अहंकार 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 3 मे 2018

हितगूज
 

नेने आमच्या सोसायटीत नवीन रहायला आले. नवरा बायको दोघंच घरी. रिटायर्ड. मुलं परदेशी आहेत. मधून मधून ती मुलांसह भारतात येतात चार आठ दिवसांसाठी. सगळ्या कुटुंबाची एकच खासियत. विलक्षण अहंकारी स्वभाव. उद्धट, उर्मट संवाद. समोरच्यांच्या भावनांचा विचारच न करणं. त्यामुळे त्यांच्या त्यांच्यात सुद्धा सततची भांडणं. सारखं मी, मी. माझं ..माझं. घरात भरपूर पैसा...आणि त्याविषयीची विलक्षण घमेंड सतत बोलण्यात डोकावणारी. घरातलं वातावरण सतत अशांत. नेने बाई रोज संध्याकाळी, सोसाटीतल्या इतर महिलांबरोबर गप्पा मारायला बसायच्या..आणि मोठया आवाजात पण कावेबाजपणे आपलं म्हणणं मांडत असायच्या. त्यात सतत आपल्याच मुलांचं कर्तृत्व, आपला पैसा, आपली रहाणी, विचारसरणी  ह्याविषयी अहंकार डोकवायचा. बाकीच्या महिलांना कंटाळा यायचा. पण त्या  बिचाऱ्या सुज्ञपणे, शांतपणे ऐकून घ्यायच्या. सोसायटीच्या मिटिंगमध्ये श्री नेने ह्यांचासुधा सारखा मोठेपणा दाखवायचा, मी म्हणेन तेच खरं हे दाखवायची हौस, अगदी उताला जायची. हळूहळू सोसायटीतलं वातावरण बिघडायला लागलं. लोकांच्याही सहनशक्तीला मर्यादा होती. त्यांच्यात सुद्धा थोडेफार असे नग होतेच. भांडण सुरू झाली. अनेक वर्षांच्या, आनंदी आणि शांत वातावरणाला अहंकाराचा सुरुंग लागला. 

 अशाच गोष्टी इतर ठिकाणी, ऑफिसेसमधे, ग्रुप्समधेही  घडत असतात. या सगळ्याच्या मागे असतो स्वभाव दोष...अहंकारी स्वभाव. नेनेंना ही आनंदी आणि शांत व्हायचं असणारच. पण सर्वं काही छान असतानाही, ते अस्वस्थ असत केवळ त्यांच्या स्वत:च्या स्वभाव दोषामुळे, अहंकारामुळे. 

आपण समजून घ्यायला हवं
मला सुखी, आनंदी, समाधानी आणि आतून खऱ्या अर्थानं कणखर व्हायचं असेल तर मला माझ्या इगो वर नियंत्रण ठेवावं लागेल. प्रत्येकामधे काही प्रमाणात इगो असणारच. पण तो फक्त आपलं अस्तित्व निदर्शक असावा. फ़्रॉइडने म्हंटल्या प्रमाणे इगो हा व्यक्ती व जग या मधील दुवा आहे. पण तो तेव्हढ्यापुरताच असावा. बऱ्याचदा आपण आत्मविश्वास असणं, अभिमान असणं आणि अहंकार असणं यात गल्लत करतो. कधी कधी आपल्याला कळत असूनही आपण असं करतो. कारण पुन्हा आपला इगो जपण्याचाच हा एक प्रयत्न असतो.  

 अहंकारी व्यक्ती दोन प्रकारे आढळतात. एक बाहेरून खूप छान वाटणारी परंतु आतून सतत छुपा अहंकार बाळगणारी. अशा व्यक्ती विलक्षण आतल्या गाठीच्या असतात. परंतु बाह्य वैशिष्ठांवरून सर्वसाधारणपणे अहंकारी व्यक्ती ओळखायची कशी? साधारणपणे पुढील पैकी एक किंवा अनेक वैशिष्ठ अशा व्यक्तींमध्ये जाणवतात. 

  अतिआत्मविश्वास : अशा व्यक्तीमध्ये अवाजवी,अतिआत्मविश्वास जाणवतो. मला काहीही शक्‍य आहे. मी जो विचार करतो /करते, वागतो / वागते तेच आणि फक्त तेच बरोबर आहे. इतरांचे म्हणणे चुकीचे आहे. इतरांचा विचार ऐकूनच किंवा समजूनच न घेता हा दृष्टिकोन ठेवला जातो.   

  आत्मप्रौढी : अशा व्यक्तींच्या चेहेऱ्यावर नेहमी मी कोणी तरी विशेष आहे आणि बाकी तुच्छ आहेत असा भाव असतो. त्यांच्या साध्या बोलण्यातसुद्धा ‘मी केलं, मी मिळवलं, माझ्यामुळे घडलं‘ अशी प्रौढी असते. इतरांच्या यशाचं कौतुक किंवा जाणीव ठेवणं त्यांच्या खिजगणतीतही नसतं.  

  अतिशय स्वार्थी आणि फक्त स्वत:वर प्रेम : अशा व्यक्तींच्या प्रत्येक कृतीत स्वार्थ जाणवतो. त्यांचं स्वत:वरच इतकं प्रेम असतं, की इतरांच्या भावना समजून घेणं, त्यांच्यावर जीव ओतून प्रेम करणं हे त्यांच्या गावीही नसतं. आपल्या अशा स्वभावामुळे जिवाभावाची माणसंसुद्धा दुखावली जाऊ शकतात याची त्यांना पर्वा नसते.  Relationship never dies a natural death. It is murdered by Ego, Attitude and Ignorance.   

  उद्धटपणा आणि अरेरावी : अशा व्यक्ती टोकाच्या उद्धट आणि अरेरावीची भाषा वापरणाऱ्या असू शकतात. मोठमोठ्याने ओरडणे, इतर आपले नोकर असल्याप्रमाणे अरेरावीची, कधी कधी अशिष्ट भाषा वापरणे. ‘मी म्हणतो / म्हणते तसं म्हणजे तसंच झालं पाहिजे आणि तेही ताबडतोब‘ अशी भाषा ते वारंवार वापरतात.  

  सहजासहजी तोल जाणे : अशा व्यक्तींना मनाविरुद्ध काही घडलेलं चालत नाही. आयुष्यात सर्वच गोष्टी मनाप्रमाणे होऊ शकत नाहीत हे वास्तव त्या नाकारतात, आणि मनाविरुद्ध घडलं किंवा कोणी वागलं, की त्यांचा तोल जातो. प्रमाणाबाहेर राग येणं, अति अस्वस्थ होणं या गोष्टी घडतात.

अज्ञान अहंकार निर्माण करतं, अहंकारामुळे स्वार्थी वृत्ती वाढते, स्वार्थी वृत्ती मुळे असामाधान, कडवटपणा, निराशा, निराशेतून क्रोध, क्रोधातून तिरस्कार आणि तिरस्कारातून सर्वनाश असा दुर्दैवी प्रवास चालू राहतो.

अहंकार आपलं सर्वार्थाने नुकसान करतो म्हणूनच त्याला सर्वात मोठा शत्रू मानलं जातं. वैवाहिक आयुष्य उध्वस्त करण्यापासून ते करियर संपवण्यापर्यंत काहीही घडू शकतं. जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, मैत्री तुटू शकते. इतकंच नव्हे तर एखाद्या अहंकारी नेत्यामुळे समाज आणि देशाचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. व्यक्ती वाईट नसते. तिचा अहंकार वाईट असतो. तो तुमच्यातलं शहाणपण, तुमच्या आतली चांगली व्यक्ती, स्वभावातले चांगले भाग झाकोळून टाकतो, आणि तुमच्या कडून नको त्या गोष्टी घडतात ज्यांचा तुम्हाला स्वत:लाही त्रास होतो. अवाजवी इगो असणारी कुठलीही व्यक्ती आतून शांत नसते. कारण त्या इगोचा त्या व्यक्तीलाही त्रास होतो. त्यांचा आतला ‘मी‘ अस्वस्थ असतो. अहंकारी व्यक्तींना अनेक शारीरिक व मनोकायिक व्याधी जडू  शकतात उदा. रक्तदाब, निद्रानाश, पचनाच्या तक्रारी, प्रतिकार शक्ती कमी होणं, विस्मरण, एकाग्रता कमी होणं वगैरे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शांत, स्वस्थ होत जाण्यासाठी आवश्‍यक अशी मनाची स्थिरता प्राप्त होऊ शकत नाही. अशी माणसं बहुतांशी आतून असुरक्षित असतात. जगण्याच्या वास्तवाशी त्यांचा संबंध तुटत जातो. मी कधीतरी संपणार आहे तसंच या जगातील प्रत्येक भौतिक गोष्ट कधीतरी नाहीशी होणार आहे. किंवा तिचं स्वरूप बदलणार आहे. मी आणि माझ्या भोवतालचे सर्व घडीचे प्रवासी आहेत, हे वास्तव ह्या व्यक्ती नजरेआड करतात. त्यामुळे या लहान आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगावा व इतरांनाही आनंद दयावा हे त्यांना वाटतच नाही. मी, माझं, मला, माझ्यासाठी या शब्दांपलीकडे त्यांना विश्वच नसतं. व्यक्तीचा इगो जसजसा बळकट होत जातो तसतसा तो त्याच्या सर्व सकारात्मक क्षमता, सृजनात्मक क्षमता आणि मुख्य म्हणजे ज्ञान, सारासार विचार करण्याची क्षमता, बुद्धिमत्ता यांवर निळ्या स्वच्छ आकाशावर मळभ पसरावं तसा पसरत जातो. जास्त जास्त गडद  होत जातं आणि या सगळ्या सकारात्मक क्षमता कोमेजून जायला लागतात. अशा व्यक्ती कधी सात्त्विक गोष्टीनी आनंदी होऊ शकत नाहीत. तसा प्रयत्नही करत नाहीत. कारण सात्त्विक आनंद म्हणजे एकप्रकारे अहंकाराचा मृत्यूच.

अहंकारावर मात कशी करायची? 
अहंकारावर मात करणं ही सोपी गोष्ट नाही. पण निर्धारपूर्वक काही काळात ते जमायला लागतं. त्यासाठी पुढील गोष्टी मनात रुजवायला हव्यात. वैचारिक आणि भावनिक पातळीवर समजून घेऊन स्वीकारायला हव्यात.  

  सर्वप्रथम अहंकार कशामुळे आहे ते समजून घ्यायला हवं. उदा. पैसा, बुद्धी, सौंदर्य, सत्ता इ. त्या कारणांचं विश्‍लेषण करायला हवं. मुख्य म्हणजे अवाजवी अहंकार सर्वार्थानं घातक आहे आणि मला आतून बदललं पाहिजे हे स्वत:शी मान्य करायला हवं. निश्‍चय करायला हवा आणि पाऊल उचलायला हवीत.

  एकूण विश्वाचा पसारा आणि त्याची प्रोसेस अफाट आहे. त्यात आपलं अस्तित्व आणि कर्तृत्व महत्त्वाचं असलं तरी नगण्य आहे. आपला अहंकारही नगण्य आहे याची जाणीव सतत ठेवायला हवी. आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आनंदाने जगण्याचा सर्वांनाच अधिकार आहे हे लक्षात घ्यायला हवं.

  माझी सारी धडपड आनंद आणि मन:शांती (Peace and Bliss) साठी आहे. माझ्या आतल्या  ‘मी‘ (True Self) पर्यंत मला मेडिटेशनद्वारा पोचायला हवं . तेंव्हा खरी शांतता लाभेल. माझा अहंकार हा या प्रोसेसमधला मोठा अडथळा आहे हे लक्षात घ्यायला हवं.  

  इतरांकडून शिकायला हवं आणि अपयश स्वीकारायला हवं -  भेटणाऱ्या  प्रत्येक व्यक्तीकडून मग ते लहान मूल का असेना त्याच्याकडून काही ना काही तरी शिकायला हवं. मग माझी पत्नी/पती, सहकारी, मित्र मैत्रिणी, ओळखी अनोळखी व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाचे ठरतात. त्यांनाही भावना आहेत आणि त्याही महत्त्वाच्या आहेत हे स्वीकारायला हवं. तसंच अपयश येणं हा आयुष्याच्या खेळातला एक भाग आहे. तो मी विनाअट स्वीकारायला हवा.  

  मला न आवडणाऱ्या घटना घडणारच, आसपासच्या व्यक्ती क्वचित चुका करणारच, ती ही माणसंच आहेत. मला त्यांना क्षमा करता यायला हवी, आणि माझी चूक असली तर त्यांची क्षमा मागण्याची वृत्ती माझ्यात यायला हवी. सतत चिडणं, नाराज होणं याने माझं मानसिक शारीरिक नुकसान होतंच आणि आयुष्यातल्या आनंदाच्या क्षणांना मी मुकतो हे लक्षात घ्यायला हवं. आयुष्य सतत वहात असतं. काळ क्षणा क्षणांनी पुढे जात असतो. माझ्या अहंकारामुळे त्या क्षणांमधला आनंद मी गमावतो.  

  मी समजून घ्यायला हवं, की मीच नेहमी जिंकीन किंवा यशस्वीच होईन असं आयुष्यात कधीही होत नाही. यश मिळणं  हा आयुष्यातला एक भाग आहे. प्रयत्नांना मधला आनंद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सदा सर्व काळ मी यशस्वीच असायला हवं हा अट्टाहास चुकीचा आहे.
  समाधानी वृत्ती रुजवणे महत्त्वाचे आहे. कारण अहंकार ही अशी एक भूक आहे जिला अंत नाही. जसा जसा तो सुखावला जाईल, त्याची भूक तितकीच जास्त जास्त वाढत जाईल, आणि म्हणूनच जसजसा अहंकार कमी होत जाईल तसतशी व्यक्ती स्वस्थता आणि मन:शांती अनुभवायला लागते.

  आपली स्पर्धेची कल्पना, यशाची कल्पना बदलायला हवी. आपली निकोप स्पर्धा आपल्याशी हवी. इतरांशी नको. म्हणजे मग मत्सर, द्वेष इत्यादी अहंकाराला खत पाणी घालणाऱ्या भावना नाहीशा व्हायला लागतील.  

  आपल्याला जे मिळालंय त्याबद्दल आपण निसर्ग, व्यक्ती, समाज ह्यांप्रती कृतज्ञतेची भावना ठेवायला हवी. त्यानं अहंकार कमी कमी होत जाईल. 

  सर्वांत महत्त्वाचं, भौतिक सुखांच्या पलीकडे पहायला शिकायला हवं. म्हणजेच ध्यानाकडे  वळायला हवं. मनाचे सर्व स्तर ओलांडून शब्दातीत, निरव शांततेशी आपली ओळख व्हायला हवी. वारंवार तिचा अनुभव घ्यावासा वाटायला हवा. मग अहंकारादी विकार नाहीसे व्हायला लागतील. विचारात व कृतीत सात्विकता यायला लागेल. 

सुखी, आनंदी, समाधानी आयुष्यासाठी तसंच भौतिक प्रगती आणि आंतरिक प्रगतीसाठी अहंकाराचा त्याग महत्त्वाचा!

संबंधित बातम्या