वैगुण्य खरंच आहे?

डॉ. विद्याधर बापट
गुरुवार, 22 मार्च 2018

हितगूज

श्रीदेवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अनेक चर्चांना तोंड फुटले. त्यात एक विषय होता, तिने सौंदर्यवर्धनासाठी स्वत:वर करवून घेतलेली अनेक ऑपरेशन्स. तिला कदाचित व्यवसायाचा भाग म्हणून, physical apearence चांगले दिसणे गरजेचे म्हणून, त्या शस्त्रक्रिया करून घेणे आवश्‍यक होते. परंतु आजकाल प्लास्टिक सर्जरीने चेहरा, शरीरयष्टी बदलून घेण्याचे पेव फुटले आहे. या व्यक्तींमध्ये काही सेलिब्रेटी आहेत. (व्यवसायाच्या गरजेसाठी, व्याधींनंतरच्या पुनर्वसनासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या व्यक्ती अपवाद आहेत. त्यांची ती अपरिहार्य गरज असते) पण काही Body dismorphic disorder ने ग्रासलेल्या व्यक्तीही आहेत. आपल्या दिसण्यात, शरीरात विलक्षण वैगुण्य आहे, याची त्यांना अस्वस्थता वाटत असते. ही अस्वस्थता अगदी असह्य होत असते. त्यात अवास्तव, काल्पनिक भीतीचा किंवा गंडाचाच भाग असतो. 

Body dismorphic disorder या disorder व्यक्तीचा बहुतांश वेळ हा चेहऱ्यावरील अवयव आणि त्यांचे अजिबात नसलेले किंवा अगदी सौम्य प्रमाणात असलेले वैगुण्य किंवा शरीराच्या आकारात किंवा पोटावर, अजिबात नसलेली अतिरिक्त चरबी किंवा बेढबपणा या विषयी काळजीत जातो. उदा. नाकाचा आकार, भुवया, गाल, डोक्‍यावरचे  केस, हनुवटी, गळ्यावरची वळी, थोडे सुटलेले पोट इत्यादी विषयी. आता हे अवयव नीट करण्यासाठी पैसे असतील तर मग प्लास्टिक सर्जन्सकडे धाव घेणे, वारंवार शस्त्रक्रियेसाठी आग्रह धरणे. वाट्टेल ते ऐकीव उपचार करत रहाणे हे चालू राहते. यात वेळ, पैसा आणि शक्ती खर्च होत राहते. या व्यक्ती स्वत:च्या दिसण्याविषयी अकारण, अवाजवी, अतिशय काळजी करत राहातात. आतून विलक्षण घाबरलेल्या असतात. बऱ्याचदा ही disorder डिप्रेशन, ओसीडी, सोशल फोबिया इत्यादी मानसिक आजारांबरोबर (co-morbidity)असू शकते. हा एक phobic anxiety सारखाच किंवा तसाच प्रकार आहे. 

कशामुळे होते? व लक्षणे 

 • मुख्यत्वे करून मेंदुमधील सेरोटोनीन या न्युरो केमिकलच्या असंतुलनामुळे ही disorder होते. साधारण पौगंडावस्थेपासून याची लक्षणे जाणवू शकतात. 
 • व्यक्तीचे लक्ष सतत आपले दिसणे, चेहरा, नाक, हनुवटी, तीळ, काळपटपणा, व्रण, याकडेच असते.  
 • आपल्या चेहेऱ्यावरचे अवयव व त्यातील symmetry याविषयी अति काळजी. 
 • आपला रंग, उंची, जाडी, कृशपणा याची अति काळजी. 
 • बहुतांशी वेळ या सगळ्या गोष्टी झाकण्यात, लपवण्यात जातो. मंत्रचळ असल्यासारख्या हालचाली होतात. सतत मेकअप करणे, आरशासमोर वेळ घालवणे सुरू असते.     
 • अस्वस्थता इतकी असते, की हतबल होऊन जाणे, आत्मविश्वास ढासळणे हे होते. 
 • सतत इतरांकडून आपले शरीर, दिसणे ठीक असल्याची खात्री करून घेणे. इतरांबरोबर सतत आपल्या दिसण्याची तुलना करत राहाणे. अशा गोष्टी सुरू असतात.

या भीतीमधील भावनात्मक लक्षणे 

 • दैनंदिन जीवनात सततची अस्वस्थता व self - conciousness 
 • ठरलेल्या कार्यक्रमा आधी किंवा घटने आधी आठवडेच्या आठवडे किंवा कित्येक दिवस आधी भीती वाटायला सुरवात होणे . 
 • आपल्याकडे कुणीतरी सारखे बघते आहे, लक्ष ठेवून आहे, जज करते आहे अशी भीती वाटत रहाणे 
 • आपण चुकीचेच दिसू आणि वागू असे सारखे वाटत रहाणे 
 • आपण नर्व्हस झालो आहोत, हे इतरांच्या लक्षात येईल याची भीती वाटणे.

या भीतीमधील वागणुकीतील बदल किंवा लक्षणे  

 • समारंभांना किंवा गर्दी होणार असेल अशा ठिकाणी जाणे टाळू लागणे
 • अशा ठिकाणी जावेच लागले तर कुणी बघणार नाही अशा जागी थांबण्याचा 
 • प्रयत्न करणे किंवा लवकरात लवकर कुणाच्याही नकळत निघून जाण्याचा प्रयत्न करणे.
 •  या अस्वस्थतेमधील शारीरिक लक्षणे 
 • चेहरा मलूल दिसणे 
 • श्वासोत्त्छ्वास जोरात होणे 
 • पोटात खड्डा पडणे
 • हात कापणे, आवाज कापणे 
 • छातीत धडधडणे किंवा जड वाटू लागणे 
 • तळव्यांना घाम येणे 
 • चक्कर येणे.

उपचार पद्धती 
मुख्य म्हणजे आपण निसर्गाची निर्मिती आहोत. निसर्ग कुठलीही गोष्ट imperfect किंवा असुंदर निर्माण करत नाही. आपण आहोत तसे परफेक्‍ट आहोत, या वस्तुस्थितीचा स्वीकार करायला शिकणे. आपला आहार , व्यायाम, विहार उत्तम असला, की आपण सतेज दिसतोच. आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या असण्याकडे, आपल्या कर्तृत्वाकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. हा विश्वास एकदा निर्माण झाला, की चेहऱ्यात, शरीरात अनाठायी बदल करण्यासाठी अकारण शस्त्रक्रिया करण्याचा आणि न सोसणारे उपचार घेण्याचा आग्रह करणे हे थांबते. मुख्य म्हणजे आपल्याला ही disorder आहे, याचा स्वीकार होतो. 
(व्यवसायाच्या गरजेसाठी, व्याधींनंतरच्या पुनर्वसनासाठी प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्या व्यक्ती अपवाद आहेत. त्यांची ती अपरिहार्य गरज असते)     
 
ही disorder बरी होण्यासाठी वेगवेगळ्या उपचारपद्धती आहेत.

 • Systematic Desensitization Therapy (SDT) - पद्धतशीरपणे अस्वस्थतेचे, भीतीचे निर्बलीकरण करणे. पायरी पायरीने अस्वस्थतेवर मात करणे. निर्बलीकरणासाठी virtual reality व इमेजरिजचा (कल्पनाचित्रांचा) वापर 
 • Cognitive Behavioural Therapy (CBT): CBT व्यक्तीला त्याचे नकारात्मक विचारचक्र, विचार पद्धती बदलायला शिकवले जाते. बऱ्याच वेळा CBT व SDT एकत्रितरीत्या परिणामकारकरीत्या वापरली जाते. 
 • Eye Movement Desensitization and Reprocessing (EMDR) - ही पद्धतही फोबिया निराकरणासाठी वापरली जाते. भयगंडाच्या लक्षणांसाठी याचा उपयोग काही थेरपिस्ट करतात.
 • भावनात्मक स्वतंत्रता तंत्र (Emotional Freedom Technique) - ही अपवादाने वापरली जाते. तणाव नियोजनाची तंत्र, ध्यानाच्या पद्धती, दीर्घ श्वसन,माईंड फूल नेसची तंत्र इत्यादी स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. 
 • बहुतांश वेळा इतर सर्व पद्धती मनोविकार तज्ज्ञांनी सुचवलेल्या औषधांबरोबर वापरल्यास लवकर परिणाम होतो. तसेच व्यक्तीनुसार उपचार पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. 
 • साधारण पुढील लक्षणे दिसल्यास तुम्हाला उपचाराची गरज आहे.
 • अस्वस्थता तसेच हतबल करून टाकणारी भीती असल्यास
 • आपली अस्वस्थता व्यर्थ आहे, हे जाणवून सुद्धा त्यावर मात करण्यात अपयश येत असेल तर.
 • disorder काही ठिकाणी जाण्यास, काही व्यक्तींना भेटण्यास तुम्ही भीत असाल, टाळत असाल तर 
 • disorder तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर वेळेवर मदत घेतली, उपचार घेतले तर यातून निश्‍चित बाहेर पडता येते. स्वस्थ होता येते. आणि पुढचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम टाळता येतात.

आपण जसे दिसतो आहोत, त्या नैसर्गिक दिसण्याचा स्वीकार केला की आयुष्यातल्या इतर गोष्टींचा, क्षणांचा मनापासून आनंद घेता येतो.

फोटो फीचर

संबंधित बातम्या