हॅलो आई...

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

हितगूज
 

हॅलो आई,
अगदी राहवेना म्हणून तुला काही सांगायचं ठरवलंय मी आज. मला माहितीय मी खूप लहान आहे अजून. लहान म्हणजे काय..अगदीच लहान.. खरं तर मला वयच नाहीय !  .. जन्मालाच यायचोय ना मी अजून. माझा मुक्काम आहे तुझ्या पोटात.. मस्त मजेत आहे मी. तुझ्या  मायेच्या उबेत.. सुरक्षित.. पण खरं सांगू का आई ? फक्त तुझ्यात आणि माझ्यातच ठेव हं हे .. तू सगळं छान करतेयस माझं. खाणं, पिणं, व्यायाम, माझी शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढ चांगली व्हावी म्हणून गर्भसंस्कार. सगळं छानच. पण अलीकडे थोडसं अस्वस्थ वाटतं मला. भीतीसुद्धा वाटते कधीकधी. तुझी नाही गं.. ती तर कधीच वाटणार नाही.. तुझाच तर भाग आहे ना मी. मला अस्वस्थ वाटतंय माझ्या आसपास जे घडतंय ना.. त्यामुळे.  बोलू ना मोकळेपणानं ? ..  हं ..  मग सांगतोच सगळं..  परवा रात्री तुझं आणि बाबाचं भांडण झालं जोरजोरात. तशी तर तुमची भांडणं सारखीच होतात. पण परवाचं अगदी टोकाचं. केवढ्या  जोरजोरात? बाबा म्हणाला ’’फार झालं आता. जमत नसेल तर वेगळं होऊ दोघे.’’ तूही ओरडलीस ’’ माझीही इच्छा नाहीय आता एकत्र राहण्याची.’’ मग एकदम शांतता. मी घाबरूनच गेलो, आणि माझी दीदी सुद्धा. ती सुद्धा केवढीशी आहे अजून. दुसरीत जाणारी. म्हणजे लहानच की नाही गं? रडायलाच लागली ती. तिला जवळ घ्यायचं सोडून  रागावलीस तिला ’’आता हिला काय झालं भोकाड पसरायला? जा जाऊन झोप तिकडे त्या खोलीत. लवकर उठायचंय सकाळी. शाळा आहे. रिक्षा येईल. चल जा आधी.’’ आता तुमच्या भांडणात दीदीची काय चूक झाली? .. कमालच झाली म्हणजे.. तरी मी तुला सारखा पायांनी ढकलत होतो आतून. पण लक्ष कुठे होतं तुझं? पुन्हा भांडण सुरू. मग पुन्हा एकदा त्या डॉक्‍टर काकांकडे जायचं ठरलं.. शेवटचं.. मग लाइट घालवलेत.. नंतर ती नकोशी शांतता.. रात्रभर जागीच होतीस तू.. अस्वस्थ .. मग मला कुठली शांत झोप?

काल डॉक्‍टरकाकांकडे गेलात दोघं. किती छान समजावून सांगितलं त्यांनी तुम्हाला? म्हणाले,  वेगळं होण्याची परिस्थिती आहे असं मला अजूनही वाटत नाही. सहजीवन हे आनंदासाठी असतं. दोघानीही थोडं समजून घ्या. आयुष्य आणि संसार प्रेमावर, विश्वासावर उभा राहतो. संशय आणि अहंकार शत्रू क्रमांक एक. लहान सहान कारणांवरून भांडणं चांगली नाहीत. मला हवं तसंच दुसऱ्यानं वागलं पाहिजे हा आग्रह नेहमीच बरोबर नाही. समोरच्याचीही काही बाजू  असू शकते.  आज एक गोंडस मुलगी पदरात आहे. एक मूल पोटात आहे.. म्हणजे मी.. त्यांच्या भवितव्याचा विचार करा. त्यांच्यावर काय परिणाम होईल? त्यांच्यात भावनिक असुरक्षितता निर्माण होऊ शकते, आणि पुढे व्यक्तिमत्त्वावर सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्ही दोघंही  सुशिक्षित आहात. दोघंही मिळवते आहात. विचार करण्याची पद्धत बदलायची आणि मुख्य म्हणजे अहंकार सोडायचा. बस. 
आई, हा अहंकार काय प्रकार आहे गं? काहीतरी फार भारी प्रकरण दिसतंय.. डॉक्‍टर काकांकडच्या सगळ्या मिटींग्स मध्ये हे सांगतातच . त्यांनी शांत होण्यासाठी, स्वभाव बदलण्यासाठी, विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी काही मनाचे व्यायाम सांगितले होते. पण तुम्ही ते काही न करता नुसते भांडतच राहता. मला आणि दीदीला किती त्रास होतो त्याचा? आणि एक महत्त्वाचा मुद्दा.. माझं जाऊ दे. मी तर अजून यायचोच आहे जगात. पण दीदीची काय अवस्था झालीय..आपण दोघं गेलो होतो ना तिच्या शाळेत मागे? टीचर सांगत होती .. मुलगी हुशार आहे पण अभ्यासात एकाग्रता होत नाही..टेन्शन आहे कसलं तरी. घाबरून घाबरून असते सारखी. मिसळत नाही मुलांच्यात म्हणावी तशी. एकदा काउन्सेलरला भेटा. काय झालंय आई तिला? घरी सुद्धा हट्ट करते सारखी. नाहीतर हिरमुसलेली असते. रडते. चिडते. डॉक्‍टरकाका म्हणाले, हे काही केवळ तुमच्या दोघांच्या भांडणामुळे नाहीय. पण आई वडिलांच्या मधल्या तणावाचा मुलांवर परिणाम होऊ शकतो म्हणाले.

मलाच टेन्शन आलंय. मला खूप आवडते दीदी. आपण तिघंच असलो, की पोटावरून हात फिरवते तुझ्या. लाड करते माझे. गोड गोड बोलते माझ्याशी. किती छान वाटतं तेव्हा. आणि आई खरं सांगू? बाबाही आवडतो मला. म्हणजे तुम्ही दोघंही. आपण राहू या ना सगळे मिळून ! सोडून नाही जाणार ना तुम्ही आम्हा दोघांना? मी प्रॉमिस देतो. कधी त्रास नाही देणार मी तुम्हा दोघांना? खूप मोठा होईन. नक्की.. हे जग म्हणे खूप असुरक्षित होत चाललंय. म्हणजे काय मला कळत नाही. पण तुमच्या दोघांची मायेची पाखर जर असेल आम्हा दोघांवर तर किती सुरक्षित वाटेल आम्हाला? रागावू नकोस हं आई. जरा जास्तच बोललो म्हणून. शेवटी तुझ्याशिवाय मला तरी कोण आहे गं आणखी?..  

तुझा सोनूला आणि बाबाचा पिट्टू. 

संबंधित बातम्या