प्रवास... स्वस्थतेकडे 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

हितगूज
 

कधी आकाशाकडे एकटक पाहणारे आपण ... आकाश स्वच्छ.... निळेशार...असीम..अनादी ..अपार निळाई...काहीसे थोडके ढग ..सावकाश विहरत जाणारे..विरळ होत जाणारे..आपण त्याचा एकटक नजरेनं पाठलाग करतो.. विलक्षण शांतता या प्रोसेसमधे मनात उतरत राहते. सूर्यकिरण ढगांच्या कडांवर..एक जादुई प्रकाश साऱ्या आसमंतात.. एक प्रसन्न शांतता बाहेरच्या आकाशात आणि मनाच्या आकाशात भरून राहिलेली..अशी अद्‌भुत अपूर्व शांतता आपल्या खूप आत उतरत जाणारी..तर कधी काळ्याकुट्ट ढगांचं आक्रमण..मनही कोंदटून गेलेलं..आधीच्या प्रसन्न शांततेचा मागमूसही नाही.. 

मग आक्रमक जलधारा आकाशात..तशाच मनात.. मग मनाचा आणि आकाशाचा धागा तुटतो. आपण नकारात्मक मन:स्थितीत. काहीच छान वाटेनासं होतं. मघाची प्रसन्न अवस्था पूर्ण नाकारली जाते. नकारात्मक विचारांनी मनाचा ताबा घेतला, की हे असं व्हायला लागतं. मग मन खिन्न होऊन जातं. काही जणांच्या बाबतीत ही खिन्नता वारंवार येते. काही जणांच्या बाबतीत नकारात्मक विचारांचा पगडा इतका असतो, की त्यांचा दृष्टिकोनच नकारात्मक होऊन जातो. त्यांना मग निळेशार आकाश..निसर्गातले मन मोहून टाकणारे, लाघवी आविष्कार काहीच भावत नाही. शांतता, प्रसन्नता आत उतरण्याची प्रक्रियाच सुरू होत नाही. मग ध्यानावस्थेत जायला खूप त्रास होतो. दैनंदिन जीवनातली शांतताही खूप दूर राहते. नकारात्मकतेमुळे हे घडतं. 

निराशावाद किंवा नकारात्मकता हा एक सर्वाथानं घातक दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन असलेली व्यक्ती एखाद्या परिस्थितीत वाईटच किंवा प्रतिकूल तेच घडणार हे जणू गृहीतच धरते. याला प्रसंगनिष्ठ निराशावाद म्हणतात. साधारणपणे या व्यक्ती एकूण आयुष्याबद्दल उदासीन असतात. या व्यक्ती सतत नकारात्मक विचारच करत असतात. त्यांना व्यक्तींमधल्या किंवा प्रसंगांमधल्या वाईट गोष्टीच महत्त्वाच्या वाटत राहतात. त्यांना आयुष्यात आनंदी राहाता येत नाही. त्यांनी नकारात्मक विचार करण्याचा पॅटर्न बदलून सकारात्मक विचार करण्याचा पॅटर्न शिकून घेणं, स्वतःत प्रोग्रॅम करणं गरजेचं ठरतं, आणि हे बहुतेकांना प्रयत्नांतीशक्‍य आहे. 

आपण ट्रकच्या मागे "विचार बदला, नशीब बदलेल." असं लिहिलेलं अनेकदा वाचतो. गमतीदार वाक्‍य म्हणून हसून सोडून देतो. पण वास्तविक खरोखरच आपलं नशीब बदलायला, आपली मन:स्थिती बदलायला आपले विचारच कारणीभूत असतात. 

सकारात्मक विचार आपल्याला सर्वार्थांनी उर्जीतावस्थेला नेतात. तर नकारात्मक विचार, नकारात्मक स्व-संवाद आपलं खच्चीकरण करू शकतात. जगात घडणारी प्रत्येक चांगली घटना, मग ती निसर्गातली असो वा मानवाच्या आणि समाजाच्या संदर्भात असो ती फक्त सकारात्मक उर्जेवरच घडत असते. सकारात्मक विचारांचा मनावर, शरीरावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होतो. तर नकारात्मक विचारांचा प्रतिकूल परिणाम होतो. नकारात्मक विचारांमुळे राग, दु:ख, नैराश्‍य आणि एकूणच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होतेच आणि प्रगतीच्या सगळ्या शक्‍यता संपुष्टात येतात. आत्मप्रतिमा दुर्बल होते, आत्मविश्वास नाहीसा होतो. नात्यांवर विपरीत परिणाम होतो. cortisol आणि andranalin सारख्या स्ट्रेस हार्मोन्स सतत स्त्रवल्यामुळे शारीरिक आजार, मनोकायिक आजार निर्माण होऊ शकतात. नकारात्मक विचार हे बहुधा निगेटिव्ह ऍटोमॅटिक थॉट्‌स म्हणजे आपोआप मनात निर्माण होणारे विचार असतात. जेंव्हा व्यक्ती सतत नकारात्मक विचार करत राहाते तेंव्हा जणू ती स्वतः:ला एक प्रकारे नकारात्मक programmed करत राहते. असं programmed होण्यामागे खोलवर रुजलेली नकारात्मक विचार करण्याची पद्धत किंवा पॅटर्न असतो. हे पॅटर्न ओळखून , समजावून घेऊन त्यावर काम करायला लागते. तेंव्हा अशी नकारात्मक विचारसरणी नाहीशी व्हायला मदत होते. 

नकारात्मक विचार कुठल्या कुठल्या पद्धतीचे असू शकतात? 
काही नकारात्मक विचार पद्धती किंवा पॅटर्न मानले गेले आहेत. यातील एक किंवा अनेक प्रकार आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत असू शकतात, आणि मग त्याचा परिणाम आपल्या वर्तनावर आणि स्वस्थतेवर होतो. वाचताना वर वर सगळ्याच थिंकिंग पॅटर्न्समध्ये साम्य वाटेल पण त्यात सूक्ष्म भेद आहेत. 

     घडणाऱ्या घटना, गोष्टी, वागणूक इत्यादी काळ्या पांढऱ्या कॅटेगिरीतच पहाणे - टोकाचा विचार करणे. काळ्या आणि पांढऱ्यामधे ग्रे किंवा राखाडी शेड असते हे मान्यच नसणे. उदा. मी एखादी गोष्ट जरी परफेक्‍ट केली नाही तर त्याचा अर्थ मी पूर्णपणे अपयशी आहे, असा विचार करणे. 
     Overgeneralization - आपल्या हातून एखादी जरी चूक झाली तरीसुद्धा "मी एकही काम नीट करू शकत नाही' असा विचार करणे. 
     The mental filter - घडणाऱ्या सकारात्मक, अनुकूल घटनांकडे दुर्लक्ष करणे आणि एखाद्या नकारात्मक किंवा प्रतिकूल घटनेवरच लक्ष केंद्रित करणे. 
     Diminishing the positive - कौतुकास्पद काम झालं आणि कोणी अभिनंदन केलं तरी ते अभिनंदन केवळ मला बरं वाटावं म्हणून केलेलं आहे. खरं तर काम काही इतकं चांगलं झालं नाही, असा सारखा विचार करणे. 
     Jumping to conclusions - सारासार विचार न करता निगेटिव्ह मत बनवून टाकायचं. कुठलाही सबळ पुरावा किंवा तर्कविचार हाताशी नसताना प्रतिकूल गोष्टच घडेल हा जणू निर्णयच करून टाकायचा. उदा. कंपनीमधे माणसं काढणार आहेत अशी न्यूज आहे. त्यात माझा नंबर नक्की असणार. माझी नोकरी जाणार. माझं कुटुंब रस्त्यावर येणार. 
     Emotional reasoning - आपल्याला जसं वाटतंय तेच खरोखरचं वास्तव किंवा वस्तुस्थिती आहे असं मानून चालणं. उदा. एकुणात मी अपयशीच आहे असं मला वाटतं. आता मला आतून तसं वाटतंय म्हणजे तसंच असलं पाहिजे. 
     'Shoulds' and 'should-nots' - स्वतःला "च' च्या कुलपात अडकवून टाकणं. म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडून विशिष्ट पद्धतीनं झालीच पाहिजे. झाली"च' पाहिजे हा अट्टहास असतो. किंवा एखादी गोष्ट माझ्याकडून होता"च' कामा नये. तशी ती झाली "च' किंवा झाली"च' नाही तर स्वतःवर विलक्षण चिडचिड चिडचिड होते. पर्यायाने मन:स्वास्थ्य बिघडते. आजूबाजूच्या वातावरणावर आणि व्यक्तींवरही विपरीत परिणाम होतो. 
     Labeling - पूर्वी आलेल्या लहानशा अपयशामुळे आपण म्हणजे "मूर्तिमंत अपयश' असं लेबल स्वतःला लावून टाकायचं आणि या गैरसमजुतीच्या प्रभावाखाली सतत दडपणाखाली राहायचं. आपल्या कडून चांगलं असं काही होऊच शकणार नाही हे जणू ठरवूनच टाकायचं. 
     Personalising - काही विपरीत, प्रतिकूल घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर दोष स्वतःकडे घेण्याची प्रवृत्ती. आपणच या चुकीला जबाबदार आहोत. आपण असे वागलो म्हणून हे असं प्रतिकूल घडलं असा विचार करण्याची सवय. 
     Magnification - आपल्या बाबतीत सगळं छान घडत असताना, घडलेलं असताना, ते दुर्लक्ष करून एखादी लहानशी कमतरता उगाळत बसणे. घडलेल्या सकारात्मक गोष्टींपेक्षा लहानशा नकारात्मक गोष्टीलाच महत्त्व देत बसणे. ती मोठी करून पहाणे. 

आपली विचार करण्याची पद्धत वरील प्रकारात मोडते का हे तपासायला हवं. या सगळ्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धती आपलं मन:स्वास्थ्य बिघडवून टाकतात. आपल्या प्रगतीच्या आड येतात. 

आपली मन:स्थिती ही ब्रेन केमिस्ट्री वर अवलंबून असते. प्रत्येक विचार मग तो सकारात्मक असो वा नकारात्मक आपल्या ब्रेन केमिस्ट्री वर परिणाम करतो. सकारात्मक विचार ब्रेन केमिस्ट्रीमधे चांगले बदल घडवून आणतात आणि मन:स्थिती स्वस्थ, शांत तरीही उत्साही बनत जाते. आपण कार्य प्रवृत्त होतो; आणि मुख्य म्हणजे जीवनातला प्रत्येक क्षण रसरसून आनंदानं जगायला प्रवृत्त होतो. 

आणि मग पुन्हा एकदा आपण आकाशाची अपार निळाई अनुभवायला लागतो. आपली नजर ढगांच्या शांत हालचालीचा पाठलाग करू लागते. ती शांतता, प्रसन्नता आपल्या आत उतरू लागते. स्वस्थतेकडे आपला प्रवास सुरू होतो. 

Norman Vincent Peale- 'There is a basic law that Like attracts Like. Negative thinking Definitely attracts Negative results. Conversely, if a person habitually thinks optimistically and hopefully, his Positive thinking sets in motion creative forces and success instead of eluding him flows towards him.'

फोटो फीचर

संबंधित बातम्या