सर सलामत तो पगडी पचास

डॉ. अविनाश भोंडवे 
मंगळवार, 29 जानेवारी 2019

कव्हर स्टोरी 
 

मनुष्य हा एक बुद्धिमान प्राणी आहे. कुठल्याही प्राण्यापेक्षा जास्त विकसित झालेला मेंदू हा त्याच्या चौफेर बुद्धिमत्तेचा कर्ता असतो. मात्र ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्न:’ म्हणतात तसे या बुद्धीतून निर्माण होणारे विचार प्रत्येकाच्या बाबतीत वेगळे असतात. सध्या दुचाकीस्वारांसाठी जी हेल्मेटसक्ती केली जाते आहे, त्याबाबत उठणारे उलटसुलट मतप्रवाह ऐकले, त्याबाबत निघणारे मोर्चे पाहिले, ठिकठिकाणची पोस्टर्स पाहिली, की याची चांगलीच प्रचिती येते.  

ब्लॅक ॲण्ड व्हाईट टीव्हीच्या जमान्यातली दूरदर्शनवरील एक जाहिरात आठवते? एका कलिंगडावर हातोडा मारला जातो आणि कलिंगडाचा चक्काचूर होतो. नंतर त्या कलिंगडावर  हेल्मेट घालून हातोडा मारला जातो. ते सुरक्षित राहते. अगदी थोडक्‍या वेळेत कमालीची परिणामकारकता साधणारी ही जाहिरात होती. दूरदर्शनची त्या काळातली व्यापकता पाहता ही जाहिरात जनमानसात घर करणारी ठरली, पण प्रत्यक्ष परिणाम साधू शकली नाही. 

गेल्या १०-१५ वर्षात भारतभरात वाहनांची जी अपरिमित वाढ झाली त्यामध्ये ८० टक्‍क्‍यांहून जास्त दुचाकी वाहने आहेत. आकडेवारीनुसार २०१७ -१८ मध्ये भारतातल्या दुचाकींची संख्या २ कोटी होती. वाहनांची संख्या वाढल्याने अपघात वाढले आणि साहजिकच त्यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त भरू लागली. २०११ पासून दरवर्षी होणाऱ्या अपघातांची, त्यात होणाऱ्या मृत्यूंची आणि होणाऱ्या गंभीर जखमी व्यक्तींची आकडेवारी पाहिली तर हे लक्षात येईल.

अपघातांचे स्वरूप
भारतात स्वयंचलित वाहनांमध्ये दुचाकी वाहनांची संख्या ६९ टक्के आहे. वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वार ठार होण्याची शक्‍यता  ३० पटीने जास्त असते. दुचाकी वाहनांच्या अपघातामुळे मृत होणाऱ्या व्यक्तींमध्ये ७२ टक्के २० ते ३० वयाचे तरुण असतात.
दुचाकी वाहनांचे जे अपघात होतात, त्यात चालक रस्त्यावर फेकला जाऊन ‘हेड इंज्युरी’ म्हणजे डोक्‍याला मार बसून मेंदूला इजा होण्याचे प्रमाण जास्त असते. त्याचबरोबर हातापायांची हाडे मोडणे, मणक्‍यांना इजा होणे, पोटाला अंतर्गत इजा होणे या गोष्टी घडतात. यातील ७५ टक्के ते ८८ टक्के अपघातात डोक्‍याला मार बसतो. या अपघाती स्वरूपाचा इलाज मोठ्या इस्पितळात इंटेन्सिव्हकेअर युनिटमध्ये करावा लागतो, आणि इस्पितळातून घरी आल्यावरही बरेचसे रुग्ण अंथरुणाला खिळून राहू शकतात. २५ टक्के रुग्णांमध्ये दीर्घकालीन अपंगत्व किंवा मेंदूच्या कार्यात दोष राहू शकतात. या साऱ्या उपचारांचा खर्चही अमाप असतो.
आज पुण्यासह अनेक शहरात रोजच्या कामांसाठी सार्वजनिक वाहनव्यवस्था मुळीच सोयीची नाही. चारचाकी घेणे सर्वांनाच परवडत नाही आणि त्या मोटारी गर्दीतून चालवणे एकतर महाकर्मकठीण झाले आहे शिवाय त्यांचे पार्किंग हा आणखी एक गहन विषय आहे. रिक्षा आणि टॅक्‍सी हा पर्याय रोजच्या रोज वापरला तर खिशाला मोठीच चाट बसते. साहजिकच आजच्या जीवनशैलीत शहरांतर्गत रस्त्यावरील दैनंदिन कामांसाठी प्रवास करायला सर्वांना दुचाकीचाच पर्याय राहतो. 

अपघाताची कारणे
शहरातल्या रस्त्यात आणि हमरस्त्यावर वेगाने जाणाऱ्या मोटारी, ट्रक्‍स, बसेस जो रस्ता वापरतात तोच रस्ता दुचाकी वापरतात. भरधाव वेगाने जाणाऱ्या या वाहनांना दुचाकी स्वार पटकन दिसत नाहीत आणि अपघात होण्याची शक्‍यता जास्त असते. त्यात तरुण पिढीला सुरक्षित पद्धतीने, वाहतुकीचे नियम पाळून वाहन चालवण्याऐवजी जिवावर उदार होऊन बेभानपणे गाड्या चालवण्यात भूषण वाटते. शिवाय या जोडीला रस्त्यावरील खड्डे, अशास्त्रीय वळणे यांची भर असते. मद्यप्राशन करून वाहने चालवणे हेसुद्धा वाहनांच्या अपघातांचे एक महत्त्वाचे कारण असते.

आपण दुचाकी वापरणे टाळू शकलो नाही, तरी हेल्मेट वापरून त्यातून उद्भवणाऱ्या हेड इंज्युरीज नक्कीच टाळू शकतो.
अपघातात डोक्‍याला मार बसण्याचे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात डोक्‍यावर एखादी गोष्ट धडकून प्रत्यक्ष इजा होऊ शकते. म्हणजे समोरील वाहनाचा एखादा भाग, रस्ता, रस्त्यावरील दगड, खांब किंवा डोक्‍यावर आदळणारी कोणतीही कठीण गोष्ट. आणि दुसऱ्या प्रकारात वाहनांची धडक झाल्यामुळे डोक्‍याला हिसका बसून अप्रत्यक्ष इजा होते. यामध्ये मेंदूवरील दोन आवरणाच्या मधील द्रवपदार्थ हलतो, त्याचा दबाव वाढून मेंदूवर दबाव येतो. हेल्मेट वापरण्याने हे दोन्ही प्रकारचे त्रास तर टळू शकतात. पण इतर त्रासही टाळले जाऊ शकतात. 

 • हेल्मेटचे बाह्य आवरण आघात झेलणाऱ्या पॉलि कार्बोनेट प्लास्टिक आणि कठीण फायबरग्लासने बनलेली असतात आणि त्यात कार्बन फायबर वापरून टणक केलेली असतात. त्यामुळे बाह्य आघातांनी होणारी डोक्‍याची आणि पर्यायाने मेंदूची इजा टळू शकते.  
 • हेल्मेटच्या आतल्या बाजूने इपीएस फोमने म्हणजेच एक्‍स्पांडेड पॉलिप्रॉपिलिन किंवा पॉलिस्टायरिनने बनलेला अंतस्थ थर असतो. जेव्हा एखादा आघात होतो, तेव्हा त्याचा प्रहार झेलून या इपीएस फोमचे तुकडे होतात आणि डोक्‍याला होणारी अप्रत्यक्ष इजा होत नाही. 
 • जागतिक पातळीवरील आकडेवारीनुसार, हेल्मेट वापरल्याने अपघातात होणाऱ्या मृत्यूची शक्‍यता ३९ टक्‍क्‍यांनी कमी होते.
 • अपघाताचा धोका आणि होणाऱ्या गंभीर इजेचा धोका ७२ टक्‍क्‍यांनी कमी होतो.  
 • हेल्मेटच्या दर्शनी भागातील पारदर्शक प्लास्टिक भागामुळे चेहऱ्याला होणाऱ्या इजा टळतात.
 • रस्त्यावरील रहदारीत इतर वाहनांच्या चाकांनी उडणारे दगड दुचाकी स्वारांच्या डोक्‍याला, डोळ्यांना, चेहऱ्याला लागून इजा होऊ शकते. हेल्मेट वापरणाऱ्या व्यक्तींना हा त्रास होत नाही.
 • कडक ऊन, पाउस, थंड हवा, धूळ, प्रदूषणयुक्त धूर यापासून संरक्षण होते. 
 • अनेकदा रस्त्यावरील कीटक, कचरा यांचा त्रास टळतो. 

    हेल्मेट वापरल्यास जे अपघात आणि इजा कमी होतील त्यामुळे या अपघातग्रस्त रुग्णांवर होणारा वैद्यकीय खर्चही कमी होईल. ही रक्कम अंदाजे २५ हजार कोटी रुपये म्हणजे भारताच्या जीडीपीच्या किमान १ टक्का असेल. थोडक्‍यात भारतीयांचे केवळ आयुर्मानच नव्हे तर जीवनमानदेखील उंचावू शकेल.

हेल्मेटबाबत निकष
भारत सरकारच्या रस्ते परिवहन आणि राज्य महामार्ग मंत्रालयाने दुचाकी चालकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेटसाठी नवीन निकष तयार केले आहेत. यानुसार

 • १५ जानेवारीनंतर फक्त आयएसआय प्रमाणित हेल्मेट्‌सची विक्री करावी लागणार आहे.
 • ही हेल्मेट्‌स ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डच्या आयएस ४१५१ :२०१८ च्या निकषांवर उतरणे गरजेचे आहे.
 • या निकषांनुसार, नवीन हेल्मेटचे कमाल वजन १.५ किलो करण्यात आले आहे.
 • वाहन चालवताना इंडस्ट्रिअल हेल्मेट्‌स परिधान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
 • रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयानद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, हेल्मेट तयार करणाऱ्या कंपन्यांना, हेल्मेटची विक्री करणाऱ्यांना आणि हेल्मेटच्या वितरकांना १५ जानेवारीपासून या निकषांचे पालन करणे आवश्‍यक ठरणार आहे. 
 • या नियमांचे पालन केले नाही तर संबंधितांना २ वर्षे कारावास आणि २ लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. 

हेल्मेट न वापरण्याची कारणे
आज जे लोक हेल्मेट वापरायला विरोध करत आहेत, त्यांच्या विधानांची दुसरी बाजूदेखील पाहू या.

 • मी व्यवस्थित वाहन चालवतो, मला काय गरज हेल्मेटची? - पण अपघात हे अकस्मात होत असतात . तुमचे वाहन हाकणे व्यवस्थित असले, तरी समोरचे वाहन व्यवस्थितपणे चालवले जात असतेच असे नाही.
 • हमरस्त्यावर आणि हायवेवर हेल्मेट ठीक आहे पण शहरात थोड्या अंतरावर फिरताना हेल्मेट नको. - अपघातांच्या आकडेवारीत शहरामध्ये तितक्‍याच प्रमाणात अपघात होतात आणि त्यातून होणाऱ्या हेड इंज्युरीज आणि इजा तितक्‍याच जीवघेण्या असतात.
 • दिवसभर हेल्मेट बाळगणे अडचणीचे असते. - वाहनावर हेल्मेट लावा किंवा त्यासाठी साखळीचे कुलूप वापरा.
 • हेल्मेट वापरल्याने खूप गरम होते, मान दुखते - हे त्रास नित्याच्या वापराने दूर होतात.
 • हेल्मेटमुळे मानेच्या मणक्‍यांचा स्पॉण्डिलोसिस होतो, केस गळतात, डोळे खराब होतात, डोके दुखते - हे सारे चुकीचे आणि अशास्त्रीय समज आहेत.
 • हेल्मेट्‌स खूप महाग असतात. - गाड्यांच्या किमतीपेक्षा आणि आपल्या जिवापेक्षा महाग नाहीत.

हेल्मेटची उपयुक्तता आणि त्यामुळे मिळणाऱ्या सुरक्षा याबाबत अनेकांना शंका नाही, मात्र त्याच्या वापराच्या सक्तीला त्यांचा विरोध आहे. अपघात विम्यात हेल्मेट वापरणे आवश्‍यक ठरवावे, नसल्यास अपघात विम्याची रक्कम न मिळण्याची तरतूद ठेवावी. हेल्मेट नसल्यास पेट्रोल पंपावर पेट्रोल देऊ नये, अशाप्रकारच्या सक्तीला आज समाजात विरोध आहे. याउलट हेल्मेट्‌सचा वापर वाढावा याकरिता समाजप्रबोधन करावे, जनतेत जागरूकता आणि सकारात्मक जाणीव निर्माण करावी. शक्‍य असल्यास हेल्मेट वापरण्यासाठी काही इंसेंटिव्हज द्यावा. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत  सतर्कता जागृत व्हावी म्हणून शिक्षण देणे योग्य ठरेल.

संबंधित बातम्या