डिजिटल हेल्थकेअर

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 30 डिसेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून सुरू झालेल्या संगणकीय क्रांतीने आपले जीवन आमूलाग्र बदलून टाकले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्मार्टफोन आला आणि त्यायोगे 3G, 4G, 5G तंत्रज्ञानाचे आगमन झाले आणि त्यातून आलेल्या सुसाट वेगाने झालेल्या प्रगतीने मानवाचे जीवन सुपरफास्ट गतीने धावू लागले. 

हजारो मैलावर असलेल्या व्यक्तीशी आपण आता नुसते बोलू शकत नाही, तर व्हिडिओ कॉलिंग करून समोरासमोर बसल्यासारखी चर्चा किंवा गप्पा मारू शकतो. आपले फोटो, माहिती जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पाठवू शकतो आणि तिथली अशीच माहिती मिळवू शकतो. हवा तो सिनेमा, टेलिव्हिजन मालिका, बातम्या, कुठेही सुरू असलेले खेळांचे सामने हवे तेव्हा बघू शकतो. टेलिफोनची, विजेची, क्रेडिट कार्डची बिले चुटकीसरशी भरली जातात. कोणत्याही विषयाची हवी ती माहिती क्षणात मिळवता येते.

याही पुढे जाऊन माणसासारखा विचार करणारी बुद्धिमान संगणकीय 'अलेक्सा' हव्या त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, पाहिजे ते घरगुती काम करू शकते... एक ना दोन. आज संगणकीय प्रणालींद्वारे मानवी जीवनातील असंख्य अतर्क्य गोष्टी सहजसाध्य झाल्या आहेत. याला डिजिटल क्रांती म्हटले जाते आणि ही क्रांतिमय प्रगती रोजच्या रोज घडते आहे आणि यापुढे कदाचित अधिकच गतिमान होत राहणार आहे.  
जगातील या प्रगतीचे आणि क्रांतीचे पडसाद वैद्यकीय शास्त्रामध्ये उमटणे स्वाभाविकच होते. मानवाचे जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी वैद्यकीय शास्त्रामध्ये आणि रुग्ण डॉक्टरकडे जाण्यापासून त्याच्या उपचारापर्यंत असलेल्या प्रत्येक टप्प्यामध्ये 'डिजिटल' गोष्टींचा यापुढे अंतर्भाव होणार आहे आणि भावी काळात 'डिजिटल हेल्थ केअर' कदाचित हाडामांसाच्या डॉक्टरची जागा घेणार आहे. 

डिजिटल आरोग्यसेवा
डिजिटल आरोग्यसेवा म्हणजे निरनिराळ्या संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर्स) आणि इंटरनेटला जोडलेल्या विविध प्रकारच्या उपकरणांच्या साहाय्याने रुग्णाच्या तक्रारींची नोंद, रुग्णाची तपासणी, त्याचे निदान, त्याच्या विविध प्रकाराच्या चाचण्या, त्यातून उद्‌भवणारे निदान आणि त्याचा उपचार करणे. जगात प्रगत झालेल्या डिजिटल संशोधनाद्वारे वैद्यकीय सेवा, वैद्यकीय शिक्षण, समाज शिक्षण, उपचार आणि वैद्यकीय संशोधन अशा नानाविध क्षेत्रात डिजिटल क्रांती होते आहे. 
अमेरिकन सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अधिकृतरीत्या जाहीर केल्याप्रमाणे डिजिटल आरोग्यसेवेचे सहा विभाग असतात.

१. मोबाइल हेल्थ (एम-हेल्थ) : एम-हेल्थ म्हणजे मोबाइल सेवेद्वारे केली जाणारी आरोग्यसेवा. मोबाइल स्मार्ट डिव्हाइसेसद्वारे वैद्यकीय निदान आणि उपचारासाठी ती वापरली जाते. संगणकात किंवा स्मार्ट मोबाइलशी निगडित अशा काही तांत्रिक उपकरणांचा वापर यात केला जातो. यामध्ये मोबाईल फोनमधून रुग्णांच्या तक्रारी, त्याच्या नाडीची गती, छातीचे ठोके, रक्तदाब, ईसीजी, श्वासाची गती अशा महत्त्वाच्या गोष्टींची नोंद केली जाते आणि ती तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांना पाठवून त्याच्यावर इलाज केला जातो. स्मार्टफोन्सवर असलेली फिटनेस आणि मेडिकल अॅप्स या साऱ्यांचा एम-हेल्थमध्ये समावेश असतो. याशिवाय काही इतर गोष्टींचाही यात अंतर्भाव आहे.
टेलीकेअर : यामध्ये रुग्ण त्याच्या घरातच असतो, पण त्याला डॉक्टरांचा तातडीच्या प्रसंगी सल्ला फोनवर दिला जातो. अशा रुग्णाला त्याच्या औषधांची आठवण करून देणे, त्याच्या औषधे घेण्यावर नजर ठेवणे, घरात एकटा असताना तो पडला, मार लागला किंवा कोणत्याही कारणाने बेशुद्ध पडला तर त्याच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये कळवून त्याला रुग्णवाहिका पाठवणे अशी अनेक कामे केली जातात. 
टेली हेल्थकेअर : टेली हेल्थकेअर तंत्रज्ञानामुळे रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीमध्ये होणारे दैनंदिन बदल, उदा. त्याचा रक्तदाब वाढला तर त्याच्या या त्रासाची दूर अंतरावर असलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून दूरस्थ तपासणी करून त्याच्या परिस्थितीचे परिशीलन करून त्याचे दूरस्थ निदान केले जाते. त्यात गरजेनुसार काही औषधे बदलणे किंवा पूर्ण उपचार बदलाने याबाबत निर्णय घेतला जातो. 
व्हिडिओ सल्लामसलत : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून केलेल्या सल्लामसलतीत रुग्ण डॉक्टरांशी थेट संवाद साधू शकतो आणि त्याच्या तब्येतीबाबत चर्चा करू शकतो. त्याच्या आजाराबाबत वैद्यकीय माहिती आणि औषधोपचार मिळवू शकतो.

२. आरोग्याबाबतच्या माहितीचे तंत्रज्ञान (हेल्थ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) : 
यामध्ये बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स (आजारांच्या माहितीचे संकलन आणि परिशीलन) - भारतात आणि जागतिक स्तरावर विविध आजारांची सर्व प्रकारची आकडेवारी संकलित करणे, त्यामध्ये रुग्णांचे आजार, त्यांचे निदान, तपासण्यांचे रिपोर्ट्स, औषधे, त्यांचे रुग्णावर झालेले बरे-वाईट परिणाम, आजारातून किती रुग्ण बरे झाले, किती जणांना मृत्यू आला अशा सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन केले जाते. रुग्णांच्या या माहितीद्वारे आजारांच्या स्वरूपावर, त्यांच्या बदललेल्या अंतर्गत आणि बाह्य परिस्थितीवर, औषधांबाबत, नव्या औषधांच्या गरजेबाबत, लसीकरणाच्या गरजेबाबत निष्कर्ष काढले जातात. 
 भारतातील अनेक 'स्मार्ट शहरे' याबाबतची त्यांच्या शहरातील माहितीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आदानप्रदान करत आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमधील साधनांच्या वापरामध्ये सुधारणा करण्यासाठी या माहितीचा वापर केला जातो आहे. 
'बिग डेटा' (व्यापक स्वरूपातील माहिती) :  यात रुग्णांची माहिती मोठ्या स्वरूपात संकलित केली जाते. यामध्ये विमा कंपन्या, आरोग्यसेवा देणाऱ्या खासगी क्षेत्रातील कॉर्पोरेट कंपन्या, सरकारी आरोग्य संस्था, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या संस्था, व्यक्ती, संशोधन केंद्रे आणि आरोग्य संस्था यांच्याकडे संकलित झालेली रुग्णविषयक सर्व माहिती डिजिटल अॅप्लिकेशन्सच्या साहाय्याने एकत्रित केली जाते. भारतीय आरोग्य व्यवस्थेमध्ये बिग डेटा लोकप्रिय होत आहे. आरोग्यसेवेशी संबंधित असलेल्या मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या उत्पादनाची माहिती देण्यासाठी, त्यांचा प्रसार करण्यासाठी बिग डेटा वापरत आहेत. या माहितीनुसार आवश्यक अशा संसाधनांमध्ये या कंपन्या गुंतवणूक करतात. या व्यापक माहितीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील आजारांचे उपचारांचे प्रवाह कोणत्या दिशेला चालले आहेत, हे लक्षात येते. यामधून विविध रोग, आजारांचे वयोगट, त्यांची लक्षणे आणि उपचारातील सुधारणा याकरता आवश्यक असलेली एक अंतर्दृष्टी मिळते.

३. इ.एम.आर. (इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड)  :  रुग्णाच्या आरोग्यातील प्रत्येक गोष्टीची, म्हणजे त्याच्या जन्मापासून आतापर्यंतच्या त्याच्या वजन, उंची, रक्तदाब, रक्तशर्करा यांसारख्या रिपोर्ट्सची, त्याच्या आजपावेतो झालेल्या आजारांची आणि उपचारांची, त्याला सुरू असलेल्या औषधांची नोंद एका इलेक्ट्रॉनिक नोंदीमध्ये असते. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड कोणत्याही हॉस्पिटलच्या किंवा आरोग्यसेवेच्या विविध वैद्यकीय नोंदींचा संग्रह असते. या डिजिटल सेवेत क्लाउड कॉम्प्युटिंग आणि आरोग्य माहितीचे एकत्रीकरण केले जाते. आज राष्ट्रीय पातळीवरील खासगी हॉस्पिटल्स आणि निमसरकारी आरोग्य सेवांनी इएमआरचा अवलंब केला आहे. यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही आजारी पडला तरी त्याच्या आजाराची माहिती या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डद्वारे तो असेल तिथल्या हॉस्पिटलला मिळते आणि रुग्णाचे उपचार सहजरीत्या होऊ शकतात. 
इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड - रुग्णाची 'इएमआर'वरील माहिती क्रेडिट कार्डसारख्या एका हेल्थ रेकॉर्ड कार्डवर संकलित करून रुग्णाजवळ दिला जातो. त्याचा वापर तो जगात कोठेही करू शकतो. इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड (इएचआर)मुळे रुग्णाच्या आजाराचे आणि त्यातील गांभीर्याचे अचूक आणि त्वरित निदान होते. यामध्ये रुग्णाचा पुन्हा होणाऱ्या अनावश्यक तपासण्या टाळता येतात. 
आपल्या देशातील आरोग्यसेवा डिजिटल करण्याच्या दृष्टीने, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने डिसेंबर २०१६ मध्ये, 'इलेक्ट्रॉनिक आरोग्य अभिलेख मानक' जाहीर केले आहेत. यामध्ये आजीवन अर्थपूर्ण वैद्यकीय नोंदी ठेवण्याचे आणि उपचारांचे मानदंड सगळीकडे सारखे ठेवण्याच्या उद्देशाने मंत्रालयाने एक मार्गदर्शक तत्त्वप्रणाली जारी केली. यामध्ये माहिती गोळा करणे, तिचे संकलन करून ती साठवणे, त्या माहितीची पुर्नप्राप्ती करणे, तिचे आदानप्रदान करणे, विश्लेषण करणे याबाबतच्या मानकांचा समावेश आहे. या नोंदी प्रतिमा, सांकेतिक भाषा आणि माहिती या पद्धतीने वापरल्या जातील. अशा व्यापक आणि संपूर्ण इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या व्यवस्थेची देखभाल करण्यासाठी प्रारंभिक गुंतवणूक खूप जास्त असली, तरी या डिजिटल पद्धतीने माहिती वापरल्यास देशाचे आणि रुग्णांचे करोडो रुपये वाचू शकतील.

४. शरीरावर परिधान करण्याची उपकरणे (वेअरेबल डीव्हाईसेस) : ही डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केलेली उपकरणे असतात. आपल्या आरोग्याबाबत काही गोष्टींच्या नोंदी आणि मोजमाप करतात. ही आकडेवारी बाहेरील एखाद्या मुख्य संगणकाला (मेन सर्व्हर) ते पुरवतात. ही उपकरणे घड्याळ, कपडे, दागिने अशा स्वरूपात अंगावर परिधान केली जातात, म्हणून त्यांना वेअरेबल डिव्हाईस म्हणतात. स्मार्ट वॉच, हेडमाउंट डीस्प्ले, स्मार्ट ज्वेलरी अशा पद्धतीने आज बाजारात आली आहेत. काही उपकरणे शरीरातसुद्धा बसवली जातात. 
 यामध्ये त्या व्यक्तीने किती व्यायाम केला, किती उष्मांक खर्च झाले, हृदयाच्या ठोक्यांची गती किती वाढली, रक्तदाब किती होता, तुम्ही खाल्लेल्या आहारातून किती उष्मांक मिळाले? अशा असंख्य गोष्टी यामध्ये जोखल्या जातात आणि त्याचे कोष्टक मुख्य सर्व्हरकडे पाठवून क्षणात त्याचे विश्लेषण केले जाते.    

५. टेलिमेडिसिन : इंटरनेटद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करून दूर अंतरावरील रुग्ण आणि मोठ्या हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर एकमेकांशी संवाद साधतात. त्यानंतर रुग्णाच्या आजारांची लक्षणे ओळखून डॉक्टर्स उपचारांचा सल्ला देतात. या सल्ला आणि उपचारामुळे वेळ आणि आर्थिक खर्च वाचतो. दूरध्वनी चिकित्सा, दूरस्थ निदान, देखरेख आणि वैद्यकीय शिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा हा वापर होतो. 
टेलीमेडिसिन क्षेत्र भारतात अतिशय वेगाने विकसित होत आहे. अपोलो, एम्स, फॉर्टिस आणि अर्टेमीस यासारख्या प्रमुख रुग्णालयांनी टेलीमेडिसिन क्षेत्रात सरकारसोबत सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) स्वीकारली आहे. आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन यासोबत टेलिमेडिसीनमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्यसेवेतील प्रश्न सोडवणे शक्य होणार आहे. हाय स्पीड इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशनच्या साहाय्याने टेलीमेडिसिनच्या वापराने वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत ग्रामीण आणि शहरी भागातील वैद्यकीय सेवेतील तफावत नष्ट होऊ शकते. भारतात असलेली डॉक्टरांची कमतरता आणि दुर्गम क्षेत्रातील अपुरी वैद्यकीय सेवा याला टेलीमेडिसिन हे प्रभावी उत्तर ठरू शकते.

६. वैयक्तिक औषधोपचार : या सर्व सुविधांचा फायदा रुग्णालाच होतो. डिजिटल तंत्रामुळे त्याला हव्या त्या डॉक्टरांची घरबसल्या 'अॅपॉईंटमेंट' घेता येते.
घरी राहून साध्या किंवा गंभीर आजारांबाबत सल्ला घेता येतो. 
तातडीच्या उपचारांसाठी घरी रुग्णवाहिका येऊन रुग्णाला वेळप्रसंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करता येते.
टेलीफार्मसीद्वारे घरबसल्या औषधे मिळतात. ती कशी घ्यायची याबाबत सल्ला ही मिळतो. त्याची आठवणही करून दिली जाते.
रुग्ण कितीही दुर्गम भागात असला, तरी त्याला देशातल्या कोणत्याही तज्ज्ञाकडून उपचार मिळू शकतात.

काही अडचणी  

  •  भारतात संगणक आणि मोबाइल वापरणारे करोडो लोक आहेत, पण इंटरनेट आणि मोबाइलची पायाभूत सेवा सर्वत्र उपलब्ध नाही. ती जिथे उपलब्ध आहे, तिथे तिचा दर्जा आणि वेग जागतिक प्रमाणांनुसार तुलनेत कमी आहे. 
  • भारत सरकारने आणि मेडिकल काउन्सिलने टेलीमेडीसीन आणि टेलीकेअर याबाबतचे कायदे अजूनही अद्ययावत केलेले नाहीत. म्हणजे प्रत्यक्ष हात न लावता तपासलेल्या रुग्णांवर औषधोपचार करणे मान्य केलेले नाही. त्यामुळे ही सेवा देण्याची इच्छा असूनही ती प्रत्यक्षात आणण्याची अनेक डॉक्टरांची तयारी होत नाही.
  • टेलीफार्मसीसाठी सरकारचे धोरण स्पष्ट नाही. फार्मसिस्ट वर्गाचा याला व्यावसायिक आणि नैतिक बाबतीत कडाडून विरोध आहे

संबंधित बातम्या