’मोमो चॅलेंज’; मुलांना जपा   

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

हितगूज
 

गेल्या आठवड्यात अर्जेंटिनामधील एका बारा वर्षीय मुलीनं आत्महत्या केली. कारण असू शकतं  ’मोमो चॅलेंज’ नावाचा जीवघेणा व्हिडिओ गेम. नुकताच व्हॉट्‌सअप ॲपच्या माध्यमातून आलेला आणि वेगात जगभर पसरत असलेला. एका मुलीचा भयानक, भीतीदायक, distorted असा चेहरा, ज्याला मदरबोर्ड म्हंटलं गेलंय, हा व्हॉट्‌सअप ॲप,युट्युब इत्यादी सोशल माध्यमांद्वारे मुलांसमोर येतो. तीव्र उत्सुकता निर्माण करतो. जपान, मेक्‍सिको आणि कोलंबिया इथल्या अनोळखी फोन नंबरवर फोन करायला उद्युक्त करतो. तिथून मग ऑर्डर्स येतात. त्या पाळल्या  गेल्या नाहीत तर आणखी भयानक, भीतीदायक चित्र दाखवली जातात. धमक्‍या येतात. ज्यांना घाबरून मुलं त्या आज्ञा पाळायला उद्युक्त होतात. आत्महत्येपर्यंत हे जातं. हा सगळा प्रकार मोबाईलमधील डेटा चोरण्यासाठीही असू शकतो. परदेशातील सायबर तज्ज्ञ शोध घेतायत. आजच्या घडीला हा गेम अजून भारतात आला नसला तरी एका क्‍लिकवर तो येऊ शकतो अन कोवळ्या, भाबड्या वयातील, स्वप्नाळू मुलांचा बळी घेऊ शकतो. परदेशातील सायबर तज्ज्ञ शोध घेतायत. हे सगळं खरं असलं व पसरलं तर पुन्हा ब्लू व्हेल या भयानक खेळाच्या परिणामांची पुनरावृत्ती होण्याची. ज्यात भारतात अनेक कोवळे जीव मृत्युमुखी पडले. 

प्रश्न आहे पुन्हा एकदा तंत्रज्ञानाचा गैरवापर होऊन पुन्हा एकदा विकृत वृत्तीच्या माणसांनी पसरवलेल्या जाळ्यात मुलं अडकण्याचा. व्हिडिओ गेम्सच्या दुष्परिणामांचा. नकळत्या वयात त्याच्या व्यसनात आधीन होणाऱ्या कोवळ्या मुलांच्या भवितव्याचा, आणि दुष्परिणाम माहीत असून त्यांच्यावर बंधनं न घालणाऱ्या पालकांचा. म्हणून आज पुन्हा एकदा या विषयाचा ऊहापोह करू. या भीतीच्या अमलाखाली नेणाऱ्या गेम्सच्या धोक्‍याबरोबरच इतर गेम्सचे  प्रकारही, त्यांचं व्यसन लागलं तर आयुष्याचं  नुकसान करतात. त्यांचा धोका तितकाच गंभीर आहे. काय घडतंय पाहूया.  
   
’व्हिडिओ गेम्सचं व्यसन’ लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलं    
आज  व्हिडिओ / कॉम्प्युटरगेम्सच्या व्यसनात अनेक मुलं अडकली आहेत, अडकत आहेत. मुलांच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर पर्यायाने त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम घडवू शकणारं हे व्यसन आहे. या मुलांच्याबाबतीत आतून म्हणजे त्यांची थिंकिंग प्रोसेस बदलूनच त्यांना यातून सोडवता येईल. आई बाबांच्या मोबाईलवर खूप लहानपणी म्हणजे केजीत असतानाच खेळायला सुरवात होते. सकाळी उठल्यानंतर मोबाईल मिळावा म्हणून हट्ट सुरू होतो. तो हातात असतानाच, मुलांचं आवरावं लागतं. त्यावरची कार्टून्स,ॲनिमेशन आणि तत्संबंधीची गाणी हे सकाळी लागतं. शाळेच्या रिक्षात सुद्धा  मोबाईलच्याच गप्पा आणि गाणी असतात. घरी आल्यावर सुद्धा आयपॅड काढून तेच पाहणं सुरू. सुरवातीला  आईबाबांना कौतुक की तो बरोब्बर फोन किंवा आयपॅड चालू करून गेम पर्यंत पोचतोच. किती हुशार आहे; पण आपला मुलगा हुशार नाहीय तर तो गेम किंवा ॲप तयार करणारे हुशार असतात. ते खूप सोप्या मार्गाने सगळं चालू होईल असं पाहतात. 

साधारणपणे  टीन एजर्स असताना व्हिडिओ / कॉम्प्युटर गेम्सच्या व्यसनाची सुरवात झालेली आढळते. यात दहावी बारावीत मेरिट लिस्टमधे आलेली मुलंही आढळतात. साधारण अकरावीत आल्यापासून अभ्यास, क्‍लास मधलं लक्ष उडते. बरीच मुलं शांत, अबोल, वरकरणी समजूतदार वाटणारी असतात. पण आता आईवडिलांनी कितीही समजावलं तरी, रागवलं तरीही गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत. ही मुलं गेम्सच्या मायावी काल्पनिक विश्वात अडकलेली असतात. जे विश्व त्यांना खोट्या आभासी ताकदीचा फील देतं. ज्या विश्वात भयानक वेग, गती, उत्सुकता, हिंसा, जिंकत जाण्याचा फील आहे. त्यांना एकीकडे ठाऊक आहे हे सगळं खोटं आहे पण त्यातली नशा त्यांना  पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी प्रवृत्त  करते. आणि प्रत्यक्ष आयुष्यात काय घडतंय? अभ्यासातली एकाग्रता नाहीशी झालीयं, मन:शांती हरवलीय, विलक्षण एकटेपणा जाणवतोय, झोपेचं, जेवणाखाण्याच गणित बिघडून गेलंय. मेरीटमध्ये येण्याची  शक्‍यता असलेला मुलगा नापास होतोय. आईवडील अस्वस्थ झालेत. काय करावं त्यांना सुचत नाहीय.

हीच गोष्ट अनेकांची झालीय. यातली बरीच मुलं शाळेला, कॉलेजला, क्‍लासला दांड्या मारतात. जेवणाखाण्याकडं लक्ष नाही. काळावेळाचं भान नाही. घरच्यांशी संवाद तुटत चाललाय. नजर चुकवतात. खोटं बोलण्याचं प्रमाण वाढलंय. काही विचारलं तर चिडतात.  रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. इंटरनेट काढून टाकलं तर मोबाईल नाहीतर सायबर कॅफे चालू. अस्वस्थतेच्या आजाराचे बळी बनत चाललेत. काहीजणांना पट्‌कन व खूप राग येतो. खोटं बोलतात. बाहेर पैसे खर्च करण्याचं प्रमाण वाढलंय. काहीजणांचं सायबर कॅफे जणू दुसरं घर झालंय.

व्हिडिओ गेम्स 
दोन प्रकारचे व्हिडिओ गेम्स असतात. म्हणूनच दोन प्रकारची व्यसन असतात. एका प्रकारात एकजण पूर्ण गेम खेळू शकतो. उदा. प्रिन्सेसची सुटका वगैरे. म्हणजेच तिथे उद्दिष्ट स्वच्छ असतं. ते कमीत कमी वेळात पूर्ण करणे किंवा एखाद्या गेममधे जास्तीत जास्त, पूर्वी मिळवलेल्या पेक्षा जास्त मार्क्‍स मिळवणे एवढंच महत्त्वाचं असतं. दुसऱ्या प्रकारच्या गेम्समधे एकापेक्षा जास्त संख्येने खेळाडू असतात. हे गेम्स ऑनलाइन असतात. म्हणजे जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणी बसून लोक हे खेळ खेळतात. या गेम्सना बहुधा ठरलेला शेवट नसतो. त्या क्षणी जो पुढे असेल तो सर्वश्रेष्ठ असं मानलं जातं. अन हेच विजेतेपद क्षणासाठी का होईना विजेत्याला बेभान करतं. आपण जगज्जेते असल्याची भावना त्याच्यासाठी निर्माण करतं. त्याच्यापेक्षा मागे असलेले खेळाडू मग ते जगज्जेतेपद हिसकावून घेण्यासाठी त्वेषाने खेळत राहतात. आजूबाजूचं वास्तव विसरलं जातं. माणूस त्या  आभासी जगात स्वत:ला गुंतवून टाकतो. वास्तवापासून दूर पळतो. या पद्धतीच्या गेम्सचं व्यसन जास्त प्रमाणात आढळते. हे व्यसन निर्माण होण्यामागे ज्या पद्धतीने हे गेम्स डिझाईन केले जातात तेही कारणीभूत ठरतं. हे गेम्स अत्यंत आकर्षक रंगसंगती बरोबरच पात्रांचे (characters) चे आकार व वागण्याची पद्धत, त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव असे ठेवलेले असतातकी तुम्ही त्यात गुंतून जावं. त्याचबरोबर गेम्स मधील चॅलेंज आणि उत्कंठा इतपतच ठेवली जाते, की आपण जिंकू शकू असं खेळणाऱ्याला वाटावं पण उद्दिष्ट अशक्‍य वाटू नये व त्याने गेम सोडून जाऊ नये. व्हिडिओ गेम्सचं आकर्षण आणि disorder हे जवळ जवळ gambling चं  आकर्षण आणि disorder सारखंच आहे.  

या व्यसनात इतर व्यसनान प्रमाणेच जैविक कारणंही आहेत. खेळत असताना, वाढणारी मेंदूतील endorphin आणि इतर रासायनिक द्रव्ये एक सुखाचा, धुंदीचा फील देत राहतात. मग उन्माद वाटायला लागतो. त्याची सवय लागली की खेळत नसतानाही त्याच्या स्मृती सुखावत राहतात. मग मेंदूत सतत ती नशेची धून राहतेच. व्हिडिओ गेम्स च्या व्यसनाची भावनिक, शारीरिक लक्षणं आणि परिणाम  साधारण पुढीलप्रमाणे असू शकतात. 

काही कारणांमुळे गेम खेळता आला नाही तर चिडचिड होते. विलक्षण अस्वस्थ व्हायला होतं. 
पूर्वी खेळलेल्या डावाची आठवण येत राहते किंवा भविष्यात खेळायच्या गेम विषयी मनात आडाखे चालू राहतात. 

 • आपण किती वेळ खेळलो या विषयी कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी खोटं बोलणं सुरू होतं. 
 • सतत खेळायला मिळावं. त्यासाठी इतरांपासून दूर राहावं, कुणात मिसळू नये असं वाटते.
 • मानसिक थकवा 
 • डोकं दुखणं. मायग्रेन सारखा त्रास  
 • डोळ्यांवर ताण येणं 
 • सतत संगणकाचा माऊस हाताळल्यामुळे Carpal Tunnel syndrom सारखे त्रास, स्वत:च्या शरीराच्या, कपड्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.
 • अपुरी झोप आणि खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष आणि त्यातून उद्भवणारे पचनाचे व इतर आजार. 
 • अभ्यासात पूर्ण दुर्लक्ष, शाळा, क्‍लास ,कॉलेजला दांड्या मारणं. 
 • सायबर कॅफेची सवय असेल तर भरपूर पैसे खर्च करणे. 
 • पैसे न  दिल्यास गैरमार्गाने मिळवणे.
 • लहानसहान गोष्टींवरून प्रचंड राग येणं. लहानशा कारणांमुळे निराश होणं 
 • Counter Strike सारख्या अनेक गेम्स मधून हिंसात्मक प्रवृत्ती वाढत जाते. समोरच्याला संपवूनच आपण यश मिळवू शकतो अशी चुकीची भावना वाढीस लागते.
 • इतर मैदानी खेळ खेळू नयेत असं वाटतं. 

मुख्य म्हणजे भविष्याविषयी पूर्ण उदासीन रहाणं. आपल्याला पुढे काय करायचं आहे याचा विचारच न करणे. तशी जाणीव करून दिली तर चिडणे किंवा निराश होणे.       

उपाय  
या व्यसनाकडे वेळीच लक्ष द्यावं लागतं अन ते थांबवावं लागतं. तज्ज्ञांची मदत वेळीच घ्यावी लागते. फक्त घरातील इंटरनेट काढून उपयोग होत नाही. मुलांचं मन व्हीडीओ गेम्स मधून काढून घेणं महत्त्वाचं आहे. या मुलांची अनेक सेशन्स करावी लागतात. आईबाबांशी मुलांच्या बालपणाविषयीबोललं जातं. मुलांची भावनिक जडणघडण, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याच केसेसमध्ये आढळते की ही मुलं  introvert, लाजाळू , अबोल आहेत. त्यांच्यात विलक्षण न्यूनगंड आहे. बाहेरच्या परिस्थितील आव्हानं पेलण्याची त्यांची तयारी नाही. मग कृत्रिम वास्तवात म्हणजे गेम्समध्ये जगात भारी ठरता येतंय याचं सुख त्यांना वारंवार हवंय. पण त्याच वेळेला आपण आपला अभ्यासाचा महत्त्वाचा वेळ वाया घालवतोय हा अपराधगंड आहेच. पण ती  हतबल झालीयत.गेम्स खेळणं थांबवू शकत नाहीत. एन्जॉयमेंट म्हणून ते आता खेळू शकत नाहीय. ते compulsion बनलंय. या सर्व मुलांना वाचवायला हवं. त्यांना वास्तवात जगायची हिम्मत द्यायला हवी. त्यांच्यावरचे ताणतणाव समजून घायला हवेत. त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्यांना मिळवून द्यायला हवी. त्यांची मूल्य दुरुस्त करायला हवी. बाहेरचं जग खरं जग आहे. त्यातले आनंद, जय, पराजय, आव्हानं स्विकारण्यातली गंमत त्यांना समजून द्यायला हवी. काही काळ मग काही कटू निर्णय घ्यावे लागतील. गेम्सपासून त्यांना तोडावं लागेल. पण हे सगळं हळुवारपणे, त्यांना विश्वास देत देत करावं लागेल.CBT (Cognitive behavioural therapy), REBT (Rational emotive behavior therapy) सारख्या काही थेरपीजचा उपयोग होईल. समुपदेशन लागेल. 

आंतरिक शांततेच्या स्त्रोतांची, त्यांच्याशीभेट घडवून आणावी लागेल. मग परिस्थिती बदलेल. निश्‍चित बदलेल. ’मोमो’च्या गेम्स च्या धोक्‍याच्या निमित्ताने सर्वंच बाबतीत सावध व्हायला हवं हे निश्‍चित.

संबंधित बातम्या