दोन दृष्टिकोन 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजनतज्ज्ञ    
शुक्रवार, 16 मार्च 2018

हितगूज    

मी माझ्या जुन्या मित्राला- अजयला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. त्याचे लूज मोशन थांबेनात. प्रचंड थकवा आला होता आणि डिहायड्रेशन झालं होतं. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये त्याला सलाईन लावलं होतं. मी गेलो तेव्हा शारीरिक परिस्थिती वैद्यकीयदृष्ट्या तशी चांगली होती. पोटही ठीक होतं. तरतरी आली होती. गंभीर असं काहीच नव्हतं. पण मला त्याच्या भावानं बोलावलं कारण अजय विलक्षण निराश झाला होता. मी आता काही जगत नाही. सगळं संपल्यात जमा आहे, अशी त्यानं समजूत करून घेतली होती. हॉस्पिटलमध्ये ठेवलं याचा अर्थ त्यानं अतिशय नकारात्मक पद्धतीनं घेतला होता. निरवानिरवीची भाषा चालू होती. त्याला मी खूप समजावून सांगितलं, पण त्याचं रडगाणं चालूच होतं. बायको आणि मुलं बिचारी त्याच्या या वृत्तीने हैराण झाली होती. अजयचा दृष्टिकोन प्रथमपासूनच असा नकारात्मक असायचा. मी त्याला मनाचा आणि शरीराचा संबंध, सकारात्मकतेचा तब्येतीवर होणारा चांगला परिणाम वगैरे सगळं समजावलं. एक-दोन दिवसांतच त्याला हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला, पण त्याला बरा व्हायला, फिट व्हायला बराच वेळ लागला. हा केवळ नकारात्मक दृष्टिकोनाचा नकारात्मक परिणाम होता. 

 आता अजयच्या नकारात्मक व्यक्तिमत्त्वाच्या विरुद्ध अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या आणि अतिशय विपरीत परिस्थितीत असलेल्या प्रकाशविषयी सांगतो. मी माझ्या मित्राचा भाऊ प्रकाश याला हॉस्पिटलमधे भेटायला गेलो तेव्हा मला आश्‍चर्याचा धक्काच बसला. मी अपेक्षा केली होती, की िजवघेण्या अपघातानंतर आणि एवढ्या मोठया शस्त्रक्रियेनंतर, तो थकलेला, निराश झालेला दिसेल. पण तो भलताच उत्साही होता. मी दिसताच त्यानं माझं हसून स्वागत केलं. मोठया प्रयत्नांनी उठून बसला. मलाच विचारलं, ’’कसा आहेस? मजेत ना? दादा सांगून गेलाय, तू येणार आहेस आज ते. म्हटलं चला आज मस्त गप्पा होतील. माझं काऊन्सेलिंग वगैरे करणार असशील तर मी पूर्ण को- ऑपरेट करीन हं. तू काळजी करू नको.’’ थक्क झालो होतो. म्हणालो ’’तसं काही नाही रे, खूप दिवसांनी, महिन्यांनी भेटतोयस. तुझ्या अपघाताचं कळलं होतं अजयकडून. भेटायला तर यायचंच होतं. आणि तुला कसलंच काऊन्सेलिंग लेका.. तूच माझं करशील.’’ तो मनमोकळ हसला.. पूर्वीसारखाच. म्हणाला, ’’तुला धक्का बसलाय नं, मला असा मस्त बघून. साहजिक आहे. दोन्ही पाय गमावलेत. इतर गुंतागुंत आहेच. नीट दिसतही नाहीय.. ताण येतो डोळ्यावर... मधूनच विसरल्यासारखं होतं... डोकं दुखतं विलक्षण कधी कधी... मजा मजा चालू आहे गेले दहा दिवस.. सारख्या टेस्ट्‌स चालू आहेत...काही गंभीरही निघू शकतं डॉक्‍टरांच्यामते... निघू दे... मला काही फरक पडत नाहीय...अरे This is part of the game’’ इतक्‍यात नर्स त्याचं बी. पी. घ्यायला आली. हा अतिशय आनंदानं तिला म्हणाला ’’हॅपी बर्थ डे सिस्टर, मला कळलंय आज तुमचा वाढदिवस आहे.’’ ती मनापासून हसली. त्याला थॅंक्‍स म्हणाली. तिला खूप बरं वाटल्याचं दिसत होतं. ती गेल्यावर मी म्हटलं ’’तुला पॉझिटिव्ह बघून खूप मस्त वाटलं.’’ एका मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या एक सैनिकाच्या गोष्टीची आठवण झाली. दुसऱ्या महायुद्धात जखमी झालेला एक जवान एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. त्याची शारीरिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. तरीही नेहमी सकारात्मक असायचा. आनंदात असायचा. सगळ्यांचं स्वागत करायचा. हसवायचा. आपल्या अवतीभवती आनंद निर्माण होईल असं पहायचा. एक दिवस त्याच्या खोलीत आणखी एक जखमी सैनिक ॲडमिट झाला. हा खिडकीजवळच्या बेडवर आणि नवीन आलेला समोरच्या बेडवर. त्याला काही खिडकीबाहेरचं दिसायचं नाही. यानं आल्याबरोबर नवीन पेशंटशी दोस्ती करून टाकली. त्याला धीर द्यायचा. खिडकीबाहेर दिसणाऱ्या छान छान गोष्टी सांगायचा, ’’आज पाऊस थांबलाय. बाहेर मस्त ऊन पडलंय....हिरवंगार गवत...पिवळी छोटी छोटी फुलं... निळं आकाश आणि त्यात तरंगणारे पांढरेशुभ्र ढग मस्त दिसतंय’’ असं छान छान सांगत रहायचा. नवीन मित्र आनंदून जायचा. कधी कधी कंटाळा आला, की आपणहून विचारायचा ’’आज आत्ता काय दिसतंय रे?’’ हा सांगायचा, ’’अरे आज बाहेर परेड चालू आहे. आपले सैनिक शिस्तीत मार्च करतायत.’’ मित्राला आनंद व्हायचा, स्फुरण चढायचं. असं रोज चालायचं. दुर्दैवानं एका रात्री आपल्या आनंदी सैनिकाचं अचानक निधन झालं. त्याच्या नवीन मित्राला खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी तो डॉक्‍टरना म्हणाला, मला त्याच्या बेडवर, खिडकीजवळ शिफ्ट करा, प्लीज.’’ सिस्टरनी तसं केलं. त्यानं खिडकीबाहेर पाहिलं तर त्याला फक्त एक दगडी भिंत दिसली. तो नर्सला म्हणाला, ’’हे काय?, बाहेरचा सुंदर बगीचा, आकाश, मैदान हे सगळं कुठे गेलं,? ही भिंत कशी इथं? मला काहीच दिसत नाही, माझ मित्र सांगत होता त्यातलं.’’ नर्सच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, ’’इथे काहीच कधीच नव्हतं. पहिल्यापासून ही भिंतच आहे. तुला बरं वाटावं, तू आनंदात असावास म्हणून तो कल्पनेनं सगळं सांगायचा. त्याचा स्वभावच होता तसा; सगळ्यांना आनंद द्यायचा. तुला आणखी एक सत्य सांगते, ’’त्याला काही दिसत नव्हतं. ही भिंतदेखील दिसायची नाही. त्यानं दृष्टी गमावली होती. गोष्ट संपली होती.’’ प्रकाशच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहेऱ्यावर स्मित.

म्हणाला, ’’ग्रेट... खरंच ग्रेट... असंच असायला हवं माणसानं. सतत दुसऱ्याला आनंद देत राहायचं.. आपल्याला आनंद होतो त्यानं.’’ त्याचा मूड पाहून विचारलं, ’’प्रकाश दोन प्रश्न विचारायचेत तुला. तुला काय झालंय हे तुला माहितीय? तू ते छान विनातक्रार स्वीकारलसं. आता पुढं तू काय करायचं ठरवलंयस? आणि तुला मृत्यूची भीती वाटत नाही का?’’ तो खळखळून हसला. म्हणाला, ’’दोस्त, तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. मला मृत्यूची भीती नाही वाटत. हे उत्तर देताना मी स्वत:ला फसवतही नाहीयं. काय आहे, आपण एक लक्षात घ्यायला हवं, की निसर्गचक्राचे आपण भाग आहोत. या प्रचंड असीम प्रोसेसचे आपण एक महत्त्वाचे घटक आहोत. त्यामुळं या कॉस्मिक इंजिनिअरिंगचे नियम आपण मान्य करायलाच हवेत. इथं प्रत्येक सजीव गोष्टीचा जन्म आणि मृत्यू होतोच होतो. आपण कोणीच त्याला अपवाद नाही. मग त्याला घाबरायचं कशासाठी? मला तर वाटतं तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तुम्ही नीट जीवन समजून घेतलं असेल तर लक्षात येईल, की मृत्यू ही खरं तर सेलिब्रेशनची गोष्ट आहे. एक मोठी महत्त्वाची घटना आपल्या बाबतीतही घडणार आहे आणि मृत्यू आहे म्हणून तर आधीच्या जीवनात आनंद घेण्यात मजा आहे. प्रत्येक क्षण उत्कटतेनं अर्थपूर्ण जगण्यात मजा आहे. हे जीवन जर न संपणारे असतं तर विलक्षण कंटाळा नसता का आला? आपल्याला वाईट वाटत असतं कारण मृत्यूनंतर ’उद्या’ नसतो. पुढचा क्षण नसतो. आणि आपण तर सारखे ’उद्या’आहे ’पुढचा काळ’ आहे हे गृहीत धरून जगत असतो. विचार करत असतो. मग वर्तमान क्षण आपल्या हातातून निसटून जातो. मला म्हणायचं, की मृत्यू ही गोष्ट सहज स्पष्ट आहे. याची जाणीव ठेवून प्रत्येक क्षण आनंदात अनुभवू या की. याचा अर्थ असाही नाही, की आपल्याला कुणाच्या मृत्यूचं दुख:च होऊ नये किंवा ते व्यक्त करू नये. अशी दुर्दैवी घटना घडलीच तर वाईट हे वाटणारंच. अश्रूंतून, आठवणीतून ते व्यक्त होणारच. कारण ती व्यक्तीही आपली एक सहप्रवासी आणि या प्रोसेसचा भाग होतीच की त्यामुळे मोकळेपणानं रडावं, व्यक्त व्हावं. पण आत्ता म्हणालो ते लक्षात ठेवून सावरावं लवकर. अन पुन्हा जगायला सुरवात करावी. कुठल्याही नकारात्मक अवस्थेमधून, भावनेमधून तुम्ही किती लवकर सावरता हे महत्त्वाच.’’ 

तुझा दुसरा प्रश्न, ’’आता मी पुढे काय करणार? ’’त्याचं उत्तर असं आहे, की आयुष्य अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करणार. आनंदी होणार आणि इतरांना आनंद वाटणार. मी मोटिव्हेशनल स्पीकर होणार आणि सकारात्मक दृष्टिकोन तरुण मुलांना शिकवणार. शक्‍य तिथे जाऊन कार्यशाळा, व्याख्यानं देणार. माझ्याकडून हे कार्य घडावं म्हणूनच नियतीनं हा अपघात घडवून आणला असावा. तुला म्हणून सांगतो, अपघातात बेशुद्ध होण्यापूर्वी, तो ट्रक आमच्या गाडीकडे झेपावत असताना मला एक क्षण मृत्यूची विलक्षण जाणीव झाली. त्या क्षणांनी मला जीवनाचं महत्त्व जाणवून दिलं असं मला आता वाटतं. हॉस्पिटलमध्ये सावरल्यानंतर मी निर्णय घेतला आता पुढचा प्रत्येक क्षण आनंदानं जगायचा. स्वत: आनंदी राहायचं आणि इतरांना आनंद वाटत रहायचा. मला कल्पना आहे मला आता पाय नसणार. या दुखण्यातून मी किती काळ जगेन याची शाश्‍वती नाही. पण जोपर्यंत मी असेन तोपर्यंत मी हे करत राहीन.’’ खूप भरून आलं होतं. मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचा निरोप घेतला. हॉस्पिटलच्या बाहेर आलो तेव्हा बराच उशीर झाला होता. बाहेर अंधारून आलं होतं. प्रकाशची वाक्‍यं माझ्या मनात रेंगाळत होती. त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, जिद्द, हिंमत या सगळ्याची नवीन पिढीसाठी गरज होती. मला माझ्यापुरती एक प्रकाशवाट दिसू लागली होती.

फोटो फीचर

संबंधित बातम्या