चला.. बदलूया स्वत:ला... 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 5 जुलै 2018

हितगूज
 

रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन अस्वस्थ राहतं. कधी कधी जुन्या आठवणी पिच्छा सोडत नाहीत. माणसांचं चुकीचं वागणं विसरता येत नाही. कटू प्रसंग आठवत राहातात. आपल्या आयुष्यात चांगलं काही घडणारच नाही असंही वाटून जातं. घडलंच काही चांगलं तर त्याचा आनंद नीट घेता येत नाही. मुख्य म्हणजे असं का होतंय ते कळत नाही. हे सगळं होतंय मनात नकारात्मक पॅटर्न्स (patterns) प्रोग्रॅम झाल्यामुळे. सकारात्मक विचार नुसते करून उपयोग नसतो. त्याला भावनिक आधाराची गरज असते. तरच सकारात्मक विचारसरणी आणि पर्यायानं चांगले, सकारात्मक रिझल्ट्‌स यायला लागतात. कारण मेंदूत चांगले जैविक बदल, चांगली secretions व्हायला लागतात. खरं तर आपण मानसिक अवस्था (Psychological State) आणि जैविक अवस्था (biology) हातात हात घालूनच असतात. 

मला मन:शांतीही हवी आहे आणि भौतिक जीवनात यशही हवंय तर मग मला माइंडफुलनेस आणि सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करायलाच हवा. नकारात्मक दृष्टिकोन बदलता येतो का? सकारात्मक प्रोग्रॅमिंग करता येतं का? स्वभावातले दोष काही प्रमाणात का होईना कमी करता येतील का? आत्मविश्वास प्राप्त करून घेता येईल का? भूतकाळ विसरून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगता येईल का? या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विशिष्ट प्रयत्न केले तर 'होय' असं आहे. न्युरो-plasicity च्या संकल्पनेप्रमाणे सातत्याने केलेले सकारात्मक विचार, सकारात्मक कृती आणि एकूणच सकारात्मक दृष्टिकोन, मेंदूत नवीन नवीन neuronal pathways निर्माण करतो, मेंदू rewire करतो. यामुळे शारीरिक, मानसिक स्तरांवर अनेक फायदे होतात. हे साध्य करताना अनेक गोष्टी शिकायला हव्यात. जरूर भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. स्वत: मनापासून प्रयत्न करायला हवेत. आत्ता आपण सकारात्मक दृष्टिकोनासंदर्भात विचार करू. 

We can complain because rose bushes have thorns, or rejoice because thorn bushes have roses. 

Abraham Lincoln 

गुलाबाच्या रोपांमध्ये किती काटे आहेत म्हणून आपण तक्रारीचा सूर लावू शकतो. किंवा काट्यांमध्ये किती छान गुलाब फुललेत पहा असं आनंदाने म्हणूही शकतो. दृष्टिकोनातला हा फरक आहे. आपल्याला अर्धा ग्लास रिकामा आहे असं वाटत राहतं, की अर्धा ग्लास भरलेला आहे असं वाटतं ? आपण सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो की नकारात्मक यावर हे अवलंबून आहे. त्याचबरोबर अर्धा रिकामा ग्लासही रिकामा नाहीय तर हवेनं भरलेला आहे ही macro व्हीजन तयार होणंही महत्त्वाचं आहे. थोडक्‍यात चांगली बाजू पहायला शिकायला हवं त्याचबरोबर मनाविरुद्ध घडणाऱ्या किंवा आपल्या कंट्रोल बाहेरील गोष्टी विनाअट, खेळाचा भाग म्हणून स्वीकारता यायला हव्यात. 

मला आयुष्यात सुखी, समाधानी व्हायचं असेल तर सकारात्मक विचारसरणी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. positive thinking म्हणजे केवळ मनात सकारात्मक विचार आणणं नव्हे. एकूणच आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मनात रुजणं आवश्‍यक आहे. चांगलंच घडेल असा विचार करण्याबरोबरच विपरीत घडलं तरी ते शांतपणे स्वीकारणं, त्याचं analysis करणं, हातात असेल तर उपाययोजना करणं, मुळात माझ्या आवाक्‍यातल्या गोष्टी कोणत्या आणि आवाक्‍याबाहेरच्या गोष्टी कोणत्या ह्याचं आकलन होणं या सगळ्या गोष्टी समजण्याची क्षमता निर्माण होणं फार महत्त्वाचं. 

सकारात्मक विचारसरणी (Positive thinking) हा एक आयुष्याकडे, त्यातील विविध घटना, व्यक्ती , विचार यांच्याकडे पहाण्याचा आशादायक दृष्टिकोन आहे. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याची मनाची धाटणी बनवणं आहे. आयुष्यातला प्रत्येक क्षण रसरसून जगण्याची ती कला आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीचा, आपल्याला आयुष्यात सुख, समृद्धी, यश मिळेलच यावर ठाम विश्वास असतो. तसंच आयुष्यातल्या विपरीत घटना, संकटं यावर आपण सहजी मात करू, ज्या गोष्टी अटळ आहेत त्या आनंदाने विनाअट स्वीकारू अशी तिची मनोभूमिका असते. त्यामुळे अशा व्यक्ती दुःख, अपयश अशा गोष्टी सहजी पचवतात. किंबहुना अशा गोष्टी या आयुष्याच्या खेळाचा एक भाग आहेत असा त्यांचा दृष्टिकोन असतो. 

सकारात्मक विचारसरणी अमलात येण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात केल्या तर मनाला तसं वळण लागायला मदत होईल.  

    आपल्याकडे असलेल्या क्षमता ओळखूया, लक्षात घेऊया. स्वत:वर आणि स्वत:च्या क्षमतांवर विश्वास ठेवूया. 

    आपल्या मन:शांतीचे सुकाणू आपल्याकडे ठेवूया. म्हणजेच इतर माझ्याविषयी काय म्हणतात. मला वाखाणतात की माझ्यावर टीका करतात यावर माझी मन:शांती अवलंबून असता कामा नये. माझा आतला गाभा नेहमीच स्वस्थ, शांत असला पाहिजे. 

    स्वत:विषयी व इतरांविषयीही सतत चांगला विचार करूया. चांगलं बोलूया. इतरांच्या चांगल्या कृतीबद्दल, त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करूया. 

    ज्या लोकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडून यश मिळवलं त्यांचा आदर्श समोर ठेऊया. त्यानं आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल. 

    नकारात्मक संवाद आणि नकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांपेक्षा सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांबरोबर राहूया. 

    स्वत:शी आपला, आपण जागं असताना सतत स्व-संवाद होत असतो. तो सकारात्मक होतोय याकडे जाणीवपूर्वक पाहूया. नकारात्मक विचार मनात आले तर ताबडतोब जाणीवपूर्वक सकारात्मक विचार मनात आणूया. ह्याचा अर्थ स्वत:शी भांडायचं नाही आहे तर शांतपणे सकारात्मक alternative आणून त्याप्रमाणे कृती करायची आहे. 

    लक्षात घेऊया, की Helplessness is not hopelessness. असहाय्य वाटलंच तरी त्याचा अर्थ सगळं संपलं असं नव्हे. आयुष्यात कुठलीच परिस्थिती कायम रहात नाही. रात्री नंतर दिवस असतोच. There is always light at the end of tunnel. अंधाऱ्या बोगद्याच्या शेवटी प्रकाशाची तिरीप असतेच. प्रकाश असतोच. म्हणूनच विपरीत परिस्थिती आलीच तर ती बदलेलच यावर ठाम विश्वास ठेऊया. 

    जर आपण नकारात्मक विचारसरणीचे असू तर स्वत:त बदल घडवणं अत्यावश्‍यक आहे हे मान्य करूया. असा बदल घडवता येओ हे मान्य करुया. 

    भूतकाळातल्या कडवट आठवणी व अनुभव विसरूया आणि पुढे जाऊया. 

    स्वत:वर टीका करणं थांबवूया आणि आव्हानांना सामोरं जायचं ठरवूया. 

    कळत किंवा नकळत होणारं नकारात्मक बोलणं थांबवूया. उदा. मला जमणार नाही, मला याआधी कधीच जमलं नाही वगैरे. 

    प्रत्येक गोष्ट व्यक्तिश: घ्यायला नको. साक्षीभावाने माणसं, प्रसंग, घटना अनुभवायचा प्रयत्न करुया. साक्षीभाव म्हणजे औदासिन्य किंवा निष्ठुरपणा नव्हे तर शांतपणे परिस्थिती न्याहाळण्याची ती एक कला आहे. ती आत्मसात करूया. 

 • सकारात्मक विचारसरणीचा मेंदूवर खूप चांगला परिणाम होतो. 
 • मेंदूमध्ये prefrontal cortex मध्ये न्यूरॉन्सची ग्रोथ होते. नवीन synapses तयार होतात. याच भागामधे मन, विचार यासंबंधीचे महत्त्वाचे कार्य चालते. 
 • विश्‍लेषण करणं व विचार करण्याची क्षमता वाढते. 
 • मनाची सतर्क राहण्याची क्षमता वाढते. 

    सकारात्मक विचारसरणी एकदा रुजली की नव नवीन, सृजनात्मक विचार निर्माण होण्याची क्षमता वाढते. . cortisol आणि andrenalin वर नियंत्रण तसंच सेरोटोनीन व इतर happy हार्मोन्स चं सिक्रेशन होतं. 
संशोधनाअंती सकारात्मक विचारसरणीचे खूप फायदे लक्षात आले आहेत.  

 • आयुष्यमान वाढणं 
 • ताणतणावाचं निराकरण 
 • अस्वस्थतेचे आजार व नैराश्‍याचा आजार टाळणं किंवा झाल्यास लवकर बरं होण्यात मदत होणं 
 • शरीरातील प्रतिकारशक्ती वाढणं 
 • व्यक्तिमत्त्व विकास
 • शारीरिक व मानसिक आजार लवकर बरे होणं. 
 • भौतिक आयुष्यात हवं असणारं यश, समृद्धी स्वकर्तृत्वानं मिळवता येणं. 
 • सकारात्मक विचारसरणी रुजवण्यासाठी दृश्‍यात्मकता तंत्रे व स्वयंसूचना याचा चांगला उपयोग होतो. 

दृश्‍यात्मकता तंत्र - एका जागी शांत बसावं. शवासना प्रमाणे क्रमाक्रमाने पायापासून डोक्‍यापर्यंत एक एक अवयव रिल्याक्‍स झालाय अशी कल्पना करावी. एखादं निसर्गरम्य किंवा मन शांत होईल असं प्रतिमाचित्र, दृश्‍य डोळ्यासमोर आणावं. पाचही senses च्या साहाय्याने आपण तिथे आहोत आणि आणि आनंद घेतोय अशी कल्पना करावी. मन शांत झालं की आपण ज्या प्रसंगांमध्ये नकारात्मक विचार करतो किंवा अस्वस्थ होतो असे प्रसंग डोळ्यासमोर आणावे. आणि आता अतिशय आत्मविश्वासाने, सकारात्मक पद्धतीने आपण त्याला तोंड देत आहोत अशी कल्पना करावी. प्रत्यक्ष तसं घडत आहे यावर विश्वास ठेवावा. ही कल्पना वारंवार करावी. त्यात अगदी लहान लहान डीटेल्स असावे. उदा. प्रसंग घडतोय तिथलं वातावरण, प्रकाश, हवा, आपली सकारात्मक देहबोली वगैरे. आपण सर्व प्रसंगात आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा यानं परिपूर्ण आहोत हा विश्वास मनात जागृत ठेवावा. हे तंत्र दिवसातून दोन वेळा तरी विविध प्रसंग कल्पनेत अनुभवून करावं. 

सकारात्मक स्वयंसूचना - शवासनातल्या प्रमाणे सर्व अवयव रिल्याक्‍स करून घ्यावे. शांत अवस्थेत स्वत:ला मनापासून स्वयंसूचना द्याव्यात. उदा. मी भरपूर ऊर्जा, आत्मविश्वास आणि अपरिमित आनंदाने परिपूर्ण आहे. आजचा दिवस खूप छान जाणार आहे. मी स्वस्थ आणि आनंदी असेन. माझं शारीरिक व मानसिक आरोग्य दिवसेंदिवस सुधारत आहे. ही निरामय जीवनाकडे वाटचाल आहे . इत्यादी. सूचना देताना कल्पनेत, अर्थाप्रमाणे तशी भावना निर्माण होणं गरजेचं आहे. मनाचं पॉझिटिव्ह रिप्रोग्रामिंग शक्‍य आहे. फक्त स्वत:त बदल घडवण्याची तीव्र इच्छा हवी. सकारात्मक विचारसरणी असलेली व्यक्ती स्वत: आनंदी असतेच पण त्याचबरोबर आसपास असणाऱ्या लोकांना ऊर्जा देते. आपण काही विशिष्ट व्यक्तींच्या सहवासात गेलो की छान वाटतं त्याचं कारण हेच आहे.  

संबंधित बातम्या