'वहिनी' का चिडतात?

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

एका नामवंत मराठी दूरदर्शन वाहिनीवर एक लोकप्रिय मराठी अभिनेता प्रत्येक एपिसोडमध्ये गृहिणींच्या घरी जाऊन मुलाखत घेतो, त्यांना प्रश्न विचारतो, निरनिराळे गेम्स घेतो आणि शेवटी विजेत्या महिलेला एक झक्कास पैठणी बक्षीस म्हणून देतो. अत्यंत धमाल उडवून देणाऱ्या या कार्यक्रमात तो त्या गृहिणीबद्दल तिच्या घरच्यांना प्रश्न विचारतो. ''वहिनींचा स्वभाव कसा आहे?'' भाऊजींच्या या प्रश्नावर घरच्या स्त्रिया आणि पुरुष निरनिराळ्या कंगोऱ्यातून तिच्या स्वभावावर प्रकाश टाकतात. पण त्या प्रतिक्रियांत एक ठराविक उत्तर नेहमी असतेच... ''ती कधी कधी फार चिडचिड करते. खूप रागावते.''

तसा हा कार्यक्रम समाजातील मध्यमवर्गीय पारंपरिक घरांमध्ये केला जातो. पण माझी खात्री आहे, की तो समाजातील अतिउच्चभ्रू ते अतिनिम्न स्तरावरच्या सगळ्या कुटुंबात आणि भारतभरातल्या कानाकोपऱ्यात जरी केला, तरी बहुतेक घरात हेच उत्तर मिळेल. 'वहिनी अधूनमधून फार चिडतात.' काय कारण असते, या घुसमटण्याचे? का होतो तिचा मनस्ताप? 'ती' का चिडते? या प्रश्नांची उकल करायला गेलो, तर महिलांच्या आजच्या या परिस्थितीला शारीरिक, मानसिक, सामाजिक, पारंपरिक असे अनेक विकल्प मिळतात.

शारीरिक कारणे
 स्त्रियांच्या आरोग्यात शरीरातील हार्मोन्सचा प्रभाव खूप महत्त्वाचा असतो. मुलगी १२-१३ वर्षांची झाली, की तिच्यातील स्त्रीविषयक हार्मोन्स (इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन) कार्यरत होतात. त्यांच्या प्रभावाने तिला मासिक पाळी सुरू होते. याकाळात शरीरात होणारे बदल, पाळीच्या काळात पोटात-कंबरेत दुखणे याचा त्रास होतच असतो. पण पाळी वेळेवर न येणे, पीसीओएसचा त्रास उद्‌भवून पाळी लांबणे, वजनवाढ होणे असे त्रास तिच्या आरोग्याबाबत उद्‌भवतात. 

तरुण वयात पाळीच्या त्रासांबरोबरच, लग्न आणि त्यानंतर दिवस जाणे, प्रसूती, प्रसूतिपश्चात होणारे शारीरिक त्रास यांचा तिच्या तब्येतीवर परिणाम होतच राहतो. आज भारतभरात ८० टक्के गर्भवती स्त्रियांना आवश्यक असलेला, पोषणमूल्ये जास्त असलेला आहार पुरेशा प्रमाणात मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मोजक्या सुशिक्षित आणि सधन वर्गातील स्त्रिया सोडल्या, तर पाळी चुकल्यापासून तिला आवश्यक असलेला वैद्यकीय सल्ला आणि औषधे मिळणेही अनेकींना दुरापास्त असते. आजही सातव्या महिन्यात सुनेला माहेरी पाठवायचे आणि मग तिच्या माहेरच्यांनी तिला डॉक्टरकडे न्यायचे, प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये नाव नोंदवायचे ही प्रथा सुरूच आहे. साहजिकच पहिल्या सहा महिन्यांत तिला आवश्यक असलेली औषधे न मिळाल्याने ती जास्तच अशक्त होत जाते.

प्रसूती नॉर्मल झाली तरी प्रसूती दरम्यानच्या असह्य कळा, कधीकधी होणारा अपरिमित रक्तस्राव तिच्या आरोग्यावर ओरखडे उमटवून जातातच आणि जर सिझेरियन झाले तर ते ऑपरेशन आणि त्यानंतरच्या वेदना, टाके काढणे या गोष्टी होतातच. प्रसूतिपश्चात बाळाला अंगावर पाजत असेपर्यंत म्हणजे दीड-दोन वर्षे प्रत्येक मातेला लोह आणि कॅल्शिअमच्या गोळ्या जाणे आवश्यक असते. पण हे सुख एकुणातल्या ५-१० टक्के स्त्रियांनाच मिळते.  

आज अनेक भारतीय स्त्रियांना मूल हवे असूनही, नवऱ्याच्या इच्छेमुळे किंवा आर्थिक कारणांसाठी, इतर अडचणींसाठी गर्भपात करून घ्यावा लागतो. प्रसूतीनंतर बाळाला अंगावर पाजणे, त्याचे संगोपन करणे यात तिची कमालीची धावपळ होते. मूल रात्री झोपेतून उठते म्हणून झोप न येणाऱ्या अगणित स्त्रिया घरोघरी आढळतात. झोपेच्या अभावाचा परिणाम तिच्यावर होतोच. मध्यम वयात स्त्रीला पुरुषांप्रमाणे उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे, मधुमेह, हृदयविकार असे विकार आणि इतरांप्रमाणेच काही संसर्गजन्य आजार उद्‌भवतात. पण त्यांच्यासाठी लागणाऱ्या तपासण्या आणि डॉक्टरांची औषधे वेळेवर होत नाहीत. शेवटी हे आजार हाताबाहेर गेल्यावरच लक्षात येतात. आयुष्याच्या पन्नाशीत स्त्रीची पाळी बंद होते. रजोनिवृत्तीच्या काळात वर उल्लेखलेल्या आजारांबरोबर हाडे ठिसूळ होऊन सांधे दुखणे; स्तनाचा, गर्भाशयाचा, बीजांडकोशाचा कर्करोग; हायपोथायरॉइडिझम, अंगावरून जास्त जाणे, गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया हे सर्व उद्‌भवते. स्त्रियांची चाळिशीनंतर जी नियमितपणे सर्वांग वैद्यकीय तपासणी व्हायला पाहिजे ती बहुधा होत नाही. स्त्रियांच्या आजारात त्यांना घरच्या पुरुषांचे साहाय्य मिळत नाही. पण बहुतेक वेळेस स्त्रियांनाच अशी मदत नको असते. अगदी पूर्ण हालचाल बंद झाली तरच या गृहस्वामिनींना मदतीला कोणाला तरी बोलावावेसे वाटते.    

आहाराबाबत म्हणाल तर आजदेखील आपल्या देशात पुरुषांचे भोजन उरकल्यावर घरातील स्त्रिया जेवतात. त्यामुळे उरलेसुरले खाणे नियमितपणे होत राहते. शिल्लक राहिलेला स्वयंपाक दुसऱ्या दिवशी परतून खाणे हा रोजचाच परिपाठ असतो. जेवताना पोळी-भाजीपेक्षा जास्तीत जास्त भात खाण्यावर स्वभावतःच जास्त भर असतो. आजही जवळजवळ सर्व गृहिणी सकाळी एक कप चहा पिऊन कामाला लागतात आणि दुपारी दोन वाजता जेवतात. त्यानंतर थेट रात्रीच भात खाऊन झोपतात. थोडक्यात घरकामाचे शारीरिक कष्ट करून सोळा-सोळा तास त्या उपाशीच राहतात. याच्या जोडीला सोमवार-गुरुवार-शनिवार आणि चतुर्थी-एकादशी असे उपवास असतातच. या सर्व कारणांनी भारतातल्या तब्बल ८० टक्क्यांहून जास्त स्त्रिया अॅनिमिक अशक्त असतात.

मानसिक कारणे
लहानपणापासून अनुभवलेली कुचंबणा, दुर्बल मानसिकता, अनाठायी सहनशीलपणा आणि शारीरिक त्रासांमध्ये होणारी मानसिक घुसमट, यामुळे भारतीय स्त्रियांमध्ये मानसिक त्रासांचे आणि मनोवैज्ञानिक आजारांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: मुलीला वाढवताना केला जाणारा भेदभाव, लहानमोठ्या वयामध्ये त्या मुलीकडे दिले गेलेले लक्ष, अभ्यासातील कमीअधिक हुशारीमुळे होणारी तुलना, वागण्या-दिसण्यातील तफावत याचा तौलनिक विचार मुलींकडून नकळत होत राहतो. वयात आल्यानंतर पौगंडावस्थेतील शारीरिक बदलाबरोबरच मानसिक बदल तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणतात. अनेक मुलींना शिक्षण घ्यायचे असूनही पुढे शिकू दिले जात नाही. काही जणींना शिक्षण सोडून मधेच कसलीही छोटीमोठी नोकरी करून कुटुंब सांभाळावे लागते. काहींचे लग्न लवकर उरकले जाते. आजकाल बहुसंख्य मुलींना वयोपरत्वे लग्न होण्यात अडचणी येतात. अशा वेळी अशा विविध स्तरांतील स्त्रियांची मानसिकताही तीव्रतेने बदलत जाते. कुटुंबातील ताणतणाव, वयोपरत्वे वाटणारे लैंगिक विषयांबद्दलचे आकर्षण यामुळे मुलींच्या अध्ययनाची गती मंदावते. अकाली अथवा मनाविरुद्ध स्त्री-पुरुषसंबंध आल्यास, नातेवाईक, मित्र, नोकरीतील सहकारी किंवा अन्य एखाद्या पुरुषाकडून शारीरिक शोषण झाल्यास मानसिक संतुलन बिघडून स्त्री चिडचिड करू लागते.  

कौटुंबिक स्तरावर, सामाजिक स्तरावर आणि नोकरी-व्यवसायात स्त्री म्हणून डावलले जाणे, महत्त्वाच्या पदव्या, नोकऱ्या, बढती यात दुय्यम स्थान मिळणे, घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तिच्या मताला किंमत दिली न जाणे यामुळेही तिची मानसिकता बिघडून जाते. 

मध्यमवर्गीय विवाहित स्त्री ही स्वतःच्या आरोग्याच्या समस्यांकडे जसे दुर्लक्ष करते, तसेच दररोज बदलणाऱ्या स्वतःच्या मानसिकतेकडेसुद्धा कानाडोळा करते. ती घर सांभाळणारी होममेकर असो, कार्यालयात नोकरी करणारी असो किंवा स्वतंत्र उद्योगव्यवसाय करणारी असो, आपल्या जीवनातील ताणतणाव आणि त्यामुळे आपल्या आयुष्यावर आणि आरोग्यावर होणारे परिणाम याकडे ती लक्ष पुरवत नाही.

वाढत्या ताणतणावांमुळे तिला जर थायरॉईड, मधुमेह, रक्तदाब असे आजार असतील तर ते बळावल्याशिवाय राहत नाहीत. आनुवंशिकतेने येणारा मधुमेह चाळिशी आधीच डोकावतो. विवाहित स्त्रीला लहान मूल असेल, तर त्याला वाढविणे ही सर्वस्वी तिचीच जबाबदारी मानली जाते. घरात वावरताना तिला शारीरिक व मानसिक दडपण येते. यातूनच पुढे शारीरिक आजार, चिंता, मानसिक नैराश्य, निद्रानाश अशा गोष्टी उद्‌भवतात. याचवेळेस वैवाहिक जीवनात तिला क्षय, एड्स वा कर्करोग उद्‌भवला तर या व्याधींच्या इलाजाबरोबरच घरातील सर्वांच्या मानसिक पाठबळाची तिला गरज भासते, तरच ती परिस्थितीशी झुंज देऊ शकते.

स्त्रीच्या रजोनिवृत्ती काळात, गरोदरपणात होणाऱ्या मानसिक बदलांकडे फार गौणपणे पाहिले जाते. अनेकदा वरकरणी तिचे नियमित व्यवहार सुरू राहतात, पण तरीही अचानकपणे तिला एकाकीपणाची भावना होते, रडू येते, चिडचिड होते, सगळे सोडून कुठेतरी दूरवर निघून जावेसे वाटते आणि कधीकधी तिच्या सैरभैर मनात आत्महत्येचे विचार येतात. 

सामाजिक कारणे
भारतीय समाजात स्त्रियांना दुय्यम मानले जाणे ही गोष्ट तर त्यांच्या मनाच्या तडफडाटाला कारणीभूत असतेच. पण त्यापेक्षा स्त्रीला भोगवस्तू मानणे ही सर्व थरातील मनोभूमिका त्यांना जास्त त्रासदायक असते. स्त्रीकडे पाहण्याची समाजाची नजर ही लैंगिकतेने वखवखलेली आजही आढळते. कित्येक युवतींनी अनेक व्यासपीठावर याबाबत विचारही व्यक्त केलेले आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलींकडे बघण्याची वृत्ती आणि नजर यांचा त्यांना किती त्रास होतो हे वर्तमानपत्रात, मीडियामध्ये आणि अनेक वेबसाइटवर पाहायला मिळते. फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक सोशल मीडियावर तरुणींशी चॅटिंग करण्याच्या बहाण्याने काय काय बरळले जाते, याचा पर्दाफाश अनेक स्त्रियांनी निर्भीडपणे केलेला आहे. मध्यंतरी गाजलेल्या 'मी टू' मोहिमेमध्ये अनेक महिलांनी याबाबतचे आपले अनुभव आणि तक्रारी जाहीररीत्या मुक्तपणे मांडल्या आहेत.

भारतामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक आणि शारीरिक अत्याचारांचे प्रमाण पाहिल्यावर खरेच आपल्या संस्कृतीबाबत प्रश्न उभे राहतात. 

काय करता येईल?
स्त्रियांना त्यांच्या आरोग्याबाबत सजग करणे. आहार, व्यायाम आणि विश्रांती यांचा सुयोग्य समतोल कसा साधता येईल याचे मार्गदर्शन करणे. त्यांच्या आरोग्य चाचण्या आणि उपचार यासाठी योजना आखणे याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकतील.
स्त्रियांना त्यांच्या ताणतणावाचे नियोजन सांभाळण्यासाठी मेडीटेशन शिकवणे, तणाव कमी व्हावा यासाठी मेडीटेशन, योग, समुपदेशन, मानसोपचार इत्यादी गोष्टींची सुविधा सहज उपलब्ध करून देणे हे उपाय करता येतील. स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अनेक एनजीओज आहेत. त्यांचे कार्य विस्तृत होण्यासाठी सर्वांनी त्यांना मदत करणे आणि त्यांच्या कामात सहभागी होणे गरजेचे आहे.

मात्र, स्त्रियांबाबतची सामाजिक भूमिका आणि दृष्टी बदलणे ही काळाची गरज आहे. यासाठी मुलांवर लहानपणापासून संस्कार होणे गरजेचे आहे. सकाळी उठल्यावर अंथरुणे आवरण्यापासून घरातील सर्व कामे म्हणजे स्वयंपाक करणे, झाडून लोटून घेणे, कपडे धुणे वगैरे कामे मुलींनी करायची, मुलांनी नाही... हा लहानपणापासूनचा संस्कार बदलण्याची गरज आहे. मुली या बौद्धिक कामात मागे नाहीत हे अनेक दहावी-बारावीच्या आणि विद्यापीठीय पदवी परीक्षांत दरवर्षी सिद्ध होते आहे. शारीरिक बाबतीत कुस्तीपासून वजने उचलण्याच्या आणि बॉक्सिंगसारख्या केवळ मर्दांची राखीव क्षेत्रे समजल्या जाणाऱ्या स्पर्धांत भारतीय स्त्रियांनी ऑलिंपिक पदके आणि जगज्जेते पदे मिळवली आहेत. कौशल्याच्या बाबतीत विमाने चालवण्यापासून अंतरिक्ष यानाची सवारी करणाऱ्या भारतीय महिला जगाला ललामभूत झाल्या आहेत.

केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक स्तरावर स्त्रीविषयक सामाजिक दृष्टिकोन गोंधळलेला आणि भरकटलेला आहे. सर्वसामान्य व्यक्ती मग स्त्री असो वा पुरुष, गरीब असो वा श्रीमंत, अशिक्षित असो वा उच्चशिक्षित, कामकरी असो वा बुद्धिवंत, त्यांच्या अंतर्मनात स्त्रियांचे सामाजिक स्थान भविष्यात काय राहील यावर या समस्येचीची फलश्रुती अवलंबून आहे. माणूस एक सामाजिक प्राणी आहे असे म्हणतात खरे, पण समाज म्हटले की, त्यातल्या प्रत्येक घटकाला समाजात काही स्थान, काही कर्तव्य, काही जबाबदाऱ्या आणि त्यामधून होणारे लाभही मिळावे लागतात. पण मग आजमितीला या समाजात स्त्रीचे स्थान नक्की कुठे दिसते आहे?

या साऱ्या विचारधारेत जेव्हा फरक होईल तेव्हाच भाऊजींना वहिनी फार चिडचिड करतात असे उत्तर मिळणे बंद होईल.

संबंधित बातम्या