आरोग्य फुप्फुसाचा कर्करोग

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 6 डिसेंबर 2021

आरोग्य संपदा

फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जितका जास्त काळ धूम्रपान केलेले आहे तितका जास्त असतो. धूम्रपान थांबविल्यास फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

मानवाचे आरोग्य दुर्धर करणाऱ्या आजारात कर्करोगाचा समावेश प्रामुख्याने होतो. त्यातही फुप्फुसाच्या कर्करोगाचा क्रमांक खूप वरचा आहे. जगभरात सर्व प्रकारच्या कर्करोगांनी होणाऱ्या मृत्यूंमधील २५ टक्के म्हणजे सर्वाधिक मृत्यू, फुप्फुसाच्या कर्करोगाने होतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये फुप्फुसाचा कर्करोग अधिक प्रमाणात आढळत असला तरी फुप्फुसाचा कर्करोग हे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये कर्करोगाच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. 

भारतात दरवर्षी कर्करोगाचे निदान होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सात टक्के रुग्ण फुप्फुसाच्या कर्करोगाचे असतात. तर कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या एकुणातल्या रुग्णांत याचे प्रमाण नऊ टक्के आहे. भारतीय वैद्यकीय संस्थांच्या संशोधनानुसार भारतीय पुरुषांत, ७४ वर्षे वयापर्यंतच्या दर ६८ व्यक्तींपैकी एकाला फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते.   धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा सर्वात जास्त धोका असतो, पण फुप्फुसाच्या कर्करोग झालेल्या व्यक्तींमधल्या पंधरा टक्क्यांनी कधीही धूम्रपान केलेले नसते. फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जितका जास्त काळ धूम्रपान केलेले आहे तितका जास्त असतो. तर अनेक वर्षे धूम्रपान केले असले तरी धूम्रपान थांबविल्यास फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

लक्षणे ः या आजाराची चिन्हे आणि लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. पण आजार प्रगत होऊ लागल्यावर ती उद्‌भवू  लागतात. या लक्षणांमध्ये- 

 •     दीर्घकाळ राहणारा आणि सतत येणारा खोकला 
 •     खोकल्यात थोड्या प्रमाणात रक्त पडणे 
 •     धाप लागणे
 •     छातीत दुखणे
 •     आवाजामध्ये बदल होणे
 •     वजन घटू लागणे
 •     हाडे दुखणे
 •     डोकेदुखी 
 • कारणमीमांसा ः धूम्रपान किंवा हवेतील विषारी वायू, धूलिकण, अॅस्बेस्टॉससारख्या काही पदार्थांचे सूक्ष्म कण श्वसनावाटे जेव्हा फुप्फुसात जातात, तेव्हा फुप्फुसांच्या पेशींचे नुकसान होऊन फुप्फुसाचा कर्करोग होतो. सिगारेटच्या धुरामध्ये कर्करोग निर्माण करणारे असंख्य पदार्थ  (कार्सिनोजेन्स) असतात. त्यांच्याशी संपर्क आल्याने फुप्फुसाच्या उतींमध्ये बदल घडण्यास सुरुवात होते. सुरुवातीला शरीरातील चयापचय क्रियेद्वारे फुप्फुसांच्या या पेशींचे नुकसान भरून  काढले जाते. परंतु प्रत्येक पुनरावृत्तीमुळे फुप्फुसांना जोडणाऱ्या सामान्य पेशींचे नुकसान होत राहते आणि कालांतराने, या पेशींच्या कार्यात आणि रचनेत बदल होऊन कर्करोगाची सुरुवात होते. जगभरातल्या आरोग्य सर्वेक्षणात, काही विशिष्ट गोष्टींचा संबंध असल्यास फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो असे संशोधकांना दिसून आले. यांना जोखीम घटक (रिस्क फॅक्टर्स) मानले जाते. यामध्ये -
 • धूम्रपान ः हा सर्वात महत्त्वाचा जोखीम घटक आहे. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता सर्वात जात असते. शिवाय कोणत्या प्रकारचे धूम्रपान केले जाते, हेदेखील महत्त्वाचे ठरते. विडी ओढणाऱ्यांना याचा धोका अधिक असतो तर सिगारेटमध्ये विना फिल्टरच्या सिगारेटी अधिक धोकादायक असतात. त्याचप्रमाणे सिगारेटमधील तंबाखूचा दर्जा, त्यातील अन्य विषारी घटकांचे प्रमाण यांवरही ही जोखीम कमी अधिक असू शकते. 
 • प्रमाण ः फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका दररोज ओढल्या जाणाऱ्या सिगारेटींची संख्या आणि किती वर्षे धूम्रपान केले आहे, यावरून वाढते.  कोणत्याही वयात धूम्रपान सोडल्यास फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. 
 • सिगारेटमध्ये ६००हून अधिक विषारी घटक असतात. ती पेटवल्यावर जेव्हा जळू लागते, तेव्हा सात हजारपेक्षा जास्त रसायने तयार होतात. यापैकी किमान ६९ अतिविषारी रसायने कर्करोगाला कारणीभूत (कार्सिनोजेनिक) असतात. सिगारेटमधील घटकांत निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉऑक्साइड तसेच फॉर्मल्डिहाइड, अमोनिया, हायड्रोजन सायनाइड, आर्सेनिक आणि डीडीटी यांचा समावेश होतो.
 • निकोटीन हा जलदरीत्या व्यसन निर्माण करणारा घटक आहे. सिगारेट ओढल्यावर, फुप्फुसात जाणाऱ्या टारचे (डांबर) प्रमाण वाढते. टार हे अनेक पदार्थांचे मिश्रण असते. ते एकत्रितपणे फुप्फुसांमध्ये चिकट गोळा तयार करते. कार्बन मोनॉऑक्साइडमुळे लाल रक्तपेशींना संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेणे अवघड होऊन बसते.
 • पॅसिव्ह स्मोकिंग ः धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीने बाहेर सोडलेला धूर आणि त्यातील विषारी घटक निकट असलेल्या व्यक्तींच्या फुप्फुसात गेल्याने त्या व्यक्तींना फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो.
 • आधीच्या रेडिएशन थेरपी ः एखाद्या दुसऱ्या प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये छातीवर केल्या जाणाऱ्या रेडिएशन थेरपीमुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. याशिवाय प्रदूषणातील रेडॉन वायू, अॅस्बेस्टॉस, आर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल अशांसारख्या कार्सीनोजेनिक पदार्थांच्या संपर्कामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. फुप्फुसाचा कर्करोग असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबामध्ये फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो.
 • रोगनिदान ः फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका ज्यांच्यामध्ये असतो अशा व्यक्तींची, दीर्घकाळ खोकला असलेल्यांची, अनेक वर्षे धूम्रपान करून त्यानंतर ते सोडून दिले अशांची सर्वसाधारण तपासणी कमी-डोस सीटी स्कॅन वापरून केली जाते. रुग्णांचा कौटुंबिक इतिहास, त्याला असलेली लक्षणे आणि शारीरिक तपासणी यात फुप्फुसाच्या कर्करोगाची शंका आल्यास काही विशेष चाचण्या कराव्या लागतात. 
 • इमेजिंग चाचण्या ः छातीचा एक्सरे आणि सीटी स्कॅन निदानासाठी महत्त्वाचा असतो. यात छातीत असलेली गाठ किंवा नाण्यासारखा डाग दिसू शकतो. सीटी स्कॅनमध्ये अतिशय छोट्या स्वरूपातील गाठ दिसू शकते. 
 • थुंकी तपासणी ः सतत येणाऱ्या खोकल्यातून पडणारा श्लेष्म सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यास त्यात फुप्फुसाच्या कर्करोगाच्या पेशी दिसून येतात.
 • बायोप्सी ः घशावाटे फुप्फुसात दुर्बीण (ब्रॉन्कोस्कोप) सोडून फुप्फुसात दिसणाऱ्या संशयास्पद भागाचा छोटा नमुना घेतला जातो. हा नमुना सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासल्यास कर्करोगाच्या पेशी आढळून येतात आणि कर्करोगाच्या पेशी कोणत्या टप्प्यात आहेत हे समजते. 
 • मेडियास्टिनोस्कोपी ः मानेच्या तळाशी एक छेद घेऊन  छातीच्या मध्यभागी असलेल्या हाडाच्या मागे असलेल्या रसग्रंथींचे नमुने शस्त्रक्रियेच्या साधनांनी घेतले जातात. त्यांचीही सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासणी केल्यावर कर्करोगाच्या पेशी आढळतात
 • सुईने तपासणी ः (नीडल बायोप्सी)-  क्ष-किरण किंवा सीटी  प्रतिमांच्या मार्गदर्शनाखाली, बरगडीमधून सुई टाकून संशयास्पद उती काढून त्या तपासल्या जातात. 
 • फुप्फुसाचा कर्करोग पुढच्या टप्प्यात गेला असल्यास तो पसरलेल्या इतर अवयवांतून देखील बायोप्सीचा नमुना, रसग्रंथी तपासल्या जातात. सीटीस्कॅन, एमआरआय, पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) आणि हाडांच्या स्कॅनयोगे कर्करोगाची व्याप्ती निश्चित करता येते. 
 • फुप्फुसाच्या कर्करोगाचे टप्पे रोमन अंकांद्वारे ० ते ४ पर्यंत दर्शविले जातात. सर्वात कमी टप्पे फुप्फुसापर्यंत मर्यादित असलेल्या कर्करोगाचे संकेत देतात, तर स्टेज 4चा कर्करोग बळावलेला आणि शरीराच्या इतर भागात पसरलेला आहे हे लक्षात येते.
 • फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रकार सूक्ष्मदर्शकाखाली फुप्फुसाच्या कर्करोगाच्या पेशींच्या बदलांवर आधारित फुप्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रमुख प्रकार मानले जातात :
 • स्मॉल सेल कार्सिनोमा-  हा बहुतेकदा दीर्घकाळ खूप मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना होतो. यामध्ये कंबाइंड स्मॉल सेल हाही एक उपप्रकार मानला जातो.
 • नॉन-स्मॉल सेल कार्सिनोमा-. यामध्ये इतर अनेक उपप्रकार आहेत. स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, अॅडिनोकार्सिनोमा आणि लार्ज सेल कार्सिनोमाचा समावेश होतो.
 • मेझोथेलीओमा हा छातीच्या आतील अस्तराचा कर्करोग, इतरत्र असलेला कर्करोग फुप्फुसात पसरून होणाऱ्या सेकंडरिज असेही प्रकार दिसून येतात. 

उपचार
रुग्णाचे सर्वसाधारण आरोग्य, त्याच्या कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा त्याचप्रमाणे रुग्णाची पसंती यानुसार कर्करोग उपचार योजना निवडली जाते.

शस्त्रक्रिया- यात कर्करोगाने व्यापलेला भाग आणि त्याच्या सभोवतीचे निरोगी पेशीसमूह काढून टाकले जातात. फुप्फुसाचा छोटा हिस्सा काढण्यासाठी ‘वेज रिसेक्शन’; त्याहून थोडा मोठा काढण्यासाठी सेगमेंटल रिसेक्शन; एका फुप्फुसाचा एक संपूर्ण घड (लोब) काढण्यासाठी लोबेक्टॉमी; संपूर्ण फुप्फुस काढून टाकण्यासाठी न्यूमोनेक्टोमी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात. शस्त्रक्रियेदरम्यान छातीतील रसग्रंथी काढून कर्करोगाची चिन्हे आणि प्रसार तपासला जातो. 

रेडिएशन थेरपी- कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी एक्स-रे आणि प्रोटॉनसारख्या स्रोकडून उच्च-शक्तीच्या ऊर्जा झोताचा वापर केला जातो. यात शरीरातील अचूक बिंदूवर रेडिएशन दिले जाते. अधिक प्रमाणात बळावलेल्या फुप्फुसाच्या कर्करोगासाठी आणि शरीराच्या इतर भागात पसरलेल्या कर्करोगांसाठी, रेडिएशन थेरपी वेदनेसारख्या लक्षणांपासून मुक्त करते.

केमोथेरपी- यात कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी कर्करोगविरोधी एक किंवा अधिक औषधे शिरेतून किंवा तोंडाने दिली जातात. औषधांचे संयोजन सामान्यतः काही आठवडे किंवा महिन्यांच्या कालावधीकरिता असते. 

कर्करोगाच्या टप्प्यानुसार आणि प्रसारानुसार फक्त शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरपी, फक्त रेडिओथेरपी, फक्त केमोथेरपी, किंवा दोन्ही थेरपी असे उपचारांचे वेळापत्रक ठरवले जाते.

स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी (रेडिओसर्जरी) - या तीव्र रेडिएशन उपचारात कर्करोगाच्या पेशींवर अनेक कोनातून रेडिएशनच्या अनेक किरणांना सोडले जाते. हा उपचार सामान्यतः एक किंवा काही बैठकांत पूर्ण केला जातो. स्मॉल सेल कार्सिनोमाचे रुग्ण शस्त्रक्रिया करून घेण्यास असमर्थ असतील तर त्यांच्यासाठी स्टिरिओटॅक्टिक बॉडी रेडिओथेरपी वापरता येते. मेंदूसह शरीराच्या इतर भागांमध्ये पसरणाऱ्या फुप्फुसाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठीदेखील ही प्रक्रिया वापरली जाते.

लक्ष्यित औषध थेरपी- कर्करोगाच्या पेशींमध्ये असलेल्या विशिष्ट विकृतींवर लक्ष केंद्रित करून त्या विकृती अवरोधित करून, लक्ष्यित औषध उपचारांमुळे कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. प्रगत किंवा पुन्हा कर्करोग झालेल्या रुग्णांसाठी, कर्करोगाच्या पेशींमध्ये विशिष्ट आनुवंशिक उत्परिवर्तन असेल तर ही प्रक्रिया विशेष करून वापरतात. 

इम्युनोथेरपी- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करू शकत नाही. कारण कर्करोगाच्या पेशीपासून बनणारी प्रथिने रोगप्रतिकारक प्रणाली पेशींपासून कर्करोगाच्या पेशींना लपण्यास मदत करतात. इम्युनोथेरपी त्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून कार्य करते. लगतच्या भागात तसेच शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोग पसरलेल्या रुग्णांसाठी ही वापरली जाते. 

परिहार उपचार- फुप्फुसाचा कर्करोग असणाऱ्या लोकांना कर्करोगाची चिन्हे आणि लक्षणे, तसेच उपचारांचे दुष्परिणाम जाणवतात. सपोर्टिव्ह केअर किंवा  पॅलिएटिव्ह केअर हे उपचारांचे एक विशेष क्षेत्र आहे यात आजाराची चिन्हे आणि लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णाला औषधे आणि समुपदेशन केले जाते. कुटुंबीय आणि रुग्णसहाय्यक यांचा यात मोठा वाटा असतो.

फुप्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपान वर्ज्य करणे आवश्यक असते. धूम्रपान सोडल्यावर हा आजार होण्याची  शक्यता कमी होते. त्यामुळे जीवनशैली बदलणे आणि जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली धूम्रपानमुक्ती केंद्रे सर्वत्र सुरू करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या