स्वस्थता... सर्वांसाठी... 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ
गुरुवार, 11 जानेवारी 2018

हितगूज
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला रिॲक्‍ट होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतात.

हांस सेले या विचारवंताचे एक छान वाक्‍य आहे.. Adopting a Right Attitude can convert a Negative stress into a positive one.. आणि ते अगदी खरं आहे. आज नकारात्मक तणाव नियोजनाची नितांत गरज भासू लागली आहे. 

हल्ली कॉर्पोरेट, मीडिया, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सर्वच क्षेत्रांमध्ये ताणतणावाचे नियोजन न करता आल्यामुळे अस्वस्थतेच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसते आहे. 

प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावाची जडणघडण, तणाव पेलण्याची क्षमता, परिस्थितीला रिॲक्‍ट होण्याची पद्धत, भावनिक समतोल वेगळा असतो. त्यामुळे ताणतणावाच्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची तीव्रता वेगळी असू शकते. पण शेवटी तणावांमुळे शरीरात होणाऱ्या cortisol, adrenalin व इतर घातक संप्रेरकांचे दुष्परिणाम होतातच. त्याचबरोबर मेंदूतील serotonin आणि norepinephrine या neurotransmitters मध्ये असंतुलन निर्माण होते. ज्यामुळे अस्वस्थतेच्या आजाराला निमंत्रण मिळते. याची शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीतील लक्षणे दिसायला लागतात, ज्याची नोंद वेळेवर घेणे जरूर असते.

बदलत्या समाज व्यवस्थेमध्ये व्यक्तींवर अपरिमित ताणतणाव असतात. या ताणाचे स्रोत विविध प्रकारचे असतात. व्यक्तिगत, कौटुंबिक, महाविद्यालयाअंतर्गतचे, डिपार्टमेंटअंतर्गतचे, राजकीय, सामाजिक आणि समाजव्यवस्थेचे. त्यातच अनियमित ड्युटीच्या वेळा, जेवणाच्या वेळा, अभ्यासाच्या वेळा, सबमिशन्सच्या वेळा, जागरणे, सततची जागृत राहण्याची मेंदूची सवय आणि ताणाचा निचरा व्यवस्थित न होणे हे प्रश्‍न असतात. या ताणाचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ताण निर्माण होतो. या ताणामुळे जी अस्वस्थता निर्माण होत राहते त्याचे परिणाम शरीर आणि मनावर निश्‍चितपणे होतात. वेळीच जर यावर उपाय झाले नाहीत, तर वेगवेगळे शारीरिक, मानसिक आजार होण्यात त्याची परिणती होते. सततच्या अस्वस्थतेमुळे वाटणारी सुरवातीची, शारीरिक व मानसिक लक्षणे पुढीलप्रमाणे असतात - सतत अस्वस्थ वाटत राहाणे, लहान सहान कारणांवरून होणारी चिडचिड, राग अनावर होणे, झोप न येणे किंवा जास्ती येणे, अनामिक भीती वाटत राहाणे, भूक न लागणे किंवा अतिभूक लागणे, विनाकारण संशय येणे, एकाग्रता न होणे, विचारांमध्ये गोंधळ व निर्णय घेता न येणे, विलक्षण थकवा वाटणे, वारंवार पोट बिघडणे, निराश वाटत राहणे, आत्मविश्‍वास कमी होणे, जगण्यातील आनंद कमी होणे, इत्यादी. 

या आणि अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास नैराश्‍याचा आजार किंवा एखादा शारीरिक आजार होऊ शकतो. Cortisol आणि इतर ताणतणावाशी निगडित संप्रेरके अतिरिक्त प्रमाणात स्रवतात व त्यामुळे इतर शारीरिक अवयवांच्या metabolism वर विपरीत परिणाम होतो. त्यातून अतिरक्तदाब, हृदयविकार, पचनसंस्थेसंबंधातले विकार व अनेक आजार उद्‌भवू शकतात. Neuroimmunology या शास्त्र शाखेच्या निष्कर्षांनुसार बहुतेक शारीरिक आजारांचे मूळ हे खूप काळ सहन केलेल्या मानसिक ताणतणावात असते. 

तसेच या सर्व लक्षणांची परिणती कार्यक्षमता कमी होणे, व्यसनाधीनता वाढणे, गैरहजेरी वाढणे इत्यादी गोष्टींमध्ये होते. 

अस्वस्थतेची मानसिक लक्षणे - १. आत्मविश्‍वास कमी होणे, अभ्यासात, कामात व एकूणच एकाग्रता होऊ न शकणे. २. लक्षात न राहाणे, स्मृतीसंदर्भात अडचणी. ३. निर्णयक्षमता कमी होणे. ४. लहानसहान गोष्टींत गोंधळ उडणे. ५. विचार करताना मूळ मुद्दा सोडून भरकटायला होणे. ६. छातीत धडधड, अचानक घाम फुटणे, काल्पनिक भीती वाटायला लागणे वगैरे. ७. उतावीळपणा वाढणे. ८. अचानक रडू येणे. ९. लहानसहान कारणांवरून अति राग येणे. १०. आत्मविश्‍वास डळमळीत होणे. 

अस्वस्थतेची शारीरिक लक्षणे - १. झोपेचे प्रश्‍न - अजिबात झोप न येणे किंवा जास्त झोप येणे. २. पचनाच्या तक्रारी. ३. डोकेदुखी. ४. त्वचेच्या समस्या. ५. अचानक थकवा येणे. ६. रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे. ७. लैंगिक तक्रारी, इच्छा, क्षमता कमी होणे. ८. इतर अनेक मनोकायिक आजार. 

या ताणतणावाचे नियोजन कसे करायचे, एक कणखर परंतु शांत, स्वस्थ मनःस्थिती निर्माण करता येईल का? त्यासाठी काय करावे लागेल? त्यासाठी पुढील पायऱ्यांमध्ये काम करावे लागेल. आवश्‍यक वाटल्यास तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल. 

  • ताण समजून घेणे व त्यांची नोंद करणे - आपल्यावर सध्या कुठले ताण आहेत? कुठल्या गोष्टींची काळजी वाटत राहाते? कसली भीती वाटते? कशामुळे राग येतो? तो ताब्यात राहतो का? कशामुळे वाईट वाटते? कुठला अपराधगंड वाटत राहतो का? शारीरिक व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे, अशा अनेक गोष्टींची नोंद करावी. थोडक्‍यात हे एक प्रकारचे भावनांचे ऑडिट  असेल. तज्ज्ञांच्या सहाय्याने त्यावरचे उपाय शोधावेत. तज्ज्ञांशी बोलल्यामुळे ताणाचा निचरा व्हायला मदत होईल. 
  • उपाय योजना व आवश्‍यक असल्यास औषधोपचार, थेरपीज - एकदा तणावाचे मूळ, तसेच अस्वस्थतेच्या आजाराचे स्वरूप लक्षात आले की आवश्‍यक असल्यास तज्ज्ञांनी सुचवलेली औषधे घेणे आणि आवश्‍यक त्या सायकोथेरपी, समुपदेशन, तणाव नियंत्रणाची, मनःस्वास्थ्याची तंत्रे शिकणे व या सर्वांचा विशिष्ट कालावधीपर्यंत उपयोग करणे महत्त्वाचे आहे. 
  • व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान व वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे - रोज चल पद्धतीचा (Aerobics) व्यायाम, म्हणजे ज्यायोगे नाडीची गती ठराविक मर्यादेपर्यंत वाढेल (त्याचा फॉर्म्युला २२० - वजा आपले वय. उत्तराच्या दोन तृतीयांश एवढी गती मिनिटाला वाढवणे... उदा. वय चाळीस असेल तर २२० - ४० = १८० च्या २/३ म्हणजे १२०. नाडीची गती मिनिटाला १२० पर्यंत वाढवणे व ती वीस मिनिटे टिकवणे.) म्हणजे तेवढ्या वेगात चालणे, धावणे, पोहोणे इत्यादी. यामुळे शरीरात serotonin, endorphins तसेच इतर नैसर्गिक anti depressants स्रवतील. तसेच प्राणायाम, ध्यानाच्या काही पद्धती, श्‍वासावर आधारित ध्यान, क्षणसाक्षित्वाची (mindfulness), वर्तमान क्षणात राहण्याची तंत्रे शिकून घेणे. 
  • संगीत, कविता, छंद आणि मैत्र - संगीत हे एक उत्तम औषध आहे. मनःस्थिती सुधारण्यासाठी रोज संगीताची साधना, आवडते संगीत रोज ऐकणे, कविता वाचणे, ऐकणे, आवडता छंद जोपासणे याची खूप मदत होते. तसेच ज्याच्यापाशी मोकळे होऊ शकू असे जिव्हाळ्याचे परंतु निर्व्यसनी मित्र जोडणे याचा छान उपयोग होतो. 
  • सकारात्मक दृष्टिकोन व विचार - परिस्थिती कधीच एकसारखी राहात नाही. ती बदलेलच यावर विश्‍वास ठेवायला हवा. माझ्यात सकारात्मक बदल घडतीलच हा विश्‍वास ठेवायला हवा. सकारात्मक स्वयंसूचनेची तंत्रे, स्वतःला स्वस्थ करून स्वयंसूचना देणे हे सगळे शिकून घ्यायला हवे. 
  • क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन - तंत्रे व गायडेड इमेजरी - मानवाला बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्ती या खूप महत्त्वाच्या देणग्या मिळालेल्या आहेत. पाचही ज्ञानेंद्रिये वापरून बुद्धिमत्ता आणि कल्पनाशक्तीच्या सहाय्याने क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन व गायडेड इमेजरीच्या सहाय्याने सकारात्मक व आनंदमय अनुभव आपण घेऊ शकतो. हे सुरवातीला तज्ज्ञांच्या सहाय्याने स्क्रिप्ट निर्माण करून करावे लागते. ताणतणावाच्या निराकरणासाठी या तंत्रांचा अतिशय चांगला उपयोग होऊ शकतो. 
  • चौरस व पौष्टिक आहार - ड्युटीच्या अनियमित वेळा लक्षात घेऊनसुद्धा जीवनसत्त्वयुक्त, प्रथिनेयुक्त, आहार, दूध व दुग्धजन्य पदार्थ, कमी तेलकट मांसाहार, भरपूर पाणी पिणे आवश्‍यक आहे. 
  • आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन - कुठल्याही परिस्थितीत मनःस्वास्थ्य टिकवता येईल का, याचे उत्तर निश्‍चित होकारार्थी आहे. त्यासाठी मुळात आपण आतून स्वस्थ व्हायला हवे. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करायला हवे. कुठल्या गोष्टी आपल्या आवाक्‍यात आहेत आणि कुठल्या नाहीत हे शांतपणे समजून घ्यायला हवे. 

जे टाळणे अशक्‍य दे शक्ती ते सहाया, 
जे शक्‍य साध्य आहे निर्धार दे कराया, 
मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय 
माझे मला कळाया देई बुद्धी देवराया!
 

या प्रार्थनेतील मर्म समजून घेतले तर बरेच प्रश्‍न सुटतील. ‘मज काय शक्‍य आहे, आहे अशक्‍य काय?’.. आपण आतून स्वस्थ झालो तर हे आपल्याला समजेल. स्वस्थ झाल्यावर आपण परिस्थितीचे नीट अवलोकन करू शकू आणि मार्ग काढू शकू; जो प्राप्त परिस्थितीत आणि पुढील आयुष्यात आपल्याला उपयोगी पडू शकेल. 
सर्वांच्याच संदर्भात आपले  ‘आतलं’ जग शांत राहिले तरच ‘बाह्य’ जगासाठी आवश्‍यक असलेली स्वस्थता, भावनिक समतोल, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता, धैर्य, तणाव मग ते व्यक्तिगत असोत, कौटुंबिक किंवा नोकरीतले असोत ते सहन करण्याची क्षमता या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. मानसिक ताकद वाढेल. 

म्हणूनच ‘आतले’ जग शांत करण्यासाठी रोज काही वेळ ‘स्व’कडे पाहण्याची सवय व्हायला हवी.

संबंधित बातम्या