अनलॉक होताना...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 15 जून 2020

आरोग्य संपदा
 

पाण्याला जीवन म्हणतात आणि खरेच आहे ते. पाणी एका जागी साचून राहिले, तर ते तुंबते. त्याचा टवटवीतपणा निघून जातो. पण पाण्याला प्रवाह मिळाला, ते पुढे सरकू लागले की ते खळाळून वाहू लागते, एक प्रकारचा जिवंतपणा त्यात येतो. लॉकडाउनमध्ये आपणा साऱ्यांचेच जीवन असे डबक्याप्रमाणे बंदिस्त झाले होते. पण यातून अनलॉक होताना, बंधमुक्त होताना ते खळाळत्या ओढ्याप्रमाणे उन्मुक्त राहणार नाही, किमान काही काळ तरी ते पक्क्या बांधलेल्या कॅनॉलप्रमाणे बंदिस्त आणि नियमबद्ध राहणार आहे. तसे राहिले तरच पुढे कधी तरी ते पुन्हा वेगाने वाहणाऱ्या जलस्रोताप्रमाणे खळाळू लागेल याची आशा ठेवता येईल. काय होतील बदल आपल्या जीवन व्यवहारात? पाहूया. 

मास्कच मास्क चहुकडे 
तुम्ही घराबाहेर पडलात, की प्रत्येकाला मास्क वापरायला लागतील. किराणा मालाची दुकाने असोत किंवा औषधाची दुकाने असोत; भाजी घ्यायला जायचे असेल, नाहीतर बँकेत जायचे असेल, मास्क आवश्यकच असतील. तुम्ही ऑफिसचे कर्मचारी असलात, कारखान्यात कामाला असलात तर तुम्हाला ते घातल्याशिवाय प्रवेशच मिळणार नाही. शाळेतील मुले असोत, नाहीतर कॉलेजकुमार; दुचाकीवर असा किंवा कारमध्ये बसा; लोकल असो, रेल्वे असो, बस असो नाहीतर मोनोरेल किंवा मेट्रो; मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही. रिक्षा, बसेस, टॅक्सी यांच्या चालकांना त्यांच्या गणवेश-बिल्ल्याबरोबर मास्कची सक्ती असेल. कदाचित मास्कच्या नवनव्या फॅशन्स येतील. शाळा, ऑफिसेस, कंपन्या त्यावर आपला लोगो छापतील. काही पक्के व्यावसायिक त्यावर जाहिराती छापून फुकटातसुद्धा देतील. पण मास्क आवश्यकच असणार आहेत. घरातून निघताना पेन, रुमाल, चावी, पाकीट, पास या 'पेरूचा पापा'मध्ये मास्कचा नक्की समावेश होईल. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता ही त्रिसूत्री प्रत्येक ठिकाणी आचरणात आणावीच लागेल.

हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार
कित्येक हॉटेल्सनी आपली 'टेक अवे पार्सल सर्व्हिस' सुरू केली आहे. दोन अडीच महिने घरचे खाऊन कंटाळलेल्या खाद्यरसिकांना आणि घरीच असलेल्या कुटुंबीयांना खायला करून दमलेल्या गृहिणींना ती एक पर्वणीच ठरली आहे. पण यापुढे हॉटेलमध्ये जाऊन खायचे असेल, तर तिथे तीन फूट अंतरावर मास्क घालून बसावे लागेल आणि कदाचित फोनवर आधी अपॉइंटमेंट घेऊन टेबल राखून ठेवावे लागेल. हॉटेल्सच्या वेळाही बदललेल्या असतील, बरीचशी हॉटेल्स उशीरापर्यंत सुरू राहणार नाहीत. कारण स्वच्छतेसाठी त्यांना पुन्हा वेगळा वेळ द्यावा लागेल.

वेटरदेखील गणवेशाला मॅचिंग रंगाचे मास्क घालून फिरत असतील. बिल काउंटरसमोर भली मोठी काच असेल. मेन्यूकार्ड डिस्पोझेबल असतील किंवा लॅमिनेट करून सतत निर्जंतुक करावी लागतील. टेबल, खुर्च्या, ग्लासेस, डिशेस सतत निर्जंतुक करावी लागतील. 

 वातानुकुलित हॉटेल्समधले एसी बंद ठेवावे लागतील. कारण सेंट्रल एसी आणि सार्वजनिक ठिकाणी जिथे लोकांचा राबता जास्त असतो अशा ठिकाणच्या एसीमुळे कोरोना पसरतो असे सांगितले गेले होते. त्याऐवजी कूलर्स, पंखे वापरावे लागतील आणि खिडक्या उघड्या ठेवाव्या लागतील. जिथे काचा लावून खिडक्या पक्क्या बंद केलेल्या असतात, अशा हॉटेल्सना ती रचना बदलावी लागेल. यामध्ये सध्या खरा प्रश्न आहे, की खाताना तोंडावरचा मास्क काढावाच लागेल. खाताना एखाद्याला ठसका लागला तर काय? या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय हॉटेल्स सुरू करणे कितपत सुरक्षित ठरेल? 

रेल्वे, बस, विमान प्रवास
यांच्याबाबत त्या वाहनात आत बसताना सोशल डिस्टन्सिंग ठेवणे एकवेळ सोपे जाईल, तिथे मास्क वापरणे अनिवार्य करता येईल. पण रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशनमध्ये शिरताना होणारी गर्दी कशी कमी करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यासाठी सर्व रेल्वेमध्ये आणि बसेसना विमानाप्रमाणे आधीच ऑनलाइन तिकीट काढावे लागेल. प्रत्येक स्टेशनच्या आतल्या प्लॅटफॉर्मवर सोशल डिस्टन्सिंग पाळून उभी करता येतील तेवढीच जनता आत जाऊ शकेल. प्रवाशांना सोडायला येणाऱ्यांना विमानतळाप्रमाणे बाहेरूनच परत जावे लागेल. रेल्वे आणि बसेसच्या वेळा त्याप्रमाणेच आखाव्या लागतील. बस आणि रेल्वे प्रवासात उतरताना पुन्हा दारापाशी गर्दी होते. कारण काही स्टेशनवर रेल्वे मिनिटभरातही निघते. त्यामुळे उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक स्टेशनवरचा कालावधी ठरवावा लागेल. उतरणारे प्रवासी संपले की मग आत चढणाऱ्या प्रवाशांना घ्यावे लागेल. कदाचित विमानतळासारखीच आत जाणाऱ्या प्रवाशांना एखाद्या वेटिंगरूममध्ये बसवावे लागेल. हे कदाचित फार आदर्श वाटेल, पण प्रतिबंधक उपाय योग्य पद्धतीने राबवायचे असतील, तर या पद्धतीचे नियम करून सोयीसुद्धा उपलब्ध करून द्याव्या लागतील.        

मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्स
महाराष्ट्रात मॉल्स उघडायला परवानगी दिली आहे. पण त्यात मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतीलच. कदाचित एका आड एक दुकान किंवा विभाग आलटून पालटून, सम आणि विषम तारखांप्रमाणे उघडायला परवानगी दिली, तर गर्दी कमी होईल आणि एकमेकात अंतर ठेवणे उत्सुक गिऱ्हाइकांना सोपे होईल. प्रत्येक मॉलमध्ये एका वेळेस किती जणांना आत घ्यायचे याचे कडक नियम करावे लागतील. मॉल्सच्या वेळाही सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंतच ठेवाव्या लागतील. संध्याकाळी मॉल्स पूर्ण निर्जंतुक करणे, फ्युमिगेशन करणे यासाठी दोन तास तरी राखून ठेवावे लागतील. मुख्य म्हणजे तिथले जिने, एलिव्हेटर्स, कठडे, काउंटर्स, जाहिरातींचे फलक सतत स्वच्छ ठेवावे लागतील. प्रसाधनगृहे, कपडे बदलण्याच्या आणि कपड्यांच्या ट्रायल घेण्याच्या केबिन्स प्रत्येक वापरानंतर स्वच्छ कराव्या लागतील.

केशकर्तनालये
लॉकडाउनपासून म्हणजे २५ मार्चपासून सर्व सलून्स, केशकर्तनालये, पार्लर्स बंदच आहेत. या सर्व प्रकारात यामधील कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या खूप जवळ जावे लागते. पण यात जनतेला आपल्याला कर्मचाऱ्यांपासून संसर्ग होईल अशी भीती वाटत होती. प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांना त्यांच्या ग्राहकांपासून बाधा होण्याची शक्यता जास्त असेल. सर्दी, खोकला, ताप असलेल्या ग्राहकांना सलूनमध्ये प्रवेश नाकारावा लागेल आणि याच तक्रारी असलेल्या कर्मचाऱ्यांना कामातून रजा घ्यावी लागेल. केस कापताना कर्मचाऱ्यांना पीपीइ किट्स वापरायची सूचना केली गेली आहे. त्यांना शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर्स इतकीच काळजी घ्यावी लागेल. मास्क वापरण्याच्या आवश्यकतेमुळे, सध्या दाढी, फेशिअल, चेहऱ्याचा मसाज या गोष्टी टाळाव्या लागतील. केसांना रंग लावणे, शाम्पू करणे अशा कार्यांना काळजी घेऊन करायला हरकत नाही. पीपीइ किट्स हे एक शास्त्रीय संरक्षक साधन आहे. ते कसे घालायचे, कसे काढायचे आणि त्याचा निचरा कसा करायचा याचे शास्त्रीय शिक्षण या कर्मचाऱ्यांना घ्यावे लागेल. या दुकानातील सीट्स, खुर्च्या, आरसा या गोष्टी सतत स्वच्छ कराव्या लागतील. कात्र्या, रेझर्स आणि इतर साधने शास्त्रीय पद्धतीने निर्जंतुक करावी लागतील.

व्यायामशाळा
व्यायामशाळेत प्रवेश करताना इतर गोष्टी आणि महत्त्वाच्या त्रिसूत्री पाळाव्या लागतीलच. व्यायामशाळेत सर्वसाधारण व्यायाम करताना मास्क वापरणे ठीकच आहे. पण वजने उचलणे, काही मोठ्या यंत्रांवरचे व्यायाम, ट्रेडमिल, सायकलिंग करताना मास्क वापरणे त्रासाचे ठरू शकते. या व्यायामात श्वासाची गती वाढते आणि शरीराला लागणारी प्राणवायूची गरज खूप वाढते. त्यामुळे मास्क वापरल्यास गुदमरल्यासारखे होऊ शकते. क्वचित प्रसंगी व्यायाम करणारी व्यक्ती बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. त्यामुळे असे व्यायाम त्यावेळेस कमीत कमी व्यक्तींना प्रवेश देऊन, त्यांच्यात किमान सहा फुटांचे अंतर ठेवून करावे लागतील. कदाचित या व्यायामांसाठी वेगळ्या वेळा ठेवाव्या लागतील. प्रत्येक व्यक्तीने व्यायामाचे साधन वापरून झाल्यावर त्याचे निर्जंतुकीकरण करावे लागेल आणि व्यायामपटूंना आपले हात प्रत्येक यंत्राचा वापर करण्यापूर्वी आणि केल्यावर हात सॅनिटायझरने स्वच्छ करावे लागतील.  

सिनेमा, नाट्यगृहे
या हमखास गर्दीच्या जागा आहेत, शिवाय तिथे किमान दोन ते तीन तास पूर्ण बंदिस्त असलेल्या जागेत बसावे लागते आणि त्यामुळे रोगाचा संसर्ग होण्याला या जागा कारणीभूत ठरतात. पण अगदी छोटी नाट्यगृहे, सिनेमा थिएटर्ससुद्धा रोगाचा संसर्ग वाढवू शकतात. कोरोनाची साथ पूर्ण आटोक्यात येईपर्यंत त्यामुळे कोणतीही साथ सुरू झाल्यावर गर्दीची ठिकाणे म्हणून आधी सिने-नाट्यगृहे बंद केली जातात. साथ संपूर्णपणे खात्रीने आटोक्यात येईपर्यंत ही सुरू केली जात नाहीत. त्यामुळे सर्व रसिकांना सध्याप्रमाणे टेलिव्हिजन आणि संगणकाच्या पडद्यावरील चित्रपट आणि नाटके बघणे यातच पुढील काही काळ समाधान मानावे लागेल.     

सभा-संमेलने आणि इव्हेंट्स
जी गोष्ट नाटक-सिनेमाची तीच सभा-संमेलनांची. मात्र, कदाचित २५ जणांपर्यंत असलेल्या सभा घ्यायला परवानगी दिली जाईल. पुढील काळात इथेही प्रवाशासाठी ताप तपासावा लागेल. मास्क बांधून यावे लागेल आणि एकमेकात सहा फूट अंतर ठेवावे लागेल. बसायच्या आसनांची, दरवाजे, टेबल-खुर्च्या, पंखे, प्रसाधन गृहे यांची स्वच्छता कार्यक्रमापूर्वी आणि नंतरही करावी लागेल. एसी न वापरता पंखे वापरावे लागतील.   

बागा
बागांमध्ये मास्क बांधून, सहा फूट अंतर ठेवून सकाळ संध्याकाळ फिरायला परवानगी मिळाली आहे. मात्र, लहान मुलांना आणि साठ वर्षांवरील ज्येष्ठांना यायला परवानगी नाही. लहान मुलांची क्रीडांगणे, झोके, घसरगुंड्या आणि इतर साधने त्यांची वाट बघत थांबणार आहेत. मात्र, बागेत येणाऱ्या लोकांच्या संख्येवर प्रशासनाला मर्यादा घालावी लागेल. प्रत्येक बागेच्या आकारानुसार दर तासाला किती लोकांनी आत यायचे? याची नियमावली तयार करून त्याच्या पालनासाठी कर्मचारी ठेवावे लागतील. आत आल्यावरही फिरून झाल्यावर जमणारे कट्टे आणि गप्पा दुरूनच कराव्या लागतील. बाकांवर एका वेळेस एकालाच बसता येईल. बागांमधील शिस्तीचे नियोजन खरे वाटते तेवढे सोपे असणार नाही.

पर्यटन स्थळे
परदेशात काही ठिकाणी पर्यटन स्थळे उघडली गेली आहेत. मात्र भारतात अजूनही त्यावर विचार सुरू आहे. याबाबतीत पर्यटन स्थळापर्यंतचा प्रवास, त्यानंतरची काळजी या गोष्टी येतीलच. पण राहण्याची हॉटेल्स, फिरण्यासाठी वापरली जाणारी प्रवास व्यवस्था म्हणजे टॅक्सी, बस यांबाबत सुरक्षा हे प्रश्नही विचारात घ्यावे लागतील. शिवाय प्रत्यक्ष त्या ठिकाणी आत जाणाऱ्या लोकांच्या संख्येवर नियंत्रण, त्यांच्यामधील सोशल डिस्टन्सिंग यांचा बारकाईने विचार करावा लागेल. शिवाय निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता पाळावी लागेल. आपल्या देशातील कित्येक पर्यटनस्थळे ही निर्जन भागात आहेत. अशा ठिकाणी वाहतुकीची आणि वैद्यकीय उपचारांची व्यवस्था निर्माण करावी लागेल. धार्मिक स्थळेदेखील आपल्या देशात पर्यटन स्थळे मानली जातात. तेथे देवळात किंवा प्रार्थनागृहात जाण्यावर संख्येचे नियंत्रण, मंदिराच्या घंटा वाजवणे, मूर्तीला किंवा एखाद्या खांबाला स्पर्श करणे, तिथे बसून राहणे, मूर्तीला हार चढवणे, प्रसाद देणे-घेणे, अंगारा लावणे अशा अनेक गोष्टी कदाचित टाळाव्या लागतील.

संबंधित बातम्या