एपिलेप्सी : अपस्माराचे झटके 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

एपिलेप्सी किंवा अपस्माराचे झटके यावर समाजात खूपच अज्ञान तर आहेच, पण गैरसमजही आहेत आणि त्यासाठी खूप प्रबोधन करणे गरजेचे आहे. ‘एपिलेप्सी’ हा एक मज्जासंस्थेचा गंभीर आजार आहे. याला मराठीत अपस्मार, मिरगी किंवा फेफरे म्हणतात. ‘फिट्स येणे’ या सर्वसाधारण शब्दांनी जनसामान्यात हा विकार ओळखला जातो. या आजारात रुग्णाच्या सर्वांगाची किंवा हात, पाय अशा अवयवांची वेगाने हालचाल होते. यालाच झटके येणे म्हणतात. अपस्माराच्या काही प्रकारात झटक्यांऐवजी थोड्या कालावधीसाठी भान हरपणे, बेशुद्ध होणे किंवा नेहमीपेक्षा वेगळे वागणे दिसून येते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. 

लक्षणे 
या आजारात अचानकपणे मेंदूमधील ऊर्जा मोठ्या प्रमाणात मज्जासंस्थेतून प्रवाहित होते. मेंदूमध्ये प्रत्येक भागाला काही कार्य असते. मेंदूचे काही भाग शरीरातील काही ठराविक अवयवांच्या हालचालींचे नियमन करतात, तर काही भाग संवेदना, विचार यांना संचलित करतात. साहजिकच मेंदूच्या ज्या भागातून ही ऊर्जा प्रवाहित होते, त्या भागाच्या कार्यावर विपरीत परिणाम दिसून येतात. यामध्ये-

 • हातापायांच्या कुठलाही ताबा नसलेल्या अनिर्बंध वेगवान हालचाली होणे.
 • काही काळासाठी गोंधळलेल्या अवस्थेत राहणे.
 • कुठेही संवेदनाशून्य नजरेने एकटक दूरवर पाहत राहणे.
 • शुद्ध हरपणे किंवा कुठलेही भान नसल्यासारखे निश्‍चल राहणे.
 • अचानक खूप भीती वाटणे, कमालीची चिंता निर्माण होणे, भूतकाळातील प्रसंगांचे भास होणे. मात्र प्रत्येक रुग्णाला प्रत्येक झटक्याच्या वेळेस यापैकी एकच लक्षण सातत्याने येत राहते. या लक्षणांवरून अपस्माराच्या झटक्यांचे दोन प्रकार पडतात.

केंद्रस्थ अपस्मार (फोकल सीझर्स)- मेंदूच्या एकाच भागाशी किंवा केंद्राशी संबंधित अशी अस्वाभाविक हालचाल दिसून येत असल्यास, त्याला केंद्रस्थ अपस्मार म्हणतात. यामध्ये पुन्हा दोन उपप्रकार आहेत.

बेशुद्धावस्था नसलेले झटके : यामध्ये रुग्णाची शुद्ध न हरपता त्यांच्या भावना बदलतात, समोरील गोष्टी त्यांना वेगळ्या दिसतात, तऱ्हतऱ्हेचे आवाज ऐकू येतात, वेगळे गंध-वास जाणवतात, स्पर्श आणि चव या संवेदनाही सर्वसामान्यांपेक्षा वेगळ्या जाणवतात. त्यांच्या शरीराचा एखादा अवयव हात, पाय काही काळ खूप थरथरत राहतो, पण कितीही प्रयत्न केला तरी ती हालचाल त्यांना थांबवता येत नाही. या प्रकारात काही व्यक्तींना शरीरभर मुंग्या येणे, गरगरणे, तीव्र प्रकाशझोत दिसणे अशाही तक्रारी आढळतात.

व्यक्तीची जागरुकता हरवणारे झटके : या प्रकारात रुग्ण अवकाशात एकटक पाहत राहतो, आजूबाजूच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखा वागतो, त्याला हाक मारली तरी ऐकू येत नाही. काही रुग्ण सतत हात चोळत राहणे, काही तरी चावत राहणे, गिळत राहणे किंवा गोलगोल फिरत राहणे अशी एखादी हालचाल पुन्हा पुन्हा करत राहतात. 

सार्वत्रिक अपस्माराचे झटके (जनरलाईझ्ड सीझर्स) - यामध्ये झटके येण्याच्या क्रियेत मेंदूच्या सर्व भागांचा समावेश असतो. याचे साधारणपणे सहा उपप्रकार आहेत.

अॅबसेन्स सीझर्स किंवा पेटीटमाल एपिलेप्सी : साधारणपणे लहान मुलांमध्ये हा प्रकार दिसून येतो. यात शून्यात बघत राहणे आणि एखाद्या अवयवाची अनपेक्षित हालचाल दिसून येते. उदा. डोळे मिचकावत किंवा ओठ चावत राहणे. असा प्रकार थोड्या थोड्या वेळाने परत परत होत राहतो आणि क्वचित प्रसंगी या मुलांची शुद्धदेखील हरपते.

स्नायू ताठरणे (टोनिक सीझर्स) : यात रुग्णाच्या पायांचे, बाहूचे, पाठीचे स्नायू अचानक कडक होतात, ताठरतात आणि तो धाडकन खाली पडू शकतो.

स्नायूंमध्ये निर्बलता येणे (एटोनिक सीझर्स) : यामध्ये रुग्णाच्या शरीराच्या स्नायूंमध्ये अचानक शक्ती नसल्यासारखे होते आणि तो खाली पडतो.

तालबद्ध झटके (क्लोनिक सीझर्स) : या प्रकारात मान, चेहरा, खांदे, बाहू या भागांचे स्नायूंना काही कालावधीसाठी एक प्रकारच्या तालात, परत परत झटके येत राहतात.

स्नायू फडफडणे (मायोक्लोनिक सीझर्स) : यात हाताचे किंवा पायांचे स्नायू अचानकपणे काही काळ फडफडत राहतात.  

टोनिक आणि क्लोनिक सीझर्स : याला पूर्वी ग्रॅंड माल एपिलेप्सी म्हटले जायचे. हा सर्वत्र आढळणारा प्रकार असून यात शरीर ताठ होणे, अंगातील सर्व स्नायूंना झटके येणे अशी लक्षणे दिसून येतात. त्याची जीभ चावली जाते, त्याला कपड्यात लघवी होते. अशा रुग्णाची शुद्ध काही काळ हरपते. झटके थांबल्यावर तो पूर्णपणे भानावर येत नाही. त्याच्या नजरेत काहीही भाव नसतात. 

गांभीर्य

 • अपस्माराच्या रुग्णात खालील लक्षणे आढळली तर त्याला त्वरित रुग्णालयात न्यावे किंवा डॉक्टरांचा तातडीने सल्ला घ्यावा.
 • कोणत्याही प्रकारचे अपस्माराचे झटके पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकले.
 • झटका येऊन गेल्यावर बराच काळ रुग्णाचे श्‍वसन पूर्ववत झाले नाही.
 • झटके थांबूनही रुग्ण पूर्ण शुद्धीवर आला नाही.
 • लागोपाठ दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा झटके येत राहिले.
 • झटक्यांबरोबर रुग्णाला खूप कडक ताप असेल.
 • झटके येणारी स्त्री रुग्ण गरोदर असेल.
 • रुग्णाला मधुमेह असेल.
 • झटके येताना रुग्णाला शारीरिक इजा झाली असेल.

कारणमीमांसा
अपस्माराचे झटके येणाऱ्या निम्म्याहून जास्त रुग्णांमध्ये त्याचे कारण दृग्गोचर होत नाही. मात्र, बाकीच्या रुग्णात काही महत्त्वाची कारणे दिसून येतात.

अनुवंशिकता : एकाच कुटुंबात अपस्माराचा आजार पिढ्यानपिढ्या असू शकतो. अनुवंशिकतेमध्ये मेंदूचा तोच भाग बाधित राहतो आणि अपस्माराचा प्रकारही तोच असतो.

जनुकीय कारण : काही व्यक्तींमध्ये जनुकीय कारणांमुळे अपस्माराचा विकार उद्‍भवतो. काही जनुके अपस्मार होण्यास कारणीभूत असतात, तर काही जनुकांमुळे ठराविक बाह्य परिस्थितीत रुग्णाला झटके येतात.

मेंदूची इजा : रस्त्यावरील किंवा अन्य अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे (हेड इंज्युरी) झटके येतात. 

मेंदूचे आजार : मेंदूत गाठ असल्यास (ब्रेन ट्युमर) रुग्णाला झटके येतात्त. मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे होणाऱ्या अर्धांगवायूमध्येही रुग्णांना झटके येतात.

जंतूसंसर्ग : मेनिनजायटीस, व्हायरल एनकेफेलायटीस, एड्स अशा जंतूजन्य आजारात याचा धोका वाढतो.

गर्भावस्थेतील इजा : बाळाचा जन्म होण्यापूर्वी ते आईच्या पोटात असताना अनेक विपरित गोष्टींनी बाळांना जन्मजात अपस्माराचे झटके येऊ शकतात. यात गरोदर मातांना होणारे काही जंतुसंसर्ग, आहारातील कमतरता, प्रसूतीदरम्यान बाळाला प्राणवायू न मिळणे, बाळाच्या मेंदूला इजा होणे अशी कारणे असतात.

बाळाच्या वाढीसंबंधातले आजार : ऑटिझम, न्यूरोफायब्रोमॅटोसिस अशा आजारांमध्ये बाळांच्या मज्जासंस्थेच्या वाढीत काही समस्या उद्‍भवून अपस्माराचे झटके येऊ लागतात. 

या कारणांशिवाय एखाद्या रुग्णाला झटके येण्यामागे अवमनस्कता (डीमेंशिया) हेही कारण दिसून येते. 

अपस्मारातील गुंतागुंत
अपस्माराचे झटके अचानक येतात. त्यामुळे ती व्यक्ती क्षणार्धात खाली पडून मूर्च्छित होते. त्यावेळेस त्यांचा शरीरावर कोणताही ताबा राहत नाही, त्यामुळे त्यांना पोहताना बुडण्याचा आणि वाहन चालवताना गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. 
आधीपासून अपस्माराचे झटके येणाऱ्या गर्भवती स्त्रियांना प्रसूती होताना झटके आल्यास ते त्यांच्या आणि बाळांच्या जीवाला धोकादायक ठरू शकते. याकरिता ज्यांना आधीपासून हा आजार आहे अशा स्त्रियांनी गर्भधारणेचा विचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन, आधीची औषधे आवश्यक वाटल्यास बदलून गर्भावस्थेत काही त्रास होणार नाही अशी औषधे सुरू करावीत. 

मानसिक आजार : अपस्माराचे झटके येणाऱ्या व्यक्तींमध्ये भावनात्मक विस्फोट, चिंता, नैराश्य, वर्तनातील विकृती असे मानसिक त्रास संभवतात. या रुग्णांमध्ये आत्महत्येला प्रवृत्त होण्याचे प्रमाणही काळजी निर्माण करणारे असते. 

गंभीर परिणाम : काही रुग्णांत अपस्माराचा झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ राहतो. तर काहींमध्ये एक झटका आला, की त्यातून सावरून शुद्धीवर येण्याआधी पुढचा झटका येतो आणि असे झटके जास्त काळ येत राहतात. याला स्टेटस एपिलेप्टीकस म्हणतात. अशा रुग्णांमध्ये मेंदूला कायमची गंभीर इजा होण्याची दाट शक्यता असते.

अचानक मृत्यू : अपस्मारामध्ये एक टक्का रुग्णांत अचानक हृदयक्रिया किंवा श्‍वासोच्छ्‍वास बंद पडून व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. काहीवेळेस रुग्णाला झटके येताना उलटी होऊन ती घशावाटे श्‍वसनलिकेत जाऊन श्‍वास बंद पडू शकतो. 

निदान
प्रत्येक अपस्माराचे झटके किंवा क्वचित प्रसंगी आलेला झटका म्हणजे अपस्मार नव्हे. अशा प्रत्येक झटक्याचे मेंदूरोगतज्ज्ञाकडून निदान करून तो झटका अपस्माराचाच आहे किंवा अन्य प्रकारचा याची खात्री करून घेणे आवश्यक असते. 

अपस्माराचे निदान करताना रुग्णाचे झटके प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तींशी बोलून झटके येते वेळेस रुग्णाच्या हालचाली आणि इतर वर्णन पाहणे योग्य ठरते. रुग्णाला झटका येतानाचा व्हिडिओ नातेवाईकांनी काढला असल्यास तो महत्त्वाचा ठरतो. रुग्णाचा कौटुंबिक इतिहास, त्याच्या आजाराची सुरुवात आणि वाढ, रुग्णाचे वागणे, चालणे-बोलणे, त्याच्या शरीराच्या स्नायूंच्या प्रतिक्षिप्त क्रिया, स्नायूंची शक्ती, मानसिक परीक्षण या गोष्टी तपासल्या जातात.
रुग्णाच्या आजाराशी संबंधित इतर आजारांसाठी रक्ताच्या तपासण्या, आवश्यक असल्यास जनुकीय तपासणी, पाठीतील पाण्याची तपासणी, मेंदूचा सिटीस्कॅन किंवा एमआरआय, पेटस्कॅन, स्पेक्टस्कॅन, मानसिक आजारांच्या तपासण्या अशा तपासण्या उपयुक्त ठरतात. मात्र, अपस्माराचे योग्य निदान होण्यासाठी मेंदूच्या विद्युतलहरींचा आलेख (इलेक्ट्रो एनसीफॅलोग्रॅम) किंवा इ.इ.जी सर्वांत महत्त्वाचा ठरतो. या सर्व चाचण्या झाल्यावर स्टॅटिस्टिकल पॅरामेट्रिक मॅपिंग, करी अॅनॅलिसिस, मॅग्नेटो एनसीफॅलोग्रॅम या अद्ययावत पद्धतींद्वारे मेंदूच्या कोणत्या भागातून हे झटके यायला सुरुवात होते याची खात्री केली जाते.  

उपचार
मेंदूरोगतज्ज्ञाकडून अपस्माराचे निदान झाल्यानंतर प्रथम प्रतिबंधक औषधे सुरू केली जातात. एका औषधाचा पूर्ण डोस घेऊनही अपस्माराचे झटके येत असतील, तर दुसरे औषध सुरू केले जाते. साधारणपणे ५० टक्के रुग्णांचे अपस्माराचे झटके एका औषधाने नियंत्रणात येतात. दुसरे औषध सुरू केल्यानंतर आणखी १५ टक्के रुग्णांना आराम मिळतो. मात्र, दोन औषधांचे पूर्ण डोस व्यवस्थित घेऊनही अपस्माराचे झटके येत असतील तर आणखी कितीही नवी आणि प्रभावी औषधे वापरली, तरी त्याचा सकारात्मक फायदा होण्याची शक्यता नसते. 

सामान्यतः ज्या रुग्णांमध्ये औषधांनी अपस्मार नियंत्रणात येत नाही, त्यांच्या मेंदूमध्ये काहीतरी अपवादात्मक वेगळा भाग आढळून येतो. हा भाग आकाराने छोटा असेल आणि तो काढून टाकल्याने रुग्णाची वाचा, भाषा, दृष्टी, श्रवणशक्ती यावर काहीही विपरीत परिणाम होत नसल्यास, विविध तपासण्यांद्वारे असा मेंदूचा भाग शोधून सोप्या सुटसुटीत शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जातो. अशा रुग्णांचा अपस्मार कायमचा बरा होतो.  बऱ्याच रुग्णांना त्यानंतर औषधे घेण्याचीही गरज उरत नाही. 
 

संबंधित बातम्या