त्वचेचे रंगविकार  

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 1 जुलै 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

नाकी डोळी नीटस, गोरा रंग आणि नितळ त्वचा असली, की आपण भारतीय त्या व्यक्तीला सुंदर म्हणतो. त्वचेचा निरोगी नितळपणा आणि गौरवर्ण या गोष्टींना आपल्या सौंदर्य कल्पनेत खूप महत्त्वाचे स्थान असते. साहजिकच काही आजारांनी, अपघातांनी एखाद्याची त्वचा विकृत झालेली असली, तर त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्याची सल आयुष्यभर छळत राहते. त्यातही जर त्वचेवर डाग असेल, तर मग विचारूच नका. लोक त्याला देवाचा कोप समजतात आणि मग दिसतील ते आणि सुचवले जातील ते उपाय करत राहतात. त्वचेवरच्या पांढऱ्या डागांविषयी जनसामान्यांत अधिक गैरसमज आहेत. त्यामुळे आरोग्यसाक्षर होण्यासाठी या पांढऱ्या डागांबाबत काही मूलभूत शास्त्रीय माहिती आज प्रत्येकाला असणे गरजेचे आहे.      

प्रत्येकाच्या त्वचेला जो रंग असतो, त्याचे मूळ त्वचेखाली असलेल्या मेलॅनिन नावाच्या रंगद्रव्यामध्ये असते. मेलॅनोसाईट नावाच्या पेशीद्वारे हे रंगद्रव्य निर्माण होते. ज्या व्यक्तींमध्ये या पेशींमधून मेलॅनिन अधिक प्रमाणात स्त्रवते, त्या व्यक्ती कृष्णवर्णीय होतात आणि ज्यांच्यामध्ये ते कमी प्रमाणात तयार होते त्या गौरवर्णीय होतात. प्रत्यक्षात या रंगद्रव्याच्या कमी अधिक प्रमाणामुळे गोऱ्या आणि काळ्या रंगाच्या विविध छटा आढळून येतात. तीव्र सूर्यप्रकाश आपल्या कातडीवर पडत राहिला, तर हे रंगद्रव्य अधिक प्रमाणात स्त्रवते आणि आपल्या त्वचेचे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेपासून संरक्षण होते. त्यामुळेच उन्हात जास्त फिरणाऱ्या व्यक्तींमध्ये मेलॅनिनचे प्रमाण वाढून त्यांची त्वचा काळवंडते.  

त्वचेप्रमाणे केस आणि डोळ्यांच्या रंगांचाही मेलॅनिनशी संबंध असतो. मेलॅनिनच्या कमी-अधिक निर्मितीनुसार त्वचेच्या रंगांचे विकार निर्माण होतात. या विकारांचे प्रामुख्याने तीन गट असतात.
 हायपरपिगमेंटेशन :
यात मेलॅनिन जास्त प्रमाणात स्त्रवले जाते आणि त्वचेवर काळ्या किंवा काळसर रंगाचे चट्टे निर्माण होतात. या गटातील आजारांमध्ये मेलॅनिन समवेत त्वचेमध्ये एरवी अस्तित्वात नसणारी रंगद्रव्येसुद्धा त्वचेखाली जमा होतात. त्वचेवर काळे चट्टे होण्याची कारणे म्हणजे -
 त्वचेचा दाह होणे.
 काही सर्वांगात पसरणारे आजार (सिस्टेमिक डिसिजेस).                     
 काही औषधांचा परिणाम.                                     
 सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेने होणारा परिणाम.

 हायपोपिगमेंटेशन : काही व्यक्तीत हे मेलॅनिन खूप कमी किंवा अजिबात तयार होत नाही. त्यामुळे तिथे पांढरे डाग तयार होतात. वैद्यकीय परिभाषेत अशा सर्व पांढऱ्या डागांना ‘हायपोपिगमेंटेड डिसऑर्डर’ अथवा ‘ल्युकोडर्मा’ या नावाने ओळखले जाते. यात त्वचेमध्ये रंगद्रव्य कमी प्रमाणात निर्माण होते आणि शरीरावर कुठेही पांढरे किंवा पांढरटसर चट्टे उमटू लागतात. या आजारात मेलॅनिन निर्माण न होण्याची मुख्य कारणे म्हणजे -
 रंग निर्माण करणारी पेशी (मेलॅनोसाईट) नष्ट होते.                               
 या पेशी जन्मतःच अस्तित्वात नसतात. 
 या पेशींमध्ये रंगद्रव्य निर्माण करायच्या प्रक्रियेत काही अडथळा निर्माण होतो.
 ल्युकोडर्मा या गटामध्ये व्हिटिलिगो (कोड), पिटीरीयासीस व्हर्सिकलर, पिटीरीयासीस अल्बा, कुष्ठरोग, नीव्हस डीपिगमेण्टोसस, मायकोसिस फंगोईड्‌स अशा अनेक आजारांचा समावेश होतो. 

 डीपिगमेंटेशन : यामध्ये रंगद्रव्य निर्माण करणाऱ्या पेशी अस्तित्वात असतात, पण रंगद्रव्य एकतर अजिबात निर्माण होत नाही किंवा झाले, तर अगदी मामुली प्रमाणात तयार होते. त्यामुळे त्वचेचा मूळ रंग निघून जातो. काही रुग्णांत ते कायमस्वरूपी निर्माण होत नसते, तर काहींमध्ये तात्कालिक स्वरूपात त्याची निर्मिती थांबलेली असते.

विविध रंगविकार
त्वचेमधील रंगद्रव्यांच्या दोषांमुळे त्वचेमध्ये अनेक रंगविकार निर्माण होतात.    
कोड (व्हिटिलिगो) : ‘श्वेतकुष्ठ’ या नावाने ओळखला जाणारा हा आजार, पूर्वी कुष्ठरोगाचा प्रकार समजला जायचा. मात्र, याचा कुष्ठरोगाशी मुळीच संबंध नसतो. अनेक सामाजिक गैरसमज निगडित असल्याने या आजाराबाबत लोकांच्या मनात खूप भीती आहे.
वय : हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. मात्र, सर्वसाधारणपणे २० टक्के लोकांत हा वयाच्या २० व्या वर्षापर्यंत होतो. २५ टक्के लोकांमध्ये हा वयाच्या १० व्या वर्षीच होते. पण कित्येकदा अगदी छोट्या मुलांमध्ये किंवा ज्येष्ठ नागरिकांमध्येदेखील याची सुरुवात झालेली आढळून येते. 

हा आजार शरीराच्या कोणत्याही भागावर आपले अस्तित्व दाखवू शकतो. 

  • व्हिटिलिगो व्हलगॅरिस या प्रकारात संपूर्ण शरीरावर चट्टे असतात. 
  • लीप टीप व्हिटिलिगो या प्रकारात फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगांवर आढळतात. 
  • लोकलाईज्ड व्हिटिलिगोमध्ये चट्टा शरीरावर एखाद्याच अवयवावर आढळतो. 
  • अनस्टेबल व्हिटिलिगो हा शरीरावर वेगाने पसरत जातो. 
  • केमिकल व्हिटिलिगोमध्ये रबरी चपलांमुळे पायांवर, बिंदीमुळे कपाळावर, गळ्यातील दागिन्यांमुळे मानेवर-गळ्यावर, हेअरडायमुळे टाळूवर चट्टे दिसून येतात. कोडातील रंगांच्या छटांप्रमाणेसुद्धा त्याचे वर्गीकरण केले जाते. 

कोड होण्याची कारणे
व्हिटिलिगो किंवा कोड नक्की कसे निर्माण होते याचे पक्के प्रमाण आणि कारणमीमांसा आजतरी वैद्यकीय शास्त्रामध्ये उपलब्ध नाही. मात्र, काही शास्त्रीय विचार या आजाराच्या कारणांचे विवेचन करतात. 
     आनुवंशिकता : जवळच्या नातेवाइकाला कोड असेल, तर २० ते ३० टक्के वेळेस हा आजार पुढच्या पिढीत आढळतो. मात्र, आनुवंशिकता नसतानासुद्धा हा आजार होऊ शकतो. 
     ऑटोइम्युन : या प्रकारात जनुकीय दोषांमुळे शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशी आपल्याच शरीरातील रंगपेशींना नष्ट करू लागतात. रंगपेशी नष्ट झाल्याने पांढरे डाग निर्माण होतात.
     रासायनिक प्रक्रिया : मज्जातंतूंच्या त्वचेखालील टोकांमधून उत्सर्जित होणाऱ्या, ‘न्युरोपेप्टाइड वाय’ नावाच्या एका विशिष्ट रासायनिक पदार्थामुळे रंगपेशींना इजा पोचते आणि त्या नष्ट होतात. 
     निदान : वूड्‌स लॅम्पद्वारे कोडाच्या चट्ट्यांची तपासणी केली जाते. व्हिटिलिगोमध्ये चट्टे प्रकर्षाने पांढरे दिसून चमकतात आणि फुगीर दिसतात, पण इतर आजारांचे चट्टे चमकत नाहीत.

उपचार 
हा आजार संपूर्ण बरा करण्यास तसे खात्रीलायक उपचार नाहीत. पण काही गोळ्या, स्टीरॉइड्‌स, इम्युनोमॉड्युलेटर औषधे, क्रीम्स, अल्ट्राव्हायोलेट ए, नॅरोबॅण्ड अल्ट्राव्हायोलेट बी, लेसर, विशेष शस्त्रक्रिया उदा. त्वचारोपण, मिनी पंच ग्राफटिंग, टॅटूइंग यामुळे हे डाग घालवता येतात. उपचारांद्वारे त्वचा पूर्ववत जशी होती तशी होऊही शकते; पण व्हिटिलिगोला मुळापासून नष्ट करता येत नाही. कालांतराने डाग परत उमटू शकतात. काही रुग्णांत ते आपोआप गायब होतात आणि वर्षानुवर्षे दिसतही नाहीत. 

कोडाबाबत समज-गैरसमज
गैरसमज : काही विपरीत पदार्थ, मासे खाल्ल्यामुळे कोड होते.  
वस्तुस्थिती : कोड होण्याचा आहाराशी अजिबात संबंध नाही. या आजारात काहीही खाल्ले तरी चालते.
गैरसमज : कोड संसर्गजन्य असते. स्पर्शामुळे ते पसरू शकते. तसेच कोड म्हणजे कुष्ठरोगाचा प्रकार असतो.                 
वस्तुस्थिती : कोड मुळीच संसर्गजन्य नसते आणि कुष्ठरोग हा मायकोबॅक्‍टेरियम लेप्राय या जंतूंमुळे होतो. कोडामध्ये हे जंतू सापडत नाहीत.  
गैरसमज : कोड असलेल्या व्यक्ती शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असतात.     
वस्तुस्थिती : कोड असलेल्या व्यक्ती शक्तीचे खेळ, व्यायाम आणि बौद्धिक कुवतीचे कोणतेही काम इतरांसारख्याच सहजतेने करू शकतात.
गैरसमज : कोड आणि अल्बिनिझम (अवर्णता) हे एकच. 
वस्तुस्थिती : कोडामध्ये मेलानोसाईट्‌स नष्ट होत जातात. अल्बिनिझममध्ये मेलानोसाईट्स असतात, पण त्या रंगद्रव्य तयार करण्यास असमर्थ असतात.
गैरसमज : कोडामधून पुढे त्वचेचा कर्करोग होतो.                             
वस्तुस्थिती : कोडाच्या रुग्णांना त्वचेचा कर्करोग होत नाही. उलट सर्वसाधारण निरोगी त्वचा असलेल्या व्यक्तीपेक्षा त्यांना तो धोका कमी असतो.

अल्बिनिझम (अवर्णता/ रंगहीनता) : यामध्ये जनुकीय कारणांमुळे मेलॅनिन तयार होत नाही. काही रुग्णांत ते अतिशय मामुली प्रमाणात तयार होते, तर इतरांच्यात ते अजिबात निर्माण होत नाही. अल्बिनिझम असलेल्या रुग्णांना अल्बिनो म्हणतात. त्यांच्या संपूर्ण शरीराची त्वचा फिकट असते, केस पांढरे असतात आणि डोळ्यांच्या बाहुल्या गुलाबी असतात. बहुसंख्य रुग्णांना सूर्यप्रकाशाचा खूप त्रास होतो, त्यांना त्वचेचा कर्करोग होण्याची दाट शक्‍यता असते. त्यांची दृष्टीदेखील खूपच मंद असते. त्यांच्या डोळ्यांना तीव्र प्रकाशाने त्रास होतो. तसेच डोळे एका बाजूला फिरवल्यास बुबुळे वेगाने हलू लागतात (निस्टॅगमस). या व्यक्तींमध्ये डोळ्याच्या मज्जातंतूंचे आणि दृष्टीपटलाचे गंभीर आजार उद्‌्‌भवतात. 
अल्बिनिझमचे दोन प्रकार असतात.
     ऑक्‍युलोक्‍युटेनियस अल्बिनिझम : यामध्ये डोळे, त्वचा केस या तिन्हीत मेलॅनिन निर्मिती होत नाही आणि त्या फिकट पांढऱ्या होतात.
     ऑक्‍युलर अल्बिनिझम : यात फक्त डोळ्यांमधील बाहुलीमध्ये रंगद्रव्याचा अभाव असतो. बाकी इतर ठिकाणची त्वचा सर्वसाधारण असते. 

मेलाझ्मा : चेहऱ्यावर, गालांवर गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे प्रमाणबद्ध आकाराचे चट्टे दिसतात, त्याला मेलाझ्मा म्हणतात. हार्मोन्सची, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह, फेनिटॉइन अशी औषधे वापरल्याने हे डाग निर्माण होतात. गर्भवती स्त्रियांच्या चेहऱ्यावर असे डाग गालांवर दिसून येतात. ऑटोइम्युन थायरॉईड आजारातही मेलाझ्मा आढळतो. काही औषधांनी, क्रीम्सनी हे डाग सौम्य करता येतात. या व्यक्तींनी सनस्क्रीन लोशन वापरणे आवश्‍यक असते.

ॲकॅन्थोसिस निग्रिकान्स : काखा, मान, जांघा या भागांत त्वचेच्या वळकटीवर अनेकदा काळसर जांभळट रंगाचे डाग तयार होतात. त्या भागाची कातडीदेखील जाड होते.

झीरोडर्मा पिगमेंटेशन : जगातील सर्व वंशाच्या लोकांमध्ये आढळणारा, पण तसा संख्येने कमी असलेला हा जनुकीय विकार आहे. या व्यक्तींना प्रखर सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांचा कमालीचा त्रास होतो. भाजल्यासारखे फोड त्यांच्या त्वचेवर येतात, त्वचा शुष्क आणि राठ होते, त्यावर काळे डाग पडतात. या डागांना केरॅटोसिस म्हणतात. या व्यक्तींना त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.

इनकॉण्टिनेन्शिया पिगमेंटी : यामध्ये मेलॅनिन रंगद्रव्य त्वचेखाली मोठ्या प्रमाणात जमा केले जाते. या रुग्णांमध्ये त्यांच्या रंगविकाराबरोबर हातापायांच्या सांध्यांची विकृती, दातातील दोष, मज्जासंस्थेचे आजार आणि डोळ्यांचे दोष असतात. हा आजार आनुवंशिक असून जनुकीय बदलामुळे तो होतो.

पिटीरीॲसिस अल्बा : याला अनेकदा कोड समजले जाते. यात लालसर चट्टे शरीरावर उठतात. ते नंतर पांढरे पडतात. 

लेंटीगाईन्स : बऱ्याचदा मध्यमवयीन किंवा वृद्ध व्यक्तींच्या शरीरावर हे काळे डाग दिसतात. शरीराच्या उघड्या भागावर सतत तीव्र सूर्यप्रकाश पडल्याने ते निर्माण होतात. हे चट्टे वेड्यावाकड्या आकाराचे असतात. त्या भागात त्वचेमध्ये मेलॅनिन मोठ्या प्रमाणात जमा झाल्याने हे डाग निर्माण होतात. 

त्वचेच्या या रंगसमस्या खूप जटिल असून त्यांच्याबद्दलचे गैरसमजही खूप आहेत. रुग्ण अनेकदा ऐकीव माहितीवर विसंबून राहून दैवी शक्तींचे, भोंदू वैद्यांचे उपचार घेतात. आजच्या युगातसुद्धा त्वचेचे रंगविकार हे ईश्वरी कारणांनी, गतजन्मीच्या पापामुळे होतात अशी समजूत प्रचलित आहे. अशा अडाणी समजुतींमुळे केलेल्या इलाजात दिशाभूल होऊन इजाच होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे त्वचेच्या आजाराबाबत मान्यताप्राप्त त्वचारोगतज्ज्ञाकडून सल्ला घेणेच योग्य.

संबंधित बातम्या