लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि मनोव्यथा 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 25 मे 2020

आरोग्य संपदा
कोरोनासारख्या  प्राणघातक विषाणूमुळे  सर्वत्र  भीतीचे  वातावरण पसरले  आहे. लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंग, होम क्वारंटाइन, आयसोलेशन  हेच उपाय सध्या या  आजारावर  उपलब्ध आहेत. मात्र, या  सक्तीच्या  लॉकडाउन काळात अनेकांना एकटे रहावे लागत आहे, काहींना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागत आहे, तर  काहींनी  आपली जिवाभावाची माणसे या आजारामुळे  गमावली  आहेत. अशात  लोकांमध्ये चिंता, नैराश्य, भय, व्यसनाधीनता यांचे प्रमाण वाढून मानसिक आजार बळावताना  दिसत आहेत. त्यामुळे वेळीच या मानसिक आजाराची  लक्षणे, त्यावरील  उपाय जाणून घेणे गरजेचे आहे... 

कोरोना विषाणू मानवाच्या शरीरात श्वासामार्गे जातो आणि त्यामुळे श्वसनसंस्थेच्या विकारांची लक्षणे निर्माण होतात. म्हणजे घसा दुखणे, खोकला येणे, छातीत न्युमोनिया होऊन दम लागणे आणि या सर्वांबरोबर खूप कडक ताप येणे, ही लक्षणे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. पण ही विषाणूजन्य साथ अप्रत्यक्षरीत्या हजारो माणसांचे मानसिक स्वास्थ्य बिघडवायलासुद्धा कारणीभूत होते आहे. कोरोनाच्या साथीपासून स्वतःला वाचवण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग हा उपाय सांगितला जातो. दोन माणसातले हे अंतर कोरोनाच्या प्रसाराची शृंखला खंडित करण्यासाठी वापरले जाते आणि आजचे हे लॉकडाउन म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग सक्तीने पाळले जाण्यासाठी केली जाणारी उपाययोजना आहे. हे फिजिकल डिस्टन्सिंग आणि हा लॉकडाउन मानवी शरीराला होणाऱ्या या दुर्धर आजारापासून वाचवणारा असला, तरी नेमक्या याच गोष्टींमुळे लोकांमध्ये अनेक तऱ्हेचे मानसिक त्रास झाल्याचे दृष्टोत्पत्तीस येत आहे.
कोरोनाच्या साथीमध्ये ज्यांना या विषाणूची बाधा होऊन ते आजारी पडले, रुग्णालयात १४ दिवस किंवा त्याहीपेक्षा जास्त दिवस आयसोलेशन वॉर्डात राहून परत घरी आले, ज्यांना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे क्वारंटाइन व्हावे लागले, ज्यांचे जवळचे कुटुंबीय अथवा नातेवाईक या साथीमध्ये दगावले अशा व्यक्तींमध्ये अनेक प्रकारचे मानसिक त्रास आढळून आले.

चिंता
आज कोरोनाच्या बेलगाम वाढत्या साथीमुळे, टेलिव्हिजनवर सतत ऐकू येणाऱ्या अमर्याद वाढत चाललेल्या आकड्यांमुळे अनेकांच्या मनात चिंता निर्माण होते आहे. या साथीत मला काही होईल का? माझ्या कुटुंबीयांना काही त्रास तर होणार नाही ना? हे विचार मनात घर करू लागतात. त्यात जर कोणी परगावी अडकले असेल, कुणाची मुले किंवा आईवडील परराज्यात किंवा परदेशात असतील, तर या विचारात भर पडते... आणि चिंता सुरू होते. लॉकडाउनमुळे असलेला रिकामा वेळ आणि मन यामध्ये चिंतेचा भस्मासुर निर्माण व्हायला वेळ लागत नाही. 
 चिंता म्हणजे भावनिक आणि शारीरिक स्वरूपाचा एक अनुभव असतो. अनेकदा चिंता म्हणजे सुप्त मनातील नकारात्मक अनुभवांचा अाविष्कार असते. काही वेळेस ती एखाद्या प्रसंगाबद्दल मनात होणारी चलबिचल व्यक्त करणारी भावना असते. जेव्हा एखादी व्यक्ती चिंतातूर होते, तेव्हा तिला सतत अस्वस्थ वाटते, मनात एक प्रकारची हुरहुर वाटत राहते. ही भावनिक लक्षणे असतात. त्याचवेळेस हृदयातली धडधड वाढणे, धाप लागणे, हातापायाला कापरे सुटणे, घाम फुटणे, पोटात गोळा येणे अशी शारीरिक लक्षणेसुद्धा चिंतेच्या आजारात कमी-जास्त प्रमाणात दिसून येतात.
ज्या व्यक्तींना आधीच 'अँक्झायटी डिसॉर्डर' म्हणजे दुश्चिंतेचा आजार असतो, त्यांना हे त्रास प्रकर्षाने जाणवतात. 

चिंता ज्यांच्यामध्ये निर्माण होते, त्या व्यक्तींमध्ये निर्माण होणारी लक्षणेही तितकीच महत्त्वाची ठरतात.

 • कारणाशिवाय किंवा छोट्याशा गोष्टींचीही चिंता वाटणे.
 • स्नायू ताठरल्यासारखे किंवा खेचल्यासारखे वाटणे.
 • हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधडणे.
 • छातीत दुखणे किंवा भरल्यासारखे वाटणे.
 • जुलाब होणे किंवा पोटात गडगडल्यासारखे वाटणे.
 • ओकारी येणे व मळमळणे.
 • चक्कर येणे, गरगरणे.
 • चिडचिडणे किंवा उतावीळ झाल्यासारखे होणे.
 • डोळे भरून येणे.
 • हातापायाला घाम सुटल्यासारखे वाटणे.
 • चिंतीत मनाने झोप येत नाही. तळमळणे, धाप लागणे होते. याचबरोबर श्वास अडकतो.
 • चिंतेच्या दीर्घकालीन आजारात पोट आणि आतड्यांशी संबंधित लक्षणे अधिक आढळतात.

भय आणि भयगंड
कुठल्याही गोष्टीची भीती वाटणे ही एक सहज प्रवृत्ती असते. मोठमोठ्या पराक्रमी वीरांनाही कशाचे ना कशाचे भय हे वाटतच असते; पण कधी कधी या भीतीचा अतिरेक होतो आणि ज्याबद्दल भीती वाटते त्यापासून पळ काढण्याची केविलवाणी, अवाजवी धडपड संबंधित व्यक्ती करू लागते. ते भय आणि त्यातून त्याच्या मनात निर्माण झालेली भयावह परिस्थिती नको, अशा तीव्र इच्छेने तो वेडापिसा होतो. अनेक असंबद्ध गोष्टी करू लागतो, भयातिरेकाने त्याचे वागणे, बोलणे बदलते. त्याच्या शरीरातही काही तीव्र लक्षणे निर्माण झाल्यासारखे त्याला वाटू लागते. अशा प्रकारची भीती सहन करण्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागते. यालाच 'भयगंड' किंवा 'फोबिया' म्हणतात. हा एक प्रकारचा अतिचिंतेचा विकार मानला जातो. ठराविक गोष्टींची भीती वाटणारे 'स्पेसिफिक फोबिया' सर्वसामान्यपणे खूप आढळतात.
आज कोरोनाच्या साथीमध्ये हेच घडतेय. जगभरात कोरोनाच्या भीतीमुळे लोकांमध्ये कमालीचे भय निर्माण झाले आहे. लोकांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी सर्वत्र कोरोनाचाच विषाणू दिसतोय. घराबाहेर पडलो तर कोरोना अंगावर जमा होईल. वर्तमानपत्रे हाताळली, तर त्यातून कोरोना होईल. नोटांमधून, भाज्या-फळांमधून, किराणा सामानातून, अनेक गोष्टींतून कोरोना होईल अशी भीती लोकांना वाटते आहे. एसी लावू की नको, योगासने करताना घरातील फरशीला हात लावला, तर कोरोना होईल, आइस्क्रीम खाल्ले तर कोरोना होईल अशा लक्षावधी प्रकारची भयसंपदा आज निर्माण झाली आहे.
यामुळे अनेक परिणाम दिसून येतायेत, मोलकरणी कामावर आल्या तर त्यांच्याद्वारे कोरोनाची लागण होईल, म्हणून अनेकांनी त्यांना कामावरून कमी केले. डॉक्टर दवाखान्यात जातात, त्यांच्याकडून कोरोनाची लागण आपल्याला होईल, म्हणून डॉक्टरांना आपल्या सोसायटीत राहू नका म्हणणारे अनेक लोक आज आहेत. हे सारे अनाठायी भयाचे प्रकार आहेत. अशा भयातून काही शारीरिक लक्षणे आढळून येतात.

 • अतिजलद श्वासोच्छ््वास किंवा गुदमरल्याची भावना.
 • छातीत धडधडणे, अस्थिर वाटणे. 
 • रात्री अचानक किंचाळत झोपेतून उठणे.
 • डोके जड होणे, चक्कर येणे.                                      
 • वास्तवाचे भान सुटणे.
 • मनावरील ताबा जाणे, मृत्यू येईल असे वाटणे.
 • अवयवांना बधिरता किंवा मुंग्या येणे. 
 • हात-पाय गार पडल्याची भावना निर्माण होणे.

     
ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर 
या मनोविकारात एखादी व्यक्ती एखादी अतिसामान्य क्रिया सतत करत राहते. आपल्याकडे याला चळ किंवा मंत्रचळ असेही म्हणतात. यामध्ये एखादे काल्पनिक चित्र किंवा तीव्र इच्छा किंवा ऊर्मी मनामध्ये अचानक, सातत्याने यायला लागते आणि कितीही प्रयत्न केले तरी जात नाही. त्यातून सतत कपडे, भांडी धूत बसणे, हात धूत राहणे, त्यामुळे स्वत:ला अपराधी ठरवत राहणे अशा कृती होत राहतात. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी हात स्वच्छ धुणे आवश्यक असते. घरातील आणि कार्यालयातील स्वच्छता खूप गरजेची असते. स्वच्छता ठेवणारी माणसे आपल्याला केव्हाही आवडतात. स्वच्छतेमुळे मन कसे प्रसन्न राहते. वातावरण सुखद वाटते. पण स्वच्छतेची कृती जेव्हा मर्यादेपलीकडे जाते, तेव्हा त्याला 'मंत्रचळ' म्हणतात. गेल्या दोन महिन्यांत अशा विकारांच्या व्यक्तींमध्ये २० ते २५ टक्के संख्यात्मक भर पडली आहे, असे काही मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

नैराश्य
जानेवारीपासून सुरू झालेली कोरोनाची साथ आज साडेचार महिने झाले, तरी आटोक्यात येत नाहीये. २५ मार्चपासून सुमारे दोन महिने होत आले, तरी लॉकडाउन पूर्ण उठण्याची लक्षणे दिसत नाहियेत. अनेकांची कामे, व्यवसाय ठप्प झालेत, कर्जांचे डोंगर वाढत चालले आहेत. ही सर्व कारणे अनेक व्यक्तींना जीवनाबाबत आणि भविष्याबाबत निराश करत आहे आणि यातूनच नैराश्याचा आजार मोठ्या प्रमाणात मूळ धरतो आहे.     
नैराश्य ही मनाची उदासीन अवस्था असते. मानसिक आजारात सर्वाधिक आढळणारा हा आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास व निराश वाटते. दैनंदिन कामे तसेच आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. आजमितीला २० ते ३० टक्के व्यक्तींमध्ये हा आजार निर्माण होऊ लागला असल्याचे काही मानसरोग तज्ज्ञांचे मत आहे. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते.
नेहमीच्या जीवनातील अनिश्चितता, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो आहे. काही व्यक्तींना कमालीच्या तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते आहे. एरवीच्या काळात अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो आणि परिणामी नैराश्य येऊ शकते. त्यामुळे कोरोनाच्या साथीमधील 'न भूतो न भविष्यती' अशा प्रसंगात हा तणाव आणि त्यातून निर्माण होणारे नैराश्य ही एक अपेक्षित गोष्ट आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, एचआयव्ही, इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे रोग नैराश्याला कारणीभूत असतात. आता कोरोनाच्या भीतीची त्यात भर पडली आहे. नैराश्य हे मानसिक दुर्बलता वाढण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे.

व्यसनाधीनता
मद्यप्राशन किंवा धूम्रपानाची सवय असलेल्या व्यक्तींमध्ये लॉकडाउनच्या काळात त्यांच्या व्यसनांच्या वस्तू न मिळाल्याने त्यांना विथड्रॉवल सिम्प्टम्स येऊन त्रास झाला. त्यात मद्यविक्री पुन्हा सुरू झाल्याने अनेकांनी मधला उपास भरून काढला. अतिरिक्त मद्यसेवन हा एक मानसिक आजारच मानला जातो.

कसे टाळावेत मानसिक आजार
 कोरोनाचे हे संकट येत्या अनेक महिन्यांपर्यंत कदाचित वर्षभरातही पूर्णपणे ओसरणार नाही. कोरोनाच्या साथीत लॉकडाउनच्या काळात निर्माण झालेल्या या काही विशेष मानसिक त्रासांना टाळण्यासाठी काही नियोजन करावेच लागेल. त्याकरता आपली जीवनशैली बदलावी लागेल. आपल्या दिनक्रमात अनेक गोष्टींचा नव्याने समावेश करावा लागेल.

 • दिनचर्येचे, कामाचे वेळापत्रक करावे लागेल.
 • टेलिव्हिजनवरील बातमीपत्रे दिवसातून एक किंवा दोन वेळेसच पहावीत.
 • सोशल मीडियावर कोरोनासंबंधी चर्चा  करू नये. अवास्तव माहिती, पोस्ट्स किंवा व्हिडिओ शेअर करू नयेत.
 • निरनिराळ्या सूचनांबाबत सतर्क रहावे, पण त्यांच्या आहारी जाऊ नये.
 • हात धुताना आपण संसर्ग टाळण्यासाठी करतो आहोत की उगाच आपल्या मनाच्या समाधानासाठी, याकडे लक्ष पुरवावे.
 • स्वच्छता पाळून घरात थांबून राहण्याचा रोज नव्याने निश्चय करावा.
 • आपला छंद जोपासावा. वाचन, फोटोग्राफी, गाणी ऐकणे, नवे-जुने सिनेमा पाहणे, कोडी-शब्दकोडी सोडवणे इत्यादी.
 • गायन, वादन, नृत्य, चित्रकला, ओरिगामी अशी एखादी कला अवगत असल्यास तिचा पाठपुरावा करावा. वेळेचा सृजनात्मक उपयोग करावा, सुप्त गुणांना व्यक्त होऊ द्यावे. 
 • झोपेच्या वेळा, जेवणाच्या वेळा आणि आहार नियमित करावा. 
 • घरातील व्यक्ती, नातेवाईक, मित्र, मुले-नातवंडे यांच्याशी टेलिफोनवरून अथवा व्हिडिओ कॉल्सवरून नियमित संपर्क ठेवावा.
 • घरातील आवराआवरीची कामे, कपाटे-कागदपत्रे लावणे, पुस्तके लावणे याकडे लक्ष पुरवावे.
 • दररोज व्यायाम करावा.
 • मेडिटेशन, ध्यान याद्वारे मनाची एकाग्रता वाढवावी. त्याने ताण नक्की कमी होईल.
 • दैनंदिन धावपळीत आपण श्वासही अर्धवट घेतो, परिणामी अनेक विकार अथवा व्याधी कायमस्वरूपी येऊन चिकटतात. चिंता, नैराश्यासारख्या कोणत्याही मानसिक विकारात दीर्घ श्वास घेत राहिल्यास छातीवर येणारे दडपण, सतत होणारी धडधड नक्कीच कमी होते.
 • एखादा मानसिक त्रास जास्त वाटत असल्यास डॉक्टरांचा अथवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 • मनात चिंता, नैराश्य सतत घर करून राहत असतील तर लेखन करावे. आपल्या चिंता, प्रश्न कागदावर लिहून काढावेत. शक्य असल्यास दैनंदिनी लिहावी.

संबंधित बातम्या