या प्राजक्ताचं पुढं काय होईल?

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

हितगूज
 

Since most sexual abuse begins well before puberty, preventive education, if it is to have any effect at all, should begin early in grade school.
- Judith Lewis Herman, 
तज्ज्ञ, संशोधक, शिक्षक 

अाज दुर्दैवाने अवतीभवती अनेक विकृत घटना, लैंगिक शोषणाच्या घटना लहान मुलांच्या बाबतीत घडतात. बऱ्याचदा ओळखीतल्या व्यक्तींकडूनसुद्धा. त्यातल्या बऱ्याचशा तपासासाठी उघडकीला येऊ दिल्या जात नाहीत. बदनामीची भीती असेल किंवा काहीही कारण असेल पण आयुष्यभरासाठी ओरखडा, जखम भळभळती राहाते. त्यासाठी सेक्‍स एज्युकेशनची लहानपणीच गरज आहे. काळजी घेणं आपलं काम आहे. अशाच एका दुर्दैवी मुलीच्या दुर्दैवी आईचं मनोगत....                                
           
प्रिय प्राजक्ता,
माझ्या बाळा, माझ्या भावना तुझ्यापर्यंत नीट पोचतील की नाही, तुला समजतील की नाही कळत नाहीय. तुझं वयच नाही गं तेवढं. पण मी बोलून मोकळी नाही झाले तर घुसमटून जाईल पुरती. म्हणून मोकळी होतेय. केवढीशी तू. अन काय सोसायला लागलं तुला?  तुझ्या बाबतीत घडलेलं आज जे कळलं त्यानं मी पुरती हादरलेय. पायाखालची जमीनच सरकलीय. सात आठ  वर्षांची अल्लड, निरागस, निष्पाप माझी मुलगी तू प्राजक्ता. तुझ्याच वाटेला का हे सगळं ? आम्ही कुणाचं काय वाईट केलं म्हणून ही शिक्षा? गेले दहा पंधरा  दिवस आपलं सगळं कुटुंब विलक्षण ताणाखाली होतं. तुझ्या बाबतीत विचित्र गोष्टी घडत होत्या. रात्री दचकून उठायचीस. दिवसा अचानक रडायला लागायचीस. सारखी चिडायचीस. खेळणं बंद झालेलं. बोलणं जवळ जवळ नाहीच.  निर्जीव नजरेनं कुठेतरी शून्यात पहात राहायचीस. आम्ही खूप विचारलं पण काहीही सांगायला तयार नाहीस. टी.व्ही. वर चार दिवसांपूर्वी तुझ्या आवडीचा सिनेमा लागला होता. मुद्दाम बघायला बसवलं. एका दृश्‍यात नायक नायिकेला जवळ घेतो असा सीन होता. अचानक तू जोरात ओरडलीस अन आत निघून गेलीस. अजितने, तुझ्या  बाबाने शेवटी तज्ज्ञांची मदत घ्यायची ठरवली. आज तपासण्या पूर्ण झाल्या अन जे निष्कर्ष आले, त्याने नैराश्‍य, हतबलता, संताप याही पलीकडे आम्हाला आमच्या प्राजक्ताच्या भविष्याची विलक्षण काळजी वाटली. तू लैंगिक शोषणाची बळी ठरली होतीस. ते ही आपल्याच ओळखीच्या, विश्वासातल्या व्यक्तीकडून.  त्या विकृत व्यक्तीवर कायदेशीर कठोर कारवाई होईलही. पण आमच्या प्राजक्ताच्या भविष्याचं काय? तिच्या भावविश्‍वाचे काय ? डॉक्‍टरांच्या शब्दांनी, खूप विश्वास दिलाय. आपण सगळ्यांनी मिळून, टीम म्हणून  या संकटाला तोंड द्यायला हवं म्हणाले. प्राजक्तावर आवश्‍यक ते उपचार होतील. ती सावरेल. नक्की सावरेल, म्हणाले. मनाच्या जखमा भरायला काही काळ जावाच लागेल. पण तिचं भावविश्व पुन्हा उभं राहील. तारुण्यात पदार्पण करताना घडलेल्या घटनांकडे एक अपरिहार्य वास्तव म्हणून विना अट स्वीकारायची हिम्मत आणि समजूतदारपणा तिच्यात आपण निर्माण करायचाय.  तिचा भविष्यकाळ, भूतकाळात घडलेल्या घटनांनी प्रदूषित होणार नाही यासाठी सर्व काळजी घ्यायचीय. माझा डॉक्‍टरांवर पूर्ण विश्वास आहे. मी आणि अजित तुला  पुन्हा उभं राहण्यासाठी जीवाचं रान करू. तुझं व्यक्तिमत्त्व तुला पुन्हा परत मिळायलाच हवं. विशेषत: पुरुष या जेन्डर विषयी तुझ्या  मनात विखार उत्पन्न होता काम नये. सर्वच पुरुष असे विकृत नसतात गं. किंबहुना खूप सुसंस्कृत, स्त्रियांना सन्मानानी वागवणारे असेही असतात. तुझ्या बाबाचं उदाहरण तुझ्यासमोर आहेच. माझ्या डोळ्यांतल्या पाण्याला खळ नाही. पण मला ही सावरायला हवं माझ्या बाळासाठी.
...आई

आज अवतीभवती अनेक प्राजाक्तांच्या बाबतीत, काहीवेळा मुलांच्याही बाबतीत अशा दुर्दैवी घटना घडतात. वासनांध, विकृत व्यक्ती ही घृणास्पद कृत्ये करतात. बहुतेक वेळा या व्यक्ती मुलांच्या माहितीतील असतात. त्यामुळे घटना घडण्यापूर्वीचे त्यांचे पवित्रे लहान अजाण मुलींच्या मुलांच्या लक्षात येत नाहीत. लैंगिक शोषणामध्ये बलात्कारासारख्या घटनां बरोबरच पुढील गोष्टीही येतात.  शरीराला नको त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्पर्श, किंवा एखाद्या वस्तूच्या सहाय्याने स्पर्श करणे . प्रत्यक्ष संभोग किंवा संभोगाचा प्रयत्न, मुलांना घाणेरडी चित्रे, फिल्म्स दाखवून तसे करण्यास सांगणे, त्यांच्याकरवी, समोर हस्तमैथुन करणे, वेगवेगळ्या विकृत मार्गांनी मुलांकडून वासना तृप्ती करवून घेणे. ही यादी खूप लांबवता येईल कारण वासनांध विकृतांच्या कल्पनाशक्तीला सीमा नाही.

मुलांनी या गोष्टी कुणाला सांगू नयेत व आपली ही विकृत कृत्ये अशीच चालू राहावीत यासाठी मुलांना आमिषं दाखवली जातात. भेटी दिल्या जातात. धमक्‍याही दिल्या जातात.

मुला-मुलींवर काय परिणाम होतो 
post traumatic disorder तसेच नैराश्‍याच्या आजारां बरोबरच या घटनांचे अतिशय गंभीर परिणाम एकूण व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतात. मोठेपणी लक्षात येणाऱ्या अनेक मानसिक आजारांची मुळे अशा कोवळ्या  वयातल्या घटनांशी संबंधित असू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये अडचणी येऊ शकतात. नैसर्गिक लैंगिक भावनांची, व्यवहारांची भीती बसू शकते. एकूणच भीती, अनेक गंड मनात राहू शकतात. आयुष्य व्यापून टाकू शकतात. मुलांच्या बाबतीत असं काही घडलं असू शकतं याची वागणुकीतील  लक्षणे - अचानक वागण्यात अनपेक्षित फरक होणे. अचानक बेफाम, आक्रमक वागायला लागणे, शाळा बुडवणे ,अचानक अंथरुणात लघवी करण्याची सवय, रात्री झोप न येणे, दचकून जागं होणे, घाणेरडी स्वप्नं पडणं, मूड मध्ये सारखे बदल, स्वत:ला इजा करून घेण्याचा प्रयत्न, स्वत:च्या शरीराविषयी घृणा वाटणे, सारखी अंघोळ करावीशी वाटणे, स्वत:कडे पूर्ण दुर्लक्ष करणे, शून्यात नजर लावून विचार करत बसणे, अचानक रडायला येणे, बोलणं बंद/कमी होणं, घाबरणे, नातेवाईक, खूप  माणसं असतील तिथे जाण्याची भीती वाटणे, काही मुलांच्या बाबतीत - अत्यंत घाणेरडं बोलणं, घाणेरड्या शिव्या द्यायला सुरवात होणे. विशिष्ट व्यक्ती घरात आल्यावर, बाहेर दिसल्यावर विलक्षण दडपणाखाली वावरणे.
या शिवाय लैंगिक अवयावांसंबंधी शारीरिक लक्षणे असू शकतात.

आपण काय करायला हवं?
लैंगिक शोषणाची शंका आली किंवा न आली तरी लक्षणे दिसताच वेळ न दवडता तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. जितक्‍या लवकर मुलीला, मुलाला मदत मिळेल तेवढे चांगले. अवघड असले तरी, आपण स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करावा त्याने मुलाच्या धैर्यावर अनुकूल परिणाम होईल. मुलामुलींवर अजिबात रागावू नये. तुझ्याकडून काहीही चुकीचे घडलेले नाही, तू अपराधी नाहीस याची खात्री द्यायला हवी. आपण त्याच्या पाठीशी ठाम उभे आहोत याचा विश्वास तिला, त्याला वाटायला हवा. पुन्हा पुन्हा काय घडले हे मुलांना विचारू नये. तज्ज्ञ सर्व व्यवस्थित हाताळतील. आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा.

पालकांची जबाबदारी कुठली?

  • मुलांबरोबर निकोप प्रेमाचं नातं असावं. संवाद असावा. म्हणजे मुले आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी मोकळेपणाने बोलतील.
  • मुलांना जुजबी पण आवश्‍यक लैंगिक प्रशिक्षण द्यायलाच हवे. आपल्या गुप्तांगाला (private parts) कुणीही स्पर्श करता काम नये हे शिकवायला हवे. आपल्याला हे अवघड जात असेल, संकोच वाटत असेल तर या शिक्षणासाठी तज्ज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी.
  • दुर्दैवाने असा प्रसंग घडण्याची शक्‍यता वाटल्यास मुलांनी न घाबरता पालकांना सांगावे. पालकांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नये.
  • ओळखीच्या व्यक्तीलाही शरीराशी लगट करू देऊ नये. तसा प्रयत्न झाल्यास मुलामुलींनी जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न करावा. ओरडावे, तेथून पळ काढावा व पालकांना सांगावे.
  • ओळखीच्या तसेच अनोळखी व्यक्तींनी दिलेल्या खाऊ, भेटवस्तू इत्यादींविषयी पालकांना न विसरता सांगावे.
  • आपल्या शरीरावर आपले स्वामित्त्व आहे आणि त्याला स्पर्श करू द्यायला नकार देणे, हा आपला अधिकार आहे हे मुलांमध्ये रुजवावे.

सध्या अवतीभवती सतत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना अतिशय वेदनादायी आहेत. वाईट आहेत. आपली मुलामुलींच्याही संवेदनशील मनावर त्याचं दडपण येऊ शकते. मुलामुलींवर हे बिंबवायला हवे की असे घडणे निश्‍चितच वाईट आहे. पण आपण सतत त्या दडपणाखाली राहण्याची गरज नाही. तर धैर्याने, प्रयत्नपूर्वक स्वत:ला खंबीर करायला हवे. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या