यकृताचे दुर्धर आजार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

हृदय, फुप्फुसे, मेंदू, मूत्रपिंडे यांच्याप्रमाणेच यकृत हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवात छोटामोठा बिघाड होऊनही त्याचे कार्य अविरतपणे सुरूच राहते. मात्र, बिघाड खूप जास्त प्रमाणात झाला तर शरीरावरील परिणाम दिसू लागून ते लक्षात येते. 
यकृताची कार्ये 
 साखरेच्या स्वरूपात ऊर्जा साठविणे. निकामी झालेल्या लाल रक्तपेशींवर प्रक्रिया करणे. ''अ'' जीवनसत्त्वाचा साठा करणे, बी-१२, ड, इ आणि क जीवनसत्वे यकृतात साठवली जातात. तसेच शरीराला आवश्यक काही क्षारांचा साठा करणे. आतड्यांतून शरीरात जाणारे जंतू नष्ट करणे. पित्तरस तयार करून त्याद्वारे स्निग्ध पदार्थांचे पचन करणे. प्रथिनांचे प्रमाण घटल्यास आवश्यक प्रथिने यकृताद्वारे तयार करणे. रक्तद्रवातील अमोनियाचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. चयापचयासाठी शरीरास आवश्यक ॲमिनो अॅसिड्सची निर्मिती यकृतात होते. रोजच्या आहारातल्या घटकांमधून कोलेस्टेरॉल तयार करून त्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे.

यकृताचे आजार 
१. संसर्गजन्य आजार : हिपॅटायटिस ए, बी, सी, डी आणि इ या प्रकारांच्या विषाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज येते. जो विषाणू संसर्गाला कारणीभूत आहे त्याच्या नावाने तो आजार ओळखला जातो. त्यामुळे हिपॅटायटिस ए, बी, सी आणि इ हे आजार प्रचलित आहेत. सर्व साधारणपणे या आजारांना ‘कावीळ’ म्हटले जाते. परंतु, वैद्यकीय परिभाषेत कावीळ म्हणजे ‘इक्टेरस’ किंवा डोळे पिवळे दिसणे. हे आजारांचे केवळ लक्षण असते, तो आजार नसतो. 
 लक्षणे : कावीळ, गडद लाल किंवा पिवळ्या रंगाची लघवी होणे, मळमळणे, उलट्या, पोटदुखी, थकवा, शरीराला खाज येणे, भूक मंदावणे, वजन घटणे
 प्रतिबंधक उपाय : हिपॅटायटीस बी आणि सी रोखण्यासाठी  

 • इतरांनी वापरलेले ब्रश, रेझर किंवा सुया वापरू नयेत.
 • पिअर्सिंग करताना, टॅटू करताना वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची काळजी घ्यावी. 
 • सुरक्षित शारीरिक संबंध ठेवणे, कंडोम वापरणे. 
 • हिपॅटायटीस बी प्रतिबंधक लस घेणे.
 • हिपॅटायटीस रोखण्यासाठी -
 • शारीरिक स्वच्छता पाळणे.
 • खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे. 
 • अस्वच्छ ठिकाणी खाणे टाळणे. 
 • लहान मुले, तरुण तसेच प्रौढ व्यक्तींनी हिपॅटायटीस ए प्रतिबंधक लस घेणे.

२. यकृतपेशींची हानी : काही रासायनिक द्रव्ये, मद्य, औषधे यांनी यकृताचे कार्य पार पाडणाऱ्या महत्त्वाच्या पेशींची हानी होते. हानी झालेल्या या पेशींची जागा सामान्य पेशी घेतात आणि यकृतात होणाऱ्या रक्तप्रवाहास अडथळा निर्माण करून त्यांचे कार्य रोखून धरतात. हळूहळू यकृताची सामान्य कामकाज करण्याची क्षमता कमी होते. यालाच यकृताचे ‘लिव्हर फेल्युअर’ म्हणतात. याचे काही प्रकार आहेत.
 लिव्हर सिऱ्हॉसिस
हा यकृताचा एक गंभीर आजार असतो. यकृत खराब होऊन ‘लिव्हर सिऱ्हॉसिस’ होण्याची कारणे 

 • ३० टक्के रुग्णांमध्ये दारूचे अतिसेवन 
 • ३० टक्के लोकांमध्ये हिपॅटायटिस ‘बी’, हिपॅटायटिस ‘सी’ हे विषाणूजन्य संसर्ग, 
 • पॅरॅसिटॅमॉल, पेनकिलर्स, मिथोट्रीक्सेट, निकोटिनीक अॅसिड, काही आयुर्वेदिक औषधे आणि काही इतर औषधे जास्त प्रमाणात दीर्घकाळ घेतली जाणे 
 • काही रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, थायरॉइडचे असंतुलन, स्थूलता ‘फॅटी लिव्हर’ होऊन त्याचे पर्यवसान लिव्हर सिऱ्हॉसिसमध्ये होऊ शकते.

 या आजारामध्ये प्रथम यकृताच्या पेशी फुटतात. त्यांचे कार्य मंदावते आणि हळूहळू त्या नष्ट होतात. त्याची जागा तंतुमय पेशींनी भरून येते. हे तंतू यकृताचे नेहमीचे कार्य करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे यकृताचे कार्य कमी होते.
 लक्षणे : सुरुवातीस वजन कमी होणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसतात. पण आजार वाढू लागल्यावर कावीळ होणे, जलोदर (पोटात पाणी होणे ), पायाला सूज येणे अशी लक्षणे दिसतात.  
या आजारात रुग्णास वारंवार जुलाब तसेच अपचन होते. पोटाच्या उजव्या बाजूस दुखते व भूकही मंदावते. यकृतात तंतुमय पेशी निर्माण झाल्याने ते आकसते आणि घट्ट होते. त्यामुळे यकृतातील रक्तप्रवाह कमी होतो. परिणामतः यकृतातील पोर्टल व्हेनमधील रक्तदाब वाढतो.  
सिऱ्हॉसिसचे प्रमाण वाढत गेल्यावर अपचनाचे त्रास होतात, भ्रम होतो आणि रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो. लिव्हर सिऱ्हॉसिसच्या चाचण्या करून ग्रेड ए, बी किंवा सीमध्ये त्याचे वर्गीकरण केले जाते. सिऱ्हॉसिस हा आजार अनेकदा गंभीर स्वरूप झाल्यावर लक्षात येते. 
 प्रतिबंधक उपाय : आरोग्यदायी जीवनशैली अवलंबणे हाच लिव्हर सिऱ्हॉसिस होऊ नये यासाठीचा उत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे.

 • दारू पिण्याची सवय असल्यास कुठे थांबावे याचा वेळीच विचार करणे गरजेचे. 
 • मद्यपी व्यक्तींनी वेळोवेळी यकृतासाठीच्या तपासण्या करून घ्याव्यात. 
 • चाळीस वर्षांनंतर पन्नास वर्षांचे होईपर्यंत प्रत्येक तीन वर्षांनी आणि वयाच्या पन्नास वर्षांनंतर प्रतिवर्षी रक्तचाचण्या व यकृताच्या अल्ट्रासाऊंड चाचणी करून घ्यावी. 
 • हिपॅटायटिस ‘बी’ व ‘सी’ झालेला असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत.
 • कोणतीही औषधे वैद्यकीय सल्ल्याने घ्यावीत.

 फॅटी लिव्हर
 यकृत पेशींमध्ये अनावश्यक चरबी साचल्याने ही फॅटी लिव्हरची परिस्थिती उद््भवते.
‘फॅटी लिव्हर’ या आजाराचे तीन प्रकार असतात. 
नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) : यामध्ये यकृतात फक्त चरबी जमा झालेली असते, पण यकृतावर सूज नसते 
नॉन अल्कोहोलिक स्टीटोहिपॅटायटिस (एनएएसएच) : यामध्ये यकृतावर सूज आढळते आणि यकृत पेशी नष्ट होत असल्याची लक्षणे दिसून येतात. 
लिव्हर सिऱ्हॉसिस : यकृतामधील चरबीचे प्रमाण वाढत जाऊन यकृताची इजा वाढते आणि पेशी मोठ्या प्रमाणात नष्ट होऊन सिऱ्हॉसिस होतो.
 कारणे  : आहारातील चरबीचे योग्यरीत्या विघटन न झाल्यास त्याचे रूपांतर यकृतातील वाढलेल्या चरबीत होते. आहारात साखर, स्निग्ध पदार्थ जास्त असणे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे हालचालींचा, व्यायामाचा अभाव असणे ही यामागची कारणे आहेत. स्थूलपणा, मधुमेह, थायरॉइड, इतर हार्मोन्सची कमतरता, कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसेराइड्सचे रक्तातील वाढते प्रमाण यामुळेसुद्धा यकृतातील चरबी वाढते. 
प्रत्येक लठ्ठ व्यक्तीला फॅटी लिव्हरची समस्या असू शकते. मधुमेहाच्या ७० ते ८० टक्के रुग्णांना फॅटी लिव्हर होण्याचा धोका असतो. बॉडी मास इंडेक्सद्वारे (बीएमआय) हा धोका लक्षात येऊ शकतो. 
यापूर्वी फॅटी लिव्हरची समस्या वयाच्या पन्नाशी-साठीत दिसत असे. बदलती आहारशैली, तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पिझ्झा-बर्गरसारख्या फास्टफूडमुळे आज तरुणांमध्ये हा आजार बळावताना दिसत आहे. 
बहुतांश स्थूल व्यक्तीमध्ये चरबीचे प्रमाण अधिक असू शकते. त्यामुळे सिऱ्हॉसिस वा कॅन्सरचीही भीती असते. साधारणतः सूज आलेल्या २० टक्के रुग्णांना सिऱ्हॉसिस होतो, त्यातील १०-११ टक्के रुग्णांमध्ये ते मृत्यूचे कारण ठरते. 
 लक्षणे : पोटाचा घेर वाढणे, सतत वजन वाढणे, यकृताचा आकार वाढणे, यकृताला सूज येणे, मळमळणे, भूक न लागणे, कामात उत्साह न राहणे, पायांना सूज येणे, थकवा, पोटात उजव्या बाजूला दुखणे. 
 प्रतिबंधक उपाय : वजन नियंत्रित करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, मद्यपान-धूम्रपान बंद करणे, कोलेस्टेरोल आणि रक्तदाबावर नियंत्रण, पौष्टिक-संतुलित आहार, नियमित व्यायाम, तळलेले पदार्थ व जंकफूड वर्ज्य करणे, आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने वागणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेणे. 

३. यकृताचा कर्करोग : यकृतात दोन प्रकारे कर्करोग होतो. पहिल्यात यकृतातील पेशीमध्ये कर्कजन्य बदल होतात. याला ‘प्रायमरी हिपॅटोमा’ म्हणतात. तर दुसऱ्यात शरीरातील इतर भागात झालेल्या कर्करोगाच्या काही पेशी यकृतात येऊन तिथे त्यांची वाढ होते आणि कर्करोगाच्या गाठी निर्माण होतात. याला ‘मेटॅस्टॅटिक लिव्हर डिसीज’ म्हणतात. यकृताच्या पेशी किंवा यकृतातील पित्तनलिकांच्या पेशींमध्ये बदल होऊन निर्माण होणाऱ्या कर्करोगाबाबत अनेक कारणे सांगितली जातात. मात्र, बऱ्याचदा यकृताच्या कर्करोगाचे नेमके कारण सापडत नाही.

४.यकृतात होणारा पू : रस्त्यावरचे, उघड्यावरचे अन्न खाऊन आमांश होतो. यात अमीबा नावाचे एक पेशीय सूक्ष्म सजीव आतड्यात जाऊन सूज येते. त्यावर योग्य व पूर्ण उपाय न झाल्यास हे अमीबा यकृतात जाऊन तिथे पू होतो. रुग्णाला पोटात दुखते, ताप येत राहतो आणि पचन मंदावते.

यकृताच्या आजारांचे निदान
रुग्णाचा इतिहास, त्याच्या सवयी, व्यसने, वजन, पोट तपासताना यकृताच्या आकारात होणारी वाढ, डोळ्यांचा व त्वचेचा पिवळेपणा, पोटात असलेले पाण्याचे प्रमाण यातून याचे प्राथमिक निदान होते. मात्र, यकृताच्या गंभीर स्वरूपाचे निदान करण्यासाठी काही चाचण्या आवश्यक असतात. लिव्हर फंक्शन टेस्ट्स, ऑटोइम्युन ब्लड मार्कर, हिपॅटायटिस ए, बी व सी या विषाणूंचा शरीरातील संसर्ग दर्शविणाऱ्या चाचण्या, लिव्हर बायोप्सी, पॅरासेन्टेसीस या महत्त्वाच्या चाचण्या कराव्या लागतात.  

यकृताच्या आजारांचे उपचार
हिपॅटायटिस ए : विश्रांती, पथ्ये, साधा आहार, प्रथिने कमी, दर आठ दिवसांनी रक्तातील बिलीरुबीन तपासणे.
हिपॅटायटिस बी : हिपॅटायटिस बी आपोआप बरा होतो आणि कोणत्याही उपचारांची गरज नसते. परंतु, एक  टक्का रुग्णांत यामध्ये अतिशय गंभीर स्थिती निर्माण होते. जर हा आजार दीर्घकाळ चालू राहिला, तर एन्टेकॅव्हिर, टेनोफॉव्हिर, लॅमिव्ह्युडीन, एडीफोव्हिर, टेल्बीव्हयुडीन अशापैकी एक गोळी रोज देऊन तो आजार नियंत्रणात ठेवता येतो. हा पूर्ण बरा करण्याचे औषध सध्या उपलब्ध नाही. 
हिपॅटायटिस सी : या विषाणूविरोधात आज अनेक औषधे उपलब्ध झाली आहेत. या औषधांमुळे हा विषाणू शरीरातून बाहेर काढणे शक्य होते किंवा कायमस्वरूपी त्याला नष्ट करता येते. एकूण १२ आठवडे ही औषधे घ्यावी लागतात.
ऑटो इम्युन डिसिजेस : यात स्वतःचे शरीर हे यकृताला बाधक ठरते. स्टीरॉइड किंवा इतर औषधे घेऊन यकृताचे होणारे नुकसान थांबवता येते. ही औषधे बरीच वर्षे घ्यावी लागतात. 
फॅटी लिव्हर : नियमित व्यायाम, वजन ताब्यात ठेवणे, मधुमेह, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे. यात  जीवनसत्त्व ‘ई’चा उपयोग होतो. यकृत बरे करण्यासाठी मानवाला १८०० कॅलरीजचा आहार घ्यावा लागतो. त्यात शरीराच्या वजनाच्या प्रतिकिलो १.२ ग्रॅम्स प्रोटिन घ्यावी लागतात.  
विल्सन्स डिसीज : यात तांबे हा धातू शरीरात वाढल्याने शरीराला इजा होते. त्याला ‘बी पेनिसिलअमायन’ हे औषध घ्यावे लागते. भारतात त्याचा सध्या तुटवडा आहे. ही संजीवनी देशात मिळत नसल्याने लाखो रुग्ण मृत्यूच्या दारात जाण्याचा धोका आहे.
लिव्हर सिऱ्हॉसिस : यात यकृत मोठ्या प्रमाणात निकामी होऊन यकृताची कार्यक्षमता कमी होते. अशा रुग्णांचे आयुर्मान एक ते दीड वर्ष असू शकते. या रुग्णांना यकृत प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय राहत नाही.  
पायावर सूज येणे आणि जलोदर यांच्यामुळे जास्त लघवी होण्याची औषधे दिली जातात. शरीरातील पाणी कमी होण्यापासून आराम मिळू शकतो. रक्तस्राव होऊन रक्ताच्या उलट्या थांबवण्यासाठी एंडोस्कोपीद्वारे अन्ननलिकेतील सुजलेल्या आणि फुगलेल्या रक्तवाहिन्या बॅण्डिंग करून बंद केल्या जातात. वारंवार होणारा संसर्ग रोखायला अॅण्टिबायोटिक्सचा वापर करावा लागतो. 
यकृत प्रत्यारोपण : रुग्णाचे यकृत पूर्णतः निकामी झाल्यास त्याचे निकामी यकृत काढून टाकून त्या जागी दुसऱ्या व्यक्तीचे यकृत बसविणे म्हणजे यकृत प्रत्यारोपण. 

यकृत प्रत्यारोपणाचे प्रकार
१. लिव्हर डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट - जिवंत दात्याकडून यकृत घेऊन प्रत्यारोपण करणे. 
२. कॅडॅव्हेरिक डोनर लिव्हर ट्रान्सप्लान्ट - यात एखाद्या नुकत्याच मृत झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून त्वरित यकृत काढून घेऊन ते वापरून प्रत्यारोपण करणे. 
 

संबंधित बातम्या