मनोविकार : प्राथमिक जाणिवा 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 9 डिसेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

मनोविकारांच्या शास्त्राची व्याप्ती अगाध आहे. मनोविकार वैद्यकीय शास्त्रात सुमारे दोनशेहून अधिक मानसिक आजारांची मीमांसा आढळते. त्यांपैकी चिंता आणि नैराश्य या दोन विकारांची माहिती मागील लेखात घेतली, आणखी काही महत्त्वाच्या मनोविकारांची प्राथमिक जाणीव या वेळेस करून घेऊया.

बायपोलर डिसॉर्डर
पूर्वी घड्याळाला लंबक असायचा. तो जसा एकदा या टोकाला आणि नंतर दुसऱ्या टोकाला जातो, तसे या विकारात एकदा नैराश्याने, तर काही काळाने उन्मादावस्थेने रुग्णाला पछाडले जाते. एकाच आजाराची ही दोन टोके असल्याने या आजारास द्विध्रुवीय मनोविकार म्हणतात.  
जीवनात जेव्हा काही मोठ्या प्रमाणात गमावले गेले, अपयश आले की नैराश्याची भावना येते. पण नैराश्याची भावना सर्व जीवन व्यापून ते अस्ताव्यस्त करत नाही. मात्र, 'नैराश्य' या आजारामध्ये उदासीनतेची भावना कमालीची तीव्र होते आणि आत्यंतिक मानसिक वेदनेच्या स्वरूपात सर्व जीवन झाकोळून टाकते. सर्व संवेदना बोथट होतात. रंग, रूप किंवा स्वाद फिके वाटायला लागतात. ही तीव्र वेदना १५ दिवसांपेक्षा जास्त काळ राहते. या रुग्णाचा आशावाद, जगण्याची आकांक्षा, आयुष्यातला आनंद लयाला जातो. भूक, झोप, लैंगिक इच्छा अशा शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. मनात आत्महत्येचे विचार येऊन तसे प्रयत्न केले जातात. चिडचिड, विसरभोळेपणा, नकारात्मक विचार ही लक्षणे दिसू लागतात. 

उन्माद - उन्मादावस्था ही नैराश्य विकाराच्या अगदी विरुद्ध दिशेची असते. उन्मादावस्थेच्या प्रसंगांमध्ये रुग्णाची मनोवृत्ती आत्यंतिक प्रसन्न असते, कमालीचा आत्मविश्वास असतो. त्यामुळे वर्तन बेहिशेबी होते. खर्चीक योजना आखून अमलात आणल्या जातात, अनावश्यक वर्तन, भांडणतंटा, मारहाण, मधेच विषयांतर करणे, झोप उडणे, झोपेची गरज कमी भासणे, लक्ष सहजरीत्या विचलित होणे, अशी विवक्षित लक्षणे आढळतात. ही अवस्था एक आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकते. याचा अतिरेक झाल्यास त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते.
आनुवंशिकता आणि मेंदूतील रासायनिक बदल ही कारणे या आजारात दिसून येतात. या आजाराकरता चांगले परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत त्यामुळे ४ ते ६ आठवड्यात रुग्णाची अवस्था आटोक्यात येऊ शकते. औषधे, दीर्घकाळ समुपदेशन, आवश्यकतेनुसार इलेक्ट्रिक शॉक दिला जातो. हे उपचार मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला आणि मार्गदर्शनाखालीच घ्यावा. उपचार न घेतल्यास आजाराचा अवधी आणि त्याची तीव्रता वाढते. तीव्र नैराश्यात आत्महत्या होऊ शकतात. 

डीमेंशिया
याला स्मृतिभ्रंश म्हणतात. स्मृतिभ्रंश हा स्मरणशक्तीशी निगडीत आजार असून वयस्कर मंडळींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. स्मृतिभ्रंश अल्पकालीनही असू शकतो. स्मृतिभ्रंशाच्या रुग्णांना त्यांच्या गत जीवनातील खूप जुन्या घटना लक्षात असतात, मात्र थोड्या वेळापूर्वी घडलेल्या घटनांचा त्यांना विसर पडतो. 

काहीच लक्षात न राहणे, माणसे ओळखता न येणे, कुणी काही सांगत असल्यास त्याचे आकलन न होणे, रुग्णाला संवाद साधताना अडथळे येणे, मूडमध्ये सतत बदल होणे, औदासीन्य वाटणे, नेहमीच्या छंदामध्ये किंवा आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस न राहणे, एकटे राहण्याकडे कल वाढणे, दररोजची कामे करण्यात अडथळे येऊन कार्यक्षमता घटणे, सतत तीच तीच गोष्ट करणे किंवा तेच तेच प्रश्न विचारणे, एखाद्या घटनेचे वारंवार कथन करणे, विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर मिळूनसुद्धा तोच प्रश्न सतत विचारणे ही लक्षणे दिसून येतात. वयस्कर मंडळींमध्ये वरीलपैकी काही लक्षणे आढळल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.

अटेन्शन डेफिसिट हायपरअॅक्टिविटी डिसॉर्डर
ही समस्या बऱ्याचदा मुले  आणि प्रौढांमध्ये उद्‌भवते. मुलांमधील मानसिक तणावामुळे होतो. यात सामान्य पातळीपेक्षा जास्त तीव्र आणि अनावश्यक वर्तन होत राहते.  एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला किंवा एकच काम जास्त काळ करत राहणे शक्य होत नाही. हा आजार प्रौढांमध्ये आणि लहान मुलांमध्ये दिसून येतो.  यातील लक्षणांमध्ये लक्ष केंद्रित करणे अवघड जाते. दिलेले काम पूर्ण करण्याऐवजी ते मधेच सोडून दुसरे काहीतरी करत राहण्याची प्रवृत्ती दिसून येते. मन सहज विचलित होते. एका जागेवर जास्तवेळ बसून राहणे अवघड जाते. दुसरी व्यक्ती बोलत असताना मधेच संदर्भरहित बोलून व्यत्यय आणला जातो. या विकाराच्या नकळत, हायपरअॅक्टिव (अतिक्रियाशील वर्तन). आणि आक्षेपार्ह वर्तन या तीन श्रेणी केल्या गेल्या आहेत. यामध्ये आनुवंशिकता, मेंदूतील डोपामिन नावाच्या रसायनाची कमतरता, एकाग्रता नियंत्रित करणाऱ्या मेंदूतील महत्त्वांच्या भागातले असंतुलन, गरोदरपणात  असंतुलित आहार, धूम्रपान, मद्यपान करणे ही कारणे दिसतात. 

स्किझोफ्रेनिया
स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन यामध्ये परिणाम जाणवतात.  स्क्रिझोफ्रेनियाची लक्षणे ही व्यक्तीनुसार बदलतात. किशोरवयीन आणि प्रौढ व्यक्ती यांच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी दिसून येतात. किशोरवयीन मुलांमध्ये झोप कमी येणे, अभ्यासातील गती मंदावणे, उत्साह नसणे आणि एकलकोंडेपणा वाढणे ही लक्षणे असून प्रौढ व्यक्तींमध्ये हेल्युसिनेशन (अस्तित्वात नसलेल्या गोष्टी जाणवणे), विश्वास न ठेवणे, अपूर्ण संवाद, रागाचे झटके, समाजापासून दूर राहण्याचा प्रयत्न ही सगळी लक्षणे दिसतात. या सगळ्या गोष्टी अतिताणामुळे सुचायला लागतात. 

याचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.
१. पॅरानॉईड स्किझोफ्रेनिया : यात कानात आवाजाचे भास होणे – कोणीतरी आपल्याशी किंवा आपल्याबद्दल वाईट बोलत आहे शिवीगाळ करत आहेत असे आवाज येतात. काही वेळा हे आवाज त्यांना आत्महत्या करायला सांगतात व त्या भरात रुग्ण आत्महत्या करतो.
मनात संशय येणे – कोणीतरी आपल्याविरुद्ध आहे, कोणीतरी आपल्याला किंवा आपल्या घरच्यांना मारून टाकेल असा संशय वाटणे. सर्व लोक माझ्याबद्दल बोलतात असे वाटणे. माझ्या घरामध्ये कॅमेरा लावलेला आहे, माझ्या मागे पोलिस लावलेले आहेत. कोणीतरी आपल्यावर करणी केली आहे, काळी जादू केली आहे मूठ मारली आहे असा संशय येतो. आपल्या पत्नी किंवा पतीचे बाहेर संबंध आहेत असे संशय घेतले जातात.
२. डिसऑर्गनाईज्ड  स्किझोफ्रेनिया : यात रुग्ण असंबद्ध बडबड करतो. त्याचा वास्तवाशी संबंध तुटल्यामुळे तो काहीही विचित्र बोलतो. एक प्रश्न विचारला असता दुसरेच काहीतरी उत्तर देतो.  किंवा सर्व प्रश्नाला तेच तेच उत्तर देतो. एकच शब्द, वाक्य सतत बोलते. जे विचारले आहे तेच वाक्य परत बोलते. अनाकलनीय शब्द वापरते किंवा भलत्याच भाषेत बोलते. या शिवाय रुग्ण असंबद्ध वागते. स्वतःची काळजी घेत नाहीत. आंघोळ न करणे, कपडे न बदलणे, किंवा कपडेच न घालणे, केस न कापणे, दाढी न करणे, कचरा गोळा करत राहणे अशा गोष्टी करत राहते. एकटे असताना किंवा स्वतःशी बडबड करते, हातवारे किंवा विचित्र हावभाव करत राहते. 
३. कॅटाटोनिक  स्किझोफ्रेनिया : यात शारीरिक हालचाल एकतर खूप कमी होते किंवा खूप प्रमाणात वाढते. हालचाल कमी होते त्यावेळेस रुग्ण एखाद्या अवस्थेत पुतळ्यासारखा स्तब्ध राहतो. ज्यावेळी हालचाल वाढते त्यावेळी विनाकारण इकडेतिकडे पळत राहतो किंवा एकच  कृती  वारंवार  करतो. विशिष्ट लकब, विशिष्ट पद्धतीची हालचाल किंवा कृती विनाकारण आणि सतत करत राहतो. चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव करतो. समोरचा जे बोलेल तेच वारंवार बोलतो किंवा कृती करेल  तीच कृती वारंवार करतो. रुग्णांमध्ये या गोष्टी जाणवायला लागल्या तर तुम्ही त्यावर उपचार करणे गरजेचे होते. 

ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर
 याला मराठीत काही लोक मंत्रचळ म्हणतात. प्रौढांमध्ये २.५ टक्के आणि मुलांमध्ये एक टक्का अशी याची व्याप्ती आहे. मेंदूतील रसायनांच्या बदलामुळे हा विकार होतो. यात ऑब्सेशन म्हणजे एखादा तीव्र विचार किंवा काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा-ऊर्मी मनामध्ये अचानक यायला लागते. सातत्याने यायला लागते. कितीही प्रयत्न करा, कष्ट करा पण हे विचार काही मनातून जात नाही. त्यातून सतत कपडे, भांडी धूत बसणे, हात धूत राहणे, स्वतःला अपराधी ठरवत राहणे अशा कृती होत राहतात.  हे विचार का येतात, कसे येतात, रुग्ण अशा विचित्र कृती का करतात याचे उत्तर वैद्यकशास्त्राला माहिती नाही. मात्र  विचारांचे आणि कृतीचे हे चक्र मनात अचानक सुरू होते व सुरूच राहते. रुग्ण हैराण होतात. या आजारात औषधे देऊन मेंदूतील रसायनांना समतोल केल्यावर आजारात फरक दिसतो. यामुळे त्यांच्या असंबद्ध विचारांची तीव्रता कमी होते. ओसीडीचे उपचार तसे दीर्घकाळ चालू ठेवावे लागतात याला समुपदेशनाची जोड दिल्यास जास्त चांगला परिणाम दिसून येतो.

पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर
धक्कादायक, धडकी भरवणाऱ्या किंवा धोकादायक घटनेचा ठसा मनावर उमटतो आणि घटना घडून गेल्यावरही काही काळ मानसिक ताण जाणवतो. काहींच्या बाबतीत हा कालावधी काही दिवसांचा तर काहींच्या बाबतीत अनंत काळापर्यंत असतो. याला मानसोपचाराच्या भाषेत पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर- आघातानंतरच्या ताणाचा आजार) म्हणतात. ज्याच्या बाबतीत घटना घडली फक्त त्या व्यक्तीलाच नाही, तर त्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांना किंवा ही घटना पाहणाऱ्यांनाही मानसिक धक्क्यातून हा आजार होऊ  शकतो. आघातानंतरच्या ताणाची काही लक्षणे नेहमी दिसतात आणि ती महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू राहतात. घटना वारंवार आठवते आणि त्यावेळची लक्षणे - हृदयाचे ठोके वाढणे, खूप घाम येणे, रात्री भयंकर स्वप्न पडणे, रात्रीची झोप न येणे, पुन्हा पुन्हा भीतीदायक विचार येणे आणि घटनेवेळचा ताण निर्माण होणे.
हे घडू लागल्यावर विशिष्ट ठिकाणे, घटना किंवा वस्तू टाळण्याचा कल वाढतो. त्यामुळे अर्थातच रोजच्या जगण्यावर मर्यादा पडू लागतात. त्याचप्रमाणे या व्यक्तींना कायम धोका जवळ असल्याची जाणीव होत राहते. त्यामुळे ताण वाढतो व काही वेळा व्यक्ती रागीट होतात. काही वेळा आवश्यकता नसतानाही दोष असल्याचे वाटते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर झाल्याची भावना होते. आकस्मिक घटनाच नाहीत तर कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बरे झालेल्यांना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या तणावाचा सामना करावा लागतो.

ऑटिझम
ऑटिझम हा असा मानसिक आजार आहे जो दोन वर्षांच्या मुलापासूनही होऊ शकतो. दोन वर्षांच्या मुलांमध्ये एकमेकांशी न मिसळणे आणि एकलकोंडेपणाने राहण्याबरोबरच ऑटिझम सुरू होते. अशी मुले बोबडे बोलतात, आपल्याच कामात आनंदी असतात आणि एकच काम बराच वेळ करत बसणे त्यांना खूप आवडते. पण हे ऑटिझमचे लक्षण आहे हे वेळेतच पालकांनी ओळखायला हवे. योग्य वयात मूल बोलत नसल्यास, डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घ्यायला हवी.  
याचबरोबर मानसिक तणावात असणाऱ्या व्यक्तींमध्ये रागीटपणा, खादाडपणा, एकलकोंडेपणा, आत्महत्येचे विचार, व्यसनाधीनता अशी लक्षणेदेखील आढळून येतात. व्यसनामुळे रुग्णांचे आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक आणि शारीरिक नुकसान होते. या सर्व गोष्टींचा परिणाम शरीरावर तर होतोच, पण त्याहीपेक्षा जास्त मनावर या गोष्टीचा जास्त परिणाम होतो. मानसिक विकारांकडे समाजाचे दुर्लक्ष होत असते. वेळेवर निदान आणि योग्य उपचार आवश्यक कालावधीसाठी घेणे यासाठी नितांत आवश्यक असते.

संबंधित बातम्या