प्लाझ्मा थेरपी - कोरोनावर उपाय

डॉ. अविनाश भोंडवे
रविवार, 7 जून 2020

आरोग्य संपदा
सध्या कोरोनावर कोणतेही खात्रीशीर  औषध, प्रतिबंधक लस किंवा इतर उपचार  उपलब्ध नाहीयेत. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वांवर वेगवेगळ्या उपचार पद्धतींचा  अवलंब केला जात आहे. यातील एक  उपचार पद्धती  म्हणजे  प्लाझ्मा थेरपी! काय आहे ही  प्लाझ्मा थेरपी आणि ही  थेरपी नेमकी कशी काम करते याविषयी केलेले मार्गदर्शन... 

संपूर्ण जगाला ग्रासून टाकलेल्या कोरोना विषाणूच्या महासाथीचा फैलाव अजूनही आटोक्यात येत नाहीये. दिवसेंदिवस आजाराची बाधा झालेल्यांची संख्या वाढते आहे. मृतांचा आकडाही फुगत चाललेला दिसतोय. जानेवारीपासून सुरू असलेल्या या जगद्व्यापी लढ्यात मे महिना संपला तरी अजूनही परिणामकारक औषध सापडलेले नाही आणि प्रतिबंधक लससुद्धा उपलब्ध झालेली नाही. जगामध्ये ३०० पेक्षा जास्त संस्था लस तयार करण्याची पराकाष्ठा करतायेत. त्यातल्या दृष्टिक्षेपातील यश अनेक महिने दूर आहे. साहजिकच साथ नियंत्रणात येत नाहीये आणि मृतांची संख्या तर सतत वाढतेच आहे. बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने सर्व छोटे मोठे संदर्भ तपासले जात आहेत. पूर्वी वापरल्या गेलेल्या काही वेगळ्या उपचारांचा या आजारात उपयोग होतोय का, यासाठी धडपड केली जाते आहे. प्लाझ्मा थेरपी हा असाच एक उपाय सध्या काही ठिकाणी पडताळला जातोय.

प्लाझ्मा
शरीरामध्ये सर्वत्र फिरणाऱ्या रक्तातील पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी आणि प्लेटलेट्स वेगळ्या केल्यावर, रक्तातील जो द्रवभाग उरतो त्याला प्लाझ्मा किंवा रक्तद्रव म्हणतात. यामध्ये ९२ टक्के पाणी असते, पण आरोग्यास आवश्यक असलेले इतर अनेक घटक असतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, बायकार्बोनेट, मँग्नेशियम, कॅल्शियम असे क्षार असतात. तसेच पोषणासाठी लागणारे घटक म्हणजे अमायनो अॅसिड, जीवनसत्वे, ऑरगॅनिक अॅसिड्स, रंगद्रव्ये, पाचक रस असतात. शिवाय इन्सुलिन, थायरॉक्सीन, कॉरटिकोस्टीरॉइड्स असे हार्मोन्स असतात. 

प्लाझ्मामध्ये सहा ते आठ टक्के वेगवेगळी प्रथिने असतात. यामध्ये फायब्रिनोजेन हा रक्त गोठण्यासाठी लागणारा घटक, अॅल्ब्युमिन, ग्लोब्युलिन्स असतात. याखेरीज शर्करा, कोलेस्टेरॉलचे विविध घटक, लोह असे असंख्य सूक्ष्म घटक असतात. सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स असतो.  

इम्युनोग्लोब्युलिन्स
आपल्या रक्तात असंख्य पांढऱ्या पेशी असतात. साधारणतः रक्ताच्या एक घन मिलीमीटरमध्ये ४,००० ते १०,००० पांढऱ्या पेशी असतात. या पांढऱ्या पेशींचे पाच प्रकार असतात, त्यात लिम्फोसाइट्स हा एक उपप्रकार असतो. त्यात पुन्हा टी आणि बी प्रकार असतात. यातील बी-लिम्फोसाइट्सच्या योगे इम्युनोग्लोब्युलीन्स स्त्रवले जातात. 

आपल्या शरीरामध्ये शिरकाव करणाऱ्या विषाणूला किंवा जीवाणूला अँटिजेन म्हणतात. हे विषाणू शरीरात आल्यावर आपल्या लिम्फोसाइट्स प्रतिकार करू लागतात आणि त्यातून इम्युनोग्लोब्युलिन्स स्त्रवतात. त्यांना आयजी म्हणजेच अँटिबॉडीज म्हणतात.

अँटिबॉडीजदेखील प्रथिनाचा एक प्रकार असतो. त्यांचा आकार इंग्रजी Y सारखा असतो. या अँटिबॉडीजचे वैशिष्ट्य म्हणजे त्या शरीरात रोगसंसर्ग झाल्यावरच तयार होतात आणि संसर्ग करणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या विषाणू किंवा जीवाणूला नष्ट करण्यासाठी वेगळ्या होत असतात. म्हणजेच ज्या ज्या प्रकारचा विषाणू आपल्या शरीरात येईल, त्या प्रत्येकासाठी वेगळ्या अँटिबॉडीज असतात. उदा. गोवर, कांजिण्या, स्वाईन-फ्लू अशा आजारांच्या अँटिबॉडीज एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात आणि त्या ज्यांच्या विरोधात आहेत, त्या विषाणूंनी शरीरात पुन्हा प्रवेश केला की त्यांना नष्ट करतात.

प्लाझ्मा दाता 
प्लाझ्मा देण्यासाठी जो दाता असतो, त्याच्यासाठी चार प्रमुख गोष्टी लक्षात घ्यायच्या असतात

  • दाता - कोविड -१९ ची लागण त्याला झाली असली पाहिजे.
  • दाता पूर्णपणे बरा झाल्याच्या १४ दिवसांनंतरच त्याचे रक्त घेता येते. त्याचे दोन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच प्लाझ्मा घेता येतो.
  • प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीने गेल्या तीन महिन्यांत परदेश प्रवास केलेला नसावा.
  • दात्याला ताप किंवा श्वसनाशी संबंधित विकार प्लाझ्मा देताना असू नयेत.

या उपचार पद्धतीत बऱ्या झालेल्या रुग्णाचे ५०० मि.ली रक्त घेतले जाते, त्यातून प्लाझ्मा (रक्तद्रव) वेगळा काढून तो गंभीर रुग्णास टोचला जातो. पण तसे करण्यापूर्वी रक्त देणारा रुग्ण बरा होऊन त्याची पंधरा दिवसांनी रक्तातील अँटिबॉडीजची चाचणी करून ती पॉझिटिव्ह येणे गरजेचे असते.

कॉनव्हॅलिसन्ट प्लाझ्मा थेरपी
कोरोना किंवा कुठल्याही विषाणू-जीवाणूजन्य आजारातून नुकताच बरा झालेला रुग्ण आपला प्लाझ्मा देण्यासाठी दाता होतो. या बऱ्या झालेल्या रुग्णाचा प्लाझ्मा त्याच विषाणू किंवा जीवाणूमुळे गंभीर आजार झालेल्या दुसऱ्या रुग्णाला टोचला जातो. यावेळेस त्या रुग्णाला दात्याने दिलेल्या प्लाझ्मातील अँटिबॉडीजमुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढून त्याच्या शरीरात शिरकाव केलेल्या विषाणूंना नष्ट करून तो बरा होतो. यालाच कॉनव्हॅलिसन्ट प्लाझ्मा थेरपी म्हणतात. 

आजमितीला बऱ्या झालेल्या रुग्णाच्या प्लाझ्माचा वापर या विषाणूवर उतारा म्हणून परिणामकारक ठरत आहे. अर्थात ही उपचारपद्धत तशी नवीन नाही. विषाणूजन्य आजारात पूर्वीही त्याचा वापर केला जात होता, पद्धत जुनी असली तरी ती नव्या विषाणूत वापरताना त्याची शहानिशा करावी लागते. त्यामुळे कोरोनामध्ये हा उपचार करताना कुठले नियम पाळायचे हे आता पक्के झाले आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णाचा रक्तद्रव थेट गंभीर रुग्णाच्या शरीरात टोचल्यानंतर, लस जे काम करते त्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने प्लाझ्मा काम करतो.

मात्र या पद्धतीत, बऱ्या झालेल्या व्यक्तीचा आणि रुग्णाचा रक्तगट जुळावा लागतो. शिवाय दात्याची रक्तद्रव देण्याची तयारी महत्त्वाची असते. जगात आता दीड लाखांहून अधिक बळी गेले असून २२ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, औरंगाबाद, मालेगाव अशा काही शहरांत परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे उपचारांसाठी बऱ्या झालेल्या रुग्णांचा रक्तद्रव वापरण्यात येणार आहे. 

१६ एप्रिल २०२० रोजी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) या उपचार पद्धतीच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिली चाचणी केरळमधील श्रीचित्रा तिरुनाल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अ‍ॅड टेक्नॉलॉजी या संस्थेत झाली आहे.

या उपचार पद्धतीला चीनमध्ये आणि अमेरिकेत चांगले यश आल्याची माहिती मिळाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या पाच पेशंट्सची प्रकृती गंभीर होती. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीनेच उपचार केल्यानंतर १२ दिवसांमध्ये ते पेशंट्स बरे झाले. चीनमधील ''द शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटल''ने २७ मार्च २०२० ला एक संशोधन प्रसिद्ध केले होते. त्यात नमूद केल्याप्रमाणे प्लाझ्मा थेरपीद्वारे ३६ ते ७३  वयोगटातील पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले. अमेरिकेच्या अन्न आणि औषध विभागाने प्लाझ्मा थेरपीला मान्यता दिली आहे. त्याकरता शिस्तबद्ध पद्धतीने क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात. अमेरिकेत अनेक गंभीर अवस्थेतील रुग्ण बरे झाले आहेत त्यात भारतीय वंशाच्या लोकांचाही समावेश आहे. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर प्लाझ्मा थेरपीनुसार उपचार करण्यात आले आणि ते पूर्णपणे बरे झाले.

अमेरिकेतील सीडीसी ही राष्ट्रीय आरोग्य संस्था कोरोनामधून बऱ्या झालेल्या लोकांमधील अँटिबॉडीजची पातळी अभ्यासत आहेत. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतर्फे अमेरिकेतील विविध राज्यातील ५७ संशोधन संस्था एकत्र येऊन यावर संशोधन करत आहेत. अमेरिकेत १२,००० रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली गेली. त्यातील ५,००० रुग्णांचा अभ्यास करून १४ मे २०२० रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला, त्यात प्लाझ्मा थेरपीमुळे या सर्व रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम झालेले नाहीत हे नमूद केले आहे. म्हणजेच प्लाझ्मा थेरपी ही उपचारासाठी पूर्ण सुरक्षित आहे, हे यातून सिद्ध झाले आहे. या संशोधनात प्लाझ्मा थेरपीमुळे रुग्णाच्या शरीरातील कोरोना विषाणूवर कितपत परिणाम झाला, याचे विश्लेषण येत्या काही दिवसांत कळणार आहे.

अमेरिकेतील या चाचण्यांमध्ये रुग्णांचा आजार बळावू लागला आहे, असे लक्षात येताच अगदी सुरुवातीच्या काळात प्लाझ्मा दिल्यास उत्तम परिणाम होतात असे लक्षात आले आहे. पण प्लाझ्मा मिळण्यास विलंब झाला किंवा रुग्णाचा श्वास कमी झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटर लावल्यावर प्लाझ्मा दिला, तर हा उपचार तितकासा यशस्वी होत नाही असेही लक्षात आले आहे.  

प्लाझ्मामधील अँटिबॉडीजचा अभ्यास करून लस तयार करण्याचे प्रयत्नही बीजिंगमधील सिंगहुआ विद्यापीठ करत आहे. तसेच अँटिबॉडीजची प्रतिकृती कृत्रिमरीत्या करून औषधेही तयार करता येतात असे आढळून आले आहे.

इतिहास
प्लाझ्मा थेरपीचा वापर १०० वर्षांपूर्वीपासून शास्त्रज्ञांना ज्ञात आहे. जर्मन फिजिऑलॉजिस्ट एमिल फॉन बेरिंग आणि किटासाटो शिबासाबुरो यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस रक्तातील अँटिबॉडीज शोधून त्या घटसर्पाच्या उपचारासाठी वापरता येतील हे दाखवून दिले होते. त्यासाठी १८९५ मध्ये बेरिंग यांना त्याच वर्षी सुरू झालेले मानाचे नोबेल पारितोषिक पहिल्याच वर्षात मिळाले होते.   

प्लाझ्मा थेरपीचा वापर १९१८ मधील स्पॅनिश फ्लूमध्ये, २००३ मध्ये आलेल्या सिव्हीयर अ‍ॅक्युट रिस्पेरेटरी सिंड्रोम म्हणजेच सार्सच्या साथीत, २०१३ मध्ये आलेल्या इबोला साथीमध्ये केला गेला आहे. याशिवाय गोवर, व्हायरल न्यूमोनिया, स्वाईन-फ्लू या आजारांच्या साथीतसुद्धा, सुरुवातीला आधुनिक उपचार उपलब्ध नसल्यामुळे त्या त्या वेळेस केला गेला होता.

महाराष्ट्रात मुंबईच्या नायर आणि लीलावती तर पुण्याच्या ससून रूग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा वापर प्रायोगिक तत्त्वावर चाचणी म्हणून केला गेला आहे. मात्र, ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजेआय) यांची मंजुरी आवश्यक आहे. सर्व लोकांवर या पद्धतीने उपचार सुरू करण्याआधी प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्याव्या लागतील. आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यात कोरोना संक्रमण होण्याचा धोका अधिक आहे. त्यांच्यासाठीही ही पद्धत वापरली जाऊ शकते.

कोरोनाच्या संकटात तो कशाने तरी बरा व्हावा, यासाठी प्रयत्नांची शर्थ सुरू आहे. पारंपारिक औषधे, आयुर्वेदिक, होमिओपॅथी, पूर्वापार चालत आलेली हायड्रोक्सिक्लोरोक्विन सारखी प्रचलित औषधे, अॅंटिव्हायरल औषधे यांच्यावर संशोधने सुरू आहेत. मानवजातीला पिडणाऱ्या रोगांविरुद्धच्या आजवरच्या लढ्यात मानवाच्या बुद्धीने या आजारांवर नेहमीच विजय मिळवला आहे. कोरोना विषाणूवरही नक्की मात करता येईल, पण प्रश्न आहे तो सोनियाचा दिवस कधी उजाडेल?

संबंधित बातम्या