रात्री दरदरून घाम येतो?

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

काही शारीरिक लक्षणांची अनेकांना भीती वाटते. त्यात छातीत दुखणे, दरदरून घाम येणे, अचानक चक्कर येणे ही लक्षणे मुख्य असतात. अनेक रुग्णालयातल्या रात्रीच्या आत्यंतिक तातडीच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या इमर्जन्सी रूममध्ये अगदी दररोज या लक्षणांचे अनेक रुग्ण हजेरी लावत असतात. त्यातही एखाद्याला रात्री झोपेत असताना जर घाम फुटला, तर त्याचे संपूर्ण कुटुंब धावपळ करत जवळच्या डॉक्‍टरांचे दरवाजे ठोठावतात किंवा रुग्णालयात भरती करतात.

झोपताना जर तुम्ही दोन-तीन जाडजूड ब्लॅंकेट्‌स घेऊन झोपला असाल किंवा पंखा, एसी बंद असल्याने तुमचे शयनगृह जास्त उबदार झाले असेल, उन्हाळ्यात खूप उकडत असेल, तर असा घाम आला तरी काळजीचे काही कारण नसते. मात्र, या दोन्ही गोष्टी व्यवस्थित असतील आणि झोपेत तुमचे अंगातले कपडे आणि गादीवरची चादर ओली होईपर्यंत तुम्हाला घाम फुटला आणि त्यामुळे गाढ झोपेतून तुम्ही दचकून जागे झालात, तर ते एखादवेळेस महत्त्वाच्या आजारांचे लक्षण असू शकते. याला वैद्यकीय लक्षणांमध्ये ‘नाइट स्वेट’ म्हणतात. 

घाम येणे ही शरीरातील उत्सर्जनाची क्रिया असून नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्त अन्य वेळी घाम येणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असते. शरीराचे तापमान नियंत्रित होण्याचे कार्य घाम येण्याच्या यंत्रणेमार्फत होत असते. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे ‘हायपर हायड्रोसिस’ म्हटले जाते. घाम येणे ही शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. पण घाम आल्यावर अनेकांची प्रतिक्रिया अगदी टोकाची असते. तसे पाहायला गेले, तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण त्या व्यक्तीला अनेकदा बऱ्याच त्रासांचा सामना करावा लागतो.

कमी गांभीर्याचे आजार
 रात्री घाम फुटला म्हणजे ‘हार्ट ॲटॅक’ आला असे समजायचे कारण नसते. कारण कित्येकदा काही सर्वसामान्य आणि जिवाला धोकादायक नसलेल्या आजारातही हा अनुभव येऊ शकतो. अशा आजारात घाम फुटण्यासमवेत इतरही काही त्रासदायक लक्षणे असतात. 

ॲसिडिटी : ॲसिडिटी किंवा वैद्यकीय भाषेत गॅस्ट्रो इसोफेजीयल रिफ्लक्‍स डिसीज (जीइआरडी) मध्ये हा त्रास होऊ शकतो. यामध्ये घाम फुटण्याच्या लक्षणासमवेत जेवणानंतर छातीत खूप जळजळ होते. अन्ननलिका मधेच आकुंचन पावते आणि त्यामुळे छातीत दुखते. अन्न गिळायला त्रास होतो, खाल्लेले अन्न घशाशी येते. दम्याच्या रुग्णांना असा त्रास असल्यास खोकल्याची उबळ येणे, दम लागणे अशी तीव्र लक्षणेदेखील उद्‌भवतात.

मानसिक तणाव, चिंता : एखादी व्यक्ती कमालीची तणावग्रस्त असेल, कसल्यातरी भीतीचे प्रचंड सावट तिच्यावर असेल, तर त्याला असा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तीला रात्री घाम तर फुटतोच पण शांत झोपही लागत नाही. त्याची दिवसभर सातत्याने चिडचिड होत असते. त्याचे हातपाय, सांधे, अंग सारखे दुखत असते. आपल्या चिंतेच्या कारणाशिवाय तो कशाचाच विचार करू शकत नाही.

हार्मोन्स संबंधित विकार : रजोनिवृत्ती काळातील स्त्रिया, हायपरथायरॉइडीझम, फिओक्रोमोसायटोमा तसेच कार्सिनॉइड सिंड्रोम असलेल्या व्यक्ती, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असलेले पुरुष यांच्याबाबत रात्री अचानक असे घामाघूम होण्याचे प्रसंग येतात. पण या व्यक्तींमध्ये वजन भरभर घटणे, डोके दुखणे, लैंगिक निष्क्रियता येणे, उत्साह न वाटणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याचे बंद होणे अशी लक्षणे आढळतात.

काही औषधे : स्टीरॉइड्‌स, मानसिक विकाराची ट्रायसायक्‍लिक आणि एसएसआरआय प्रकारची तसेच फिनोथायाझिन गटातील औषधे, ॲस्पिरीन आणि पॅरासिटॅमॉलसारखी वेदनाशामक औषधे, मधुमेहाची औषधे, कर्करोग निवारण करणारी काही औषधे, काही हार्मोन्स रुग्णाला दिली गेली असताना, काही ठराविक व्यक्तींमध्ये असा अचानक घाम सुटण्याचे प्रसंग येतात. अशा व्यक्तींना ज्या डॉक्‍टरांनी ती औषधे दिली असतील, त्यांचा सल्ला घेतल्यास ते त्यात फेरफार करून रुग्णाचा उपचार करू शकतात. 

इडिओपाथिक हायपरहायड्रोसिस : या प्रकारात रुग्णामध्ये इतर कोणताही आजार नसतो. मात्र, त्याच्या शरीरातील स्वेदग्रंथी अकारण खूप प्रमाणात घाम निर्माण करत असतात.

गंभीर स्वरूपाचे आजार
 काही गंभीर स्वरूपाच्या आजारातही रात्री घाम फुटतो. पण यात त्या आजाराच्या बाबतीत असलेल्या विशेष आणि इतर व्यवच्छेदक लक्षणांचादेखील विचार करावा लागतो.

स्लीप ॲप्निया : झोपेत घोरणे आणि मधेच १०-२० सेकंद श्वास थांबणे किंवा नाक चोंदणे असे त्रास स्लीप ॲप्नियामध्ये होतात. या व्यक्तींना रात्री अचानक खूप घाम फुटतो. याशिवाय सकाळी डोक दुखणे, स्मरणशक्ती कमी होणे, मन एकाग्र होण्यात आणि काही नवे शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळे येणे, नैराश्‍याची भावना येणे, व्यक्तिमत्त्वात बदल होणे, वारंवार लघवी करण्यास उठणे, सकाळी उठल्यावर तोंड, घसा कोरडा पडणे अशी लक्षणे या बरोबर दिसतात. या रुग्णांना मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, वजन वाढणे असे विकार जडू शकतात. त्यामुळे या रुग्णांची संपूर्ण तपासणी केल्यास तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या योग्य उपचारांच्या बळावर त्यांच्या या विकारावर मात करता येते. 

क्षयरोग : क्षयरोगाच्या रुग्णांना दीर्घकाळ बारीक ताप येतो. खोकला येणे, खोकल्यातून श्‍लेष्म पडणे असे त्रासही त्यांना होतात. या व्यक्तींमध्ये ताप उतरताना खूप घाम येऊन तो उतरतो. वेळेवर निदान केल्यास क्षयरोग पूर्ण बरा होऊ शकतो.

जंतुसंसर्ग (इन्फेक्‍शन्स) : क्षयरोगाप्रमाणेच इतर काही विशेष जंतुसंसर्गापासून होणाऱ्या आजारांमध्ये रुग्णांना रात्री खूप घाम येतो. यामध्ये गुरांपासून आणि निर्जंतुक न केलेल्या प्राणीजन्य उत्पादनांपासून होणारा बृसेल्लोसिस, हृदयाच्या झडपांना होणारा एंडोकार्डायटिस, हाडांना होणारा ऑस्टीओमायलायटिस अशा जंतूंच्या संसर्गाने होणाऱ्या आजारात ताप, थंडी, अंग, हाडे, स्नायू दुखणे, दम लागणे, वजन कमी होणे असे त्रास होतात. तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने योग्य प्रतिजैविके वापरून यांचा उपाय त्वरित केल्यास रुग्ण अत्यवस्थ होत नाही आणि पूर्ण बरा होऊ शकतो. 

कर्करोग : काही रुग्णांना दीर्घकाळ सर्दी, खोकला, ताप, थंडी भरून येणे, वजन कमी होणे, छाती, पोट, हाडे दुखणे, मानेवर किंवा काखेत गाठी येणे असे त्रास होतात. हे त्रास नेहमीच्या इलाजाने दूर होत नसल्यास कर्करोगाच्या शक्‍यतेचा विचार करावा लागतो. रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया), हॉजकिन्स लिम्फोमा, नॉन हॉजकिन्स लिम्फोमा यामध्ये अशी लक्षणे दिसून येतात. 

मज्जासंस्थेचे आजार : अर्धांगवायू, मज्जासंस्थेतील ऑटोनॉमस संस्थेच्या काही आजारात विशेषतः ऑटोनॉमिक न्युरोपाथी या मज्जातंतूंच्या विकारात आणि ऑटोनॉमिक डिसरीफ्लेक्‍सिया या मज्जारज्जूशी संबंधित आजारात, मज्जारज्जूमध्ये द्रव पदार्थाने भरलेल्या गुठळ्या तयार होऊन गंभीर त्रास होणाऱ्या सिरीन्गोमायलीया या आजारात थरथर सुटणे, हातपाय बधिर आणि संवेदनाशून्य होणे, स्नायूंचा अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात. या रुग्णांनाही अचानक खूप घाम येऊ शकतो.

मधुमेह : रक्तातील साखरेची पातळी खूप कमी झाल्यास खूप घाम येतो. अशावेळेस रुग्ण बेशुद्ध पडू शकतो. दीर्घकाळ उपाशी राहिलेल्या व्यक्तीत मधुमेह नसेल, तरी असा घाम येतो.

व्यसने : काही व्यसनांमध्ये रुग्णाने ते व्यसन अचानक सोडल्यास किंवा त्याला त्याच्या व्यसनाची ‘वस्तू’ न मिळाल्यास होणाऱ्या शारीरिक त्रासात अचानक खूप घाम येतो. विशेषतः रात्री असे होण्याची शक्‍यता जास्त असते. या व्यसनात मद्यसेवन आणि काही नशील्या गोष्टींचा समावेश होतो.  

प्राथमिक उपाय
 तुम्हाला किंवा तुमच्या घरात कुणाला असा कपडे ओलेचिंब करणारा घाम आला, तर अगोदर काही प्राथमिक उपाय करावे लागतात.

 • झोपण्याची खोली थंड व्हावी या उद्देशाने पंखा, कुलर, एसी वापरावा. खिडक्‍या उघड्या ठेवाव्यात.
 • अंगावर जाड ब्लॅंकेट घेण्याऐवजी पातळशी चादर किंवा दुलई, रजई पांघरावी.
 • नेहमी घाम येत असल्यास उशीखाली आईसपॅक ठेवावा.
 • झोपण्यापूर्वी थंड पाणी प्यावे. घाम येऊ लागल्यावर आणि त्यानंतरही डीहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी पीत राहावे.
 • झोपण्यापूर्वी व्यायाम करणे टाळावे.
 • झोपायच्या आधी थोडावेळ थंड पाण्याने अंघोळ करावी.
 • झोपण्यापूर्वी मसालेदार जेवण, धूम्रपान, मद्यपान टाळावे.
 • ताणतणाव कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगा, रीलॅक्‍सेशन टेक्‍निक्‍स अशा पद्धतींचा वापर करावा.

वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा?
 जर तुम्हाला कधीतरी असा घाम येत असेल आणि आला तरी तुमची झोप विचलित होत नसेल, तर तुम्ही डॉक्‍टरांना लगेच दाखवण्याची अजिबात गरज नाही. मात्र, त्यानंतरच्या काळात तुम्ही जेव्हा कधी डॉक्‍टरांकडे जाल तेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट जरूर घाला आणि आवश्‍यक वाटल्यास तपासण्या करून घ्या. मात्र, जर अशा घामाघूम होण्याचे लक्षण इतर गंभीर लक्षणांसमवेत उद्‌भवत असेल आणि घामाने चिंब होऊन तुमची झोप उडत असेल, तर डॉक्‍टरांना लगेच दाखवून घ्यावे.
जर काही विशेष लक्षणे आढळत असतील तर वैद्यकीय सल्ला त्वरित घ्यावा. उदा.

 1. अचानकपणे काही प्रयत्न न करता वजनात खूप घट होत असेल,
 2. सतत हातपाय, स्नायू, सांधे, अंग दुखत असेल, 
 3. कमी पातळीचा किंवा खूप तीव्र ताप आठवडाभर येत असेल,
 4. खोकल्यातून लालसर कफ किंवा रक्त पडत असेल, 
 5. सतत पोट बिघडणे, पोटात दुखणे, जुलाब होणे अशी लक्षणे उद्‌भवत असतील, तर तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला घेणे अत्यावश्‍यक ठरते.
 6. रजोनिवृत्ती झाल्यानंतर सुरुवातीला असा घाम येण्याचा कुठलाही त्रास नसेल, पण काही काळाने तो सुरू झाला, तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य असते.  

थोडक्‍यात काय तर रात्री दरदरून घाम फुटला, तर घाबरून जाऊ नका. अगोदर वर उल्लेखिलेल्या काही प्रतिबंधक गोष्टी करा. त्यानंतर बरे न वाटल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार अगोदरपासूनच असल्यास त्वरित रुग्णालयात भरती व्हा.

संबंधित बातम्या