आपत्ती व वैद्यकीय सेवा नियोजन 

डॉ. अविनाश भोंडवे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

भूकंप, भूस्खलन, अतिवृष्टी, महापूर, वणवे, चक्रीवादळे या साऱ्या नैसर्गिक आपत्ती. त्यांना नष्ट करणे शक्य नाही, त्यांना काबूत आणणेही होणार नाही. त्यामुळे अशा आपत्तींना सामोरे जाताना जय्यत तयारी करणे आणि मानवांची हानी वाचवणे एवढेच आपल्या हातात राहते. त्यामुळे आपत्ती नियोजन ही कोणत्याही देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत महत्त्वाची बाब ठरते.

नैसर्गिक आणि मानवनिर्मित हे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. 
१. नैसर्गिक आपत्तीमध्ये हवामानासंबंधी : वादळे, चक्रीवादळे, त्सुनामी, हिमवर्षाव, अतिथंडी, उष्णतेची लाट, अतिवृष्टी, ढगफुटी, दुष्काळ आणि जमिनीसंबंधी - भूकंप, दरड कोसळणे, हिमकडे कोसळणे, महापूर इत्यादींचा समावेश होतो. तर जैविकमध्ये - सांसर्गिक आजारांच्या साथी, टोळधाड यांसारख्या घटना घडतात.
२. मनुष्यनिर्मितमध्ये : प्रवासादरम्यान होणारे अपघात, इमारती कोसळणे, पूल कोसळणे, धरण फुटणे, आण्विक केंद्रात होणारे अपघात, वायू गळती, दंगे, युद्धे इत्यादींचा समावेश होतो.
आपत्ती नियोजनात सर्व सरकारी विभागांचे टीमवर्क असावे लागते. यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, विद्युतविभाग, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, प्रदूषण नियंत्रण, नाले विकास, मलनिःसारण, घनकचरा व्यवस्थापन, शहरविकास, सुरक्षा विभाग, वृक्ष प्राधिकरण, संगणकीय माहिती विभाग अशा खात्यांमध्ये उत्तम समन्वय असावा लागतो. याचबरोबर समाजकार्य करणाऱ्या विविध स्वायत्त संस्था (एनजीओ), स्वयंसेवक मंडळे, वैद्यकीय संस्था यांना सहभागी करून घ्यावे लागते.

आपत्ती आणि वैद्यकीय सेवा
 नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या लोकांना मुक्त करणे हे प्रथम काम असते. अशा वेळेस केवळ स्वयंसेवक काही करू शकत नाहीत. त्यासाठी सुसज्ज अशा कार्यकारी दलांची गरज भासते. उदा. पुरात अडकलेल्या, आगीत अडकलेल्या, मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या लोकांची सुटका करणे. मात्र, त्यानंतर अशा व्यक्तींना वैद्यकीय मदतीची तातडीने गरज भासते.
आपत्तीग्रस्त भागात वैद्यकीय मदत तीन टप्प्यात द्यावी लागते.
१. पहिल्या टप्प्यात मुख्यत्वे शारीरिक इजांचे इलाज त्वरित करणे आवश्यक असते. यामध्ये अनेक प्रकारच्या खोल जखमा, हाडे फ्रॅक्चर होणे, मेंदूला मार लागणे, पोटातील अवयवांना इजा पोचणे, मणके फ्रॅक्चर होणे, भाजणे अशा इजा येतात. त्यांना प्रथमोपचार करून रूग्णालयात हालवावे लागते. त्यामुळे खालील गोष्टी कराव्या लागतात. 
 प्रथमोपचार दवाखाने आणि डॉक्टर्स यांची सेवा सुरू करणे.
 तातडीक उपचार, छोट्या आणि मध्यम स्वरूपाचा इलाज करणारी रूग्णालये उभारून तज्ज्ञ शल्यचिकित्सक, हाडांचे डॉक्टर्स, पोटाचे तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टर्सना सहभागी करणे.
 आपत्तीग्रस्त भागाच्या जवळील गावांमध्ये असलेल्या सरकारी, निमसरकारी आणि खाजगी रूग्णालयात अत्यवस्थ रुग्णांसाठी आणि मोठ्या शस्त्रक्रियांसाठी खाटा उपलब्ध ठेवणे. सर्व प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टर्सना पाचारण करणे. 
 काही वेळेस आपत्तीग्रस्त जागेवर प्रत्यक्ष जाऊन काम करण्यासाठी फिरत्या दवाखान्यासारख्या मोबाइल वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते.
 आपत्तीत दगावलेल्या व्यक्तींचे वैद्यकीय परीक्षण करून त्यांची ओळख पटवणे, त्यांच्या अंत्यविधीसाठी मदत करणे किंवा प्रेतांची विल्हेवाट लावणे, मृत्यूची नोंद ठेवणे अशाही गोष्टी कराव्या लागतात. 

२. दुसऱ्या टप्प्यात साथीचे आजार बळावू लागतात. यात - 
 दूषित आहारातून आणि पाण्यातून पसरणारे उलट्या, जुलाब, कॉलरा, टायफॉइड, ए प्रकारची कावीळ असे आजार 
 डासांची पैदास वाढल्यामुळे होणारे मलेरिया, डेंगी
 पिसवांमुळे होणारा टायफसची लागण अनेक लोकांना होऊ शकते. 
 गोवर, डांग्या खोकला, जंत असे आजारही डोके वर काढतात. 
 आधी असलेले दमा, सीओपीडी, उच्च रक्तदाब, हृदयविकार, संधिवात बळावू लागतात. 
 काही आपत्तीग्रस्त प्रदेशात मोकाट कुत्र्यांमुळे ''रेबीज'' उद्‌्‌भवतो. 
 या सर्व आजारात वैद्यकीय पथकांनी आवश्यक ते लसीकरण करून घ्यावे. सरकारी आदेश असल्यास, त्या प्रदेशातील लोकांचे, लहान मुलांचेसुद्धा लसीकरण करावे.  
 याचबरोबर चिखल्या, गजकर्ण, खरूज असे त्वचा विकार असलेले रुग्ण दिसू लागतात.
यासाठी प्रथम पातळीवर उपचार करणारे दवाखाने, डॉक्टर्स आणि आजार बळावल्यावर लागणाऱ्या मोठ्या रूग्णालयांची तसेच स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता भासते. या साऱ्या वैद्यकीय उपचारांबरोबरच आढळलेल्या साथीच्या आजारांची आरोग्यसेवेच्या दफ्तरी नोंद (डिसीज नोटिफिकेशन) पाठवावी लागते. 

३. तिसऱ्या टप्प्यात बळावलेले आजार, अन्न पदार्थांच्या टंचाईमुळे उद्‌्‌भवणारे पोषणासंबंधी विकार आणि मानसिक विकारांचा प्रश्न उभा राहतो. मानसिक धक्का, चिंता, नैराश्य, वैफल्य यामुळे त्रस्त झालेल्या आपत्तीपीडित रुग्णांना फिजिशियन्सचे इलाज आणि मानसोपचार लागू शकतात. 

जनजागृती
 कोणत्याही आपत्तीत वैद्यकीय संस्था तसेच स्वयंसेवी संस्था, जनतेला चुकीच्या वागण्यापासून रोखणे, सूचनांचे आणि नियमावलीचे पालन करणे याबाबत लोकांना सजग करू शकतात. यामध्ये खालील प्रकारच्या सूचना देता येतात. 
आजूबाजूच्या भागात जर पूर आला असेल तर - 

 • माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐकणे. 
 • पूर येण्याची शक्यता असल्यास उंचावर जाऊन थांबणे. 
 • वेगाने वाहणारे नाले, ड्रेनेज चॅनेल, दऱ्या आणि पुराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहावे.

घर सोडून निवाऱ्यात जाताना - 

 • आपले घर सुरक्षित ठेवावे. हातात वेळ असेल, तर बाहेरचे फर्निचर आणि महत्त्वाच्या वस्तू वरच्या मजल्यावर हालवाव्यात. 
 • इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे मुख्य स्विचेस, व्हॉल्वज सर्व विद्युत उपकरणे बंद करून ठेवावे. 

घर सोडणे आवश्यक असल्यास - 

 • वाहत्या पाण्यात चालू नये. प्रवाहाची उंची सहा इंचापेक्षा जास्त असेल, तर तुमचा तोल जाऊ शकतो. प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता. जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवावी. 
 • पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नये. जर आपली गाडी पाण्याखाली जात असेल, तर ती सोडून द्यावी आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्यावी. कारण पाण्याच्या प्रवाहात वाहनदेखील वेगाने वाहून जाऊ शकते.
 • पुराच्या पाण्याशी संपर्क टाळावा. हे पाणी मैला, तेल, रसायने किंवा इतर पदार्थांमुळे दूषित असू शकते. 
 • विजेच्या तारांपासून लांब राहावे, कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे. वीज कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करावी. 
 • पुराचे पाणी ओसरलेल्या जमिनीवरून चालताना काळजी घ्यावी. ढिगाऱ्याखालील जमिनी व फरशांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्तू, खिळे इत्यादी वस्तू असू शकतात. चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनीवरून पाय घसरण्याची भीती असते. 
 • इमारतीचे छत ओले झाले असेल, तर वीज बंद करावी. जिथून पाणी गळत असेल तेथे खाली बादली ठेवावी आणि छताला लहानसे छिद्र पाडावे, जेणेकरून त्यावरील भार थोडा कमी होईल. 
 •      खोलीतील पाणी काढून टाकण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल्स आणि कपड्यांचा वापर करावा. 
 •      फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये अॅल्युमिनियम फॉइल शीट ठेवावे.

या गोष्टी टाळाव्यात - 

 • वाहत्या पाण्यातून चालू नये. त्यामुळे पाय घसरण्याची भीती असते.  वाहत्या पाण्यामध्ये पोहू नये. 
 • पूरग्रस्त भागातून वाहने नेऊ नयेत. कारण अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहने वाहून जाण्याची दाट शक्यता असते. 
 • पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नये.
 • अभियंत्याने तपासणी केल्याशिवाय वीज सुरू करू नये. 
 • गॅस गळतीबाबत सावध राहावे. मेणबत्त्या, कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नये. 
 • वस्तूंवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करू नये. यामुळे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. 
 • छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरू नयेत. 
 • ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल्स किंवा इतर इलेक्ट्रिकल उपकरणे सुरू करू नये. 
 • व्हॅक्युम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नये. 
 • तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई करू नये. गरजेपेक्षा कमी वेळात पाण्याचा दबाव कमी झाला, तर भिंतींवर ताण वाढू शकतो. 

आपत्ती नियोजन 
१. प्रतिबंध : जिल्ह्यातील, शहरातील संभाव्य आपत्तींचे वर्गीकरण, संभाव्य धोके आणि जोखमींचे संकलन, कोणत्या आपत्तींमुळे किती नागरिक संकटग्रस्त होतील याचे रोखठोक आराखडे तयार करणे. या आपत्ती भविष्यकाळात कशा रोखता येतील याचे नियोजन करणे. हे आराखडे पुढील काळात मार्गदर्शक ठरावेत असे तयार करावे लागतात.  

२. उपशमन : यामध्ये आपत्तींमुळे होणारी संभाव्य वित्त आणि जीवितहानी कमीतकमी राखणे. तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा निश्चिती, संरक्षक निवारे, भूकंप प्रतिरोधक घरे, इमारती बांधण्याचे प्रशिक्षण संबंधित अभियंत्यांना, गवंड्यांना देणे. पूर न येण्यासाठी छोटेमोठे बंधारे बांधणे. 

३. सज्जता : प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन प्रकारच्या सज्जता येतात. जीवित आणि वित्तहानी कमी राखणे या उद्देशाने आपत्तीनंतर तात्काळ उपाययोजना अमलात आणणे. नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सजग करून तात्कालिक आणि दूरगामी आपत्तीनिवारण कार्यात त्यांची मदत घेणे. आपत्ती विमोचन पुस्तिका तयार करणे. जीवनावश्यक वस्तू आणि त्यांच्या उपलब्धतेची माहिती तयार ठेवणे. या कामांसाठी मनुष्यबळ सज्ज ठेवणे. सर्वांगाने परिपूर्ण असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे. संवेदनशील तसेच धोकादायक बाबींचे संतुलन राखणे. आवश्यक आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा ताफा योग्य प्रशिक्षण देऊन तयार करणे. प्रतिसाद कार्याकरिता आवश्यक यंत्रसामग्री तयार करणे. आपत्तीची सातत्याने माहिती मिळण्यासाठी संदेशवहन, टेलिफोन्स, संगणक, इंटरनेट सज्ज ठेवणे.
आपत्ती निवारण सज्जतेमध्ये सर्व सेवांना एकत्र आणणे. त्यांचा समन्वय राखून सर्व साधन सामग्री मिळवणे आणि त्याचा वापर करणे या गोष्टी येतात. 

४. आपत्ती प्रतिसाद : आपत्ती येताना ती ध्यानीमनी नसताना अचानक येते. अशावेळेस आपत्तीनिवारक प्रक्रिया किती कमीतकमी वेळेत कार्यान्वित होते हे महत्त्वाचे असते. हा प्रतिसाद जीवितहानी होऊ न देणे, खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ न देणे आणि आपत्तीमुळे होणारी पर्यावरण हानी कमी करणे या गोष्टींवर केंद्रित करावा लागतो. 
मॉकड्रिल - आपत्ती आली असे गृहीत धरून अचानक त्याबाबतची यंत्रणा राबवणे आवश्यक असते. यामुळे आपत्तीला प्रतिसाद त्वरित मिळतो.

५. पूर्ववत स्थिती : आपत्तीमुळे विस्कळीत आणि वेळप्रसंगी उद्ध्वस्त झालेले जनजीवन सामान्य होण्यासाठी मदत करणे अपेक्षित असते. यामध्ये घरांची डागडुजी, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, रस्ते दुरुस्ती करणे, दळणवळण सुस्थितीत आणणे, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणे या बाबी येतात. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज असते. यात सरकारी मदतीबरोबर स्वयंसेवी संस्था महत्त्वाचे कार्य बजावू शकतात.  
 आज आपल्या देशाला सक्षम आपत्ती व्यवस्थापन केंद्राची गरज आहे. त्याकरिता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या पुनर्रचनेकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे. आपत्तींचा सामना करताना ताबडतोब सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या घटकांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दीर्घ मुदतीच्या पुनर्वसन धोरणाचा त्यात समावेश असायला हवा. समाजातही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. आपत्ती व्यवस्थापन निधीची निर्मिती राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा पातळीपर्यंत व्हायला हवी. अंतरिक्ष विभागाने ठिकठिकाणी डॉप्लर रडार केंद्रे उभी केली पाहिजेत. आपत्ती उपशमन विभागात तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका व्हायला हव्यात. आपत्तीतज्ज्ञ, त्यांची धोरणे आणि त्या धोरणांनी प्रभावित होणारे नागरिक यांच्यातही समन्वय हवा. 
(''जनजागृती''- संदर्भ: पुणे मनपा, आपत्ती व्यवस्थापन- मार्गदर्शक तत्त्वे)

संबंधित बातम्या