाखूसेवन, बिछान्यात काम करणे, शयनगृहात खूप उष्णता किंवा थंडी अशाप्रकारचे त्रासदायक वातावरण असणे, झोपताना टीव्ही, संगणक किंवा स्मार्टफोन खूप वेळ वापरणे, यामुळे झोप येण्यात व्यत्यय येतो.

    ‘ग्रेट इंडियन स्लीप स्कोर्ड २०१९’ नावाच्या एका सर्वेक्षणात मुंबईतील ३७ टक्के व्यक्ती सात तासांपेक्षा कमी झोपतात असे सिद्ध झाले होते. मोबाईल स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टेलिव्हिजन यांचा रात्रीच्यावेळी होणारा अतिरिक्त वापर त्याला कारणीभूत आहे असे दिसून आले होते. हार्वर्ड विद्यापीठाच्या एका संशोधन पत्रिकेत निद्रानाशाची जागतिक साथ आली आहे, असेही नमूद केले होते. 

 • रात्रीचे जेवण ः रात्री उशिरा आणि पोटाला तडस लागेपर्यंत जेवल्यास, छातीत जळजळ होणे, पोटात गुबारा धरला जाऊन त्याचा दबाव छातीवर येतो आणि झोप येणे कठीण होते.
 • मानसिक आजार ः चिंता, नैराश्य, उन्माद (मॅनिया) अशा मानसिक विकारात झोप विचलित होते.
 • औषधोपचार ः अस्थमा, उच्च रक्तदाब, सर्दीची काही औषधे, स्थूलता घटवणाऱ्या गोळ्या यामुळे झोप लागणे जड जाते.
 • शारीरिक व्यथा ः नाक चोंदणे, हाडांना झालेल्या इजेमुळे होणाऱ्या वेदना, कर्करोग, पोटशूळ, हृदयविकार, दमा, थायरॉईड संप्रेरकांचे प्रमाण वाढणे, झोपल्यावर छातीत जळजळ होणे, पार्किन्सन, अल्झायमर अशा आजारात निद्रानाश उद्‌भवू शकतो. त्वचेवर कंड सुटणे हे निद्रानाशाचे महत्त्वाचे कारण असू शकते. त्वचेचे विकार आणि शरीरातील इतर अवयवांच्या आजारामुळे अहोरात्र कंड सुटू शकते. यामुळे झोप येणे अशक्य होऊन बसते.
 • झोपेसंबंधी आजार ः स्लीप ॲप्नीआमध्ये (श्वासावरोध) श्वासोच्छवासात अडथळा आल्यामुळे निद्रानाश होतो. यात मध्यवर्ती श्वासावरोध आणि श्‍वासवाहिन्यांत निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे झालेला श्‍वासावरोध असे दोन प्रकार असतात. मध्यवर्ती प्रकारात श्वसन पूर्णपणे थांबते. श्वसनलिकांतील अडथळ्यांमध्ये श्वसनाची हालचाल चालू राहते, पण श्वास घेतला जात नाही. श्वास थांबणे व पुन्हा सुरू होणे अशी क्रिया रात्रभरात शंभराहून जास्त वेळा होऊ शकते. 
 • रेस्टलेस लेग सिंड्रोममध्ये पायात अस्वस्थपणा आल्याने ते सतत चाळवले जातात. अशा आजारात झोपेत कमालीचा व्यत्यय येतो.
 • वाढते वय ः वाढत्या वयात शरीरातील जैविक घड्याळात बदल होतात. काहींना सायंकाळी लवकर थकवा येतो, त्यामुळे ते लवकर झोपतात; पण त्यांना जागही भल्या पहाटे येते. काही वृद्धांमध्ये दिवसभरात फारशी हालचाल होत नाही, त्यामुळे त्यांना लवकर झोप येत नाही. काही जण दुपारी झोप काढतात, त्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. वयोमानानुसार होणाऱ्या आजारांच्या वेदना काही औषधे यामुळे झोप न लागण्याची उदाहरणे बऱ्याच वृद्धांत आढळतात.

निद्रानाशाचे दुष्परिणाम
निद्रानाशामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे तब्येतीवर परिणाम होतो. जीवनाचा दर्जा खालावतो. कार्यक्षमता कमी होते, वाहनचालकांकडून अपघात घडू शकतात. निद्रानाशामुळे चिंता, नैराश्य असे आजार तर बळावतातच पण अशा व्यक्ती व्यसनाधीन होण्याची शक्यता खूप जास्त असते. रक्तदाब वाढणे, हृदयविकार निर्माण होणे, पोटाचे विकार निर्माण होणे हे तर नक्कीच घडते.

उपचार
निद्रानाशाचा त्रास बराच काळ होत असेल तर त्वरित मानसोपचार तज्ज्ञांना भेटावे. यावर उपचार करताना निद्रानाशाचे कारण शोधून त्यावर उपचार करावे लागतात. निद्रानाश होण्यामागील शारीरिक आणि मानसिक विकार धुंडाळल्यास योग्य औषधोपचार करणे शक्य असते. 

झोप येण्याची औषधे, तणावांचा परिणाम दूर करणारी औषधे या व्यक्तींना द्यावी लागतात. ही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी लागतात. ती सांगितल्याप्रमाणे आणि सांगितलेल्या डोसमध्ये आणि निर्देशित केलेल्या काळापुरतीच घ्यावीत.
विशेष उपचारांमध्ये ताणतणावांचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन घ्यावे लागते आणि वेळप्रसंगी समुपदेशनदेखील आवश्यक ठरते.

स्व-संमोहन, स्लीप रिस्टोरेशन, रिकंडीशनिंग थेरपी, बिहेवियरल थेरपी, यूव्ही लाइट थेरपी अशा अनेक पद्धती आज वापरल्या जातात. 

तात्पुरता निद्रानाश टाळण्यासाठी आरोग्यविषयक काही नियमांचे पालन करावे लागते. यात रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची विशिष्ट वेळ पक्की करावी. संध्याकाळी चार नंतर चहा, कॉफी, कोला अशी पेये घेणे टाळावे. नियमित शारीरिक व्यायाम करावा. व्यायाम व रात्रीची झोप यात किमान चार तासांचे अंतर असावे. रात्री उशिरा जेवू नये. रात्रीचे जेवण आणि झोपेमध्ये किमान दोन तासांचे अंतर असावे. झोपल्यावर मनात येणारे काळजी आणि चिंतेचे विषय टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी मन प्रसन्न ठेवावे. मेडीटेशन, संगीत उपयुक्त ठरतात. काही व्यक्तींना रात्री कोमट पाण्याने अंघोळ केल्यास चांगली झोप येते.

योग्य वेळेस आणि योग्य प्रमाणात घेतला जाणारा चौरस आहार, नियमित व्यायाम, वाईट सवयींचा त्याग यावर आधारलेली योग्य जीवनशैली स्वीकारणे हा निद्रानाशाचा प्रभावी उपचार आहे

संबंधित बातम्या