कुबड-पाठीच्या मणक्यांची विकृती

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

आरोग्य संपदा

सौम्य कुबड दोषाचा आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र कुबड खूप वाढत गेल्यास किंवा जन्मजात असल्यास विकृती, वेदना आणि श्वासोच्छवासाची समस्या निर्माण होते. परंतु शस्त्रक्रियेद्वारे त्यात सुधारणा होऊ शकते. लहान मुलांबाबत दोष थोडा असला तरी नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचार हे या विकारात खूप महत्त्वाचे ठरतात.

पाठीच्या कण्याच्या विशिष्ट विकृतीला कुबड म्हणतात. अगदी पौराणिक काळापासून आपल्याला हे कुबड माहिती आहे. दुर्दैवाने या शारीरिक दोषाचा संबंध दुष्ट स्वभावाशी लावला जातो. रामायणातली मंथरा किंवा महाभारतातील कुब्जा दासी हे त्याचे उदाहरण. पाश्चात्त्य साहित्यातही अमानवी स्त्री पिशाच्चाचे कुबड असलेले म्हणजे ‘हंचबॅक’ असे वर्णन असते. पण वस्तुतः हे शारीरिक दोषामुळे निर्माण झालेले एक व्यंग असते.        

शरीरात कवटीच्या खालपासून पाठीचा कणा सुरू होतो आणि माकड हाडाच्या शेवटी असलेल्या उलट्या त्रिकोणी आकाराच्या टोकदार गुदास्थीपाशी (कॉक्सिक्स) संपतो. एकूण ३३ मणक्यांनी बनलेल्या पाठीच्या कण्याचा आकार काहीसा नागमोडी असतो. म्हणजे आपण जर पाठीचा कणा एका बाजूने पाहिला, तर मानेचा भाग पुढच्या बाजूस आलेला बहिर्गोल स्वरूपाचा असतो, त्यानंतर पाठीच्या भागात हा कणा पुन्हा मागील बाजूस जाऊन अंतर्गोल बनतो. त्यापुढे कंबरेच्या भागात तो पुन्हा बहिर्गोल बनतो आणि नंतर गुदास्थीच्या भागात मागील बाजूस जाऊन काहीसा अंतर्गोल बनतो. या नागमोडी आकारात एक प्रकारचा समतोल असतो. हे सर्व वक्राकार आखीव आणि सलग असतात. दोन मणक्यातील ही वक्रता २० ते ४५ अंशाची असते. पण अनेकविध कारणांनी ही वक्रता ५० अंश किंवा त्याहूनही अधिक होते आणि पाठीच्या कण्यामध्ये उंचवटा निर्माण होतो. हा प्रकार मुख्यत्वे छातीच्या आणि मानेच्या भागातल्या मणक्यात उद्‌भवतो. यालाच कुबड किंवा वैद्यकीय भाषेत कायफोसिस असे म्हणतात. आकडेवारीनुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या ४ ते ८ टक्के व्यक्तींना थोड्याबहुत प्रमाणात कुबड असते. कुबड असलेल्या व्यक्तींपैकी मानेच्या भागात कुबड असलेले ३८.३ टक्के तर पाठीच्या भागात कुबड असलेले ५१ टक्के असतात. यामध्ये २० ते ६४ वयाच्या स्त्रियांमध्ये या दोषाचे प्रमाण ३५ टक्के आढळते.

कुबडाचे प्रकार

 • बसण्यातील दोषामुळे ः हा प्रकार किशोरावस्थेतील मुलामुलींत दिसून येतो. शाळेत, कॉलेजात, घरी अभ्यास करताना किंवा लिहिता-वाचताना ताठ न बसता पोक काढून बसण्याच्या सवयीने हा दोष निर्माण होतो. यामध्ये बसलेल्या अवस्थेत हा दोष लगेच दिसून येतो, मात्र उभे राहिल्यावर तो नाहीसा होतो. सरळ ताठ बसण्याची, पाठीला पोक न काढता उभे राहण्याची सवय ठेवल्यास हा दोष जाऊ शकतो. मात्र किशोर वयात पाठ दुखण्यापलीकडे याचा त्रास फारसा होत नाही. मात्र लक्ष न दिसल्यास प्रौढ वयात हे पोक वाढू शकते.
 • वयपरत्वे येणारा दोष ः पुरुषांमध्ये वयाच्या पन्नाशीनंतर आणि स्त्रियांमध्ये चाळीशीनंतर शरीरातील इतर हाडांप्रमाणे मणक्याचीही हाडे ठिसूळ होऊ लागतात, त्याचप्रमाणे दोन मणक्यांमधील कुर्चासुध्दा वयोमानानुसार घर्षणाने झिजून जातात. कित्येकदा या वयातील ऑस्चिओपोरोसिसमुळे मणक्यांची फ्रॅक्चर होतात आणि कण्यामधला बाकदारपणा जाऊन उभट आकाराचे कुबड तयार होते.
 • श्युअरमान्स कायफोसिस ः सर्वसामान्यपणे मणक्यांचा आकार आयताकृती असतो. पण या आजारात तो जन्मतः एका बाजूला लांब आणि दुसऱ्या बाजूला निमुळता असा पाचरीसारखा असतो. त्यामुळे अगदी तरुणपणातच या व्यक्तींचे मणके पुढील बाजूस सरकतात आणि पाठीला कुबड यायला सुरुवात होते. त्यापुढील आयुष्यात हे व्यंग वाढत जाते.
 • जन्मजात दोष ः अनेकदा गर्भावस्थेत बाळाच्या कण्याची वाढ सदोषरित्या होते. त्यामुळे कण्याची वक्रता वाढते. बाळाचा जन्म झाल्यावर  उत्तरोत्तर हे कुबड जास्त वाढत जाते.
 • लक्षणे ः बसण्यातील दोषामुळे होणाऱ्या कुबडात पाठ भरून येणे आणि पाठीला पोक येण्यापलीकडे फारसा त्रास होत नाही. मात्र अन्य प्रकारात काही त्रास नक्की जाणवतात. 
 • अपघातजन्य ः अपघाताने इजा पोचल्याने पाठीच्या मणक्यांचे फ्रॅक्चर होऊन मणक्यांचा वक्राकार बदलतो आणि काही मणके पुढे येऊन हे व्यंग निर्माण होते.
 • लक्षणे ः काही प्रकारात, विशेषतः तरुणांमधील बसण्याच्या दोषांमुळे निर्माण होणाऱ्या कुबडात बहुधा कोणतेही लक्षण जाणवत नाही. या व्यक्तींमध्ये केवळ बसल्यावर पाठीला आलेला फुगवटा दिसतो. मात्र अन्य प्रकारात दिसणारी लक्षणे म्हणजे-
 •     पाठीत वेदना होणे
 •     पाठ भरून येणे किंवा ताठरणे 
 •     खांदे गोलाकार बनणे
 •     खांदे वरखाली दिसणे
 •     पायांना बधीरपणा, अशक्तपणा जाणवणे किंवा पायांना मुंग्या येत राहणे
 •     मांडीचे स्नायू ताठरणे
 •     चालायला त्रास होणे
 •     श्वास घ्यायला किंवा अन्न गिळायला त्रास होणे

कारणे
पाठीच्या मणक्यांच्या शृंखलेमध्ये त्यांचा वक्राकार बदलला जाऊन कुबड येण्याची अनेक कारणे आहेत. मात्र त्यात प्रामुख्याने खुर्चीमध्ये किंवा अन्यत्र पोक काढून दीर्घकाळ बसणे, हाडे विरळ होणे (वय वाढल्याने किंवा कुपोषणामुळे होणाऱ्या ऑस्चिओपोरोसिसमुळे मणक्यांच्या हाडांची आणि मणक्यांमधल्या चकत्यांची झीज झाल्याने कुबड निर्माण होते), मणक्यांची फ्रॅक्चर, गर्भावस्थेत असताना मणक्याच्या हाडांचा दोषयुक्त विकास होणे, मणक्यांच्या हाडांचा कर्करोग, श्युअरमान डिसीज, एह्लर्स-डनलॉस सिंड्रोम (या दुर्मीळ आजारात शरीरातील अस्थिबंध आणि स्नायूबंध कमकुवत होतात. त्यामुळे त्यांनी बांधले गेलेले पाठीचे मणके शिथिल होऊन कण्याचा वक्राकार बिघडतो आणि कुबड निर्माण होते), मार्फन सिंड्रोम (या जन्मजात आजारातही हाडांना आणि स्नायूंना भक्कमरीत्या जोडणारे आणि त्यांच्या हालचाली सक्षम आणि मर्यादित ठेवणारे शरीरातील स्नायूबंध व अस्थिबंध सैलावतात) यांचा समावेश होतो.

निदान

 •     शारीरिक तपासणी ः यामध्ये रुग्णाला सरळ आणि ताठ उभे राहून केलेल्या वैद्यकीय निरीक्षणात आणि हातांनी केलेल्या तपासणीत कुबड लक्षात येते. शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीत हा दोष लक्षात येऊ शकतो आणि त्यानुसार वेळेवर निदान होऊ शकते. 
 •     एक्सरे ः पाठीच्या कण्याच्या एक्सरेमध्ये कण्याचा बदललेला वक्राकार, त्याच्या वक्रतेचे मोजमाप होऊ शकते, मणक्यांचे फ्रॅक्चर, त्यांचे बदललेले आकार याबाबतही जाणीव होऊ शकते.
 •     एमआरआय ः पाठीच्या कण्यामधील सूक्ष्म तडे, कुबड आल्यामुळे मज्जारज्जूवर आणि कण्यामधून बाहेर पडणाऱ्या मज्जातंतूंवर दबाव आलेला आहे का हे कळू शकते. 
 •     मज्जासंस्थेची विशेष तपासणी ः रुग्णाला पायांना, हातांना अशक्तपणा, बधीरपणा जाणवत असेल, किंवा सतत मुंग्या येत असतील तर शरीरातील रिफ्लेक्सेस, स्नायूंच्या क्षमतेची तपासणी तसेच मज्जातंतूंमधून वाहणाऱ्या 'विद्युतप्रवाहाचे' मोजमाप (नर्व्ह-मसल कंडक्शन) अशा अन्य तपासण्या केल्या जातात. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर पल्मनरी फंक्शन टेस्ट, अन्न गिळण्यास त्रास होत असेल तर पोटाची एंडोस्कोपी करावी लागते. 

उपचार 

 • लहान मुलांमध्ये आणि वाढत्या वयाच्या किशोरांमध्ये असे कुबड येत असेल तर त्यांना अभ्यासाला बसताना, खुर्ची वापरणे आणि खुर्चीत पाठ ताठ आणि सरळ उभी ठेवण्याचे सांगावे लागते. एक्सरेमध्ये जर वक्राकार थोडा जास्त असेल तर त्यांना फिजिओथेरपीचे विशेष व्यायाम आणि उपचार करावे लागतात.  
 • काही जन्मजात आजारात कुबड असेल तर ते वाढू नये म्हणून पाठीला बांधायचा विशेष पट्टा (ब्रेस) वापरावा लागतो. त्यामुळे कुबड ठीक होत नाही, पण त्यामुळे स्नायूंवर पडणारा ताण आणि वेदना सुसह्य होऊ शकतात आणि कुबडाचा वक्राकार वाढणे मंदावते. पाठीच्या दुखण्यासाठी नॉन-स्टेरॉइड्स वेदनाशामके, आणि स्नायू सैलावणारी औषधे वापरली जातात. 

शस्त्रक्रिया

 • रुग्णांना जर खूप वेदना होत असतील आणि औषधोपचारांनी त्या कमी होत नसतील
 • कुबड जन्मजात दोषांमुळे आलेले असेल.
 • श्युअरमान्स कायफोसिसमध्ये जर पाठीच्या कण्याची वक्रता ७५ अंश किंवा अधिक असेल  
 • कुबडामुळे काही शारीरिक क्रियांमध्ये गुंतागुंत वाढून कमालीचे त्रास होत असतील तर उपचारांसाठी शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारावा लागतो. 
 • स्पायनल फ्युजन ः यामध्ये दोन मणक्यांमध्ये हाडांचे छोटे तुकडे किंवा चुरा टाकून मणके एकमेकांशी जोडले जातात. सुरुवातीला धातूच्या पट्ट्या, स्क्रू, रॉड वापरून कण्याची वक्रता कमी केली जाते. कालांतराने धातूच्या पट्ट्या काढून टाकल्या जातात.

कुबडामुळे होणारे गुंतागुंतीचे त्रास  

 • महत्त्वाच्या अवयवांवर दाब पडून त्यांच्या कार्यात गंभीर अडथळा येणे- छातीच्या भागातील मणक्यांची वक्रता वाढून उद्‌भवणाऱ्या कुबडामुळे फुफ्फुसे, हृदय, अन्ननलिका यांच्यावर दबाव येऊन श्वास घेणे, हृदयाचे स्पंदन व रक्ताभिसरण आणि अन्नाचा घास गिळणे या शारीरिक क्रियांवर मर्यादा येऊन दैनंदिन आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
 • मज्जातंतूंवर दबाव पडून वेदना होणे, उठणे-बसणे-चालणे अशा हालचाली करण्यास त्रास होतो. हातपाय बधीर होणे, सतत मुंग्या येणे असे त्रास उद्‌भवतात. त्याचबरोबर मूत्रविसर्जन, मलविसर्जन क्रियांवरील नियंत्रण कमी होऊन कपड्यात लघवी होणे, शौचाला होणे असे त्रास होतात.
 • सर्वसामान्य हालचाली, चालणे, खुर्चीत बसणे, पाठीवर झोपणे याबाबतीत अडचण निर्माण होते.
 • आपल्या शारीरिक प्रतिमेबाबत जागरूक असणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये मानसिक भावनिक आणि मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात उद्‌भवतात. मित्रमैत्रिणींकडून होणारी कुचेष्टा यात भर टाकत राहते.
 • सौम्य कुबड दोषाचा आयुष्यावर कोणताही परिणाम होत नाही. मात्र कुबड खूप वाढत गेल्यास किंवा जन्मजात असल्यास विकृती, वेदना आणि श्वासोच्छवासाची समस्या निर्माण होऊ शकते. परंतु शस्त्रक्रियेद्वारे त्यात सुधारणा होऊ शकते. लहान मुलांबाबत आणि दोष थोडा असला तरी नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचार हे या विकारात खूप महत्त्वाचे ठरतात.

संबंधित बातम्या